School Education: शाळेत झोपेचा तास ठेवला तर काय होईल?

मी प्राथमिक शिक्षक आहे. मला त्यावर्षी पहिलीचा वर्ग मिळाला होता. निरागस, नितळ, निर्मळ मनाची लहान लहान मुलं म्हणजे साक्षात चैतन्यच. पहिलीतल्या मुलांबरोबर राहायचं, खेळ, गाणी, गप्पागोष्टी आणि भरपूर दंगामस्ती करायची, चिमुरड्यांसोबत राहून त्यांना समजून घ्यायचं... या कल्पनेनेच मी रोमांचित झालो होतो.
School Education
School EducationAgrowon

मी प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) आहे. मला त्यावर्षी पहिलीचा वर्ग मिळाला होता. निरागस, नितळ, निर्मळ मनाची लहान लहान मुलं (Children) म्हणजे साक्षात चैतन्यच. पहिलीतल्या मुलांबरोबर राहायचं, खेळ, गाणी, गप्पागोष्टी आणि भरपूर दंगामस्ती करायची, चिमुरड्यांसोबत राहून त्यांना समजून घ्यायचं... या कल्पनेनेच मी रोमांचित झालो होतो.

School Education
Education System : तुमी मॅडम कशाला झाल्या कायनू?

पहिलीचा वर्ग आल्यावर मुलं आणि मी मस्त हसत खेळत, गप्पागोष्टी करत मजेमजेने नव्या नव्या गोष्टी रोज शिकत होतो. मुलांशी छान दोस्ताना झाला होता. वर्गातलं वातावरण अत्यंत अनौपचारिक कसे राहील यावर माझा कटाक्ष असे. समजून घेणारं उबदार वातावरण आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मिळाल्यानं मुलं मस्त खुलून बोलायला लागली होती. गप्पांच्या ओघात मुलं मनातलं बिनधास्तपणे सांगू लागली होती.

“तुमाला एक सांगायचंय. सांगू का?”

लाडात येऊन साई मला विचारत होता.

“सांग ना रे साई!” मी म्हणालो.

“पण रागावायचं नाही अं, तरच सांगंण. नायतर नाही सांगणार ...”

“अरे बाबा, अजिबात रागावणार नाही, तू सांग तर आधी...”

“दुपारचं जेवल्यावं लई कटाळा येतो. पार झोपच येती.” जरासं गुतत गुततच साईनं त्याचं मनोगत सांगितलं.

“हां सर खरंचये साई म्हणतोय ते. जेवल्यावं त लय कटाळा येतोय. तुमाला नाही माहिती!”

School Education
ZP Education : बंद पडणाऱ्या शाळेला उभारी

स्नेहलने साईच्या सुरात सूर मिसळला.

“जेवण झाल्यावर थोडंसं खेळायचं. मस्त उड्या मारायच्या. भिंतीवर लिहिलेले अक्षरं, शब्द वाचायचे आणि मग वर्गात येऊन बसायचं, चालेल ना?”

मी मुलांसमोर एक ‘प्रस्ताव’ ठेवला. तो बहुतेक मुलांना तो आवडलाही, त्यांना आनंद झाला. साई मात्र त्यावर खुश दिसत नव्हता. त्यालाजवळ घेत, विश्वासात घेऊन विचारल्यावर तो म्हणाला,

“सर, आपल्या शाळेत (त्याला बहुदा वर्गात म्हणायचं असावं.) भाषेचा, गणिताचा, खेळायचा तास असतो ना. तसा झोपेचा तास का बरं नसतो? दुपारी लय झोप येती तवा झोपायचा तास ठेवाया पायजेल...”

“हां, सर लय मज्जा येईल, झोपायचा तास ठेवल्यावं.” आणखी काही मुलांनी साईच्या ‘सूचने’ला ‘अनुमोदन’च दिले!

“आपल्या वर्गातले काही लहान पोरं (ज्यांचं शाळेत नाव घातलेलं नाही, पण वर्गात येऊन बसतात अशी मुलं!) दुपारचं जेवल्यावं लगेच झोपात्यात. त्यांना तुमी खुशाल झोपून देत्या. मग आमाला बी झोप आल्याव तसं थोडा वेळ झोपून द्यायचं...”वैष्णवी म्हणाली.

