Seva Sankalp Samitee: आदिवासी विकासाचा सेवा संकल्प

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात आरोग्‍य सुविधांची उणीव भरून काढण्यासाठी नाशिक येथील श्री गुरुजी रुग्णालयाच्या वतीने सेवा संकल्‍प समितीची स्थापना झाली.
Seva Sankalp Samitee
Seva Sankalp SamiteeAgrowon

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात आरोग्‍य सुविधांची उणीव भरून काढण्यासाठी नाशिक येथील श्री गुरुजी रुग्णालयाच्या वतीने सेवा संकल्‍प (Seva Sankalp) समितीची स्थापना झाली. आरोग्य सेवेसोबत जलसंधारण (Water conservation), पाणीपुरवठा, कृषी विकास (Agriculture Development), महिला सक्षमीकरण, शिक्षण क्षेत्रात संस्था कार्यरत आहे. आदिवासी बांधवांचे जीवनमान सुधारणा आणि आर्थिक उन्नती हे लक्ष समोर ठेऊन त्र्यंबकेश्‍वर, पेठ तालुक्‍यातील पाड्यांवर सेवाकार्य अविरतपणे सुरु आहे.
-

Seva Sankalp Samitee
Cotton Picking : कापूस वेचणीला झाली सुरुवात

नाशिक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित श्री गुरुजी रुग्णालय ३ मार्च २००८ पासून नाशिक जिल्हासह उत्तर महाराष्ट्रात आरोग्य सेवा देत आहे. दरम्यान डॉ.राजेंद्र खैरे यांनी आदिवासी पाड्यांवर अभ्यास सुरू केला. येथे आरोग्यविषयक मुद्दे समोर असल्यानंतर १ ऑक्टोबर २०१६ साली सेवा संकल्प समितीची स्थापना झाली. सुरवातीला नाशिक शहरापासून अतिदुर्गम भागातील पाड्यांची निवड करण्यात आली. येथे आठवड्यातून एकदा, ठराविक वारी, ठराविक वेळी रुग्णवाहिका जात असे. रुग्ण तपासणी आणि औषधे अगदी नाममात्र शुल्कात दिली जायची. पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाऊ लागले. ‘साप्ताहिक दवाखाना’ या उपक्रमात ५० पाड्यांवर रुग्णवाहिका व डॉक्टर नियमित वेळेत प्रत्येक पाड्यावर जातात. प्रामुख्याने साप्ताहिक फिरता दवाखाना, आरोग्य शिबिरे, अनेमिया प्रकल्प, मोती बिंदू व अनेक प्रकारच्या आरोग्य कार्यशाळा उपक्रम राबविले जातात. या माध्यमातून आजपर्यंत ७९,०६९ रुग्णांना आरोग्य सेवा मिळाली आहे. स्थानिक पातळीवर समन्वय ठेवण्यासाठी ३१ आरोग्य सेवक काम करत आहेत. यामध्ये स्त्रीरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, पोटविकार अशा महत्वपूर्व विषयांवर आरोग्य सेवा दिली जाते.

Seva Sankalp Samitee
Soybean Rate : सोयाबीनचे वाढलेले दर टिकतील का?

‘जल' उपक्रम ः
त्र्यंबकेश्वर, पेठ या आदिवासी तालुक्यात पर्जन्यमान चांगले असले, तरी दिवाळीनंतर पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होते. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाड्यांवर ५ हजार आणि १० हजार लिटर क्षमतेच्या पाणी टाक्या बसविण्यात आल्या. त्यामुळे आदिवासी महिलांची २ ते ३ किलोमीटर पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली. यासह नवीन कूपनलिका उभारणी, विहीर निर्मिती, जुनी विहीर दुरुस्ती, गाळमुक्त बंधारे, वनराई बंधारे, गॅबियन बंधारे, दगडी बांध सारखे अनेक उपक्रम राबविले जातात. रोजगार हमी योजनेतून कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करून कामे मार्गी लावली आहेत. देणगीदार व ग्रामपंचायतीचे सहकार्य, लोकसहभागातून हे शक्य झाले आहे.

