शारीरिक कष्ट करणारे लोक गेले कुठे?

एकेकाळी शेतकऱ्यांना परवडेल अशा दरात भरपूर मजूर मिळायचे. पुढे मजुरी वाढत गेली, पण मनाजोगतं काम करणारे मजूर मिळेनात. दुसऱ्या बाजूला अन्नधान्य, भाजीपाला वा फळांच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली. त्या तुलनेत शेतीमालाच्या भावात वाढ झाली नाही. त्यामुळे मजूर आपली अडवणूक करताहेत, मनाला वाटेल तशी मजुरी मागताहेत, असं शेतकऱ्यांना वाटतं. यात तथ्यांश आहेच. पण बाजारचा नियम इथंही लागू पडतो.
शारीरिक कष्ट करणारे लोक गेले कुठे?
Agriculture Worker Agrowon

शेतीतील कामासाठी मजूर मिळत नाहीत, ही ओरड सुरू होऊन तशी दहा वर्षे तरी सहज होऊन गेली असतील. दिवसेंदिवस ही तक्रार अधिक तीव्र होत चाललीय. सुरुवातीच्या काळात बहुतेक शहरी मध्यमवर्गीय विचारवंतांना ही शेतकऱ्यांनी उठवलेली हूल वाटायची. त्यातून आजही ते बाहेर आल्याचं दिसत नाही. मजुरांबद्दल कोणी टीकात्म बोललं, त्यांची चिकित्सा केली, तर तो त्यांना सरंजामदारांचा हस्तक वाटतो.

आजही त्यांना शेतकरी शोषक आणि मजूर शोषित वाटतो. हे त्यांचं आकलन कीव करण्याजोगं आहे. काळानुरूप बदललेलं वास्तव त्यांना माहीत नाही. ते माहिती करून घेण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळं त्यांच्यासाठी हा प्रश्‍नच नाही.

मी शेतीतील मजुरांचा तुटवडा, या विषयावर गेल्या आठ-दहा वर्षांपासून जी मांडणी करतोय.
मजुरांनी शेतीतील कामासाठी किती मजुरी मागावी, त्यांनी काम करावं की करू नये, हा सर्वस्वी त्यांच्या इच्छेचा भाग आहे. मजुरांनी काम केलंच पाहिजे, असं म्हणण्याचा कोणाला अधिकार नाही. तो त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. या मतावर मी आजही ठाम आहे.

शेतकऱ्यांच्या शेतमजुरांबद्दल दोन तक्रारी आहेत. पहिली म्हणजे त्यांना योग्य मजुरी देऊनही शहरी मजुराप्रमाणे ते आठ तास काम करत नाहीत. दुसरी म्ह्णजे कामाचं स्वरूप बघूनच ते कामावर यायचं की नाही, ते ठरवतात. पहिली तक्रार योग्य आहे. किमान आठ तास कामाची अपेक्षा गैर नाही. त्यांना योग्य आर्थिक मोबदला मिळत असेल तर त्याची भरपाई त्यांनी श्रमातून केली पाहिजे..

दुसरी तक्रार पुन्हा मजुरांच्या स्वातंत्र्याचा भाग आहे. त्याला जे काम योग्य वाटेल तेच तो स्विकारील. शेतकरी म्हणेल ते काम करण्याचं बंधन कोणी घालू शकत नाही

एकेकाळी शेतकऱ्यांना परवडेल अशा दरात भरपूर मजूर मिळायचे. पुढे मजुरी वाढत गेली, पण मनाजोगतं काम करणारे मजूर मिळेनात. दुसऱ्या बाजूला अन्नधान्य, भाजीपाला वा फळांच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली. त्या तुलनेत शेतीमालाच्या भावात वाढ झाली नाही.

त्यामुळे मजूर आपली अडवणूक करताहेत, मनाला वाटेल तशी मजुरी मागताहेत, असं शेतकऱ्यांना वाटतं. यात तथ्यांश आहेच. पण बाजारचा नियम इथंही लागू पडतो. मजुरांची मागणी जास्त, पुरवठा कमी आहे. अशावेळी शारीरिक कष्ट करणारा वर्ग त्यांचं मोल वाढवणार, हे उघड आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांशी त्यांना देणघेणं असण्याचं कारण नाही.

शेतीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झालं आहे. त्याला मजुरांची टंचाई हे महत्त्वाचं कारण आहे. मला हे सिद्ध करण्यासाठी बाहेरच्या साक्षीपुराव्यांची गरज नाही. कारण या बदलांचा मी साक्षीदार आहे. वडील शेती करीत होते, त्या काळात आमच्याकडं कायम चार बैल होते.

१९९० नंतर ती संख्या दोनवर आली. २०१३ नंतर बैल इतिहासजमा झाले. मी छोटा ट्रॅक्टर घेतला. माणसानं करावयाची अनेक कामं संपली. शेतीतील कोळपणी वगळता सगळी मशागतीची कामं छोट्या ट्रॅक्टरनं होतात. कोळपणीसाठी भाड्याने बैल मिळतात. शिवाय कोळपणी केली नाही तरी भागू शकतं. शेतीचं कितीही यांत्रिकीकरण झालं, तरीही वेळोवेळी विविध कामांसाठी काही मजूर लागतातच. तेही मिळत नसल्याने माझ्यासह सगळेच शेतकरी अस्वस्थ आहेत.

मी या प्रश्‍नावर सातत्याने गंभीरपणे विचार करतोय. शेतीत मजूर का मिळत नाहीत? शारीरिक कष्टांची कामं करण्यासाठी माणूस का मिळत नाही? हा प्रश्‍न मी विविध थरांतील अनेक लोकांना विचारला. ओळखीच्या मजुरांशीही विस्ताराने बोललो. या विषयाला अनेक पदर आहेत. शारिरीक कष्टांविषयी अनास्था निर्माण करण्यात टी.व्ही. आणि मोबाईल या दोन्ही माध्यमांचा मोठा वाटा आहे. हे लाइव्ह मनोरंजन असल्यानं व बहुतेक लोक या माध्यमांच्या आहारी गेले असल्याने विविध सिनेमा, सीरियल्समधील रंगीबेरंगी दृश्‍यांची स्वप्नं बघतच माणसं जगतात. ही माध्यमं उपलब्ध होण्याआधी सिनेमाच्या करमणुकीसाठी वेळ काढून थिएटरला जायची.

आता टी.व्ही.वर आणि हातातल्या स्मार्ट फोनवर ही सुविधा २४ तास उपलब्ध आहे. यात रमलेली माणसं सहजपणे बाहेर येत नाहीत. धार्मिकतेबाबतही असंच घडलंय. भजन-कीर्तन हा लोकांच्या श्रद्धेचा व करमणुकीचाही भाग होता. पण तो बारमाही नव्हता. शिवाय त्यात मूठभर लोकच सहभागी होत. या माध्यमांमुळे हेही २४ तास उपलब्ध झालंय. लोकांच्या जातीय अस्मिता फुलवण्याचं, माणसांना कट्टर बनवण्याचं काम सोशल मीडियाने केलंय. त्यामुळे आता छोट्या छोट्या जातींचेही संत, महात्मे, महाराज आहेत. त्यांच्यावरची पुस्तकं, मालिका, सिनेमा निघत आहेत. साहजिकच माणसं यात अधिक गुरफटून गेली आहेत.

वरवर ही माध्यमं करमणुकीची वाटत असली, तरी ती माणसांना विशिष्ट मालिका, कार्यक्रम बघण्याची सवय लावतात. अशा माध्यमाहारी माणसांना शारीरिक कष्ट म्हणजे शिक्षा वाटते. शिवाय गावोगाव धार्मिक उत्सव, भजन, कीर्तन, पोथ्या-पुराणांचे वाचन, सप्ताह अशा कार्यक्रमांची रेलचेल झालीय. यातही माणसं अडकून पडलीत. इथं भक्तीबरोबर पोटाचीही फुकट सोय होते. एकदा अशा भक्तिमार्गाची गोडी लागली, की तो शारीरिक श्रमाची कामं करू शकत नाही.

