Agricultural Drone : फवारणीसाठी ड्रोनचा वापर करताना काय काळजी घ्यावी?

ड्रोनचा वापर विविध कार्यासाठी होऊ लागला असला तरी शेतीमध्ये प्रामुख्याने फवारणीसाठी त्यांचा वापर वाढत आहे. त्याविषयी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकताही असल्याने तो वाढत जाण्याची शक्यता आहे. या लेखामध्ये ड्रोनद्वारे फवारणी करताना कोणत्या काळजी घ्यावीत, याची माहिती घेऊ.
 Drone Spraying
Drone SprayingAgrowon

सामान्यतः शेतामध्ये ज्या वेळी फवारणी करतो, त्या वेळी आधी त्या शेताचे क्षेत्र आपण निर्धारित केलेले असते. त्याच प्रमाणे पिकाच्या कॅनोपीनुसार एकूण फवारणीसाठी किती द्रावण लागेल, कीडनाशकांचे शिफारशीत प्रमाण लक्षात घेऊन संबंधित कीडनाशकाची (Pesticide) तजवीज केली जाते.

त्यानंतर प्रत्यक्ष शेतामध्ये फवारणी करताना द्रावण तयार करून फवारणीच्या साधनामध्ये भरले जाते. फवारणी यंत्राच्या नोझल अन्य सर्व बाबी व्यवस्थित कार्यरत आहेत, त्यामध्ये कोठे गळती नाही, याची खात्री करून घेतो.

या साऱ्या प्रक्रिया ड्रोनच्या फवारणीमध्ये (Spraying by drone) कराव्याच लागतात. मात्र हे नवीन तंत्रज्ञान असल्यामुळे आणखी काही प्रक्रिया किंवा पायऱ्या कराव्या लागतात.

१. जीपीएस कॅलिब्रेशन : ड्रोनचे अचूक स्थान निश्चित करण्यासाठी.

२. उड्डाण पूर्व तपासणी : ड्रोनचे विविध घटक उदा. पाते, रोटर, बॅटरी, टाकी, फवारणी प्रणाली, इ. एकमेकास तसेच ड्रोनच्या सांगाड्यास व्यवस्थित जोडले असल्याची खात्री करावी. त्यातील एखादा घटक सैल असेल तर तो व्यवस्थित करून घ्यावा.

३. उड्डाण नियोजन : ड्रोन जर स्वयंचलित स्थितीमध्ये (Autonomous mode) वापरायचा असेल तर ज्या क्षेत्रावर ड्रोनद्वारे फवारणी करावयाची आहे, त्या क्षेत्राची ड्रोनच्या उड्डाण नियंत्रकाद्वारे आखणी करणे. थोडक्यात आपल्या उड्डाण क्षेत्राच्या सीमा निश्चित करणे.

 Drone Spraying
Agricultural Drone : शेतीमध्ये ड्रोन वापरण्यासाठी सरकारकडून कोणत्या परवानग्या घ्याव्या लागतात?

४. ड्रोन टाकीत फवारणी द्रावण भरणे : ज्या रसायनाची फवारणी करावयाची आहे, त्याचे पाण्यामध्ये शिफारशीत प्रमाणामध्ये द्रावण तयार करून घ्यावे. ते व्यवस्थितपणे टाकीमध्ये भरणे.

५. ड्रोन घटकाच्या कार्यासंबंधी योग्य त्या माहितीची नोंद करणे : ड्रोनच्या उड्डाण नियंत्रकाद्वारे ड्रोन उडविण्यासंबंधीच्या घटकाची माहिती त्यात नोंदवावी लागते.

उदा. ड्रोन किती वेगाने उडवायचा आहे (drone speed), जमिनीपासून किती उंचीवरून उडवायचा आहे (drone height), प्रत्यक्ष फवारणी करतेवेळी ड्रोनद्वारे किती रुंदी कव्हर करणे अपेक्षित आहे इ.

६. ड्रोन उड्डाणासाठी सज्ज : वरील प्रमाणे सर्व माहिती भरल्यानंतर ड्रोन आता उड्डाणासाठी सज्ज आहे. स्वयंचलित स्थितीमध्ये (Autonomous mode) ड्रोन उडविणार असल्यास उड्डाण नियंत्रकाद्वारे ड्रोनला उड्डाणाची सूचना दिली जाते.

त्यानंतर ड्रोन फवारणीसाठी आखणी केलेल्या क्षेत्राकडे म्हणजेच फवारणी क्षेत्राकडे उड्डाण घेतो. मनुष्यचलित स्थितीमध्ये (Manual Operation) नियंत्रकाद्वारे ड्रोनचे उड्डाण व संचलन फवारणी क्षेत्राकडे करावे लागते.

७. ड्रोनचे प्रत्यक्ष उड्डाण : स्वयंचलित स्थितीमध्ये ड्रोन उड्डाणासाठी विहित केलेल्या जसे की गती, उंची, रुंदी इत्यादी घटकानुसार फवारणी करतो. फवारणी पूर्ण झाल्यानंतर ज्या जागेवरून ड्रोन उडविला गेला होता, त्या जागेवर परत येतो. मनुष्यचलित स्थितीमध्ये मात्र ड्रोन उड्डाणाचे विविध घटक ड्रोनच्या नियंत्रकाद्वारे नियंत्रित करावे लागतात.

