World Soil Day 2022: वनस्पतींंप्रमाणे माणसांनीही माती का खाल्ली पाहिजे?

आज जागतिक मृदा दिन आहे. वनस्पतींना पोषणासाठी माती लागते. मातीतून त्यांना आवश्यक पोषणघटक मिळतात. माणसांना सुध्दा आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी, पोषण होण्यासाठी माती उपयुक्त ठरते.
World Soil Day 2022
World Soil Day 2022Agrowon

डॉ. आनंद कर्वे

माती करणं, माती होणं, मातीमोल किंमत मिळणं, माती खाणं (Soil Eating) असे वाक्प्रचार मराठीत प्रसिध्द आहे. त्या सगळ्यांना नकारात्मक अर्थ आहे. विशेष करून कोणी माती खाल्ली म्हणजे अत्यंत चुकीचं कृत्य केलं, असा अर्थ प्रचलित आहे. तो अर्थ बाजूला ठेऊन आरोग्याच्या (Health) दृष्टीने विचार केला तर मात्र मातीची वेगळी बाजू ध्यानात येईल. माती एवढी का महत्त्वाची आहे, त्याची खात्री पटेल. मग कळेल की पिकाचं आरोग्य (Crop Health) असो की माणसांचं आरोग्य (Human Health) असो, त्यांनी जरूर माती खाल्ली पाहिजे.

World Soil Day 2022
Eating Soil : तुम्ही माती खाल्ली का?

आज जागतिक मृदा दिन आहे. वनस्पतींना पोषणासाठी माती लागते. मातीतून त्यांना आवश्यक पोषणघटक मिळतात. माणसांना सुध्दा आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी, पोषण होण्यासाठी माती उपयुक्त ठरते. त्यामुळे अनेक जण माती खात असतात. विशेषतः गरोदर स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं. अशा प्रकारे माती खाणं यात चुकीचं काही नाही. मातीतून मानवी आरोग्यासाठी आवश्यक असे अनेक खनिज मूल्यद्रव्यं मिळत असतात.

माती खाण्यास युनानी औषधशास्त्रात मान्यता आहे. त्यामुळे ज्या शहरात मुसलमान लोकांची बरीच वस्ती आहे, अशा ठिकाणी पाकिस्तानातून आयात केलेली एक खास प्रकारची खाण्याची माती वापरली जाते. भारतात अनेक ठिकाणी, अगदी पुण्यात सुद्धा, ही माती मिळते. उपलब्ध आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या औरंगाबाद शहरात तर दर वर्षी १६ टन माती खाण्यासाठी वापरली जाते.

World Soil Day 2022
World Soil Day : मातीच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे लागेल

युनानी तिब्बा आणि आयुर्वेद या दोन्ही पारंपरिक आरोग्यपद्धतींना आता आधुनिक विज्ञानाची जोड देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत; पण अद्याप त्यात बरेच काम बाकी आहे. कोणताही पदार्थ गिळल्यानंतर तो आपल्या शरीरात शोषला जाण्यापूर्वी तो पाण्यात पूर्णपणे विरघळणे आवश्यक आहे. पाण्यात न विरघळणारे अनेक पदार्थ, उदाहरणार्थ स्टार्च, प्रथिने आणि तैले आपण खातो.

आपल्या आतड्यातील पचनक्रियेत त्यांचे पाण्यात विरघळतील अशा स्वरुपात परिवर्तन केले जाते आणि मगच ते शरीरात शोषले जातात. आपल्या आसमंतातील हवेत थोडीफार धूळ नेहमीच असते आणि तिचा काही अंश आपल्या पोटात सतत जातच असतो. मातीमध्ये अनेकविध खनिजे असतात पण ती पाण्यात विरघळत नाहीत. कारण मातीतली खनिजे बहुतेक करून सिलिकेट या स्वरुपात असतात. पाण्यात विरघळणारे खनिज पदार्थ पावसाने कधीच धुपून समुद्रात गेले आहेत.

मी २०१० साली असे दाखवून दिले होते की आपण जमिनीत नुसती साखर जरी घातली तरी जमिनीतल्या सूक्ष्मजंतूंचे गुणन होऊन त्यांच्या संख्येत वाढ होते. साखरेत कोणतेच खनिज पदार्थ नसतात; त्यामुळे या प्रयोगाने हे सिद्ध झाले की सूक्ष्मजंतू आपली संख्या वाढविताना त्यांना लागणारे खनिज पदार्थ मातीतून घेतात.

हाच नियम आपल्या पोटातल्या सूक्ष्मजंतूंना लागू होतो का हे पाहण्यासाठी आमच्या संस्थेत आम्ही बायोगॅस संयंत्रात माती घालून पाहिली. बायोगॅस संयंत्रात जनावरांच्या पोटातले सूक्ष्मजंतूच कार्यक्षम असतात. या प्रयोगात आम्हाला असे आढळले की बायोगॅस संयंत्रात घातलेली माती हळूहळू कमी होत गेली. म्हणजेच माती पाण्यात अविद्राव्य असली तरी आपल्या आतड्यातील सूक्ष्मजंतू माती खाऊ शकतात.

शरीराला पुरेसे लोह मिळाले नाही तर ॲनिमिया (रक्तक्षय) हा रोग होतो. बी-१२ या व्हिटॅमिनमध्ये कोबाल्ट असते म्हणून त्याला कोबालामाइन असेही म्हटले जाते. मज्जासंस्थेतील संदेशवहनासाठी पोटॅशियमयुक्त सहविकर लागतो तर थायरॉइड ग्रंथीच्या कार्यासाठी आयोडीनयुक्त सहविकर लागतो. जर सेलेनियमची कमतरता असेल तर मेंदू नीट कार्य करीत नाही.

आपले केस आणि नखे यांमध्ये गंधक असते. आपली हाडे आणि दात मुख्यतः कॅल्शियम फॉस्फेटपासून बनलेली असतात. पेशींमधील नाभिकाम्लात फॉस्फरस असतो. याशिवाय जस्त, बोरॉन, तांबे, मँगेनीज, मॅग्नेशियम, मॉलिब्डेनम ही मूलद्रव्येही विविध कार्यांसाठी लागतात. ती सर्व आपल्याला अन्नातून मिळतात; पण पोटभर अन्न मिळत असूनही बरेचदा विशिष्ट खनिजघटकांच्या कमतरतेने आजार उद्भवतात.

गरोदर स्त्रियांना बरेचदा माती खावीशी वाटते याचेही कारण त्यांच्या आहारातली खनिज घटकांची कमतरता हेच असावे. कमी पडणाऱ्या खनिजघटकांची आपूर्ती करण्यासाठी ज्यात ही खनिजद्रव्ये आहेत अशी औषधे औषधालयांमध्ये विकत मिळतातच. पण रोज थोडी माती पोटात गेली तर आपल्याला आपोआपच सर्व खनिजे मिळत राहतील.

गवत खाणारे प्राणी जमिनीलगतचे गवत खातात तेव्हा त्यांच्या पोटात नक्कीच तिथली स्थानिक माती जात असणार आणि तिच्यातून त्यांना नक्कीच खनिज पदार्थही मिळत असणार. खनिजांचा स्रोत म्हणून माती खाण्यास हरकत नसावी असे प्रस्तुत लेखकाचे प्रांजळ मत आहे; पण खाण्याआगोदर या मातीचे निर्जंतुकीकरण केलेले असावे अशीही लेखकाची अपेक्षा आहे.

लेखक आरती (ॲप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट-ARTI)चे संस्थापक अध्यक्ष आणि विश्वस्त आहेत. ९८८१३०९६२३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com