Tomato Rate: टोमॅटोचे दर का घसरले?

प्रतिकूल वातावरणातही पीक वाचविलेल्या टोमॅटो उत्पादकांना चांगल्या बाजाराने दोन महिन्यांपर्यंत दिलासा दिला.
Tomato grower
Tomato growerAgrowon

ज्ञानेश उगले

प्रतिकूल वातावरणातही पीक वाचविलेल्या टोमॅटो उत्पादकांना (Tomato Farmer) चांगल्या बाजाराने दोन महिन्यांपर्यंत दिलासा दिला. खर्च निघून येईल, अशी आशा मनात असतानाच दिवाळीनंतर मार्केट डाउन झाले. मागील वर्षी आधीच संपलेला बेंगळुरूचा टोमॅटो हंगाम (Tomato Season) या वर्षी नेमका आताच सुरू झाला आहे. देशातील टोमॅटो व्यापारी खरेदीदार, निर्यातदार कर्नाटककडे वळले असल्यानेही उतरण झाली आहे. तरी टोमॅटोचे सध्याचे दर स्थिर राहतील, अशी स्थिती आहे.

मागील काही वर्षे तेजीचे मिळाल्यामुळे यंदा नाशिक भागातील टोमॅटो उत्पादकांत दांडगा उत्साह होता. वातावरणातील बदलाने सतत फटका दिल्यामुळे पारंपरिक द्राक्ष उत्पादकही बागा तोडून टोमॅटोकडे वळले होते. त्यामुळे टोमॅटो लागवड अर्थातच वाढलेली होती. यंदाच्या जोरदार पावसाने त्यातही चित्रा नक्षत्रातील परतीच्या पावसाच्या तडाख्याने उत्साहाची हवा बरीच कमी केली.

Tomato grower
Potato, Tomato Production : बटाटा, टोमॅटो उत्पादन घटणार

या काळात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी जिवाचे रान केले. औषधे, खते, मजुरी यासाठीचा खर्च यंदा दीड ते दोन पटीपर्यंत वाढला. त्यातही काही वाणांनी मोठाच दगा दिला. बरेच प्लॉट मर, सुकवा या रोगांना बळी पडले. याही परिस्थितीतून वाचलेल्या टोमॅटो उत्पादकांना प्रति क्रेट ५०० ते ८०० रुपये दर मिळत असल्याने त्यातही दिलासा होता.

मागील पाच दिवसांपासून या तेजीलाही ग्रहण लागले आहे. टोमॅटोचे दर प्रति क्रेट कमाल ८०० वरून ४०० पर्यंत, म्हणजे निम्म्याने खाली आले आहेत. हे दर तरी टिकून राहावेत, अशी उत्पादकांची अपेक्षा आहे. तसे झाले तरच यंदाचा झालेला भरमसाट खर्च निघून येईल.

दरातील नरमाई

बंगळूरचा नुकताच सुरू झालेला हंगाम, तसेच मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतील स्थानिक टोमॅटोची आवक ही दर उतरण्यामागील मुख्य कारणे व्यापाऱ्यांकडून सांगितली जात आहेत.मागील वर्षी महाराष्ट्र वगळता इतर राज्यांतील टोमॅटो उत्पादक पट्ट्याचे जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले होते.

यामुळे बंगळूर हंगाम अगोदरच आटोपला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील विशेषत: नाशिक भागातील टोमॅटोला देशभरातून मागणी होती. परिणामी, टोमॅटोला शेवटपर्यंत चांगले दर मिळाले. मागील वर्षीचा धडा घेऊन बंगळूर भागातील उत्पादकांनी लागवड उशिरा केल्या. तो माल मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दीड ते दोन महिन्यांनी म्हणजे ऐन दिवाळीत बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.

कर्नाटक भागातील बहुतांश लाल मातीत येणारा तेथील स्थानिक टोमॅटो एक सारखा रंगात येत आहे. त्यामुळे त्याला पसंती मिळत आहे. तसेच नाशिकच्या तुलनेत त्याचे दर काहीसे कमी आहेत. त्यामुळे नाशिक भागातील टोमॅटोच्या खरेदीदारांनी बंगळूरकडे मोर्चा वळवला आहे.

गिरणारे भागात मागील मागील दहा वर्षांहून अधिक काळापासून व्यापार करणारे नसीम यांच्या म्हणण्यानुसार या भागातील ८० टक्के व्यापाऱ्यांनी बंगळूरकडे गेले आहेत. बंगळूर येथील टोमॅटो हा नाशिकच्या तुलनेत शंभर ते दीडशे रुपये कमी दराने मिळत असल्याने त्या टोमॅटोलाच प्राधान्य दिले आहे.

Tomato grower
Tomato Pest : टोमॅटोवरील टुटा अळीच्या नियंत्रणासाठी करा सामूहिक प्रयत्न

घटलेली निर्यात

बांगलादेश हा भारतीय टोमॅटोसाठी सर्वांत महत्वाचा खरेदीदार देश राहिला आहे. मागील चार-पाच वर्षांपासून दोन्ही देशांतील हा व्यापारही अडचणीत आलेला आहे. बांगलादेशने वाढविलेला ३४ टक्के आयातकर हे त्यामागील प्रमुख कारण आहे. परिणामी, टोमॅटोची निर्यात मंदावलेली आहे. गिरणारे, पिंपळगाव बसवंतच्या बाजारातून बांगलादेशला होणाऱ्या निर्यातीत ७० टक्क्यांनी घट झाली आहे. हा माल गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांत देशांतर्गत बाजारात विकण्याचा पर्याय स्वीकारला जात आहे. मात्र या बाजारातून अपेक्षित उठाव होत नसल्याचे व्यापारी सांगतात.

पिकाकडे दुर्लक्ष नको

नाशिक बाजार समितीत टोमॅटो व्यापारी असलेले राजेश म्हैसधुणे हे टोमॅटो उत्पादकही आहेत. ते म्हणाले, ‘‘मागील दोन महिने टोमॅटोला तेजीचे दर मिळाले. बाजारात तुटवडा असल्याने हे दर मिळत होते. आता दरात उतरण झाली असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असणे साहजिक आहे. मात्र तरीही हे दर फारच कमी म्हणता येणार नाहीत. मंदीमुळे पिकाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. चांगला व जास्त माल मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यातूनही झालेला खर्च भरुन येण्यास चांगली मदत होऊ शकते.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com