Generation Gap : ज्वारीचे पोती सहज उचलणारी पिढी कुठं गेली?

या म्हाताऱ्यांचे डोळे खोल विहिरीसारखे, गालावर सुरकुत्यांचं जाळं, कपाळावर चंदन, पांडूरंगाचा बुक्का अगर जोतिबाचा गुलाल, सोबतीला गळ्यात तुळशीमाळ.
Generation Gap
Generation Gap Agrowon

-मतीन शेख

गावातल्या बाकड्यावर, कट्ट्यावर - वट्ट्यावर, ओसरीवर, पारावर बसलेली ही माणसं समृद्ध असतात.

तंबाखूची चिमट तळहातावर ठेवून मळत बसलेली, सुपारीचा खांडका अडकित्या खाली कात्रत पानाचा विडा तोंडात टाकून ते बोचरं तोंड लाल भडक रंगवून बसलेली ही माणसं जगण्यानं समृद्धच.

डोळ्यातली नजर विझत चाललेली, हयातभर उन्हातान्हात राबल्याने अंगाचं चमडं रापून गेलेली ही माणसं अनुभवानंही समृद्धच असतात.

या म्हाताऱ्यांचे डोळे खोल विहिरीसारखे, गालावर सुरकुत्यांचं जाळं, कपाळावर चंदन, पांडूरंगाचा बुक्का अगर जोतिबाचा गुलाल, सोबतीला गळ्यात तुळशीमाळ.

अंगावर पांढरा सदरा अथवा छाटन, जुनाट पण स्वच्छ धोतर. डोळ्यावर तीन चार जागी तुटलेला पण दोरीनं जोडलेला भल्या मोठ्या भिंगाचा चष्मा.

डोळे मिचकावत डोळ्यात सर्व त्राण एकवटून समोरच्याकडे त्यांच पाहणं आफाटच.

डोक्याला त्यांच्या गुलाबी, पिवळं अथवा दुधी रंगाचं मुंडासं, पटका अगर पांढरी टोपी. डोक्यावर काय नसलं तर यांना बोडकं वाटतं. यांच्या हाताला काय तो काठीचाच आधार...

Generation Gap
Rural Social Structure : नासवलेल्या संसारात कोलमडलेली माणसं

यांनी दुष्काळ भोगला तर कधी शेताला लागलेली असंंख्य चिबडं पाहिली. पोटाला भाकरी नाही म्हणून आबांड्याची भाजी अन् मक्क्याच्या कण्या खाऊन दिस काढलं.

लेकरं बाळं जगवली, संसार उभा केला. चांगलं दिस यावं म्हणून पांडुरंगाला साकडं घातलं. वारी ही केली. कायम कष्ट सोसलं पण कधी टेन्शन नावाची गोष्ट मनावर घेतली नाही.

आज ही त्यांना डिप्रेशन येत नाही. म्हणून गळ्याला फास कधी त्यांनी लावला नाही.

ताटात असेल तो भाकर तुकडा समाधानाने खाणं, डेऱ्यातलं गार पाणी घेवून तांब्या तोंडाला लावून तृप्त होणं अन् ओसरीला घटकाभर अंग टाकून झालं की परत पारावर जाणं.

यांच्या गप्पांचे विषय अगदी साधे सुधे. त्यांच्या बोलण्यात ना शेअर्स मार्केट, ना सोशल मीडिया, ना राजकारण. जवानीत मी इतक्या बैलांची मोट हाकत होतो.

एकटा जवारीचं पोतं उचलत होतो. दुध दुभतं, तालीम, शेती, माती, माळ, रान, पान - सुपारी, लेकरं - बाळं, जित्राबं, गाव या देशी मुद्द्यांच्या पलिकडे यांचे विषय जात नसतात.

यांना ना बीपी चा त्रास, ना शुगची गोळी. समृद्ध जगली ही हाडा मांसाची माणसं. आपण मात्र दगड झालो. डोळं भरुन पाहून घ्यावं या माणसांना अन् साठवावं काळजात कारण पुढे कधी दिसतील न दिसतील...

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com