School Education
Rural Education : ग्रामीण महाराष्ट्रातील शिक्षणगंगा आटणार

“हां सर आता नाही म्हणायचं नाही...”सारी मुलं एका सुरात बोलली. आता मुलांचं बहुमत झालं होतं आणि मी अल्पमतात होतो! मला मुलांचं ऐकणं भाग होतं. मी होकार दिला. मुलांना कोण आनंद झाला. हेहेहेहेsss म्हणत वर्गात एकच दंगा सुरु केला. मुलांचे चेहरे मला अगदीच वाचता येत होते. आवडीची खेळणी विकत घेतल्यावर, नवीन ड्रेस किंवा आवडीची वस्तू/खाऊ मिळाल्यावर जेवढा आनंद होणार नाही, इतका आनंद मुलांना झाला होता! वर्ग डोक्यावर घेऊन त्यांनी तो व्यक्त केला. त्या क्षणी वर्गात जल्लोषपूर्ण वातावरणात जे काही सुरु होतं, तो प्रसंग इथं शब्दांत पकडणं केवळ अशक्य आहे. शिक्षक असल्यानेच अशा अनमोल आनंदक्षणांचे साक्षीदार होण्याचं भाग्य अनेकदा माझ्या वाट्याला आल्याचं समाधान मी अनेकदा अनुभवलंय.

मुलांचं शिकणं शास्रीय पद्धतीनं समजून घ्यायला लागल्यापासून आम्ही शाळेतले कठोर शिस्तीचे वातावरण हद्दपार केलेय. मुलांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब शाळेच्या दैनंदिन कामकाजात पडताना दिसते. एकूण शिक्षण प्रक्रियेचे लोकशाहीकरण करण्याचा आमचा प्रयत्न असतो.

झोपेमुळे मुलं फ्रेश होतात

मुलांच्या मागणीनुसार पहिलीच्या वर्गात दुपारी झोपेचा तास सुरु झाला! जेवण झाल्यावर १० ते १५ मिनिटं मुलं शांतपणे झोपी जातात. रिल्याक्स होतात. उठायचं, चेहऱ्यावर पाणी मारायचं, पाणी पिऊन मस्तपैकी फ्रेश होऊन वर्गात येऊन बसायचं.

विशेष म्हणजे आधी दुपारच्या वेळी मुलांचे चेहरे सुकायचे. मुलं आळसावलेले दिसत असत. आता शाळा सुटेपर्यंत मुलांचा मूड टिकून राहतो. अर्थात वेगवेगळे विषयदेखील आनंददायी पद्धतीने शिकवायचा प्रयत्न असतो, हेही त्याचं एक कारण असावं.

झोपेच्या तासाची अजून एक गंमत सांगायची राहिली. तास सुरु झाला तेव्हा आधी आधी फक्त मुलंच झोपायची. मी वर्गातच काहीतरी लेखी कामकाज करत बसायचो. कोणी डोळे मिटलेले नाहीत, कोण हसतंय, याचं निरीक्षण करत बसायचो.

‘तुमी पण झोपा आमच्याबरोबर...’ असं काही दिवसांनी मुलं म्हणू लागली. ‘आपण कसं काय झोपायचं बॉ? पालक-अधिकारी वर्गात आले तर काय उत्तर द्यायचं?’ असे अनेक विचार मनात आले. मुलांना माझ्या नजरेतून दिसणाऱ्या अडचणी सांगायच्या नव्हत्या. काही दिवस मी आढेवेडे घेतले. काही दिवसांनी माझी मानसिकता तयार झाली. धाडस वाढले. मग मी पण झोपेच्या तासाचा विद्यार्थी झालो! मुलांबरोबर मी झोपू लागलो. लक्षात असं आलं की, त्या घडीभाराच्या विश्रांतीनं आपण किंचित का होईना जास्त क्षमतेनं काम करायला ‘चार्ज’ होतो आहोत.

व्हॉटसअप्सच्या ग्रुप्समध्ये, फेसबुकवर आमचा झोपेचा तास फोटोसह शेअर केल्यावर त्याचं भरपूर कौतुक झालं. झोपेच्या तासाचे अनेक फायदे तिथल्या काही डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या मित्रांनी सांगितले. बौद्धिक काम करून येणारा थकवा किंवा कंटाळा घालविण्यासाठी हा चांगला उपक्रम असल्याचं सांगितलं. वामकुक्षी घेतल्यानं कार्यक्षमता कशी वाढते? याबाबत काही संशोधनं झाल्याची माहितीही मिळाली.

