Biodiversity register: आंबा गावाचं जैवविविधता रजिस्टर तयार करायचं आम्ही ठरवलंय...

चार दिवसापूर्वी काही कामानिमित्त अचानक मला माझ्या आंबा (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) गावी जावे लागले. रात्री गाडीत बसलो आणि माझे मित्र संजय पाटील यांचा फोन आला.
Biodiversity Register
Biodiversity Register Agrowon

चार दिवसापूर्वी काही कामानिमित्त अचानक मला माझ्या आंबा (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) गावी (Amba Village) जावे लागले. रात्री गाडीत बसलो आणि माझे मित्र संजय पाटील यांचा फोन आला.

पाटील हे बाएफ (BAIF) संस्थेत विविध पिकांच्या देशी बियाण्यांचे (Indigenous Seed) अभ्यासक आणि विस्तारक म्हणून काम करतात. ते म्हणाले की, मी उद्या कोल्हापूरला एका कार्यक्रमासाठी येत आहे, सोबत देशी बियाणे प्रदर्शन (Desi Seed Exhibition) आहे, भेटूयात.

मी म्हणालो, ‘‘आंब्यात या, आमच्या अंबेश्वर विद्यालयातील शिक्षक आणि मुलांना आपले प्रदर्शन पाहायला मिळेल. आणि महत्वाचे म्हणजे मुलांना बियाणे संवर्धनासाठी जागरूक करुयात.''

लगेचच मी आंबा गावातील माझे शिक्षक बंधू सुनील गद्रे आणि मित्र प्रसाद बेंडके यांना फोन केला. काही मिनिटांत शाळेचे मुख्याध्यापक श्री. पाटील सरांचा तात्काळ होकार मिळाला.

वेळ सकाळी दहा. मी, सुनील, संजय यांनी मिळून भात, नाचणी, मका, ज्वारी, वरी आणि भाजीपाला पिकांच्या जवळपास दीडशे जातींचे प्रदर्शन मांडले.

आम्ही तयार झालो आणि काही मिनिटांत ८ वी आणि ९ वी चे विद्यार्थी हॉलमध्ये जमा झाले. आणि सुरू झाली पिकांच्या देशी जातींच्या संवर्धनाची चर्चा आणि माहितीची देवाणघेवाण.

सर, आमच्या वाडीत पाटलाच्या अंगणात शेप्या आंबा हाय, डोंगराकडल्या रानात गोटी आंबा गावतोय, चाळणवाडीत शेम्बड्या फणस बी दिसतोय बघा, लई गोड.. रानभाज्या तर मायंदाळ...करवंद, जांभूळ, अळू, तोरणं या बघायला... मुले-मुली उत्स्फुर्तपणे बोलू लागली...

Biodiversity Register
Biodiversity : जैवविविधतेसाठी ३० टक्के भूभाग, जलसाठे संरक्षित

जवळपास दीड तास आमचा संवाद झाला. मग आम्ही विद्यार्थ्यांना एक उपक्रम दिला. घरी गेल्यावर आज्जी, आजोबाला विचारायचे की, तुम्ही लहान असताना तुमच्या रोजच्या जेवणात काय असायचे? भाजी, भाकरी, पालेभाज्या, हंगामी फळे कोणती असायची?

दुसऱ्या दिवशी हेच प्रश्न आई, वडिलांना विचारायचे आणि तिसऱ्या दिवशी सध्या तुमच्या रोजच्या जेवणात कोणती भाजी, भाकरी, हंगामी फळे असतात, याची तीन स्वतंत्र कागदावर नोंद करायची. यावरून आपण गेल्या ५० वर्षांमध्ये आपल्या आंबा गावातील आणि आपल्या रोजच्या जेवणातील काय जैवविविधता गमावली हे लक्षात येईल.

Biodiversity Register
Animal Biodiversity : शाश्वत विकासासाठी पशू जैवविविधता संवर्धन

विद्यार्थी हे ऐकून खरोखर गंभीर झाले. हेच आम्हाला अपेक्षित होते. मग आम्ही सर्वांनी मिळून एक संकल्प केला की, मुला-मुलींचे गट पाडून पुढील चार महिन्यात गावशिवारातील विविध पिके, त्यांच्या देशी जाती, रानफळे, डोंगरी गवत, रानभाज्या तसेच दिसणारे पशू पक्षी, वनस्पती यांच्या नोंदी शाळेतील शिक्षकांच्या मदतीने ठेवायच्या.

मुला-मुलींनी गावशिवारातील रानभाज्या आणि त्याची रेसिपी लिहून एक पाककृती पुस्तक तयार करायचे. मुली एकदम खुश होत्या. त्यांनी जवळपास १५ रानभाज्या आम्हाला सांगितल्या; ज्यांची नावे आम्हाला देखील माहिती नव्हती.

आमचं आता पक्कं ठरलंय की, येत्या चार महिन्यांत आपणच आपल्या आंबा गावाचे जैवविविधता रजिस्टर तयार करायचे आणि १५ ऑगस्ट रोजी झेंडा वंदन झाले की, ते ग्रामपंचायतीकडे द्यायचे.

गावाने काय गमावले आणि ते परत मिळून सर्वांनी एकत्र येऊन संवर्धन करायचे, याचा संकल्प आम्ही सोडलाय.

या चर्चेतून आम्हाला मुला-मुलींनी आंबा गाव शिवारातील दुर्लक्षित ३ देशी आंबा जाती, २ फणस जाती शोधून दिल्यात, हेच आमच्या धडपडीचे फलित म्हणावे लागेल.

या मुलांच्या मनात एक शाश्वत बीज पेरलंय. त्यातून नवीन काही तरी नक्कीच उगवून येणार, हा विश्वास आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com