
नाशिक : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना (Jalyukta Shiwar Yojana)२०१५ ते २०१९ या कालावधी राबविली गेली. मात्र, महाविकास आघाडी सरकारने ही योजना गुंडाळली होती.
आता राज्य सरकारने जलयुक्त शिवार-२ योजना जाहीर केली असून, २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली असून, नाशिक विभागात ८५० गावांची निवड केली आहे.
शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर या सरकारने जलयुक्त शिवाय अभियान-२ ही योजना पूर्वीप्रमाणेच सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी तयारी सुरू झाली असून, त्याचाच भाग म्हणून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यांच्या जिल्ह्यांमधील गावांची निवडीबाबतच्या सूचना केल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी ठरवून दिलेल्या संख्येप्रमाणे गावांची निवड करून राज्य सरकारकडे पाठविण्याच्या सूचना आहेत. निवडीसाठी सर्वाधिक उद्दिष्ट नगर जिल्ह्यात असून सर्वांत कमी गावे धुळ्यात असतील.
नाशिक विभागातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांसाठी ८५० गावांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. नव्या योजनेतून जलसाक्षरतेला प्राधान्य दिले जाणार आहे.
या जलसाक्षरतेमुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. याबाबत गावांची निवड करणे, आराखडे तयार करणे आदींबाबत यापूर्वीच जलसंधारणने शासन निर्णय काढला आहे.
जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा, पंतप्रधान कृषी सिंचन योजना (एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम) नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्प व आदर्श गाव इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत जलसंधारणाची कामे पूर्ण झालेली गावे योजनेतून वगळायची आहेत.
त्यानंतर उर्वरित गावांपैकी अवर्षणप्रवण तालुक्यातील गावे, भूजल सर्वेक्षण विभागाकडील पाणलोट प्राधान्यक्रमानुसार गावांची निवड प्राधान्यक्रमाने योजनेसाठी केली जाणार आहे.
विभागातील जिल्हानिहाय उद्दिष्ट
नाशिक - २१०
नगर- २४०
जळगाव - २४५
धुळे - ७०
नंदुरबार - ८५
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.