Dairy Industry : पंजाबच्या पशुपालकांच्या यशाचे गमक

पंजाबातील पशुपालक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आघाडीवर आहेत. पशुपालकांनी तेथील वातावरणातही चांगले दुग्धोत्पादन देणाऱ्या ‘पंजाब होल्स्टिन फ्रिजियन’ गाईंचा प्रसार केला आहे.
Milk Production
Milk ProductionAgrowon

Indian Dairy Industry आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत देश दूध उत्पादनात (Milk Production) आघाडीवर असला तरी एका जनावरापाठीमागे दूध उत्पादन पाहिले, तर फार मागे आहे. प्रति माणशी दूध उपलब्धता फार कमी आहे. आपल्या देशातील दूध उत्पादनाचा विचार केला, तर उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर असून, प्रति माणशी दूध उपलब्धता ३४८ मिलि प्रति दिवस आहे.

महाराष्ट्राचा दूध उत्पादनात (Maharashtra In Milk Production) सातवा क्रमांक असून, प्रति माणशी दूध उपलब्धता २४३ मिलि प्रति दिवस आहे. देशाचा विचार केला, तर एकंदरीत दूध उत्पादनात पंजाब राज्याचा पाचवा क्रमांक असला, तरी प्रति माणशी दूध उपलब्धता १०७५ मिलि प्रति दिवस आहे.

Milk Production
Milk Processing : दूध प्रक्रिया उद्योगात तयार झाला ब्रॅण्ड

दुग्ध व्यवसायात (Dairy Industry) प्रगती करायची असेल, तर आपल्याला पंजाब राज्यातील पशुपालकांकडून बऱ्याच नवीन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. दुग्ध व्यवसायाला एका कंपनीचे स्वरूप दिले पाहिजे.

पंजाबमधील पशुपालक जागतिक पातळीवर अभ्यासदौरे करून नवीन तंत्रज्ञान शोधून ते कमी खर्चात तयार करून दुग्ध व्यवसायाच्या वाढीसाठी वापरतात.

गोठा व्यवस्थापनातील तंत्र ः

पंजाब ः

१) कमी मजुरांमध्ये गोठ्याचे नियोजन, यांत्रिकीकरणावर भर. १०० ते १५० गाईंचा गोठा २ ते ३ मजुरांवर चालतो.

२) मुक्तसंचार गोठ्याची शेड उंच, हवेशीर. प्रति गाय फिरण्यासाठी मुबलक जागा, आरामशीर चारा खाता येईल अशी गव्हाण, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, गाईंना बसण्यासाठी मऊ आरामदायी जागेची उपलब्धता.

३) गाभण गाई, नुकत्याच व्यालेल्या गाई, जास्त दूध देणाऱ्या गाई, आजारी गाईंसाठी स्वतंत्र कप्पे. वासरांसाठी वयोमानानुसार पाळणाघर, ग्रोअर, हिफर विभाग.

४) उन्हाळ्यात तापमान नियंत्रणासाठी स्प्रिंकलर, फॉगर्स, पंख्यांचा वापर. हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून शेडनेटचा वापर. ऋतुमानानुसार जनावरांना आहार.

Milk Production
Milk Production: जास्त दूध देणारी कालवड मिळवण्यासाठी काय करावे?

महाराष्ट्र :

१) मजूर कमतरतेमुळे पशुपालक जनावरांची संख्या वाढवत

नाहीत. तसेच यांत्रिकीकरण कमी.

२) जनावरे बांधून ठेवण्याचा जास्त कल. मुक्तसंचार गोठे लहान आकाराचे, जनावरांना कमी जागा. गोठ्यातील जागा मुरुमाची असल्याने गाईंच्या कासेला, सडास त्रास.

३) जनावरांच्या गरजेप्रमाणे गोठ्याचे विभाग नाहीत. वासरांना वेगवेगळे कप्पे नाहीत. त्याचा आरोग्य आणि उत्पादनावर परिणाम.

४) शेडची उंची कमी, गोठा वाढविताना अपूर्ण नियोजन. हवेशीरपणाचा अभाव, तापमान नियंत्रण करण्यासाठी फॉगर, स्प्रिंकलर आणि पंख्यांचा वापर कमी. ऋतुमानाच्या गरजा ओळखून आहार प्रणाली ठरविण्याचे प्रमाण कमी.