Seva Sankalp Samitee
Cotton Picking : कापसाची वेचणी कशी कराल? | ॲग्रोवन

सेंद्रिय शेतीला चालना ः
आदिवासी पाड्यांवरील जमिनी छोट्या छोट्या तुकड्यात विखुरलेल्या आहेत. भात, नागली, उडीद या पिकांची लागवड असते. स्वतःच्या आहारासह उत्पादित शेतीमालाची थोड्याफार प्रमाणात विक्री होते. त्यातून मिळणारे उत्पन्न हे पाच ते दहा हजारांच्या दरम्यान असते. रब्बी हंगाम येथे होत नाही. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी शहरात स्थलांतर वाढत आहे. पारंपारिक शेती पद्धतीत बदल करून संकरित बियाणे व निविष्ठांचा वापर होऊ लागल्यानंतर उत्पादन खर्च वाढू लागला.
येथे सुधारित पीकपद्धती न रुजल्याने अपेक्षित उत्पादन वाढल्याचे दिसून आले नाही. समितीने सेंद्रिय शेतीसंबंधी कामकाज हाती घेतले. शास्त्रीय पद्धत रुजण्यासाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन पाड्यांवर १५१ कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. जीवामृत, घन जीवामृत, दशपर्णी अर्क, पंचपर्णी अर्क, गांडूळखत आदी प्रयोग येथे रुजल्याने सेंद्रिय शेती क्षेत्र वाढू लागले आहे. भात, उडीद सारख्या शेतमालाची गुणवत्ता वाढू लागल्याने त्यास अपेक्षित दर मिळण्यात मदत झाली. येथील १५० शेतकरी 'आत्मा'अंतर्गत नोंदणीकृत आहेत. यातून भाजीपाला लागवड वाढली आहे.

Seva Sankalp Samitee
Cotton Picking : कापसाची वेचणी कशी कराल? | ॲग्रोवन

शेतकऱ्यांच्या भात उत्पादनात वाढ साधण्यासाठी सुधारित ८ जातीची बियाणे पुरवली जात आहेत. त्यामध्ये लाल माडी, काळी खडशी हे प्रमुख आहेत. गतवर्षी तांदूळ विक्रीतून १,३२,७७३ रुपये उलाढाल झाली. समितीची बियाणे बँक सुरू आहे. सुरवातीला ६४ शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंबा काजू विक्रीसाठी काम सुरु झाले. जुलै २०२२ मध्ये ५० शेतकऱ्यांना आंबा, बांबू, शेवगा, लिंबू अशी ५,००० गुणवत्तापूर्ण रोपे पुरविण्यात आली. यासह काही निवडक शेतकऱ्यांना फवारणी पंप उपलब्ध करून दिले आहेत.

कामकाज दृष्टीक्षेपात:
-आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट ः ६
-शेतकऱ्यांसाठी १५१ प्रशिक्षण वर्ग त्यामध्ये २,२५० शेतकऱ्यांचा सहभाग.
-‘वाडी’ उपक्रमाअंतर्गत आंबा व काजू लागवडीचे प्रशिक्षण आणि लागवड. आंब्याची ५५० कलमे, काजुच्या १२०० कलमांचे ७६ ठिकाणी ४५६ शेतकऱ्यांना वितरण.
-ठिबक सिंचन उपक्रमाला चालना. दर वर्षी १० ते १५ शेतकऱ्यांचे उद्दिष्ट.

विविध उपक्रमातून महिलांना संधी ः
१) थेट ग्राहकांना तांदूळ विक्री ः
आदिवासी शेतकऱ्यांकडून रास्त दरात तांदूळ खरेदी करून शहरातील ग्राहकांना विक्री केली जाते. यामध्ये भातमळणी, प्रतवारी, पॅकिंग आदि कामे महिला करतात. त्यामुळे महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळाला आहे. नाशिक शहरात महिलांनी बाजारपेठ केंद्रित काम सुरु केले आहे.

