English language: सरकार गोरगरीब पोरांच्या दर्जेदार इंग्रजीचा विचार कधी करणार?

आमच्या घरी धुणीभांडी करायला येणाऱ्या ताईने तिच्या मुलाला माझ्या ओळखीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घाला असा हट्ट धरला. मी म्हटलं की, त्याला मराठी शाळेत घाला ताई. सेमीमध्ये शिकू द्या. तर त्या म्हटल्या, ‘‘सर, होऊ द्या कि तुमच्यावानी साहेब पोरगा.
Education
EducationAgrowon

लेखक - प्रा. सतिश वाघमारे

इंग्रजी महत्वाची आहे; परंतु दुर्दैवानं गोरगरीब मुलांना ही महत्वाची इंग्रजी शिकविणारी शिक्षणव्यवस्था (Education System) गचाळ आहे. तिथे मुलगा इंग्रजी (English Education) तर शिकत नाहीच धड, पम मराठीही नीट शिकू शकत नाही. लहानपणापासूनच शिक्षणाचं भयंकर त्रांगड झालेली टीव्हीत आणि बापाच्या मोबाईलमध्ये अडकलेली लहान लहान मुलं वाढत चाललीत.

त्यापेक्षा सरळ मराठी माध्यमात त्यांना शिकू द्या. दहावी-बारावीपर्यंत पाहिजे तसं उंडारु द्या. तसंही मनाची संवेदनशील म्हणून मशागत व्हावी असे कुठले वाचन, कुठले उपक्रम इंग्रजी शाळेत आहेत? इथे मराठीत पोरगा उत्तम बालसाहित्य वाचतो. घरादारात मराठी असल्याने भावभावना शेअर करू शकतो. सशक्त तगडं बालपण मनपाच्या, झेडपीच्या शाळेतला मुलगा जितका जगतो तितकं (वर वर्णन आलेल्या खास गोरगरिबांसाठीच्या ) इंग्रजी माध्यमातली मुलं जगत नाहीत .

आमच्या घरी धुणीभांडी करायला येणाऱ्या ताईने तिच्या मुलाला माझ्या ओळखीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घाला असा हट्ट धरला. मी म्हटलं की, त्याला मराठी शाळेत घाला ताई. सेमीमध्ये शिकू द्या. तर त्या म्हटल्या, ‘‘सर, होऊ द्या कि तुमच्यावानी साहेब पोरगा. आम्ही अजून कष्ट करू. लै कष्ट करू आणि खर्च करून शिकवू .‘‘ मी त्यांना सांगितलं, ‘‘अहो, या घरातली मुलं सुद्धा सरकारी शाळेत मराठी माध्यमात शिकतात. तुमचे कष्ट, तुमचा पैसा आणि तुमच्या मुलाचं शिक्षण याला न्याय देणाऱ्या इंग्रजी शाळा आपल्या भोवती नाहीत. वाईट अवस्था आहे. आणि पोरगं दहावी-बारावीला गेल्यावर नंतरच काय ती खरं असतंय. तोवर शिकवा मराठीतच.‘‘ तर त्यांनी अजिबात ऐकलं नाही. त्यांच्या मुलाचं ॲडमिशन इंग्लिश मिडियमलाच झालं.

इंग्रजी महत्वाची आहे, खूप खूप महत्वाची आहे हे आधीच क्लिअर करतो. पण म्हणून पहिली दुसरीला असतानाच आपला पोरगा वा पोरगी फाडफाड इंग्रजीतून बोललं म्हणजे त्यांना लगेच वयाच्या सातव्या आठव्या वर्षीच कलेक्टरचा जॉब मिळेल अशा धारणेतून जे आई-बाप (त्यातही खास सुशिक्षित आई-बाप ममा-पपा-डयाडावाले ) पोरांच्या शाळा , शिक्षक , ट्यूशन , इंग्रजी टॉकिंग आणि एकस्ट्रा ॲक्टिव्हीटी कडे जगण्या मरण्याच्या गंभीर समस्येपेक्षा अधिक गंभीर समस्या आहे असे समजून पाहतात ते फार भयानक आहे. बंगला, वनबीएचके, टूबीएचके फ्लॅट मधील रहिवासी असलेल्या, गडगंज श्रीमंत दक्ष आईबाप लोकांच्या एकूणच जगण्या वागण्याच्या सर्व प्रिप्लानिंगने, त्यांच्या मुलांच्या बौद्धिक भावनिक विकासाने झालेले बरे वाईट फायदे तोटे याचा त्यांना भविष्यात त्रास जरी झाला तरी ते पालक लोक तो सहजी बेअर करू शकतील तेवढी आर्थिक कुवत, धमक त्यांच्यात असते.