प्रजनन व्यवस्थापन ः

पंजाब ः

१) चांगली वंशावळ तयार करण्यावर भर, खास वंशावळ निर्मितीचा आराखडा. गोठ्यामध्ये कोणत्या गुणधर्माची गाय आहे आणि जन्मणारे वासरू कोणत्या गुणधर्माचे आपणास मिळवायचे आहे, यासाठी वळू निवडीसाठी विशेष लक्ष. उच्च गुणवत्तेच्या रेतमात्रा आयात करून त्याचा गरजेप्रमाणे वापर.

२) वळूंची निवड करण्यासाठी त्या वळू मातेच्या दूध उत्पादनाबरोबर गुणवत्ता, आजारी पडण्याचे प्रमाण, विण्याच्या वेळी अडचण नसणारी, कासेची चांगली ठेवण असणारी, पोटाचा आकार चांगली असणारी आणि कोणतेही वातावरणामध्ये सहनशीलता जास्त असलेल्याची क्षमता तपासणी.

यातील आपल्या गाईमध्ये कोणते गुणधर्म जास्त आहेत किंवा कमी आहेत याचा परिपूर्ण अभ्यास करूनच कृत्रिम रेतनासाठी रेतमात्रांचा वापर. गोठ्यातील द्रव नत्र कंटेनरमध्ये रेतमात्रा उपलब्ध.

Milk Production
Gokul Milk Rate : ‘गोकूळ’च्या म्हैस, गायीच्या दूध खरेदीदरात २ रुपये वाढ

३) गुणवत्तापूर्ण सॉर्टेड सीमेनचा वापर. खर्च वाढला तरी जातिवंत कालवड गोठ्यात तयार होते. या कालवडीस चांगली किंमत मिळते.

४) कालवडी तयार करून विकण्याचा मुख्य व्यवसाय. कालवडी जन्माला यायच्या अगोदरच १ ते २.५ लाख रुपयांपर्यंत आगाऊ नोंदणी, जातिवंत पैदाशीवर भर.

महाराष्ट्र :

१) आपल्याकडे केवळ कृत्रिम रेतन करावयाचे आहे याकडेच कल. फारच कमी पशुपालक निवड प्रक्रिया करून नियोजित कालवड निर्माण करण्यासाठी आग्रही.

२) फार कमी पशुपालक गाईला कृत्रिम रेतन करताना कोणत्या गुणधर्माच्या वळूची रेतमात्रा वापरली याची चौकशी करतात. जनावरांची संख्या कमी असल्याने स्वतंत्र कंटेनर ठेवत नाहीत, त्यामुळे कृत्रिम रेतन सेवक ज्या रेतमात्रांचा पुरवठा करतील त्यावरच विसंबून राहावे लागते.

परंतु आता आयडीएफएसारखी पशुपालकांची संघटना पुढे येऊन चांगल्या रेतमात्रा वापरल्या जात आहेत. संकरित गाईंचा ‘महाराष्ट्र हिरकणी‘ ब्रीड तयार करण्याचा प्रयत्न.

३) सॉर्टेड सीमेन जास्त खर्चिक असल्याने बरेचसे पशुपालक या तंत्रज्ञानाकडे वळले नाहीत. परंतु महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अनुदानावर रेतमात्रा उपलब्ध, त्याचा वापर आवश्यक.

४) युवा पशुपालक जातिवंत दुधाळ पैदास तयार करत आहेत. दुग्धोत्पादनाच्या बरोबरीने जातिवंत कालवड तयार करण्यावर भर. त्यामुळे जातिवंत गाई खरेदीसाठी पंजाब किंवा बंगळूरला जाण्याची आवश्यकता नाही.

पशुपालकांना दिशा देणारी ‘पीडीएफए‘ संस्था ः

शासन, सहकारी दूध संघ तसेच खासगी दूध संकलन कंपनीवर अवलंबून न राहता पंजाबमधील पशुपालकांनी एकत्र येत १९७२ मध्ये कॅप्टन कमलजितसिंह यांच्या नेतृत्वाखाली ‘पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशन’ (पीडीएफए) ही संस्था स्थापन केली.

