
हळद (Turmeric) हे एक मसाल्याच्या पिकातील प्रमुख नगदी पीक (Cash Crop) म्हणून प्रचलित आहे. भारतातील अनेक राज्याप्रमाणेच महाराष्ट्रात हळदीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे. काढणीनंतर हळदीचा वापर विविध प्रक्रिया (Processing Industry) उद्योगात होतो.
हळदीपासून हळद पावडर, कुरकुमीन, सौंदर्यप्रसाधने, सुगंधी तेलओलीओरिजिन निर्मिती, कुंकू आणि सुगंधी तेलाची निर्मिती केली जाते.
हळद पावडर
हळद पावडर तयार करण्यासाठी प्रथम जाड, मोठ्या हाळकुंडाचा इलेक्ट्रिक मोटर चालणाऱ्या चक्की किंवा मशीनमध्ये भरडा केला जातो.
या भरड्यापासून हळद पावडर तयार केली जाते. पावडर वेगवेगळ्या मेषच्या जाळीतून बाहेर पडून शेवटी ३०० मेषच्या जाळीतून बाहेर पडते. तयार पावडर चार, दहा, पंचवीस किलो आकाराच्या प्लॅस्टिक किंवा कापडी पिशवीमध्ये पॅकिंग करून विक्रीसाठी पाठवावी.
कुरकुमीन
वाळलेल्या हळद पावडर पासून कुरकुमीन नावाचा घटक वेगळा काढता येतो. हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण जातीनुसार दोन ते सहा टक्के असते. हळदीपासून अनेक आयुर्वेदिक औषधे तसेच सौंदर्यप्रसाधने बनविता येतात.
जातीनुसार हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण बदलते. वाळलेल्या हळदीचा पिवळेपणा कुरकुमीनमुळे दिसून येतो. अधिक कुरकुमीन असलेल्या हळदीला बाजारात चांगला बाजारभाव मिळतो.
सौंदर्यप्रसाधने
सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी ज्या आयुर्वेदिक वनस्पतींचे लागवड उपयुक्त ठरते त्यामध्ये हळदीचा सिंहाचा वाटा आहे.
वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये तसेच साबणामध्ये हळदीच्या गुणधर्माचा उपयोग केलेला आढळतो.
सुगंधी तेल
हळद ही मुळातच औषधी व गुणकारी असल्यामुळे तिच्यापासून सुगंधी तेल काढता येते. हळदीच्या ताज्या गड्ड्यापासून पाच ते सहा टक्के तेल मिळते.
हे तेल नारंगी पिवळ्या रंगाचे व हळदी सारखा वास असणारे असते.
रंगनिर्मिती
लोकरी, रेशमी, सुती कपड्यांना पिवळा रंग देण्यासाठी हळदीचा उपयोग करतात. सध्या काही प्रमाणात सुती कपड्यांना हळदीचा रंग देतात. औषधे, कॉन्फेक्शनरी उद्योगात हळदीचा रंगासाठी उपयोग होतो.
ओलीओरिजिन निर्मिती
हळदीच्या भुकटीपासून ओलीओरिजिन काढण्याची पद्धत म्हैसूरच्या केंद्रीय अन्न तंत्र संशोधन संस्थेत प्रमाणित केली आहे.
रंग व स्वादाकरिता ओलीओरिजिन चा उपयोग खाद्यपदार्थांमध्ये करतात म्हणून त्याला चांगली मागणी आहे.
ओलीओरिजिन चे शेकडा प्रमाण पाच ते सात टक्के असून त्यातील व्होलाटाइल तेलाचे प्रमाण १८ ते २० टक्के आहे.
कुंकू
हळदीचे गड्डे मुख्यतः कुंकू तयार करण्यासाठी वापरतात. त्यामध्ये टॅपीओका आणि पांढऱ्या चीकनमातीचे खडे मिसळतात आणि त्यावर सल्फ्युरिक ऍसिड व बोरिक ऍसिडची प्रक्रिया करतात. हे मिश्रण वाळवून दळतात.
अशा प्रकारे हळदीपासून कुंकू तयार करण्याचे कारखाने अमरावती, पंढरपूर, तुळजापूर, पुणे आणि नाशिक येथे आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.