Education
Education Policy : विद्यार्थ्यांना आधार देणे सरकारी विद्यापीठांचे कर्तव्य

शिवाय हल्ली सोशल मिडीयावर हवे तेव्हा सुस्कारे , निःश्वास टाकून दुखवटा शेअर करण्याची सोय असल्याने मिळालेल्या लाईक व कॉमेंटमुळे भावनिक ब्यालंस देखील साधला जाऊन थोड्याच दिवसात इश्यू काही फार गंभीर वा मोठा न्हवता हं, अशी स्वतःवर उत्तम ह्यामरिंग करून ते उत्तम जगणं देखील जगू शकतील. तर त्यामुळे त्या पालकांची फार काळजी करण्याची गरज नाही. तसे ते महत्वाचे आहेही आणि म्हटले तर नाहीही. त्यांच्या बाबतीत महत्वाचा मुद्दा म्हणजे पोरगा टॅलंटेड करून सोडायचा, या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे उध्वस्त होत असलेल्या त्यांच्या मुलांच्या भावविश्वाचा व मग त्याच्या भविष्याचा आहे .

दुसरीकडे अधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे फार मोठ्या प्रमाणात गावखेड्यात, झोपडपट्टीत राहणाऱ्या अडाणी, अशिक्षित, अर्धशिक्षित रोजगारी, कामगार, छोटे विक्रेते या तळागाळातल्या लोकांच्या इंग्रजी माध्यम, खासगी शाळा, मनपा- झेडपीच्या शाळा आणि इंग्रजी विषय यांच्याकडे बघण्याच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या पोरांच्या भविष्याचा आहे. शहरात खूप इंग्रजी मिडियमच्या शाळा झाल्या आहेत. आणि त्या गरिबांना परवडतील असे शुल्क घेऊन चालू आहेत. पंधरा हजार फी वर्षातून तीन चार टप्प्यात भरण्याची सुविधा देऊन तळागाळातल्या गोरगरीब लोकांवर त्यांच्या पोरांवर इंग्रजी शिकविण्याचे थोर उपकार त्या करत आहेत.

Education
Education : स्थलांतराने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खोळंबा

जे एन पेटीट , डॉन बॉस्को , बिशप स्कूल, पुनावाला, नगरवाला, सीबीएससीची वातानुकुलीत स्कूल्स वा अजून हायफाय इंग्रजी शाळेत कधीही जाऊ न शकणाऱ्या गोरगरीब पोरांची नवनव्या शिक्षणसम्राटांनी ही सोय केलीय. आणि ह्या सोयीच्या ठिकाणी ही गोरगरीबांची मुले अशी इंग्रजी शिकतात का बस्स! आठवीच्या पोराला स्वतःच्या नावाचं स्पेलिंग बरोबर लिहिता येत नाही. इतर लिहिणं-वाचणं वगैरे तर लांबच. गोरगरीबांसाठी म्हणून असलेल्या अशा बऱ्याच शिक्षण संस्था व शाळा आहेत. त्या शाळांमधील शिक्षकांना कसली ऑर्डर नसते काही नसते. नोकरीतील स्थैर्य, वेतनवाढ, पगारी सुट्ट्या वगैरे मुलभूत लाभांशी त्यांचा कधीच संबंध येत नाही.