गेल्या काही वर्षांत संस्थेचे कार्य जागतिक पातळीवर गेले आहे. संस्थेमध्ये पशुपालक ठरावीक वर्गणी जमा करतात.जो पशुपालक दूध उत्पादनात अग्रेसर आहे, त्याला संस्थेचे अध्यक्ष बनवितात.

१) दर महिन्याला चर्चासत्रामध्ये अनुभवी पशुपालक, अभ्यासू तज्ज्ञ तसेच परदेशातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन.

२) आधुनिक यंत्रसामग्री, औषधे, खाद्यपूरके, चांगल्या गुणवत्तेच्या रेतमात्रा तयार करणाऱ्या कंपन्यांसोबत करार. योग्य दरात उत्पादनांच्या उपलब्धतेसाठी पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी सोल्यूशन कंपनीची स्थापना.

३) आधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज गोठा व्यवस्थापनाबाबत सल्ला, मार्गदर्शन. कमीत कमी पशुखाद्य आणि अधिक गुणवत्तेचा चारा वापरून आहार संतुलन, लसीकरण, जंत निर्मूलनाबाबत मार्गदर्शन. मुरघास तंत्रज्ञानावर भर.

४) प्रति दिन ५० ते ६० लिटर दूध उत्पादन असणाऱ्या पंजाब होल्स्टिन फ्रिजियन जातीची निर्मिती. यासाठी निवड पद्धतीने प्रजनन तंत्र विकसित.

५) दरवर्षी डिसेंबर महिन्यात जग्राव येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पशू प्रदर्शन. देश, परदेशातील कंपन्यांचा सहभाग. पशुपक्षी प्रदर्शन, चर्चासत्रांचे आयोजन.

Milk Production
Napier Grass: दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नेपियर घास का ठरतेय वरदान?

आहार व्यवस्थापनाचे नियोजन ः

पंजाब ः

१) जनावरांच्या आहारावर जास्त लक्ष. खाद्य प्रमाणाबरोबरीने गुणवत्तापूर्ण संतुलित खाद्यावर भर. जनावराचे पोट हे चाऱ्यासाठी तयार झालेले असून, अधिक सकस चारा दिल्यास दूध उत्पादन, आरोग्य, प्रजनन चांगले राहते.

उत्पादन खर्च कमी येतो. दूध उत्पादनाच्या तुलनेने कमी पशुखाद्य आणि अधिक गुणवत्तेचा भरपूर हिरवा चारा दिला जातो.

२) हिरव्या चाऱ्यामध्ये एकदल मका, ओटचे प्रमाण अधिक. द्विदल चाऱ्यामध्ये बरसिमचे प्रमाण. एकदल चारा मुरघासाच्या माध्यमातून दिला जातो, ताजे कापलेले बरसीम दिले जाते. काही पिकांच्या उपपदार्थांचा आहारात वापर करून खर्च कमी करण्याचा प्रयत्न. उदा. बीट पल्प.

३) आहारात गव्हाच्या काडाचा वापर. गव्हाचे काड साठवून वर्षभर गरजेप्रमाणे संपूर्ण मिश्र आहारात वापर. यातून जनावरांना आवश्यक तंतुमय पदार्थ मिळाल्याने संपूर्ण आहाराचे योग्य पद्धतीने पचन.

४) दिवसातून १ ते २ वेळा भरपूर प्रमाणात आहार. दुसऱ्यावेळी ज्या वेळी आहार टाकायला जातो, त्या वेळी थोडा अगोदरचा आहार शिल्लक. आहारात मिक्सर व्हॅगनचा वापर करून वेगवेगळ्या दूध देण्याच्या क्षमतेप्रमाणे संपूर्ण मिश्र, संतुलित आहाराचे नियोजन.

५) संपूर्ण मिश्र आहार (टीएमआर) हे तंत्रज्ञान अधिक दूध उत्पादनासाठी महत्त्वाचे. यामध्ये ओला चारा, मुरघास, सुका चारा, पशुखाद्य, खनिज मिश्रण आणि इतर खाद्यापूरके एकाच वेळी मोठ्या मिक्सर व्हॅगनमध्ये चांगल्याप्रकारे मिसळली जातात.

