Jugaad : जुगाड करण्यावरच सगळ्यांचा भर का?

शेतीतल्या यांत्रिकीकरणात आपण फार मागे आहोत याचे एकमेव कारण आमची गरीबी आणि अडाणीपणा. मग ती गरीबी खर्च टाळण्यासाठी, आहे त्या साधनसामुग्रीत थोडे फार रचनात्मक बदल करून जुगाड करायला शिकवते.
Agriculture Jugaad
Agriculture JugaadAgrowon

शंकर बहिरट

शेतीतल्या यांत्रिकीकरणात (Agriculture Mechanization) आपण फार मागे आहोत याचे एकमेव कारण आमची गरीबी आणि अडाणीपणा. मग ती गरीबी खर्च टाळण्यासाठी, आहे त्या साधनसामुग्रीत थोडे फार रचनात्मक बदल करून जुगाड करायला शिकवते. मजूर टंचाई (Labour Shortage) हा सध्याच्या काळात शेतकऱ्यांना सर्वात जास्त भेडसावणारा प्रश्न आहे. यावर पर्याय म्हणून आधुनिक दर्जेदार यंत्राच्या (Agriculture Equipment) साहाय्याने शेती केली तर ती अधिक किफायतशीर होऊ शकते. मात्र अजूनही आपल्याकडे यांत्रिकीकरणाबद्दल तितकासा सकारात्मक विचार केला जात नाही. मग अशी दर्जेदार यंत्रे तयार करण्यासाठी लागणारे संशोधन आणि विकासाचे नियोजन या खूप दूरच्या गोष्टी झाल्या. त्याऐवजी जुगाड (Jugaad) करण्याला प्राधान्य दिलं जातं.

Agriculture Jugaad
दुचाकीला ट्रॉलीचे जुगाड अन् सुरू झाला रोजगार...

एखाद्या दर्जेदार आणि उच्चप्रतीची क्षमता असणाऱ्या यंत्राचा आपल्या शेतात वापर करायचा ठरवला तर ते यंत्र बाहेरच्या देशातूनच मागवावे लागते. त्याची किंमत आपण कल्पना करू शकत नाही इतकी महाग असते. आपल्या देशात मात्र तशा दर्जाची यंत्रे तयार होऊ शकत नाहीत, ही मोठी खेदाची बाब आहे. यांत्रिकीकरणातील आपल्या पिछाडीला सरकारची अनास्थाही कारणीभूत आहे. शिवाय गरीबी आणि अडाणीपणामुळे या प्रश्नाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन विचित्र आहे. आम्हाला लहानपणी हातात पाटी-पुस्तक मिळण्याऐवजी हातात बैलाचा कासरा दिला गेला. शाळकरी वयात मेंदूचा विकास होण्याऐवजी अतिकष्टामुळे आम्ही अधिकाधिक निर्बुद्ध होत गेलो. त्यामुळे ढोरकष्टात सगळे आयुष्य खर्ची घातले तरी या कष्टातून बाहेर पडण्याचा आम्हाला प्रयत्न करता आला नाही.

मागच्या अनेक पिढ्यांनी असं काबाडकष्टाचं जगणं स्वीकारलं होतं. त्यांना त्यात वावगं काही वाटत नव्हतं. त्यामुळे त्यांची पुढच्या पिढीकडून सुद्धा तशीच स्वाभाविक अपेक्षा होती. आपल्याकडे पूर्वीपासून मुबलक पशुधन आणि मनुष्यबळ आहे. शेतीची तसेच औतकाठीची कामे ही अतिशय कष्टाची असतात. कष्ट हीच आपली परंपरा आहे अशी समजुत असल्यामुळे कष्ट कमी करण्याचे पर्याय शोधले गेले नाहीत. परदेशात शेतीमध्ये अनेक बदल झाले, यंत्रे आली. आपल्याकडे मनुष्यबळ भरपूर असल्यामुळे बेरोजगारी वाढण्याच्या भीतीने पहिल्यापासूनच विचारवंतांनी तसेच सरकारने यांत्रिकीकरणाकडे डोळेझाक केली.

यंत्रे नाकारल्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाला फक्त काम मिळाले; पण त्यांची प्रगती झाली नाही. कामाला जुंपलेले मनुष्यबळ शिक्षणापासून वंचित राहिले. अडाणीपणा वाढत गेला. प्रगती खुंटली. शेती तोट्यात गेली.

