
डॉ. आनंद कर्वे
भारतात खाद्यतेलाचा तुटवडा (Edible Oil Shortage) असल्याने औद्योगिक वापरासाठी खाद्यतेल वापरायला बंदी आहे. त्यामुळे बायोडिझेल (Biodiesel) करण्यासाठी जट्रोफा कुर्कास नामक एका अखाद्य तेलपिकाची लागवड (Oil Crop Cultivation) करावी, असा बराच प्रचार करण्यात आला. पण जट्रोफापासून प्रति हेक्टर उत्पादन किती येईल, त्याच्या बिया किंवा तेल कोण विकत घेईल आणि भाव किती मिळेल ही माहिती कोणीच सांगेना. त्यामुळे शेतकऱ्यांनी जट्रोफा लावण्याचे नाकारले. हळूहळू बायोडिझेल आणि जट्रोफाची लाट ओसरली; पण जेव्हा सरकारी पातळीवर जट्रोफाचा प्रचार केला जात होता, त्यावेळी कोणीही एरंडीचा (Castor For Biodiesel) का विचार केला नाही याचे मला आश्चर्य वाटे.
एरंडीचे तेल हे जरी अखाद्य तेल म्हणून गणले जात असले तरी ते एक पारंपरिक पीक असल्याने एरंडीच्या बिया आणि तेल यांच्यासाठी इतर पिकांप्रमाणेच खरेदीदार आहेत. एरंडीला भाव किती मिळतो ही माहितीही सहज मिळू शकते. इतर पिकांप्रमाणेच एरंडीच्याही सुधारित आणि संकरित जाती उपलब्ध आहेत.
एरंडीच्या बियांमध्ये त्यांच्या शुष्कभाराच्या ५० टक्के तेल असते. संकरित एरंडीपासून हेक्टरी ३ ते ३.५ टन एवढे बियांचे आणि त्याच्या निम्मे तेलाचे उत्पन्न मिळते. डिझेल इंजिनाचा शोध ज्याने लावला त्या डिझेल नामक जर्मन इंजिनियरने सुरुवातीला त्याच्या इंजिनात इंधन म्हणून भुइमुगाचे तेल वापरले होते. त्याच्या पावलावर पाऊल ठेवीत ऑइल इंजिनात डिझेलऐवजी एरंडेल वापरूनही इंजिन चालते हे मी दाखवून दिले होते.
भारतातल्या सर्व पारंपरिक तैलजनक पिकांमध्ये प्रति हेक्टर उत्पादनाच्या दृष्टीने नारळाचा पहिला क्रमांक लागतो; पण नारळाचे चांगले उत्पादन फक्त समुद्रकिनारी आणि दक्षिण भारतातच येते. त्यामुळे तो भूभाग सोडला तर अन्य भारतात संकरित एरंडीइतके प्रति हेक्टर उत्पादन दुसरे कोणतेच तैलपीक देत नाही. थोडक्यात म्हणजे आपल्याकडे एरंडी हे अखाद्य तेलाचे उच्च उत्पन्न देणारे पीक असताना आपण जट्रोफाचा विचार करावा, हे मला अनाकलनीय होते.
देशात जट्रोफाचा प्रचार चालू होता त्यावेळी मी एरंडीवरच संशोधन करीत होतो. संकरित वाणांमुळे एरंडीचे प्रति हेक्टर उत्पादन प्रचंड वाढले होते पण एरंडीच्या तेलातील मेदाम्लांमध्ये सुमारे ९० टक्के प्रमाण रिसिनोलेइक आम्लाचे असते. त्यामुळे हे तेल अखाद्य बनले होते. रिसिनोलेइक आम्लामुळे आतड्यातील पेशिकांमधून आतड्यात खूप मोठ्या प्रमाणात पाणी स्रवते. त्यामुळेच एरंडेल घेणाऱ्या व्यक्तीला जुलाब होतात. म्हणून एरंडेल हे रेचक म्हणून वापरले जाते. एरंडीच्या बियामध्ये प्रथम ओलेइक आम्ल निर्माण केले जाते. त्यानंतर त्या ओलेइक आम्लाचे रिसिनोलेइक आम्लात रूपांतर केले जाते.
एरंडीचा खाद्यतेल म्हणून वापर शक्य
करडईच्या तेलातील मेदाम्लांमध्येही प्रथम ओलेइक आम्ल निर्माण होते आणि नंतर त्याचे लिनोलेइक आम्लात रूपांतर होते. त्यामुळे करडईच्या तेलात जवळ जवळ ८० टक्के प्रमाण हे लिनोलेइक आम्ल नामक मेदाम्लाचे असते. परंतु एका नैसर्गिक उत्परिवर्तनाने करडईत असेही एक वाण निर्माण झालेले आहे की ज्याच्यात ओलेइक आम्लापासून लिनोलेइक आम्ल निर्माण होण्यात अडथळा येतो.
या वाणाच्या तेलात फक्त २० टक्के लिनोलेइक आणि ८० टक्के ओलेइक आम्ल असते. अशाच प्रकारचे उत्परिवर्तन एरंडीत घडवून आणता येईल का, यावर मी विचार केला. जर एरंडीमध्ये ओलेइक आम्लापासून रिसिनोलेइक आम्ल निर्माण होण्याची क्रिया खंडित करून एरंडीच्या तेलातले रिसिनोलेइक आम्ल पूर्णपणे नाहीसे करता आले तर आपल्याला अशा एरंडीचे तेल खाद्यतेल म्हणून वापरता येईल, या विचाराने मी एरंडीत उत्परिवर्तन घडवून आणण्याच्या प्रयत्नात होतो.
