Indian Wrestling : दंगल : आखाडा ते जंतरमंतर

हरियानातील महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख, भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करून त्यांच्यावर कारवाईसाठी आंदोलन केले. ही घटना शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे.
Indian Wrestling
Indian WrestlingAgrowon

विसंगतीत जग जगतं हेच खरं. म्हणजे, ज्या हरियानात देशातल्या सर्वाधिक भ्रूणहत्या (Infanticide) नोंदल्या जातात, तोच हरियाना ‘टॉप टेन’मधील आठ महिला कुस्तीपटू (Wrestler)देशाला देतो.

पुरुषप्रधान खाप पंचायतीचे वर्चस्व असलेल्या हरियानातून इतक्या मोठ्या संख्येने महिला कुस्तीपटू (Women Wrestler) पुढे येणे आणि थेट राष्ट्रकुल, ऑलिम्पिक अशा विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत बाजी मारणे ही बाब चमत्कारापेक्षा कमी नाही.

जिथे मुली आणि महिलांना तोंडावर पदर घेऊनच घरी-दारी वावरावे लागते, स्त्रियांच्या आयुष्याचे निर्णय पुरुषच घेतात, त्या प्रांतात स्त्रियांना कुस्ती (Women Wrestling) खेळण्याची परंपरा रुजवणे ही बाब सोपी नव्हती.

Indian Wrestling
Indian Agriculture : विहीर

भारताचे नाव सुवर्णाक्षरात कोरताना अनेक अडचणी, संकटांचा सामना करावा लागतो. कुस्तीचे मैदान मुलांनीच का मारायचे, मुलींनी का नाही, असा प्रश्‍न भिवानी येथील महावीर सिंग फोगट या मल्लाच्या डोक्यात येतो. माझ्या मुलींनी कुस्तीत नाव कमवावे म्हणून ते स्वत:च प्रशिक्षक बनतात. प्रतिस्पर्धी तुल्यबळ असावा म्हणून हरियानाच्या रूढी, परंपरा झुगारत ते मुलींना कुस्तीगीर मुलांसोबत लढवतात.

त्यांच्यासोबत सराव करवतात, कुस्तीचे डावपेचही शिकवतात. यात मुली यशस्वी होतात. फोगट कन्यांचे नाव आसमंतात दुमदुमते. महावीर फोगट यांच्या कमालीच्या जिद्दीला सुपरस्टार अमीर खानही सलाम ठोकतो. त्यातूनच २०१६मध्ये ‘दंगल’ चित्रपटाची निर्मिती होते. फोगट कन्यांच्या यशाप्रमाणे मुलींना कुस्तीक्षेत्रात नाव काढण्यासाठी हा चित्रपट वेड लावतो. परंतु महिला कुस्तीपटू घडणे सोपे नाही.

कितीतरी अडथळे पार करीत स्वत:ला सिद्ध करावे लागते. सगळ्यांनाच शारीरिक-मानसिक-भावनिक आव्हाने पेलावी लागतात. त्यानंतर स्थानिक समाजाचा अशा कुस्तीपटूंकडे बघण्याचा ऑलिम्पिक पूर्व आणि ऑलिम्पिक पश्‍चात दृष्टिकोन बदलत जातो. या सगळ्या मुलींचा एकच मंत्र असतो तो म्हणजे जिद करों, दुनिया बदलों!

कुस्तीपटूंची मांदियाळी

साक्षी मलिक ही महिला कुस्तीपटू, २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवून शब्दश: भारताची इभ्रत राखते. वयाच्या बाराव्या वर्षापासून ती कुस्तीचे धडे गिरवते. २०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले.

गीता फोगट ही महान कुस्तीपटूंपैकी एक. ज्या वेळी मुलींनी कुस्ती खेळण्याची मानसिकता नव्हती अशावेळी गीताने अनेक अडचणींवर मात करून २०१०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

विनेश फोगट ही भारतातील सर्वांत आश्‍वासक महिला कुस्तीपटूंपैकी एक. तिने राष्ट्रकुल आणि आशियायी खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकले. अंशू मलिकने वयाच्या एकविसाव्या वर्षी जगभरात नाव कमावले. तिने २०२१च्या ओस्लो जागतिक कुस्ती स्पर्धेत रजत पदक पटकावले.

Indian Wrestling
Indian Agriculture : तोट्याच्या धंद्यात कोण करेल गुंतवणूक?

फोगट कुटुंबातील बबिता कुमारीने २०१४च्या ग्लासगो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. नवोदित कुस्तीपटू निशा दहिया हिने २०२१मध्ये जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. गीतिका जाखड़ हिने २००६मध्ये दोहा आशियायी आणि २०१४ मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रजत पदक जिंकले. या सर्वच कुस्तीगीर महिला हरियानातील आहेत.

याशिवाय देशातील अन्य राज्यांतील काही महिला कुस्तीपटूंनीही जागतिक पातळीवर पदके पटकावली आहेत. परंतु हरियानातील विशेषत: रोहतक, भिवाणी, हिसार, सोनीपत, जिंद, कर्नाल भागातील तरुणींमध्ये ‘विनींग इज द ओन्ली ऑप्शन’ची अनुभूती दिसते. मैदानात कसब दाखविण्याची प्रत्येकीची स्पर्धा स्वत:शीच लागली आहे.

