सरकारची बनवेगिरी

जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पण गेल्या ८ वर्षांत जीडीपी सरासरी किती वाढला, सरत्या तिमाहीत किती वाढला ते सांगायचे नाही. १४० कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशातील लोकांनी दैनंदिन लागणाऱ्या वस्तू, सतत वाढणाऱ्या किमतीत खरेदी केल्या तरी जीडीपी वाढणार आहे, दरडोई जीडीपी किती वाढली हा निकष का नाही?
सरकारची बनवेगिरी
Narendra ModiAgrowon

संजीव चांदोरकर

लहानपणी एक बाहुली मिळायची. अजूनही मिळत असेलच. तिला कशीही हवेत फेकली की ती बरोबर पायांवर पडते. आताचे दिल्लीतील सरकार अर्थव्यवस्थेत काहीही घडो, कोणतीही आकडेवारी समोर येवो; आम्हीच कसे बरोबर, हा एकच घोषमंत्र उच्च आवाजात बोलत असते.

मागच्या महिन्यात एप्रिल २०२२ मध्ये जीएसटी १,६७,००० कोटी रुपये गोळा झाले. ते म्हणाले बघा अर्थव्यवस्था वेग पकडत आहे. आज त्यात १६ % घट होऊन फक्त १,४०,००० कोटी रुपये गोळा झालेत, तर हे म्हणतात, की त्याचा अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होणार नाही.

काल २०२१-२२ चे जीडीपीचे आकडे आले. हे म्हणतात, की जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पण गेल्या ८ वर्षांत जीडीपी सरासरी किती वाढला, सरत्या तिमाहीत किती वाढला ते सांगायचे नाही. १४० कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशातील लोकांनी दैनंदिन लागणाऱ्या वस्तू, सतत वाढणाऱ्या किमतीत खरेदी केल्या तरी जीडीपी वाढणार आहे, दरडोई जीडीपी किती वाढली हा निकष का नाही?

परकीय गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकी केल्या, की तो भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल विश्‍वास असल्याचा पुरावा सांगायचा. आणि परकीय गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रणामावर गुंतवणुकी काढून घेतल्या तर आमचे काही अडत नाही म्हणायचे. यात काँग्रेस विरुद्ध भाजप , यूपीए विरुद्ध एनडीएपेक्षा प्रामाणिक विरुद्ध अप्रामाणिक किंवा वस्तुनिष्ठ विरुद्ध आत्मनिष्ठ अशा चर्चा घडवल्या पाहिजेत. कॉर्पोरेट वित्त भांडवलकेंद्री विरुद्ध जनकेंद्री अशा चर्चा घडवल्या पाहिजेत.

तेलंगणाचा धडा

दोन जून रोजी तेलंगणा राज्याचा आठवा स्थापना दिवस होता. तेलंगणा राज्याच्या निर्मितीत सिंहाचा वाटा असणारे व स्थापनेपासून एक हाती मुख्यमंत्री म्हणून सत्ता राबवणारे के. चंद्रशेखर राव (केसीआर) देशातील सर्व वर्तमानपत्रे आणि प्रमुख न्यूज चॅनेलवर झळकत होते. महिला, शेतकरी, विद्यार्थी, शेती, पाणीपुरवठा आदींसाठी भरघोस योजना राबवत असल्याचे त्यांनी ४-४ पानी रंगीत पुरवणीतून अख्ख्या देशाला सांगितले.

कष्टकरी वर्गासाठी असणाऱ्या आजच्या कठीण काळात केसीआर यांचे लोकल्याणकारी कार्यक्रम, त्यांची अंमलबजावणी बऱ्यापैकी होत असल्याचे रिपोर्टस् आहेत. प्रश्‍न असा पडला आहे, की प्रत्यक्ष कर आकारायचे अधिकारच नसताना, जीएसटीमुळे अप्रत्यक्ष कर आकारणीवर बंधने असताना, तेलंगण राज्याने या लोककल्याणासाठी एवढे पैसे कोठून उभे केले? याचे उत्तर आहे काही लाख कोटींची कर्जे उभारून.

तेलंगणा राज्यावरचे कर्ज गेल्या काही वर्षांत वाढले आहे हे नक्की. काही ठिकाणी वित्त आयोगाने दिलेल्या मर्यादाचे उल्लंघनही तेलंगणाने केले आहे. कॅगने आपल्या अहवालात ताशेरे ओढले आहेत. त्याशिवाय केसीआर यांनी नरेंद्र मोदींवर टीका करत विरोधकांची आघाडी उघडण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने तेलंगणाला मार्केटमधून यापुढे कर्जे उभारण्यास प्रतिबंध केला आहे. भारतीय अन्न महामंडळाने तेलंगणातून तांदूळ खरेदी करण्यास विलंब केला आहे. आणि इतरही काही केंद्रीय साह्य योजना अडवून धरल्या आहेत.

कर्ज काढले म्हणून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना केसीआर म्हणतात, “कर्जाकडे डोक्यावरचे कर्ज म्हणून बघू नका, एक वित्तीय स्रोत म्हणून बघा ’’ केसीआर आवाज उठवतात, की राज्यांना FRBM कायद्याचे उल्लंघन केले म्हणून शिक्षा करणारे केंद्र सरकार कर्ज उभारणी करताना स्वतः मनमानी करते, वाटेल तेवढी अर्थसंकल्पीय तूट वाढवते. केसीआर टीका करतात, की मोदींच्या केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत अनेक गोष्टींवर करांच्या ऐवजी “सेस” वाढवले. कराच्या पैशातून राज्यांना वाटा द्यावा लागतो, सेस असेल तर द्यावा लागत नाही.

केंद्र सरकार ज्या योजनांमधून राज्यांना मदत करते त्यासाठी जाचक पूर्वअटी घालते. उदा. शेतकऱ्यांकडून वीजबिल वसुली केली, तरच अमुक हजार कोटी मिळतील; केसीआर म्हणतात, की आमच्या शेतकऱ्यांची स्थिती आम्हाला माहित आहे. केसीआर यांनी नव उदारमतवादाच्या फ्रेमला- ज्यात शासनाने फार काही करू नये, मार्केट शक्तींना मुक्तद्वार द्यावे सांगितले जाते- अंशतः छेद दिला आहे.

Narendra Modi
तेलंगणा सरकारचे दिल्लीत धरणे आंदोलन

विहिरीतून पंपाने पाणी काढताना आधी पंपात पाणी ओतावे लागते, त्याला “पम्प प्रायमिंग” म्हणतात. अविकसित प्रदेशाचा आर्थिक विकास करण्यासाठी शासनाने अनेक दशके असे पम्प प्रायमिंग करण्याची गरज असते.

केसीआर यांनी जर भ्रष्टाचाराला काबूत ठेवले, कल्याणकारी योजनांतून कोट्यवधींना खरा भौतिक फायदा झाला, त्यातून राज्याचा जीडीपी वाढवून दाखवला, त्यातून भांडवली गुंतवणुकी आल्या, त्यातून रोजगारनिर्मिती झाली, तर केसीआर आपल्या गल्लीतील मॅच नक्कीच जिंकतील. भारतात लोकशाही टिकवायची असेल तर भाजपला काउंटर वेट तयार व्हावी लागतील. त्यासाठी असे ८-१० केसीआर तयार झाले पाहिजेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com