Agriculture Jugaad
सांगलीत जीपनंतर जुगाड 'मिनी फोर्ड' गाडीचा आविष्कार 

दुसऱ्या बाजूला उद्योगधंदे वाढत गेले. कारखान्यातली कनिष्ठ दर्जाची नोकरी शेतीपेक्षा सुरक्षित वाटू लागली. शेती करणारे हात कारखान्यात झाडलोट आणि मशिनरीमध्ये हात काळे करण्यात धन्यता मानू लागले. इकडे शेतात मनुष्यबळाची टंचाई भासू लागली. शिवाय उच्चशिक्षित असणाऱ्यांनी सुद्धा शेतीकडे पाठ फिरवली. शेतात राबणाऱ्या आपल्या भावंडांचे कष्ट कमी व्हावे या हेतूने काही नवीन शोध किंवा सुधारणा आपण घडवून आणू शकतो असा विचार त्यांनी करायला हवा होता. मात्र तशी इच्छाशक्ती दिसली नाही. पुढे कुटुंबांच्या वाटण्यांमुळे मनुष्यबळाची आणखी विभागणी झाली. बहुतेकांनी शहराचा रस्ता धरला. शेतीत काम जास्त आणि माणसं कमी पडू लागली आणि यंत्राशिवाय पर्याय राहिला नाही. आपल्याकडील शेतकरी मजबुरीने यांत्रिकीकरणाकडे वळाले.

जुगाडामागची मानसिकता

शेतकरी संकटात आहे म्हणून सरकारने यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. अनुदान योजना सुरु झाल्या. मात्र कर्ज प्रकरणाची चौथाई भरण्याइतपत सुद्धा बहुतेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नसते. प्रगतीतला फार मोठा अडथळा गरिबीच्या रूपाने आ वासून उभा असतो. मग त्या गरिबीला वैतागून एखादा आपल्या आयुष्याचा शेवट करून टाकतो. बरेच जण तसेच रडतखडत रोजचा खर्च टाळण्यासाठी, मिळेल त्या साधन सामुग्रीत, आहे त्या अवजारात थोडे फार रचनात्मक बदल करून जुगाड करायचा प्रयत्न करत असतात. गरिबीने गांजलेला, मजुर टंचाईने वैतागलेला हा शेतकरी असतो. अगदी मजबुरीने डोकं चालवतो, काहीतरी जुगाड करतो. बैल जोडीतला एक बैल मेला आणि दुसरा बैल घ्यायची ऐपत नसते म्हणून कुणी एका बैलाची अवजारे बनवतो. डिझेल, पेट्रोल किंवा विजेवर चालणारी आधुनिक यंत्रे घ्यायला परवडत नाहीत म्हणून एखादा घरी भंगारात पडलेल्या दुचाकीला काहीतरी चित्रविचित्र जोडणी करून शेतीचे अवजार करायचा प्रयत्न करतो. टीव्हीवर, वर्तमानपत्रात त्याची बातमी होते. लोक त्याची वाहवा करतात. त्यालाही आपण संशोधक झाल्यासारखे वाटू लागते. मग इतर शेतकरी सुद्धा हे आपल्याला कसं सुचलं नाही असे म्हणून त्याचा आदर्श घेऊ लागतात. जो तो जुगाड करायच्या मागे लागून समाजमाध्यमांमध्ये आपली पाठ थोपटून घ्यायचा प्रयत्न करू लागतो. शेतकी महाविद्यालये अशी चित्रविचित्र जुगाडे लोकांना बघण्यासाठी प्रोत्साहन देऊ लागतात.

शेतीचा गंध नसलेले, गुणवत्तेची चाड नसलेले, आधुनिकतेपासून खूप दूर असलेले काही मूर्ख उद्योजक अशी जुगाड केलेली यंत्रे जशीच्या तशी कॉपी करतात आणि स्वस्तात बाजारात आणतात. सौंदर्य, कलात्मकता, दर्जा आणि गुणवत्ता नसणारी यंत्रे शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात. ती यंत्रे व्यवस्थित चालत नाहीत. शेतीकामात सौंदर्य आणि सुबकता राहत नाही. यंत्रांची शिफारस करणारे सरकारी अधिकारी लाचखोरी करून गब्बर होतात. अनुदानाच्या आमिषाला बळी पडून शेतकरी मात्र अधिकाधिक गरिबीच्या खाईत लोटला जातो. मात्र कसेबसे जगायचे तर असतेच, मग तरीसुद्धा आम्ही आयुष्यभर तडजोडी करत फक्त जुगाड करत कसे तरी काम करतो. सरकारी यंत्रणांनाही डोळ्यावर झापड घालून या जुगाडांचा महिमा गात शेती आणि शेतकरी आधुनिकतेच्या मार्गावर आहेत असा भ्रम निर्माण करतात.