अनेक देशांत झोपेच्या तासाचा प्रयोग

अशी प्रशस्ती मिळाल्यावर मग आमचाही आत्मविश्वास दुणावला. जगभरातल्या काही शाळांमध्ये झोपेचा तास सुरु असल्याचंही समजलं.पाठोपाठ भारतात आसाममध्ये एका शाळेत दुपारी मुलं झोपल्याचा फोटो बातमी एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाली. काही देशांत ऑफिसातच अँटी चेंबरमध्ये विश्रांती घेता येते.

कॉर्पोरेट जगतातली 'पॉवर नॅप' नावाची संकल्पना समजली. 'पॉवर नॅप' म्हणजे कामातून थकवा आल्यावर दुपारच्या वेळला डुलकी घेणे! ही सारी माहिती माझ्यासाठी अगदीच नवीन होती. आपला हा वेडेपणा नसून, आपण योग्य वाटेवर आहोत, याचीही खात्री पटली.

शिक्षक म्हणून मुलांच्या मनात आलेला विचार ऐकून घेतला. तशी कृती केली. तो इतका सर्व व्यापक असू शकतो, याची प्रचीती या निमित्तानं आली. मुलांना भरपूर सांगायचं असतं. घरी-दारी मुलांचं ऐकून घेणारे कमी आणि त्यांना ऐकवणारे लोकं जास्त झालेत, त्यामुळे मुलांच्या कल्पना शक्तीला आम्ही बांध घालून त्यांचं सृजनशील मन संकुचित केल्यासारखं वाटतं. आधी घरी आणि पुढं शाळेत हा मोकळेपणा नसल्यानं तो जगण्याचा स्थायी भाव बनत नाहीये. म्हणून शिक्षणात मुलांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब उमटायला पाहिजे. माणूस म्हणून घडण्यासाठी ते फार आवश्यक आहे, असे वाटते.

वर्गात डुलक्या घेणं चूक आहे का?

पाचवी सहावीत असताना आमचे गणिताचे शिक्षक दुपारच्या सत्रात त्यांच्या तासाला डुलक्या घेणाऱ्या मुलांवर डाफरायचे, खवचटसारखं बोलायचे. तेव्हा मुलांचं ते डुलक्या घेणं चूक आहे, असं वाटे. भर वर्गात सरांदेखत डुलक्या घेणारी म्हणजेच झोपणारीमुलं अपराधीच आहेत, असंवाटायचं. आता शिक्षक म्हणून टेबलच्या या बाजूला उभं राहून बघताना या गोष्टींची गरज लक्षात येतेय. शिक्षक शिक्षकांना विश्रामीकेत शिक्षक विश्रांती घेऊ शकतात, तर मग मुलांसाठी अशी सोय शाळेत का नाही/नसावी? असा प्रश्न एखाद्या विद्यार्थ्याने विचारला तर माझ्याकडं कुठं शिक्षक म्हणून काही उत्तर आहे? शाळा जर का मुलांकरिता असतील तर तिकडे मुलांच्या मनोभूमिकेतून शिक्षणाचा एकूण पट मांडला जायला हवा असंही मला वाटतं.

मुलांना समजून घेतल्याशिवाय, विश्वास दिल्याशिवाय मुलं आपल्यासाठी त्यांच्या मनाची कवाडं कदापि उघडणार नाहीत, याची खात्री पटलीय.म्हणूनच विद्यार्थी असताना जे आपल्याला मिळायला हवं होतं पण मिळालं नाही, त्या गोष्टी मुलांना द्यायचा माझा सतत प्रयत्न राहिला आहे.

लहान मुलांचं विश्व निराळंच असतं. उनाड वाऱ्यासारखं अवखळपणे खेळणं, हसणं-खिदळणं मुलांना आवडतं. अनेकदा हे स्वातंत्र्य शाळा आणि शिक्षक मुलांना नाकारतात. मग विद्यालयं आनंदालयं नाहीतर भयालयं वाटत राहतात. शाळेच्या वेळापत्रकात परिपाठापासून परीक्षेपर्यंत अनेक गोष्टींविषयी मुलांना काहीतरी म्हणायचं असतं. ते सांगण्यासाठी मुलांना मोकळा अवकाश दिला की मुलं मुक्तपणे व्यक्त होऊ लागतात. मुलांना शिकवण्यापेक्षा ती शिकती कशी होतील, हे बघताना मुलांना जीव लावणं आणि त्यांना उबदार शैक्षणिक पर्यावरण आवश्यक असतं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com