
व्हिएतनाममध्ये आल्यापासून बघतोय.एकाही बाथरूममध्ये आंघोळीसाठी बकेट अथवा मग नाही.सगळीकडं शॉवर.
चोवीस तास गरम पाणी.कोण किती पाणी सांडतोय, कितीवेळ, कितीवेळा आंघोळ करतोय,हेही कोणी बघत नाही,विचारत नाही.
मी रुद्रा हटवर थंड पाण्याच्या शॉवरने आंघोळ करतो.तरीही बकेट,मग लागतोच.गरम पाणी असेल तर बकेट लागतंच.
पावसाळा,हिवाळा भरपूर पाणी असतं.तेव्हा मनसोक्त आंघोळ करता येते.उन्हाळ्यात अप्रत्यक्ष दबाव असतोच.
जास्त पाणी सांडून काहीतरी गुन्हा करतोय,असा फील असतो. बकेट,दोन बकेटात भागवावं लागतं. तसंही ग्रामीण भारतात बकेट,मग शिवाय आंघोळ होत नाहीच.
इथं मुबलक पाणी आहे.बारमाही वाहणाऱ्या मोठ्या नद्या.
त्यावर काढण्यात आलेले कालवे, डोंगरातून वाहणाऱ्या पाण्याचा सिंचनासाठी कल्पकतेने केलेला वापर,गावोगाव बांधण्यात आलेली शेकडो शेततळी, भरपूर होणारा पाऊस यामुळं इथं पाणी हा कोणाच्याच चिंतेचा विषय नाही.
पाणी कोण किती सांडतयं,हा मुद्दाच नाही. त्यामुळं इथं शॉवर ही रुळलेली पध्दत असावी.
मला दणांग मध्ये दोन दिवस आंघोळीची अडचण आली नाही. तिथं पाणी सौरउर्जेने गरम होत होतं की हिटरने ते माहित नाही. तिथला शॉवर व्यवस्थित सेट होता.
जेवढं हवं तेवढं गरम पाणी भरपूर वेळ येत होतं.हूए मध्ये शॉवर होतं पण पुरेसं गरम पाणी येत नव्हतं.
त्यामुळं कसंतरी भागवलं. मात्र फोंगन्हामध्ये आंघोळ करताना परेशान झालो.
इथं हिटर आहे.तो चालू करून दहा मिनिटे झाली की,गरम पाणी सुरू होतं.
पण या शॉवरचं सेंटींग काही केल्या जमेना.एकतर खूप कडक पाणी यायला लागलं..
नाहीतर थंडगार.पाणी थंड येतयं की गरम,हे बघता बघता हात भाजून निघू लागला.
आशूलाही त्याचं सेटींग जमेना.शेवटी कोमट पाण्यानेच आंघोळ केली. दुसऱ्या दिवशी दुपारी बकेट आणि मगची चौकशी केली पण त्यांच्याकडं बकेट नव्हतंच.
शेवटी कोमट पाण्यानेच अर्धा तास आंघोळ केली.असाच अनुभव दोन ठिकाणी आला.परतीच्या प्रवासात हूऐमध्ये ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो,तिथला शॉवर एक नंबर.
भरपूर गरम पाणी. मी त्याचा पुरेपूर लाभ उठवला.गार वातावरणात दरदिवशी किमान दोनवेळा मनसोक्त आंघोळ केली.
आंघोळीच्या शॉवरसारखीच दुसऱ्या शॉवरची अवस्था.काही ठिकाणी त्याला एवढं जबरदस्त प्रेशर की, कमोडवर बसलेला माणूस घाबरून उठावा...
आम्ही हे सगळं मस्त एन्जॉय केलं. कागदाचा वापर करणाऱ्यांसाठी या शॉवरचा विषय नव्हता!
पिण्याच्या पाण्याचंही असंच असावं.जेवणात सुप वगैरे पातळ पदार्थ भरपूर असतात. शिवाय बीअर पाण्यासारखी पितात.
