पवन ऊर्जाः सुरक्षित अन् किफायतशीरही

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पवनचक्क्यांचा वापर हा विद्युत निर्मितीसाठी होऊ लागला. विद्युत निर्मिती करण्यासाठी, पवनचक्की चालविण्यासाठी पाणी उपसा करणारे किंवा मलमूत्राचा निचरा करणारे पंप चालविण्यासाठी तसेच शिडाची जहाजे चालविण्यासाठीही या ऊर्जेचा केला जातो.
Wind Energy
Wind EnergyAgrowon

मनोज पिसे

पवन ऊर्जा (Wind Energy) ही अक्षय्य ऊर्जा असून ती सहजासहजी उपलब्ध करून घेता येते. तसेच ही ऊर्जा अत्यंत सुरक्षित आणि किफायतशीर आहेच यासह पवन ऊर्जेमुळे वायू प्रदूषण व जल प्रदूषण टाळता येते.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पवनचक्क्यांचा वापर हा विद्युत निर्मितीसाठी होऊ लागला. विद्युत निर्मिती करण्यासाठी, पवनचक्की चालविण्यासाठी पाणी उपसा करणारे किंवा मलमूत्राचा निचरा करणारे पंप चालविण्यासाठी तसेच शिडाची जहाजे चालविण्यासाठीही या ऊर्जेचा केला जातो. आजच्या काळात जगभर पवन ऊर्जेचा वापर करून आधुनिक पद्धतीने तयार केलेल्या वातझोत यंत्रांच्या (विंड टरबाइन) साह्याने विद्युतनिर्मिती करण्यात येत आहे.

पवन ऊर्जेचे महत्त्व

पवन ऊर्जा ही अक्षय ऊर्जा असून, ती सहजासहजी उपलब्ध करून घेता येते. तसेच ही ऊर्जा अत्यंत सुरक्षित आणि किफायतशीर आहेच यासह पवन ऊर्जेमुळे वायू प्रदूषण व जल प्रदूषण टाळता येते. पवन ऊर्जेचा विकास काही पाश्चिमात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, स्पेन, भारत, डेन्मार्क, चीन इत्यादी देशांत पवन ऊर्जेवर विद्युत निर्मिती करण्यात येत आहे.

भारतात तमिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, पश्‍चिम बंगाल इत्यादी राज्यांत पवन ऊर्जा केंद्र उभारण्यात आली आहेत. भारतात १९८५ मध्ये गुजरातमधील मांडवी येथे व्यापारी तत्त्वावर पवन ऊर्जा केंद्र उभारण्यात आले असून, आशिया खंडातील पहिले पवन ऊर्जा केंद्र होते. भारताला मोठ्या लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यामुळे पवन ऊर्जा निर्मितीला बऱ्याच ठिकाणी वाव आहे.

पवन ऊर्जा क्षमतेबाबत आकडेवारी

पवन ऊर्जा विकासामध्ये भारत आता जगातील एक आघाडीचा देश म्हणून ओळखला जात आहे. त्यानुसार पवन ऊर्जा विद्युत निर्मितीमध्ये (International Renewable Energy Agency-IRENA) जगात भारताचा चौथा क्रमांक लागतो. नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या ३१ मे २०२२ च्या आकडेवारीनुसार पवन ऊर्जानिर्मिती क्षेत्रात देशाची आस्थापित क्षमता ४०७०६.३८ मे.वॅ. इतकी आहे. देशात महाराष्ट्र राज्य (५०९२.८३ मे.वॅ.) तिसऱ्या क्रमांकावर असून, तमिळनाडू (९८६६ मे.वॅ) व गुजरात (९३४८.५२ मे.वॅ) हे राज्य अनुक्रमे एक व दोन क्रमांकावर आहेत.

पवन ऊर्जेबाबत राज्याचे धोरण

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा स्रोतांच्या क्षेत्रात पवन ऊर्जेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साहजिकच, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांनी आपापल्या राज्यातील नोडल एजन्सींद्वारे संपूर्ण देशभरात पवन ऊर्जा कार्यक्रम अतिशय तीव्रतेने हाती घेतला असून महाराष्ट्रात हा उपक्रम महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत राबविण्यात येतो.

महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या आकर्षक पवनऊर्जा धोरणामुळे आत्तापर्यंत राज्यातील ५१ पवनऊर्जा निर्मितिक्षम ठिकाणी तसेच विकासकांमार्फत विकसित करण्यात आलेल्या पवनऊर्जा निर्मितिक्षम ठिकाणी अनेक छोट्या-मोठया गुंतवणूकदारांनी पवनऊर्जा प्रकल्प उभारलेले आहेत. राज्यात एकूण ९८२१०.०० मे.वॉ. क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यास वाव आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जामसंडे येथे राज्यातील पहिला पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे.