काही वर्षांपूर्वी या शहरातील शाळांच्या मैदानांवर, क्रीडा संकुलात सकाळी, सायंकाळी पुरुषच दिसायचे, अपवादानेच मुली! आता मुलींची गर्दी वाढली. कोणी कुस्ती, कोणी कबड्डी, कोणी कराटे, तर कोणी मुष्टीयुद्धाचा सराव करताना दिसताहेत.

Indian Wrestling
बांधावरची झाडे

रोहतक जिल्ह्यातले मोखरा हे १८ हजार लोकवस्तीचे गाव जगात पोहोचले आहे. त्याने आतापर्यंत पन्नासवर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महिला-पुरूष कुस्तीगीर दिले आहेत. गावातील शेकडो कुस्तीगीर सीमेवर देशरक्षणार्थ ठाकले आहेत. येथील अनेक कुस्तीपटू हरियाना पोलिसांत कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी बजावत आहेत.

लष्करातून निवृत्त झालेले निस्वार्थभाव ठेवत गावातील मैदानांवर मुलींना-मुलांना कुस्ती, कबड्डी, कराटे, मुष्टियुद्धाचे डावपेच शिकवतात. त्यांची जिद्द हीच, की या गावाचे नाव देश-परदेशांत कायम राहावे. साक्षी मलिक याच गावातील. तिचा जन्म इथेच झाला. साक्षीच्या गावाप्रमाणेच हरियानातील प्रत्येक जिल्हा, तालुक्याचे चित्र आहे.

फोगट भगिनी, साक्षी, अंशु मलिक यांचे यश पाहता हरियानातील प्रत्येक मैदानावर कुस्तीच्या आखाड्यात मुलांपेक्षा मुलींच अधिक दिसतात. गेल्या पंधरा वर्षांतली हरियानातील कुस्तीपटू मुलींची कामगिरी देशासाठी अभिमानास्पद आहे.

जंतरमंतरवर आखाडा!

कुस्तीपटूंच्या यशाचे, त्यांच्या परिश्रमाचे कौतुक होत असताना त्यांना तसे पोषक वातावरण, पायाभूत सुविधा देण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकारांचे आहे. परंतु वरवर चांगल्या दिसणाऱ्या गोष्टी आतून किती भयावह आणि किडलेल्या आहेत, हे कुस्तीपटूंनीच चव्हाट्यावर आणले आहे.

कुस्तीमध्ये भारताचे नाव जगात नेलेल्या या कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे ‘नायक’ भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करून जंतरमंतरवर त्यांच्या विरोधात आंदोलन केले. ही घटना देशवासीयांना शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे.

सहा वेळा खासदार आणि दशकापेक्षा अधिक काळ कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असलेले ६६ वर्षीय ब्रिजभूषण सिंह दबंग आहेत. उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदार संघात ते बाहुबली म्हणून ओळखले जातात. स्वत: कुस्तीगीर आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात पन्नासावर शाळा, महाविद्यालये आणि अनेक व्यायामशाळा उभारल्या आहेत. तरुणांना मैदानात उतरवले.

त्यांच्याच काळात भारताने सर्वाधिक पदके पटकावली. परंतु अध्यक्षपदाचे यश त्यांच्या डोक्यात शिरले. शीघ्रकोपी असल्याने ते लवकरच ‘आता माझी सटकली’च्या भूमिकेत येतात. खाडकन मुस्काटातही देतात. याच ब्रिजभूषण यांच्यावर महिला मल्लांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

त्यांना पदावरून हटवा आणि तुरुंगात डांबा, यासाठी जंतरमंतरवर बुधवार ते शुक्रवारपर्यंत त्यांनी आंदोलन केले. अनेक वर्षांपासून ते महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करीत असल्याच्या विनेश फोगाट यांच्या आरोपाने केंद्र सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या मध्यस्थीने आंदोलन थांबले आहे. चौकशीसाठी समिती स्थापन झाली. महिनाभरात अहवाल येईल. परंतु प्रश्‍न सुटले का? विनेश फोगाट यांनी ऑक्टोबर २०२१मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परिवारासह भेट घेतली.

तेव्हा त्यांनी विनेशला मुलगी म्हणून संबोधले होते. त्याचवेळी ब्रिजमोहन यांच्या काळ्या कृत्यांबाबत त्यांच्या कानावर घालण्यात आल्याचे विनेशचे म्हणणे आहे. सव्वा वर्ष होऊनही अत्यंत गंभीर आरोपावर मोदी कोणतीच कारवाई करणार नाहीत यावर विश्‍वास बसत नाही.

कुठेतरी राजकारण मुरते का? हेही शोधावे लागेल. परंतु जंतरमंतरवरील मल्लांच्या आंदोलनाने मोदींच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’वर प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. लैंगिक शोषणातील आरोपी भाजपचा असला तर तो मोकाट सुटतो, अशी सातत्याने होणारी टीका यापुढे होणार नाही, याचीही सरकारला काळजी घ्यावी लागणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com