आठ ते दहा हजार पगार. संस्थेतील मान्यताप्राप्त चोंग्या वा चोंगीशी लाळघोटेपणाचे वर्तन करणे न जमल्यास वर्षभरात लगेच हकालपट्टी. लगेच फ्रेश डीएड-बीएड झालेल्या वीसबावीस वर्षाच्या पोरी घ्यायच्या. पर्याय नसेल तरच एखादा जेन्ट्स शिक्षक. शिक्षिका घेण्यामागचे कारण मुकाट काम करतात हे . बंडखोरी बिलकुल नाही. आता अशा नासक्या वातावरणात कसे काय तिथले शिक्षक या गोरगरीब, कष्टकरी, रोजगारी, मजुरी करणाऱ्या , वेळप्रसंगी उपाशी- तापाशी राहून पोटाला चिमटा घेऊन शाळेतल्या वेगवेगळ्या डेजला संस्थाचालक लोकांच्या खात्यात पैशांची भरती करणाऱ्या आईबापांच्या लेकरांना इंग्रजी शिकवीत असतील? त्या व्हॉट्सॲप-फेसबुकवर बिझी राहतच या गोरगरीब मुलांना वाघिणीचे दूध पाजायचा प्रामाणिक प्रयत्न करतात.

नियमांची खतरनाक पायमल्ली करणाऱ्या एका शिक्षण संस्थेत मी स्वतः काम करतो. तिथे सेम अशीच एक शाळा आहे. कसलेही स्थैर्य नसलेल्या शिक्षक पोरी आणि एक लाडाचा कान्हा असे मिळून ती शाळा चालवतात. आणि शिकायला येणारी सर्व पोरं जात, संपत्ती दोहोंबाबत तळागाळातल्या वर्गाची. काय आहे या मुलांचं भवितव्य? आठवी-नववी पर्यंत थेट ढकलून पास. घरात इंग्रजीची कसलीच परंपरा नाही. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून म्हणण्यापुरतेसुद्धा टीचर शिवाय आजूबाजूला कोणी नाही. दहावी नंतर म्हणजे दहावी नापासनंतर (कारण आधीच्या खतरनाक पार्श्वभूमीमुळे पुढे तो जिंदगीत दहावी पास होत नसतो ) ही पोरं सुद्धा थेट चकचकीत बिल्डींगमध्ये कामाला लागतात ते तिथल्या कॅन्टिनमध्ये, संडास साफ करायला, स्वीपर म्हणून, हॉटेलमध्ये रुमबॉय म्हणून.

आयुष्य खलास. अडाणी आईबापांचा मेंदू ढोर कष्टानेच इतका शिणून जातो का पोरगा इंग्लिशमध्ये शिकवूनही साहेब का झाला नाही, हा प्रश्न त्यांना फार वेळ स्वतःत अडकवून ठेवू शकत नाही. पोटाचं कोडं पुढं उभं असतं. मनमोहनसिंग यांचे सरकार काय वा आताचे हे मोदीचे सरकार काय कुणीही या असल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेतल्या वातावरणावर वचक ठेवलेला नाही. कितीही तक्रारी करा, काहीही करा कुठलाही शिक्षण अधिकारी झटून मागे लागून या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी ठोस काही करताना दिसतोय असं नाही. असल्या शाळेतून प्रत्येक वर्षाला बहुजन समाजाच्या पिढ्याच्या पिढ्या केवळ इंग्लिश मीडियममध्ये शिकतायेत या कौतुकाखाली निव्वळ नासवल्या जात आहेत.

इंग्रजी महत्वाची आहे; परंतु दुर्दैवानं गोरगरीब मुलांना ही महत्वाची इंग्रजी शिकविणारी शिक्षणव्यवस्था गचाळ आहे. तिथे मुलगा इंग्रजी तर शिकत नाहीच धड, पम मराठीही नीट शिकू शकत नाही. लहानपणापासूनच शिक्षणाचं भयंकर त्रांगड झालेली टीव्हीत आणि बापाच्या मोबाईलमध्ये अडकलेली लहान लहान मुलं वाढत चाललीत. त्यापेक्षा सरळ मराठी माध्यमात त्यांना शिकू द्या. दहावी-बारावीपर्यंत पाहिजे तसं उंडारु द्या. तसंही मनाची संवेदनशील म्हणून मशागत व्हावी असे कुठले वाचन, कुठले उपक्रम इंग्रजी शाळेत आहेत? इथे मराठीत पोरगा उत्तम बालसाहित्य वाचतो. घरादारात मराठी असल्याने भावभावना शेअर करू शकतो. सशक्त तगडं बालपण मनपाच्या, झेडपीच्या शाळेतला मुलगा जितका जगतो तितकं (वर वर्णन आलेल्या खास गोरगरिबांसाठीच्या ) इंग्रजी माध्यमातली मुलं जगत नाहीत.

