Millets year: भरडधान्यात कोणत्या पिकांचा समावेश होतो?

संयुक्त राष्ट्रानं २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर केलंय.
Millet Year
Millet YearAgrowon

सध्या भारतातच नव्हे तर जगात मिलेट्सचा (Millets) म्हणजे भरडधान्य पिकांचा बोलबोला सुरू आहे. मिलेट्स किंवा भरडधान्य म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर ज्वारी (Jowar), बाजरी (Pearl Millet), नाचणी (Ragi), वरई यासारखी दुर्लक्षित पिकं. संयुक्त राष्ट्रानं २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष (International Year of Cereals) म्हणून जाहीर केलंय.

Millet Year
देशी भरडधान्य आहेत ‘सुपरफूड’

वातावरणातील बदल, तापमानवाढीचे चटके संपूर्ण जगाला बसत आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहणाऱ्या पिकांची लागवड वाढवण्यावर आता आख्ख्या जगात भर दिला जात आहे. तसेच त्या अनुषंगाने जागतिक अन्न व्यवस्थेमध्ये (फूड सिस्टीम) मोठे बदल होऊ घातले आहेत. आता जगाची एकूण खानपान संस्कृतीच बदलण्याच्या बेतात आहे. त्यामुळे भरडधान्य पिकांना मोठा उठाव मिळाला आहे. भारतात वातावरणातील बदलाचा सगळ्यात जास्त फटका शेतकऱ्यांना बसत आहे. वातावरणातील बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी आणि देशातील अन्न व पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पीकपध्दतीत बदल करण्याची गरज ऐरणीवर आली आहे. त्यामुळे येत्या काळात प्रमुख आणि दुय्यम भरडधान्य पिकांचे स्थान कळीचे ठरणार आहे.

Millet Year
भारत बनेल भरडधान्य उत्पादनाचे आगार

भरडधान्ये म्हणजे नेमकी कोणती पिके?

भरडधान्य पिकांमध्ये ९ भारतीय पिकांचा समावेश होतो.

१.ज्वारी (Sorghum) – ज्वारी हे सर्वदूर घेतले जाणारे पीक आहे. विशेषतः कोरडवाहू भागात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महराष्ट्रातील सोलापूर, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तर पश्चिम महाराष्ट्रातील डोंगरभागातदेखील याचे उत्पादन कमी-अधिक प्रमाणात होते. यात सफेद, पिवळी, लाल अशा विविध रंगछटा असणारी ज्वारी पहावयास मिळते.

२. बाजरी (Pearl milllet)- कोरडवाहू जमिनीत अगदी कमी पाण्यावर येणारे बाजरीचे पीक पूर्वीपासून घेतले जात होते. काळ्या मातीत याची गोडी काही वेगळीच असते. यात देखील हिरवा, लाल, तपकिरी असे मुख्य रंग व त्यांच्या छटा दिसतात.

3. नाचणी (Finger millet)– नाचणीला आधीपासूनच सुपरफुड म्हणून मान्यता मिळालेली आहे. पूर्वी सर्व भागांत होणारी नाचणी आता फक्त आदिवासी डोंगरभाग व कोकणात केली जाते. यात सफेद व लालकेशरी व मरूनलाल अशा रंगत येते.

४. वरई (Little millet) – आजही आदिवासी व कोकण भागात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. डोंगरशेतीतील हे मुख्य नगदी पीक आहे. यात कमी दिवसाच्या ते जास्त दिवसाच्या अशा विविध जाती आहेत.

५. वरी (Proso millet)– महाराष्ट्रातील काही भागांत वरईसारखेच दिसणारे हे धान्य पिकवले जाते. दिसायला हे अगदी वरईसारखेच असले तरी त्याचे गुणधर्म व पोषकमूल्य भिन्न आहेत.

६. राळा/ भादली / कांग (Foxtail millet) – पूर्वी सर्व भागात राळा पिकवला जाई. राळ्याचा भात खाण्यासाठी चविष्ट लागतो. खानदेशात तर पितरांना राळ्याचीच खीर करण्याची परंपरा होती. यात देखील विविध रंग असतात.

७. कोदो/ कोद्रा/ हरिक (kodo millet ) – एकावर एक असे सात थर असणारे हे धान्य. याचे वैशिष्ट्य म्हणजे आवरण काढले नाही तर हे अनेक वर्ष ठेवता येते. याची शेती बऱ्याच प्रमाणात गडचिरोली, धुळे आणि कोकणात केली जाते.

८. बर्टी (Barnyard millet )– सर्वात कमी दिवसात पक्व होणारे हे धान्य. हे देखील अनेक रंगांत उपलब्ध असते. कोरडवाहू व अतिपाऊस असणाऱ्या भागात देखील हे उत्तम येते. खाण्यासाठी चविष्ट व पौष्टिक असे हे धान्य आहे.

९. ब्राऊनटोप मिलेट (Browntop millet ) – मूळचे भारतीय असलेले हे मिलेट धान्य सध्यातरी फक्त दक्षिण भारतात घेतले जात आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे धान्य खाल्यानंतर अनेक तास भूक लागत नाही. भरपूर उर्जा यातून मिळते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com