या संशोधनाला केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागाकडून आर्थिक साहाय्यही मिळाले होते. उत्परिवर्तन घडवून आणण्यासाठी मी एरंडीच्या बियांवर गॅमा किरणांची प्रक्रिया करून घेतली आणि त्या बिया शेतात लावल्या. यापुढची पायरी होती प्रत्येक वनस्पतीचे स्वतंत्रपणे तेल काढून त्या प्रत्येक नमुन्याचे रासायनिक विश्लेषण करणे. पण हे काम करण्यासाठी लागणारी खास उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ आमच्याकडे नव्हते. बाहेरच्या प्रयोगशाळेकडून त्यांची फी भरून हे काम करून घ्यावयाचे तर अक्षरशः एक-दोन कोटी रुपयांचा खर्च आला असता.
या अडचणीवर मी एक सोपा तोडगा काढला. सर्व वनस्पतिजन्य तेले अल्कोहोलमध्ये अविद्राव्य असतात. पण एरंडीच्या तेलातील रिसिनोलेइक आम्ल असते. त्यामुळे फक्त एरंडीचे तेल तेवढे अल्कोहोलमध्ये विरघळते. त्यामुळे प्रत्येक वनस्पतीचे तेल स्वतंत्रपणे काढून ते अल्कोहोलमध्ये विरघळते की नाही, हे मी शेतातल्या शेतातच तपासले. अल्कोहोलमध्ये त्यातल्या त्यात कमी विरघळणाऱ्या नमुन्यांची बाहेरच्या प्रयोगशाळेतून तपासणी करून घेतली. त्या तपासणीत या नमुन्यांमध्ये ८४ टक्के रिसिनोलेइक आम्ल असल्याचे आढळले होते.
पुढचा टप्पा होता ज्यात रिसिनोलेइक आम्लाचे प्रमाण कमी झाले आहे अशा वनस्पतीच्या बियांवर पुन्हा गॅमा किरणांची प्रक्रिया करावयाची आणि त्यापासून मिळणाऱ्या वनस्पतींच्या तेलाची पुन्हा तपासणी करायची. हे काम एरंडीच्या काही पिढ्या चालू ठेवले असते तर आम्हाला रिसिनोलेइक आम्लाचे प्रमाण शून्यावर आणता आले असते. पण पहिल्या वर्षीचा अहवाल पाठविल्यावर हा प्रकल्प चुकीच्या मार्गाने चालला असल्याचे निमित्त पुढे करून आम्हास अणुऊर्जा विभागातर्फे मिळणारे अनुदान बंद करण्यात आले. त्यामुळे हे काम पुढे गेलेच नाही.
या संशोधनात माझ्याकडून काय चुकले, याची मी चौकशी केली तेव्हा मला मिळालेले स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे होते. पानांमध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक पेशिकेत अनेक हिरवे क्लोरोप्लास्ट असतात त्याचप्रमाणे बीजदलात त्याच्या प्रत्येक पेशिकेत अनेक रंगहीन असे ल्यूकोप्लास्ट असतात. तेलबियांमधील तेलाची निर्मिती या ल्यूकोप्लास्टमध्ये होते. प्रत्येक ल्यूकोप्लास्टमध्ये त्याचे स्वतंत्र रंगसूत्र असते.
त्यामुळे बीजदलातील प्रत्येक पेशिकेतल्या प्रत्येक ल्यूकोप्लास्टमध्ये रिसिनेलेइक आम्लाची उत्पत्ति थांबविण्याचे उत्परिवर्तन घडून आले तरच मला शून्य टक्के रिसिनोलेइक आम्ल असणारे बीज मिळाले असते; पण संख्याशास्त्रीयदृष्ट्या हे अशक्य असल्याने या संशोधनावर वेळ आणि पैसा खर्च करू नये, असे मत अणुऊर्जा विभागाच्या परीक्षकांनी नोंदवले होते. दान देणाऱ्याला ते न देण्याचा पूर्ण अधिकार असतो. परंतु हे सरकारी मत चुकीचे होते हे दुसऱ्या एका उदाहरणाने सिद्ध झाले.
मोहरीच्या तेलातील मेदाम्लांमध्ये सुमारे १० ते १५ टक्के एरुसिक आम्ल नावाचे एक अपाच्य मेदाम्ल असते. पाश्चात्य संशोधकांनी संख्याशास्त्रानुसार अशक्य असणारे हे काम करून शून्य टक्के एरुसिक आम्ल आणि शिवाय शून्य तिखटपणा अशा डबल झिरो मोहरीच्या वाणांची पैदास केली. कॅनोला या नावाने या वाणाची पाश्चात्य देशांमध्ये प्रचंड प्रमाणावर लागवड गेली जात आहे. माझे अजूनही असे मत आहे की पाश्चात्यांनी ज्याप्रमाणे मोहरीतून एरुसिक आम्लाचे उच्चाटन केले त्याप्रमाणे पुरेसे प्रयत्न केल्यास आपल्यासही रिसिनोलेइक आम्ल नसलेली एरंडी निर्माण करता येईल. तसे झाले तर एरंडीच्या तेलाचा खाद्यतेल म्हणून उपयोग करता येऊ शकेल. त्यामुळे खाद्यतेल क्षेत्राचे अर्थकारण बदलून जाईल.
: ९८८१३०९६२३,
(लेखक ‘आरती’चे (अॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट-ARTI) संस्थापक
अध्यक्ष आणि विश्वस्त आहेत.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.