माझ्याजवळ माझ्या भावंडांची मुलं आहेत. दोन वर्ष अशा खतरनाक पार्श्वभूमीच्या इंग्रजी माध्यम असलेल्या शाळेत त्यांना घातलं. सिनिअर, ज्युनिअर, केजी सर्व सोपस्कार पार पाडून इयत्ता दुसरी पर्यंत पोरं पोचली तरी लिहिता वाचता येईना. चार वर्षात पोरांना फक्त ए बी सी डी आणि पाच पर्यंतचा टेबल यापलीकडं काही येईना. त्यांच्या शिक्षिकांना जाऊन डाफरले तर त्या व्हॉट्सॲपवरून नजर हटवीत मोठ्या मुश्किलीने बोलल्या- क्लास लावा, घरी अभ्यास घ्या . त्या शिक्षक मिस लोकांची, हेडबाईची आयमायच काढायचे बाकी ठेवलं. पण शेवटी हतबल झालो. मी मुलं तिथून काढली आणि सरळ मराठी माध्यमात घातली. तिथल्या शिक्षकांना सांगितलं खणखणीत मराठी लिहिता-वाचता यायला पाहिजे. गणित, इतिहास, भूगोल नंतर बघू. इंग्रजी नीट यायलाच हवं, अशी वेळ यायला अजून आठ- दहा वर्ष बाकी आहेत. चिक्कार वेळ आहे, बघू नंतर.

आज या घटनेला दोन वर्ष पूर्ण झाली. माझे दोन्ही पुतणे उत्तम मराठी लिहितात, वाचतात . इंग्रजी थोडं कच्चं आहे पण फिकीर नाही, असं त्यांच्या शिक्षकाचं व माझं दोघांचंही मत आहे. या उन्हाळी सुट्टीत तब्बल दीडशे छोटी छोटी गोष्टींची पुस्तकं दोन्ही बहिण भावंडांनी वाचून काढली. प्योर इंग्रजी माध्यमातल्या पोराला बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, शाहू, फुले नीट सांगता येणार नाही इतके नीट माझे पुतणे सांगतील. विक्रम वेताळ, अरेबियन नाईट्सचा एक एक भाग सांगतात. आता सरकारी शाळेत शिकत असल्यामुळं काही संस्कार घेऊन ते वागतात वावरतात त्याला इलाज नाही. तशी त्याचीही फार अडचण नाही . खेळता खेळता चिडाचिडीत अध्येमध्ये सहज ओघात एखादी शिवी जाते तोंडातून. पण एक टोला लगावला की जीभ चावून सॉरी म्हणतात. अजून काय पाहिजे ? फक यू ला प्रतिष्ठा असणाऱ्या वातावरणात माझा पुतण्या कुणाला झवण्या म्हटला तर मी फार सिरिअस व्हायचं काही कारण नाही .

इथली सरकारं अन्नानं मरायला लागलेल्या कुपोषित पोरांचा जिथं विचार करीत नाहीत तिथं गोरगरीब पोरांच्या दर्जेदार इंग्रजीचा कधी करणार? आपणच आपले मार्ग काढावे लागणार. त्यात सध्या तरी सरळ उत्तम मराठी शिकवावे आणि पुढे सावकाश खास एक विषयाचा क्लास म्हणून इंग्रजीची तयारी करून घ्यावी आणि मग जगण्याच्या झटापटीत स्पर्धेत सावकाश उतरवावं. मनसोक्त सशक्त तगड जिनं जगू देऊनच भारताचं कणखर निब्बर भविष्य ताकदीनं उभं राहणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com