मजुरांची टंचाई निर्माण होण्याला अन्नसुरक्षा कायदा कारणीभूत असल्याचं बहुसंख्य शेतकऱ्यांचं मत आहे. शंभर रुपयांत महिन्याचं गहू, तांदूळ हे रेशन मिळणार असेल, तर मजूर काम कशाला करतील? या म्हणण्यात तथ्यांश आहे; पण हे पूर्ण सत्य नाही. फक्त रेशनवर मिळणारं धान्य कवडीमोल किमतीने मिळत असलं, तरी इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

अनेक जण रेशनवर मिळणाऱ्या मालापैकी निम्मा माल किराणा दुकानात विकतात. त्याचे चांगले पैसे त्यांना मिळतात. त्यातून इतर गरजेच्या वस्तूंसाठी पैसे उपलब्ध होतात. तसं हे चित्र कमी-जास्त सगळीकडंच बघायला मिळतंय. शेतीत रोजंदारी पद्धतीने मजूर मिळत नसले तरी गुत्ते पद्धतीने कामं होतात.

सोयाबीन काढणीसारखी अनेक कामं गुत्ते घेऊन केली जातात. हे दर मजूर ठरवतात. एका सोयाबीन बॅगच्या काढणीचे दर पाच वर्षांत जवळपास दुपटीवर गेलेत. शेतकरी कुरकुरत का होईना हे वाढीव दर मान्य करत आहेत. कारण त्यांच्यापुढे पर्याय नाही. गेल्या दोन वर्षांत सोयाबीन काढणीच्याही मशिन आल्या आहेत. त्यात आणखी सुधारणा झाली, की मशिनचा वापर अधिक वाढेल.

मी राहतोय, बघतोय त्या समाजात तरी कोणी उपाशी असल्याचं चित्र दिसत नाही. बहुसंख्य लोकांची जगण्याची प्रमुख गरज अन्न हीच आहे. ते सहज उपलब्ध होत असेल तर शारीरिक कष्ट करण्याची तेवढी गरज उरत नाही. शिवाय धार्मिक कार्यक्रमात जेवणावळी असतात. भंडारा, महाप्रसाद या नावाखालीही लोकांना जेऊ घालण्याचे कार्यक्रम अखंडपणे सुरू असतात.

अन्नदान हे आपल्या समाजात पुण्यकर्म समजलं जात असल्यानं, नवनवीन अन्नछत्र सुरूच असतात. त्यामुळं या समाजात पोट भरणं हा काही चिंतेचा विषय नाही. साहजिकच पोट भरण्यासाठी काम केलंच पाहिजे, ही पूर्वीची परिस्थिती आता बदलली आहे.

माझा एक अभ्यासू मित्र आहे. त्याच्याशी या विषयावर विस्तृतपणे बोललो. तो म्हणाला, की शारीरिक कष्ट करायला लोक का तयार नाहीत, या प्रश्‍नाकडं अधिक व्यापक दृष्टीने बघण्याची गरज आहे. आपल्या समाजात शारीरिक कष्ट करणाऱ्या लोकांना अजिबात प्रतिष्ठा नाही.

ज्यांचं शिक्षण नाही, ज्यांना बुद्धिमत्ता नाही, ज्यांच्याकडं पैसे नाहीत तेच लोक शारीरिक श्रम करतात, असं गृहीत धरलं गेलंय. त्यामुळे स्वत:ला सुशिक्षित, हुषार समजणारे लोक शारीरिक श्रम करणं हा कमीपणा मानतात. राजकीय मंडळी, सरकारी नोकरदार हे कोणती शारीरिक कष्टाची कामं करतात? तरीही त्यांची भरभराट सुरूच असते. सरकारी कर्मचारी तर दरमहा पगार घेतात आणि वर लाचही घेतात. तरीही ते प्रतिष्ठित समजले जातात. मी शारीरिक कष्ट का करायचे, असा प्रश्‍न प्रत्येकाला पडतो.