८. उड्डाण मिशनदरम्यान निरीक्षण : ड्रोनद्वारे फवारणी कार्यक्षमपणे किंवा एकसारखी झाली की नाही, हे तपासून घ्यावे. हे करण्यासाठी पिकांमध्ये विशिष्ट ठिकाणी विशिष्ट प्रकारचे कागद (water sensitive papers) फवारणी आधी पिकाच्या उंचीवर लावून घ्यावेत.

फवारणी झाल्यावर त्या कागदावर पडलेल्या द्रवबिंदूची पाहणी करून सर्व ठिकाणी योग्य प्रकारे फवारणी झाली आहे की नाही, याची माहिती मिळते.

वर वाचताना आपल्याला ड्रोनद्वारे फवारणी करताना करावयाच्या प्रक्रिया वेळखाऊ वाटू शकतात. मात्र थोडेसे कौशल्य प्राप्त झाल्यानंतर आणि एकूणच प्रक्रियेची सवय झाल्यानंतर त्या सहजपणे आणि अत्यंत कमी वेळामध्ये करता येतात.

याबाबत पहिल्यांदा ट्रॅक्टरद्वारे एखादे अवजार चालवताना किती वेळ लागला होता आणि आता तेच अवजार चालवताना किती वेळ लागतो, याचा विचार करून पाहा.

ड्रोनद्वारे फवारणी करताना पुढील बाबींकडे लक्ष द्यावे...

१) ड्रोन उड्डाण घटक

-ड्रोन फवारणी करीत असताना त्याचा उडण्याचा वेग साधारणतः ४.५ ते ५.० मीटर प्रति सेकंद एवढा असावा.

-सर्वसाधारणपणे ड्रोन उडताना त्याची पिकापासूनची उंची १.५ ते २.५ मीटर असावी.

-पीक ड्रोनच्या उड्डाणामुळे लोळू शकणारे असल्यास ड्रोनची पिकापासून उंची २.० ते २.५ मीटर एवढी असावी.

 Drone Spraying
Agricultural Drone : किसान ड्रोन योजनेबाबत मोठी माहिती

२) निविष्ठा मापदंड

अ) कीटकनाशके, बुरशीनाशके आणि वनस्पती वाढ नियामक (जैव-कीटकनाशके आणि वनस्पतिजन्य किटकनाशकासह) यांचा समावेश असलेली नोंदणीकृत कीटकनाशके फार्मूलेशन्स यांना भारतात नॅपसॅक स्प्रेअरद्वारे माणसांच्या साह्याने फवारणी करण्याची परवानगी आहे.

मात्र १८ एप्रिल २०२२ रोजी प्रकाशित मेमोरॅंडमद्वारे ड्रोनद्वारे व्यावसायिक वापरासाठी तात्पुरती (दोन वर्षासाठी) मान्यता देण्यात आली आहे.

ब) प्रतिहेक्टर मूलद्रव्य अथवा कीटकनाशके याची मात्रा प्रचलित पद्धतीने फवारणी करीत असताना जेवढी असते तेवढीच असावी. मात्र पाण्याचे प्रमाण पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत प्रती हेक्टर २० लिटर, व पिकाच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेत अथवा दाट वाढणाऱ्या पिकामध्ये प्रतिहेक्टर २५ ते ३० लिटर एवढे असावे.

३) पर्यावरणीय मापदंड

-उन्हाळ्यामध्ये फवारणीचा काळ हा साधारणपणे सकाळी ६ ते १० व दुपारी ३ ते ६ चे दरम्यान असावा.

-हिवाळ्यामध्ये सकाळी ८ ते ११ व दुपारी २ ते ५ च्या दरम्यान फवारणी करावी.

-सर्वसाधारणपणे फवारणी करीत असताना तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस पेक्षा कमी, आर्द्रता ४५ ते ५५ टक्क्यांपेक्षा जास्त व वाऱ्याचा वेग ३ ते ३.५ मीटर प्रतिसेकंद पेक्षा कमी असावा. पाऊस असताना अर्थातच फवारणी करू नये.

टीप : वर नमूद केलेले मापदंड हे मार्गदर्शक आहेत. सविस्तर माहितीसाठी भारत सरकारच्या ‘कृषी व शेतकरी कल्याण’ विभागाने प्रसारित केलेल्या प्रमाणित कार्य पद्धतीचा (Standard Operating Procedure) संदर्भ घ्यावा. त्याच प्रमाणे रसायनाची फवारणी करताना प्रचलित पद्धतीमध्ये ज्या काळजी व निगा घेणे अत्यावश्यक आहेत, त्या ड्रोनद्वारे फवारणीवेळीही नक्कीच घ्याव्यात.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये ड्रोनची निगा, काळजी कशी घ्यावी, या सोबतच ड्रोन उडविण्याचे व फवारणी करण्यासंदर्भातील प्रशिक्षणही दिले जाते. त्याचे प्रमाणपत्रही दिले जाते. यासंदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क इमेल ः caast.csawm2018@gmsil.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com