health issue : अचानक मृत्यूस जबाबदार कोण?

कुणी चालताना तर कुणी नाचताना तर कुणी बसल्या जागीच हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू पावत आहेत. असे अचानक मृत्यू येणाऱ्यांत तरुणांचे प्रमाण अधिक आहे. कोरोना काळानंतर अशा घटना वाढल्या आहेत. अचानक मृत्यू येण्याची नेमकी काय कारणे असतील बरं?
Health
Health Agrowon

अतीश साळुंखे

आज-काल निरोगी धष्टपुष्ट तरुण युवकांतील काहींचा जीममध्ये वर्कआउट करताना, गाणं गाताना, डान्स करताना तर काहींचा जॉगिंग करताना, रोजची नित्याची कामे करताना हृदयविकारामुळे जीव गेला, अशा बातम्या सतत ऐकण्यात येत आहेत.

तसेच शाळेतील काही लहान मुलांचा सुद्धा चालता, बोलता, खेळताना फिट आल्याने आणि ‘ब्रेन हॅमरेज’मुळे मृत्यू झाला आहे.

या मागील कारण काय? लग्नकार्य समारंभात सुद्धा काही जणांचे अचानक मृत्यू झाले आहेत, ही धोक्याची घंटा सगळ्यांसाठीच असून, या अचानक होत असलेल्या मृत्यूस जबाबदार कोण? कोरोना काळानंतरच अशा घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे का?.

बदलती जीवनशैली, बदलते पर्यावरण, मोबाईल 5g नेटवर्क सेवा यामुळे वाढलेले रेडिएशन, नफेखोर औषध निर्मात्या कंपन्या की दिशाहीन शासकीय आरोग्य यंत्रणा, असे सामान्यांचे अनुत्तरित प्रश्‍न आहेत.

मानवी शरीर आणि निसर्ग

निसर्गाचा समतोल बिघडत चालला असून वातावरणातील बदलासोबतच वाढत चाललेले प्रदूषण, वाढते शहरीकरण, वाढते औद्योगीकरण, पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण, अन्नभेसळ, संकरित पीक उत्पादन यांचाही परिणाम मानवी शरीरावर होत आहे.

मानवी शरीर आणि निसर्ग याच्यात कायम समतोलपणा दिसतो जसे पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण, तसेच पृथ्वीवर वाढत चाललेले प्रदूषण याची तुलना तुम्ही मानवामध्ये वाढत असलेल्या कर्करोगाच्या प्रमाणाशी करू शकता.

जसे पृथ्वीचे संतुलन बिघडत जाणार तसेच मानवी आरोग्य बिघडत जाणार याचा अनुभव आपल्याला कोरोना काळात आला. पर्यावरणातून सहज उपलब्ध होणारा प्राणवायूच्या अभावामुळे कित्येक रुग्ण हॉस्पिटलमध्ये मृत पावले. मानव जात जर नष्ट होऊ द्यायची नसेल तर अन्नसाखळीतील प्रत्येक जिवाचे रक्षण करणे हा आपला धर्म आहे.

Health
प्रत्येक जिल्ह्याचे असावे ‘इन्व्हायर्न्मेंटल हेल्थ कार्ड’

प्रगती मागील उणिवा

पूर्वी हॉस्पिटल्स आणि आरोग्य सेवा एवढी प्रगत नसताना सुद्धा आधीच्या लोकांचे आयुर्मान ८० ते ९० वर्षांचे होते, आता जर आरोग्यसेवा प्रगत आहे, असं जरी म्हटलं तरी कोरोनाकाळात जगातील संपूर्ण डॉक्टर्स, स्पेशालिटी हॉस्पिटल्स, या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणवून घेणारी सर्व सुपर स्पेशालिस्ट मंडळी, मोठ्या औषध कंपन्या, अत्युच्च तंत्रज्ञान, आयसीयू, व्हेंटिलेटर्स, वैद्यकीय तपासण्या करणाऱ्या सर्व तथाकथित अत्याधुनिक लॅब या सर्व यंत्रणा कोरोना नियंत्रित करण्यास असमर्थ ठरल्या, हे ॲलोपॅथिक चिकित्सा व्यवस्थेचे सुरुवातीचे अपयश सर्वज्ञात आहे.

आतासुद्धा तिशीतील तरुण हृदयविकारामुळे दगावले जात आहेत, हे आपल्या आरोग्यसेवांच्या प्रगतीचे प्रतीक म्हणायचं का? या प्रगती मागील उणिवांचा शोध लावणे हे गरजेचे आहे.

सध्या आरोग्य सेवेचे व्यवसायीकरण झाले असून, औषध कंपन्यांमध्ये नवीन औषध सर्वांत आधी बाजारपेठांमध्ये आणायच्या स्पर्धेमुळे आणि नफ्याच्या हव्यासापोटी या औषधांच्या सखोल क्लिनिकल चाचण्या होत नाहीत, केलेल्या चाचण्यांचे दुष्परिणाम याचे रिपोर्टस सामान्य

माणसाला कधीच उपलब्ध होत नाहीत, या औषध कंपन्यांच्या स्पर्धेदरम्यान कळत-नकळत अशा औषधांच्या चाचण्यांसाठी सामान्यांच्या शरीराचा गैरवापर होतो की काय, हा प्रश्‍न आहे.