शारीरिक कष्ट करून कोणी फारसे पैसे मिळवू शकत नाही, असंच सगळीकडं चित्र दिसतं. त्यामुळे कष्टकरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजाचीही मानसिकता तशीच तयार झालीय. शारीरिक कष्ट न करण्याचं एक कल्चरच निर्माण झालंय.

आणखी खोलात जाऊन बघितलं तर लक्षात येईल, की शेतीतील मजुरांपैकी ७० ते ८० टक्के मजूर या स्त्रिया आहेत. बहुतांश महिलांचे नवरे दारू पिऊन पडुन राहतात. शेतीतील सालगड्यांचं प्रमाण झपाट्याने कमी होतंय. गतवर्षीपेक्षा यावर्षीची स्थिती वाईट आहे. मी जो पन्नास शेतकऱ्यांना बोलून सर्वे केला, त्यातून आलेल्या निष्कर्षानुसार ४० टक्के शेतकऱ्यांना सालगडी मिळालेला नाही.

नोकरी पत्करलेल्या सालगड्यांनी त्यांचा वर्षाची पगार ॲडव्हान्स म्हणून उचललाय. एवढंच नाही तर अनेकांनी पगारापेक्षा अधिक उचली दिल्यात. तरीही तो वर्ष काढेल की नाही, ही धाकधूक असतेच. सालगड्याची नोकरी पक्की करून, पैशाची उचल करून तो निघून गेल्याच्या घटनाही घडल्यात. आता नोकरीच्या अटी शेतकरी नाही तर सालगडी ठरवतोय. तरीही शेतकरी निमूटपणे हे सहन करतोय, कारण त्यांना काहीही करून शेतीत एकतरी सालगडी हवाय.

चार-पाच वर्षांपूर्वी शेतकरी म्हणायचे, चांगला सालगडी बघा की... चांगला म्हणजे दारू पिऊन न लोळणारा, सतत सुट्ट्या न मारणारा वगैरे. आज म्हणतात, कसला का होईना सालगडी बघून द्या ना...हे चित्र अस्वस्थ करणारं आहे.

अनेकांच्या ट्रॅक्टरला ड्रायव्हर नाहीत. माणूस नाही म्हणून मळणीयंत्र पडून आहेत. सांभाळायला माणसं मिळत नाहीत, म्हणून शेतकऱ्यांनी जनावरं ठेवणं बंद केलं. रस्त्यावरच्या गावांमध्ये तर अनेकदा कितीही पैसे मोजण्याची तयारी ठेवली तरी माणूस मिळतच नाही.

अपवाद सोडले तर बांधकाम क्षेत्रातील, हमाली करणारे, ट्रॅक्टर चालवणारे लोक दारू प्यायल्याशिवाय कामच करू शकत नाहीत. याबद्दल तक्रार तरी कशी करायची? ते दारू पिऊन काम तरी करत आहेत. जे कामच करत नाहीत, त्यांचं काय?

केवळ शेतीत मजूर मिळत नाहीत, असं नाही. जिथं जिथं शारीरिक कष्टाची काम आहेत, तिथं तिथं मजुरांची टंचाई आहे. माझा गवंडीकाम करणारा चांगला मित्र आहे. तो म्हणाला, की बिगारी कामगार मिळाला नाही म्हणून आठवड्यातून दोन वेळा तरी काम बंद ठेवण्याची पाळी येते. अनेक वर्षांपासून सोबत काम करणारे मजूरही मध्येच न सांगता सुट्टी घेतात. त्यामुळं ऐनवेळी खोळंबा होतो.

या बिगारींना घरून आणणं आणि परत नेऊन सोडण्याचं कामही गवंड्याला करावं लागतं. वेल्डिंगचं काम करणारे असोत, की रंगकाम करणारे असोत, सगळ्यांनाच कष्टाच्या कामासाठी मनुष्यबळाचा तुटवडा जाणवतोय. कामगार मिळत नाहीत. ते टिकत नाहीत, म्हणून अनेक हॉटेल बंद झाल्याची उदाहरणं समोर आहेत.