खरं तर शेतीचे काम करताना काही तरी जुगाड करायला लागणे हे अजिबात प्रगतीचे लक्षण नाही. बहुतेक जुगाड हास्यास्पद असतात. गंमत म्हणून पेपरमध्ये, टीव्हीवर, सोशल मिडीयावर व्हायरल होतात. समाजाच्या मनोरंजनाचा भाग बनतात. अडचणीच्या वेळी किंवा आपत्कालीन परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी जवळ कोणतीही हत्यारे किंवा साधनसामग्री नसताना शक्कल लढवून जुगाड करणे वेगळे आणि रोजचे काम निस्तरावे लागण्यासाठी आयुष्यभर जुगाड करायला लागणे वेगळे. एखादा काहीतरी जुगाड करतो म्हणजे अर्थिक मजबुरीतून करत असतो. जुगाड करताना तो फार आनंदी असतो अशातला भाग नाही. एखादा अर्थिक परिस्थिती ठीक असताना, चांगल्या सोयी उपलब्ध असताना सुद्धा जुगाड करतो, तेव्हा त्याच्या मानसिक दरिद्रीपणाची कीव येते. पायाखाली बघत कामचलाऊ गोष्टी करुन वेळ मारुन नेता येणे हा फार मोठा पराक्रम नाही.

संशोधनाला प्रोत्साहन हवे

नवीन संशोधन हे प्रत्यक्ष शेतात काम करणाराच चांगले करु शकतो किंवा प्रत्यक्ष काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सोबत न घेता झालेले संशोधन निरुपयोगी ठरण्याचा संभव असतो. मात्र आपल्याकडे तशा प्रकारची संधी दिली जात नाही किंवा तशी इच्छाशक्तीही नाही. रोजच्या भाकरीचा चंद्र शोधण्यात आमची बुद्धी आणि वेळ खर्च होते. मग नवीन संशोधन कसे होणार? त्यामुळे चालू कामात काही अडचणी आल्या की आम्ही जुगाड करतो. त्यांची बातमी होते, पोकळ कौतुक होते. आपल्याकडे कसलेही जुगाड केले तरी त्याचे कौतुक होते. हे खूप खेदजनक आणि मागासलेपणाचे लक्षण आहे.

अगदी नवीन संकल्पना आणि प्राथमिक स्वरूपात असणारा एखादा शोध यशस्वी होण्यासाठी किंवा त्याला मूर्त स्वरूप येण्यासाठी खूप कालावधी, चिकाटी, आर्थिक आणि मानसिक पाठबळ हवे असते. मात्र अशी कोणतीही अनुकुलता आपल्याकडे बघायला मिळत नाही. त्यामुळे अगदी नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन मुलभूत स्वरूपाचे संशोधन आपल्याकडे फारसे होत नाही. तसे कुणी करत असेल तर ते संशोधन प्राथमिक स्वरूपात असल्यामुळे ते किती फायदेशीर असेल किंवा यशस्वी होईलच यावर कुणी विश्वास ठेवत नाही. संशोधन करणाऱ्याला प्रोत्साहन मिळत नाही. मग ते संशोधन तसेच अर्धवट अवस्थेत त्या संशोधकाबरोबर अडगळीत पडते.

प्रसार माध्यमांनी, समाज माध्यमांनी जुगाड करणाऱ्याचा महिमा गात बसल्यामुळे आपण मुलभूत संशोधना पासून दूर जात आहोत. सरकार आणि कृषी विद्यापीठांनी जुगाडावर खर्च करत बसण्यापेक्षा मुलभूत संशोधनावर भर द्यायला हवा. त्यासाठी ज्यांच्याकडे काही नवीन संकल्पना आहेत असे शेतकरी शोधून त्यांना त्या विषयाचे योग्य प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय लावली पाहिजे. तर असे अनुभवी शेतकरी निश्चित चांगल्या प्रकारचे संशोधन जगासमोर आणतील. विद्यार्थी दशेत असतानाच संशोधक वृत्तीच्या शेतकऱ्यांच्या मुलांचा शोध घेऊन त्यांच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने उचलली तर भारतीय शेतकऱ्यांना कमी खर्चात भारतात संशोधित आणि निर्माण झालेली उच्च दर्जाची यंत्रे वापरता येतील. दर्जेदार यंत्रे वापरल्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील. आणि त्यांच्यावर पुन्हा कधीही जुगाड करण्याची वेळ येणार नाही.

--------

(लेखक यांत्रिक शेती करतात.) ९८५०२४०१३०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com