Punjabrao Dakh Recording : पंजाब डख कुणाचं भलं करतात, शेतकऱ्यांचं की कंपन्यांचं?; कॉल रेकॉर्डिंग झालं व्हायरल

पंजाबराव डख आणि दीपक जाधव यांच्या नावाने कथित कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Punjabrao Dakh
Punjabrao Dakh Agrowon

Weather Update : स्वत:ला हवामान तज्ज्ञ म्हणून घेणाऱ्या पंजाबराव डख यांचे कथित कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे डख यांचा हवामान अंदाज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

आधीच निसर्गाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना चुकीच्या हवामान अंदाजामुळे मनस्ताप तर झालाच; परंतु आर्थिक झळ सहन करावी लागल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. या कॉल रेकॉर्डिंगच्या सत्यतेची पुष्टी ॲग्रोवन डिजिटल करत नाही.

"पंजाबराव डख यांनी दिलेल्या ढगफुटच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतू डख यांना त्याचे काहीही सोयरसूतक नाही. उलट त्यांनी ढगफुटीचे फोटो व्हॉटसॲप स्टेटसला ठेवून शेतकऱ्यांची खिल्ली उडवली," असा आरोप नाशिक जिल्ह्यातील शेतकरी दीपक जाधव यांनी केला आहे.

पंजाबराव डख आणि जाधव यांच्या नावाने कथित कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Punjabrao Dakh
Weather Update : पावसाची उघडीप राहणार

नाशिक जिल्ह्यात १९ मार्च रोजी ढगफुटीचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला. मात्र नाशिक जिल्ह्यात ढगफुटी झालीच नाही. परंतु ढगफुटीच्या भीतीने शेतकऱ्यांनी शेतमालाची काढणी करून घाईने तो बाजारपेठात विकला. यावरून शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.

नाशिक जिल्ह्यातील जाधव या शेतकऱ्याने पंजाबराव डख शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे व्हाईस मेसेज व्हॉटसग्रुपवर पाठवले. ते ऐकून डख यांनी जाधव यांना कॉल केला. या संभाषणात "तुम्ही माझी बदनामी करू नका. नाहीतर पुन्हा सांगितले नाही म्हणाल!" अशी धमकी डख यांनी शेतकऱ्याला दिली आहे.

तुम्ही खत, बियाणे कंपनीचे पैसे घेऊन शेतकऱ्यांना हवामान अंदाज देता. त्यात शेतकऱ्याचे भले करण्यापेक्षा कंपनीचे भले करण्यावर तुमचा भर असतो, असा आरोप जाधव यांनी केला.

त्यावर डख यांनी "तुम्ही तुमचं काम करा गप! लोकांची उकरडी उकरू नका. नाहीतर सांगितलं नाही म्हणाल!" अशी धमकी दिल्याचे या कथित कॉल रेकॉर्डिंगमध्ये दिसून येते.

या कथित कॉल रेकॉर्डिंगमध्ये डख आणि शेतकऱ्यामध्ये चांगलेच खटके उडाले. रेकॉर्डिंगमध्ये जाधव नावाचे शेतकरी म्हणतात,"तुम्ही कंपन्याच भले करून पैसे घेता. शेतकऱ्यांचे नुकसान करता. तुमच्यासोबत गावातील चार गुंड आहेत. त्यांच्या सोबत तुम्ही पार्ट्या करता. दारू पिता." यावर डख यांनी "तुम्ही काय करता तेही माहीत आहे. उगाच माझ्या नादाला लागू नका. ठेवा फोन आता" असे म्हणत कॉल कट केला.

Punjabrao Dakh
Cloudy Weather : ढगाळ वातावरणामुळे आंब्‍यावर रोगांचा प्रादुर्भाव

कथित व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमध्ये करण्यात आलेल्या आरोपाबद्दल ॲग्रोवन डिजिटलने पंजाबराव डख यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

यापूर्वीही पंजाबराव डख यांच्या अशाच कथित कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील शेतकऱ्यांशी वाद झाला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांने पंजाब डख यांच्यावर चुकीचे हवामान अंदाज दिल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, पंजाबराव डख यांच्या हवामानाला अंदाज कशाचा आधार असतो? असाही आक्षेप शेतकरी घेतात. शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवून काही संस्था आणि कंपन्यांशी संधान बांधून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचेही आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत.

दुसऱ्या बाजूला अनेक शेतकरी मात्र पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजावर विश्वास ठेऊन शेतीचे निर्णय घेत असतात. डख हे देवमाणूस असून जे काम हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांना जमत नाही ते काम डख निस्वार्थ भावनेने करतात, त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, अशा शब्दांत अनेक शेतकऱ्यांनी डख यांचे जोरदार समर्थन केले. तर काही शेतकऱ्यांनी मात्र डख यांच्या हवामान अंदाजाला काहीही शास्त्रीय आधार नसतो, त्यांचे अनेक अंदाज चुकलेले आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

दरम्यान, व्हायरल झालेल्या कथित कॉल रेकॉर्डिंगमुळे डख देत असलेल्या हवामान अंदाजाच्या विश्वासार्हतेबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com