खरे गुरू कोण?

गुरुविना जीवन व्यर्थ आहे, असे म्हटले जाते. तुम्ही भरपूर बुद्धिमान असाल, कर्तबगार असाल तरीही नीतिमत्ता आणि सचोटीच्या मार्गाने योग्य दिशेने वाटचाल करण्याची शिकवण देणारा योग्य मार्गदर्शक असावा लागतो.
Nature
NatureAgrowon

शंकर बहिरट

गुरुविना जीवन व्यर्थ आहे, असे म्हटले जाते. तुम्ही भरपूर बुद्धिमान असाल, कर्तबगार असाल तरीही नीतिमत्ता आणि सचोटीच्या मार्गाने योग्य दिशेने वाटचाल करण्याची शिकवण देणारा योग्य मार्गदर्शक असावा लागतो. असा मार्गदर्शक जो मायेने ओथंबलेल्या अंतःकरणाने, आपल्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता मुक्त हस्ताने तुम्हाला घडवणारा असावा. त्याबरोबरच तुमचे अतीव प्रेमाने रक्षण आणि पोषण करणारा असावा. या योग्यतेचा पहिला गुरू म्हणजे आपली आई. आपल्या लेकराच्या हिताची अहोरात्र चिंता करणारी आई. जिचे प्रेम कोणत्याही लाभाच्या अपेक्षेने नसते. आईचे चालणे बोलणे बाळ मेंदूत साठवत असते. आईकडून मिळालेले हे बाळकडू आयुष्यातली सर्वांत मोठी संपत्ती असते. जी दुसरा कोणताही गुरू देऊ शकत नाही.

Nature
निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य

याच योग्यतेचा दुसरा गुरू म्हणजे आईचेच रूप असणारा साक्षात निसर्ग. आईच्या मांडीवरून उठून बाळ अंगणात खेळायला येते. अंगणातली वेगवेगळ्या फळाफुलांच्या झाडावर मधुर आवाजात चिवचिवणारी पाखरांची शाळा भरलेली असते. निसर्गातल्या शाळेतला बाळाचा हा पहिला वर्ग असतो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या अनुभूतीचे प्रत्यक्ष ज्ञान देणारा निसर्ग हा एकमेव गुरू आहे. आई प्रमाणेच निसर्गाचे दातृत्व हे कोणत्याही लाभाच्या अपेक्षेशिवाय असते. निसर्गाची व्याप्ती अफाट आहे. निसर्ग सढळ हाताने आपल्याला द्यायला उत्सुक आहे. मात्र त्यामानाने आपली झोळी कमकुवत आहे.

आयुष्यातल्या अनेक उतार-चढावात, सुख-दुःखाच्या प्रसंगी निसर्गाला गुरू मानणारा, निसर्ग नियमांची जाण ठेवणारा, आयुष्यातल्या कोणत्याही कठीण प्रसंगी न डगमगता नव्या जोमाने कामाला लागतो. निसर्ग आपल्या प्रत्येक घटकातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणादायी शिकवण देत असतो. मात्र ही शिकवण समजून घेणे ही सुद्धा कला आहे. निसर्गाची ओळख करून देताना निसर्गाकडून कसा बोध घ्यावा याचे धडे शालेय शिक्षणातून शिकवायला हवेत. निसर्गाची गुपिते उलगडून त्यांची व्यावहारिक आयुष्याशी सांगड घालणाऱ्या विचारवंतांच्या तसेच संत महात्म्यांच्या ग्रंथांची ओळख करून देणारे शालेय शिक्षक हे आयुष्याला कलाटणी देणारे असतात.

ज्ञानेश्‍वरी, तुकाराम गाथा आदी ग्रंथातून अध्यात्मज्ञान आणि प्रबोधन करताना निसर्गातले अनेक दाखले देणारे, निसर्गाचे महत्त्व अधोरेखित करणारे ग्रंथ हेच आपले गुरू होय. आपले वाडवडील, हितचिंतक, चांगले मित्र हे सुद्धा आपल्याला योग्य तोच मार्ग दाखवतात. ही मूल्यवान संपत्ती जवळ असताना चमत्काराला भुलून कुठल्यातरी भोंदू गुरूच्या नादी लागणे हा मूर्खपणा नाही का? अध्यात्माचा बाजार मांडणाऱ्या, शिष्यांकडून आर्थिक लाभाची अपेक्षा ठेवणाऱ्या भोंदू गुरूंना ओळखता आले पाहिजे. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com