महाराष्ट्राच्या काही भागातच हा प्रश्‍न आहे, असंही नाही. कोकणातही मला या प्रश्‍नाची तेवढीच तीव्रता जाणवली. राज्याबाहेर गोव्यातही हा प्रश्‍न गंभीर आहेच.

मला शेतकरी नेहमी हा प्रश्‍न विचारतात, ‘शेतीत काम करणारी माणसं कुठून आणायची?’ मी म्हणतो, ‘याचं उत्तर कोणाकडंच नाही. सर्वांसाठी एक असं उत्तर तर असूच शकत नाही. प्रत्येकाला आपापल्या परिस्थितीप्रमाणे याचं उत्तर शोधावं लागेल.’ मी गेल्या दोन-तीन वर्षांपासून सतत म्हणतोय, की प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतीत स्वत: शारीरिक कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. बांधावर उभं राहून शेती करतो असं म्हणण्याचे दिवस संपलेत.

तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना शेतीत काम करावंच लागेल. मी माझ्या परीने या प्रश्‍नातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. मूग, उडीद, तीळ, कारळ अशी बहुविध पिकं घेणं मी बंद केलं. यामुळं ऐन हंगामात मजूर मिळवण्याचा ताण गेला. आमची जमीन सोयाबीनसाठी योग्य आहे. ट्रॅक्टरने पेरणी होते. फवारणी होते. एखादी कोळपणी झाली तर खुरपणीचीही गरज भासत नाही. काढणीचं काम गुत्ते पद्धतीनं होतं. त्या काळात पावसाळी वातावरण असतं. काढलेलं सोयाबीन झाकण्यासाठी पळापळी करावी लागते एवढेच. त्याची रासही मशिननेच होते. सोयाबीन कितीही दिवस ठेवले तरी त्याला कीड लागत नाही... हा माझ्यापुरता पर्याय निवडला. बहुतांश कोरडवाहू शेतकरी हेच करतात.

मी पत्रकारितेतील उच्च शिक्षण घेऊन पत्रकारितेत आलो. एका जिल्हा दैनिकाचा संपादक म्हणून व नंतर एका साप्ताहिकाचा संपादक म्हणून तीस वर्षे काम केलं. त्यातून बाहेर पडलो. मी विविध विषयांवर लिहितो. त्याची पुस्तकं काढतो. माझं स्वत:चं प्रकाशन, वितरण आहे. ‘मुक्तरंग’ हा माझं ब्रँड लोकप्रिय आहे. ८७५ पुस्तकं या मुक्तरंगतर्फे प्रकाशित झालीत. त्यात माझी ६५ आहेत. या व्यवसायावर माझं उत्तम चालू आहे. तरीही मी शेतीत आलो. कारण ती माझी मानसिक गरज होती.

मला मातीची ओढ आहे. माझं शेतीवर पोट नसतानाही मी शेतीत प्रत्यक्ष कष्ट करतो. सोशल मीडियावर त्याचे फोटो टाकतो, तेव्हा लोक मला विचारतात, तुम्ही असली काम करायची गरज काय? हा प्रश्‍न विचारणाऱ्यांच्या मनात हेच असते, की शारीरिक कष्ट करणं, हे माझ्यासारख्या शिक्षिताचं, पत्रकार, प्रकाशकाचं काम नाही. मी त्यांना उत्तर देत नाही.

मी मात्र जगण्याचा एक अपरिहार्य भाग म्हणूनच शेतीतील शारीरिक कष्टाची कामं स्वीकारलीत. त्याचा मी मनापासून आनंद घेतो. इतरांची मते काही असोत, मी मात्र शारीरिक श्रम करणं प्रतिष्ठेचं मानतो. शारीरिक श्रम करणाऱ्या सगळ्या लोकांना मी प्रतिष्ठित व्यक्ती समजतो. बांडगुळापेक्षा कष्टकरी माणसांना मी श्रेष्ठच मानतो.

श्रमप्रतिष्ठा प्रस्थापित करणं ही खरी आजच्या काळाची गरज आहे. ती व्हावी यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करतोय.

(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.) ९०९६१३९६६६, ९४२२४६९३३९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com