बदलती जीवनशैली

बदलत चाललेली गतिमान जीवनशैली परिणामी अनावश्यक जिभेचे चोचले पुरवण्यासाठी काय खातो, याचा विचार न करता बदलत चाललेले खानपान, जंक फूड्स, फास्ट फुड्स असे प्रक्रियायुक्त अन्न आहार पोट भरण्यासाठी घेतला जात असल्यामुळे यातून शरीराचे पोषण कसे होणार परिणामी पोषक आहाराच्या अभावामुळे शरीरामध्ये प्रतिकारशक्तीची कमतरता होत आहे. धावपळीचे युगामध्ये कोणालाही वेळ नाही.

त्यामुळे आजारपणात सुद्धा आपल्याला गोळ्यांचे परिणाम लगेच हवे असतात. वातावरणातील बदलामुळे होणारे साथीचे आजार सुद्धा नकोसे असतात. डॉक्टरांकडून जास्त पावरफुल औषध घेऊन आपणच आपली प्रतिकारशक्ती कमी करत आहोत.

जसे पूर्वी ताप आला तर ५० mg ची तापासाठीची एक गोळी घेतल्यावर अंगातून घाम आला की ताप निघून जायचा. परंतु आता ६५० mg ची गोळी दिवसातून दोनदा घेतली तरी ताप जात नाही, याचाच अर्थ प्रतिजैविक औषधे (अँटिबायोटिक), पेन किलर, आणि इतर अनावश्यक औषधे वारंवार घेतल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे.

उत्तेजक औषधांचा अतिवापर

सुदृढ शरीरासाठी किंवा दिसण्यासाठी, पिळदार शरीरासाठी स्टिरॉइड आणि प्रोटीन पावडर याचा गैरवापर होत आहे.

स्टिरॉइड औषधांचा वापर हा दुधारी तलवारीसारखा असून औषध प्रमाणात ठरावीक काळासाठी घेतले तर ते आरोग्यास उपायकारक असून, या औषधाचे वारंवार सेवन केल्याने हृदयविकाराचा झटका किंवा कार्डिआक अरेस्टचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

देशाची शोकांतिका अशी आहे, की हे स्टिरॉइडचे इंजेक्शन सहजच उपलब्ध होत असल्याचे वारंवार दिसून आले आहे, जसे पोलिस भरतीतील तरुणांनी शारीरिक चाचणीच्या वेळेस हे इंजेक्शन घेतल्याचे निदर्शनास आले होते.

Health
APMC Election : बाजार समिती निवडणुकांमध्ये शेतकरी उमेदवारीवरून संभ्रम

अंगातील धमक वाढवण्यासाठी अशी औषधे गंभीर परिणामाचा विचार न करता खेळाडूंकडून सुद्धा घेतली जातात, तसेच उच्चभ्रू जीमच्या कचऱ्यामध्ये सुद्धा या इंजेक्शनच्या मोकळ्या बाटल्या निदर्शनास आल्या आहेत. अशा उत्तेजित औषधांमुळे क्षणिक ताकद वाढल्याचे भासते.

परंतु याचा दुष्परिणाम गंभीर होतो. स्टिरॉइड स्वस्तात उपलब्ध होत असल्यामुळे ॲलोपॅथी औषधांबरोबर आता आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा याचा वापर करण्यात येत आहे. स्टिरॉइडच्या अतिवापरामुळे शरीरामध्ये प्रतिकारशक्ती कमी होत चालली असून, याची तुलना ब्रेडबरोबर होऊ शकते.

ब्रेड जर उघडा ठेवला तर त्याला बुरशी लागते. कोरोना काळात स्टिरॉइडच्या अतिवापरामुळे कमी झालेल्या प्रतिकारशक्तीमुळे म्युकोरमायक्रोसिस हा ‘ब्लॅक फंगस’ आजार खूप जणांना झाल्याचे निदर्शनास आले आहे.

आरोग्य सेवेतील महत्त्वाचे घटक जसे डॉक्टर, औषधे आणि लस उत्पादित कंपन्या, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, खासगी हॉस्पिटल्स, मेडिकल स्टोअर, पॅथॉलॉजी लॅब, मेडिक्लेम इन्शुरन्स कंपनी, सरकारी आरोग्य यंत्रणा हे सर्व एका माळेचे मणी आहेत.

या सर्वांचा जनसामान्यांच्या आरोग्यासोबत आर्थिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होत आहे. रुग्णहक्क आणि आर्थिक विषमता परिणामी समाजामध्ये वाढत असलेली आरोग्य उपचार विषमता या सर्व गोष्टींचे सखोल विश्लेषण झाले पाहिजेत.

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com