त्यामुळं जेवणाच्या टेबलवर पाणी असतंच असं नाही.कॉफी शॉप व स्ट्रीट फुडच्या ठिकाणी मात्र कुठलातरी पाला उकळलेलं रंगीत पाणी असतं.
पहिल्या दिवशी मी त्या पाण्याला मद्यच समजलो.सकाळी सकाळी सगळे लोक कसं काय पित असतील,असा मला प्रश्न पडला.पण दुसऱ्या दिवशी तो गैरसमज दूर झाला.
प्रत्येक ठिकाणी मला पाण्याची बॉटलच विकत घ्यावी लागली.तरीही दिवसभरात पाणी पिण्याचं प्रमाण दिड लिटरच्या पुढं गेलं नाही... जे की भारतात चार-पाच लिटर सहज होतं.
मराठवाड्यात तीव्र स्वरूपाचा उन्हाळा व पाणी टंचाई ची स्थिती असल्याने, पिण्याच्या पाण्याचं महत्त्व अधिक आहे.
आता हॉटेलमध्ये पाणी बॉटल मिळत असल्याने,त्याचं गांभीर्य कमी झालयं. मात्र हे बाटलीबंद पाणी बाजारात येण्याआधी, पिण्यासाठी पाणी कोणाला मागायचं,असा विषय असायचा.
याची तीव्रता खेड्यात, गावात अधिक असायची.प्रत्येकजण पिण्याचं पाणी मोठ्या कष्टानं मिळवायचा.त्यामुळं पाणी मोलाची बाब होती.
पूर्वी छोट्या छोट्या हॉटेलात चहा घेतला तरच पाणी मिळायचं.प्रवासात पुढे कुठे पाणी मिळेल याची खात्री नसायची. त्यामुळं पाणी मिळालं की पोट भरून प्यायचं,ही सवय.
सकाळी उठलं की,मी लिटर,दोन लिटर पाणी पितो.बाथरूमची चिंता नसते. ' नॉट ओन्ली होल वावर इज अवर बट आल्सो ऑल रोडसाईडस् & एम्टी प्लेसेस टू!'
अर्थात ही सगळी व्यवस्था पुरूषांसाठी.त्यामुळं वॉशरूमची चिंताच नाही.स्त्रियांची याबाबतीत आजही गैरसोयचं आहे.
मी व्हिएतनामला आलो.नेहमीची सवय.बाहेर पडताना पोटभर पाणी प्यायचं.पिलं, निघालो फिरायला.शहरात कुठंच स्वच्छतागृह दिसेना.
रस्त्यावर उभा टाकण्यासारखी कुठचं एकही जागा दिसेना...असं बघायची सवयच नाही.अधिकृत मुतारी नसली म्हणून कुठं बिघडलं?
लोकांनी जागोजाग मुताऱ्या निर्माण केलेल्या असतातच की,! पण इथं अशी एकही जागा दिसेना.शेवटी रेस्टॉरंट गाठावं लागलं.
इथं प्रत्येक छोट्या -मोठ्या हॉटेलमध्ये बाथरूम असतेच. शिवाय ती स्वच्छही असते. पहिल्या दिवशीच धडा मिळाला. गरजेपुरतंच पाणी प्या. बाहेर निघताना बाथरूमला जाऊनच या. शिवाय थोडी कळ काढायला शिका.
फोंगन्हाला बारा कि.मी.चं पदभ्रमण करून आल्यानंतर भारतीय पध्दतीच्या हॉटेलमध्ये जेवण केलं. थोडा गुडघा त्रास देत होता म्हणून, खोबरेल तेलाची आठवण झाली.
तेलानं मालिश करावं असा विचार केला.दहा-बारा दुकानांमध्ये चौकशी केली.तेल कुठचं मिळालं नाही.
अधिक माहिती घेतली तेव्हा कळलं,इथं ते तेल कोणी वापरतच नाही. आपण खातो, वापरतो ते पदार्थ आपल्यासाठीच भारी असतात.
जगात इतरत्र त्याचं मोल असतंच असं नाही,हा ही एक धडा या प्रवासात मिळाला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.