गाईच्या गरजेप्रमाणे आवश्यक ते वेगवेगळे अन्नघटक मिसळून वेगवेगळ्या आहाराची निर्मिती. हा पूर्ण आहार असल्याने कोठी पोटाचे आरोग्य चांगले, योग्य पचन. गाईंना २४ तास स्वच्छ पाणी मिळेल याची दक्षता.

६) लहान वासरांना मुबलक दूध पाजले जाते. त्यानंतर गरजेप्रमाणे मिल्क रिप्लेसर, काल्फ स्टार्टर, काल्फ ग्रोव्हर, हिफर ग्रोव्हर असे खाद्य. योग्यवेळी जंतनाशक, लसीकरण. चांगली वंशावळ असलेली वासरे ९ ते ११ महिन्यांत योग्य वजन मिळवून माजावर येतात. पहिल्याच वेतात ३५ ते ४० लिटर दूध देतात.

महाराष्ट्र :

१) पशुपालक आजही चांगल्या गुणवत्तेचा चारा देऊ शकत नाही, त्यामुळे पशुखाद्यावर अवलंबून राहावे लागते. यातून खर्च वाढतो. आहार संतुलित करून देणे, त्यामध्ये आवश्यक प्रमाणात तंतुमय पदार्थांचा समावेशाचा फारसा विचार केला जात नाही. या सर्वांचा परिणाम दूध उत्पादन आणि खर्चावर होतो.

२) चांगल्या गुणवत्तेच्या चारा निर्मितीसाठी गुंतवणूक आणि नियोजन नाही. काही पशुपालक मोठ्या प्रमाणात फक्त वाढे आणि उसाचा आहारात समावेश करतात. याचा परिणाम दूध उत्पादकता, आरोग्य, प्रजनन क्षमतेवर होतो.

३) गव्हाच्या काडाला विशेष महत्त्व देत नाहीत. हिरव्या चाऱ्याच्या पचनास आवश्यक असणारा सुका चारा न मिळाल्याने नुकसान. सकस हिरवा चारा किंवा महागडे पशुखाद्य वापरून सुद्धा चांगल्या गुणवत्तेचे दूध उत्पादन मिळत नाही.

४) दिवसातून जास्त वेळा आहार दिला जातो, परंतु तो मुबलक किंवा आवश्यकतेनुसार दिला जात नाही. दिवसातून जास्त वेळा चारा टाकतो, परंतु थोड्याच वेळात जनावरे चारा संपवतात. पुन्हा चाऱ्याची वाट पाहतात. गव्हाणीत चारा शिल्लक राहत नाही.

५) टीएमआरचा वापर अत्यल्प प्रमाणात. हिरवा चारा, सुका चारा आणि पशुखाद्य वेगवेगळे दिले जाते. त्याचा आहाराच्या पचनावर परिणाम. आवश्यक त्या प्रमाणात दूध उत्पादन मिळत नाही.

६) वासराला अत्यंत कमी दूध. काल्फ स्टार्टरचा वापर कमी आणि चाऱ्याचा वापर वाढल्याने पोट मोठे व पाय छोटे असलेली वासरे तयार होतात. अशी वासरे माजावर येण्यास दीड ते दोन वर्षे घेतात.

७) जनावरांना दोनदा किंवा तीनदा पाणी पाजतात. परंतु २४ तास गरजेप्रमाणे पाणी फार कमी ठेवतात. त्यामुळे आवश्यक त्या प्रमाणात आहाराचे पचन होत नाही. याचा परिणाम उत्पादकतेवर होतो.

यांत्रिकीकरणाकडे कल ः

पंजाब ः

१) मजुरांच्या तुटवड्यामुळे कमी खर्चात जास्तीत जास्त यांत्रिकीकरणावर भर.

