
Wada News : ज्याची दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस आतुरतेने वाट पाहिली जाते, असा औषधी गुणधर्म असलेला वाडा तालुक्यातील चांबळे येथील प्रसिद्ध पांढरा कांदा (White Onion) बाजारात दाखल झाला आहे.
शेतातून कांदा काढून सुकवून त्याच्या माळा बनवून विक्रीस बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. या वर्षी कांद्याचे पीकही उत्तम आल्याने शेतकरी आनंदित आहे.
भातपीक कापणी झाल्यानंतर पांढरा कांदा लागवडीला सुरुवात होते. वाडा तालुक्यात चांबळा, डाकिवली, असनस, चिखला, गातेस केळठण या काही मोजक्याच गावात पांढरा कांदा लागवड केला जातो.
पांढऱ्या कांद्याला पोषक वातावरण आणि पारंपरिक लागवड यामुळे आजही पांढरा कांदा आपले औषधी गुणधर्म टिकवून आहे. बाजारात या कांद्याला मोठी मागणी आहे.
तालुक्यात प्रामुख्याने चांबळे, डाकिवली, केळठण या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जात असे. त्यानंतर तालुक्यात इतरही गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड शेतकरी करू लागले.
अभ्यासकांच्या माहितीनुसार, या कांद्यात औषधी गुणधर्म आहेत. कांद्यात मिथाईल सल्फाईड अमिनो ॲसिड हे घटक असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.
पोषक वातावरणाचा पिकाला फायदा
या वर्षी वाडा तालुक्यात बऱ्यापैकी पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. यंदा पडलेली थंडी ही पांढऱ्या कांद्याला पोषक ठरली आहे. त्यामुळे यंदा कांद्याचा आकार थोड्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे यंदा पांढऱ्या कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.
शेतात कांदा तयार झाला असून, शेतकरी काढणी करीत आहे. कांदा काढल्यानंतर उन्हात दहा ते पंधरा दिवस सुकवला जात आहे. त्यानंतर घरी आणून मजुरांमार्फत त्यांच्या माळा बांधल्या जात आहेत. कांदा रुचकर असल्याने माळेला ७० ते ८० रुपये भाव मिळत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.