१९९४ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे १.५ मे. वॉ. क्षमतेची राज्यातील पहिली वातभूमी (विंडफार्म) उभारण्यात आली. आकर्षक पवनऊर्जा धोरणामुळे आतापर्यंत राज्यातील ५१ पवन ऊर्जा निर्मितिक्षम ठिकाणी, तसेच विकासकांमार्फत विकसित करण्यात आलेल्या पवनऊर्जा निर्मितीक्षम ठिकाणी अनेक छोट्या-मोठया गुंतवणूकदारांनी पवन ऊर्जा प्रकल्प उभारलेले आहेत.

विजयदुर्ग विंड फार्म

सातारा जिल्ह्यात पवन ऊर्जानिर्मितीची अनेक केंद्रे असून, या जिल्ह्यातील वनकुसवडे पठारावर ५०० मे.वॅ. क्षमतेचा चाळकेवाडी पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प विकसित झाला असून, तो आशियातील सर्वांत मोठा प्रकल्प आहे. अहमदनगर, सांगली, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांतही असे प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

सरकारने ३१ डिसेंबर २०२० रोजी अपारंपरिक ऊर्जा धोरण २०२० जाहीर केले असून, या धोरणांतर्गत २५०० मे.वॉ. क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या अपारंपरिक ऊर्जानिर्मिती धोरण- २०२० अंतर्गत प्रोत्साहनात्मक सुधारणा करण्यात आले आहेत. सदर पवन ऊर्जा विद्युत प्रकल्पासाठीच्या प्रोत्साहनात्मक सुधारणांमुळे राज्यात आणखी क्षमतेत वाढ होणे अपेक्षित आहे.

पवन ऊर्जा विद्युत प्रकल्पासाठीच्या प्रोत्साहनात्मक सुधारणा

१. स्वयंवापरासाठी पवन ऊर्जा विद्युत प्रकल्पातून निर्माण झालेल्या विजेवर प्रकल्प कार्यान्वित झालेल्या दिनांकापासून पहिल्या १० वर्षासाठी विद्युत शुल्क माफ

२. पवन ऊर्जा विद्युत प्रकल्पासाठी बिगर शेती कर माफ

पवन ऊर्जा प्रकल्पांचे फायदे

राज्यातील विजेचा तुटवडा पाहता पवनऊर्जा प्रकल्प ३ ते ४ महिन्यांत कार्यान्वित होत असल्यामुळे विद्युत निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. महाराष्ट्रातील विजेचा तुटवडा कमी होण्यास मदत होऊ शकेल. माहे मे ते सप्टेंबर या काळात पवन ऊर्जा प्रकल्प ५० ते ६० टक्के प्लांट लोड फॅक्टरवर कार्यरत असतात.

या कालावधीत पवन ऊर्जा प्रकल्पांचा उपयोग बेस भार (बेस भार व्याख्या : विद्युत ग्रीडवर ठरावीक कालावधीसाठी मागणीची किमान पातळी) सारखा केला जाऊ शकतो. त्यामुळे जल विद्युत प्रकल्पांतील पाण्याचा उपयोग फक्त अत्यावश्यक वीज निर्मितीसाठीच करून उर्वरित पाण्याचा उपयोग पावसाळा संपल्यानंतर वीज निर्मितीसाठी करता येऊ शकतो, पवनऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक ही पूर्णतः खाजगी गुंतवणूकदारामार्फत होत असल्यामुळे सरकारवर प्रत्यक्षरीत्या कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार पडत नाही.

पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी कुठल्याही इंधनाची गरज नसल्याने कोळशाची मोठ्या प्रमाणात बचत होते व स्वच्छ व प्रदूषणविरहित ऊर्जानिर्मिती होते. पवनऊर्जा प्रकल्प डोंगराळ व अविकसित भागात स्थापित होत असल्यामुळे त्या भागाचा विकास होतो. स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो व स्थानिक उद्योगधंद्यांना चालना मिळते.

तसेच ग्रामीण भागात चांगल्या प्रकारच्या दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होतात. ग्रामीण भागातील विद्युत दाबामध्ये वाढ होण्यास मदत होते. एकत्रितरीत्या ग्रामीण भागातील जनतेचे राहणीमान उंचावण्यास मदत होते. पवन ऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणारी वीज वापराच्या ठिकाणाजवळ असल्यामुळे पारेषणातील घट कमी होते.

लेखक पवन - महाऊर्जा, पुणेचे महाव्यवस्थापक आहेत.)

(संकलन : बाबा तारे, पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com