२) मुक्तसंचार गोठा, शेण गोळा करण्याचे यंत्र, दूध काढण्यासाठी मिल्किंग पार्लर, स्वयंचलित ग्रुमिंग ब्रश, तापमान नियंत्रणासाठी स्वयंचलित फॉगर्स/स्प्रिंकलर, टोटल मिक्स रेशन यंत्र, चारा कुट्टी यंत्र, चारा कापणी यंत्र, मुरघास करण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रांचा वापर.

महाराष्ट्र ः

१) गोठ्याचा आकार लहान, त्यामुळे महागडे यांत्रिकीकरण परवडत नाही.

२) गेल्या चार वर्षांत बरेच पशुपालक कमी खर्चात मुक्तसंचार गोठा करत असून, गरजेनुसार यांत्रिकीकरणाकडे जात आहेत. यामध्ये चारा कुट्टी यंत्र, दूध काढणी यंत्र, ग्रुमिंग ब्रश, कमी खर्चातील तापमान नियंत्रक प्रणालीचा समावेश.

३) पशुपालक एकत्र येऊन मुरघास निर्मिती, हुफ ट्रीमिंग, कम्युनिटी टीएमआर यंत्रणा विकत घेऊन सामुदायिक वापराकडे वळत आहेत.

पंजाबमधील पशुपालनाची वैशिष्ट्ये ः

पंजाबातील दुग्ध व्यवसाय हा उच्च दर्जाचा असून, येथील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आघाडीवर आहेत. या राज्यात म्हशींपेक्षा गाईंचे जास्त प्रमाणात संगोपन केले जाते. पंजाबमध्ये साहिवाल हा देशी गोवंश तसेच संकरित गाईंमध्ये होल्स्टिन फ्रिजियन गाईंची जास्त संख्या आहे.

येथील पशुपालक कमी दुधाच्या जास्त गाई पाळण्यापेक्षा अधिक दूध क्षमतेच्या कमी गाईंच्या संगोपनावर भर देतो. विदेशी जनावरांची शुद्धता ही प्रजनन करताना ६७.५ टक्क्यांपर्यंतच मर्यादित ठेवली पाहिजे.

जर ही शुद्धतेची मर्यादा वाढली तर गाईमध्ये आपल्या वातावरणात टिकण्याची क्षमता कमी होते, त्या जास्त आजारी पडतात. हे लक्षात घेऊन पंजाबमधील पशुपालकांनी प्रजनन धोरणामध्ये चांगले काम केले आहे.

येथील पशुपालकांनी त्यांच्या वातावरणात टिकेल अशी ‘पंजाब होल्स्टिन फ्रिजियन’ गाईंचा विकास केला आहे. या गाईंचे वैशिष्ट्य म्हणजे होल्स्टिन फ्रिजियन गुणधर्माची शुद्धता ९० टक्के असली, तरी त्यांच्यामध्ये जास्त गुणवत्तापूर्ण दूध देण्याची क्षमता आहे.

Milk Production
Milk Processing : दूध प्रक्रिया उद्योगात तयार झाला ब्रॅण्ड
“आमच्या संस्थेने जागतिक पातळीवर पशुपालनात उपलब्ध असलेले नवीन तंत्रज्ञान पंजाबमधील पशुपालकांना उपलब्ध करून दिले आहे. हे तंत्रज्ञान भारतीय पद्धतीने विकसित करून देशभरातील पशुपालकांपर्यंत आम्ही पोहोचवीत आहोत.”
सरदार दलजित सिंह सरदारपुरा, (अध्यक्ष, पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशन)
‘‘पंजाब अभ्यास दौऱ्यामध्ये आम्हाला कमीत कमी मजुरांमध्ये गोठा व्यवस्थापन, मुक्तसंचार गोठा, मूरघासाचे महत्त्व कळाले. आपल्याच गोठ्यात प्रति दिन ५० लिटरची गाई कशी तयार करावयाची हे शिकलो. यापुढे आम्हाला पंजाब, कर्नाटकमध्ये दुधाळ गाई खरेदीला जावे लागणार नाही.’’
अमोल धुमाळ,९४२१२१५९९६, (आदर्की खु., ता. फलटण, जि. सातारा)

संपर्क ः डॉ. एस. पी. गायकवाड, ९८८१६६८०९९ (महाव्यवस्थापक, गोविंद डेअरी, फलटण, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com