२) गोमय गोवरी प्रकल्प ः
गोवरी मागणी व बाजारपेठ लक्षात घेऊन महिलांचे गट तयार करून ‘गोमय गोवरी प्रकल्प’ सुरु करण्यात आला. व्यावसायिक पद्धतीने ४५ महिलांना गोवरी निर्मिती व विक्रीसंबधी प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी समान आकाराचे साचे देऊन गोवरी तयार केली जाते. गेल्या चार वर्षांपासून श्री गुरुजी रुग्णालयाच्या आवारात विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या चार वर्षात ११.२० लाखांवर उलाढाल झाली. प्रत्येकीला सरासरी दोन ते अडीच महिन्यात १० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.

३) स्वावलंबन विक्री केंद्र ः
संस्थेने महिलांच्या उत्पादनांना विक्री व्यवस्था उभी करून दिली आहे. नावीन्यपूर्ण उत्पादनांचे प्रशिक्षण समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी आदिवासी महिलांना पाड्यांवर जाऊन दिले. ज्यामध्ये थालीपीठ भाजणी, मुखवास, मेतकूट, नागली सत्त्व, जवस बी, निरगुडी तेल अशी उत्पादने तयार होऊ लागली आहेत. याशिवाय सेंद्रिय तांदूळ,डाळी, खपली गहू, भगर, नागली, मिरची आदि शेतमाल विक्री केली जाते. यातून सात लाखांवर उलाढाल झाली आहे.

युवकांना कौशल्य प्रशिक्षण ः
आदिवासी पाड्यांवर रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी युवक व युवतींना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. कृषी विज्ञान केंद्र(नाशिक), महा बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, औद्योगिक केंद्र, जिल्हा उद्योग केंद्राच्या मदतीने कौशल्य आधारित कुक्कुटपालन, शिवणकाम, नर्सिंग आदी व्यावसायिक अभ्यासक्रम प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये ७२० महिला व पुरुषांनी लाभ घेतला आहे.

विद्यार्थ्यांसाठी वाचनालय ः
कोटंबी आणि हिवाळी या दोन ठिकाणी आदिवासी पाड्यांवरील समितीने वाचनालय सुरू केले आहे. येथे ४०० पुस्तके उपलब्ध आहेत. त्यातून व्यक्तिमत्त्व, वकृत्व विकास विद्यार्थ्यांचा घडत आहे. योगासने, क्रीडा प्रकार, मैदानी खेळांचे आयोजन केले जाते. स्थानिक गणेश मंडळांच्या माध्यमातून हरिपाठ ,कीर्तन, हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.

शासकीय योजनांसाठी समन्वय ः
समितीने दोन वर्षांपूर्वी गावोगावी जाऊन आदिवासी विधवा, निराधार, भूमिहीन व शेतकरी, महिला अशा घटकांपर्यत शासकीय योजना पोहचविल्या आहेत. आतापर्यंत ३८५ लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. या उपक्रमातून सौर पंप, विहीर, शेततळे,निराधार योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, नरेगा योजना, आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत कूपनलिका, वनधन केंद्र योजना, पशुसंवर्धन योजना, आयुष्यमान योजना याअंतर्गत १९३ जणांना लाभ मिळाला आहे. तीस गावांमध्ये ग्रामविकास समितीची स्थापना करण्यात आली. यातून स्थानिक ग्रामीण प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी चर्चा करून पाठपुरावा केला जातो. ‘वृक्षवल्ली’ उपक्रमातून पाच हजार देशी वृक्ष लागवड करून संवर्धन केले जात आहे.

‘‘पुढील पाच वर्षात समितीच्या माध्यमातून पन्नास आदिवासी पाडे सक्षम करण्याचा मानस आहे. शेती विकास करण्यासाठी त्यादृष्टीने पावले टाकण्यासाठी सुरवात केली आहे. जल प्रकल्पात विस्तार करून शेती सिंचन कार्यक्षम होण्यासाठी वर्षभरात शेतकऱ्यांना ठिबक सिंचन प्रकल्प देण्याची योजना आहे.‘‘
-रामेश्वर मालाणी,अध्यक्ष,सेवा संकल्प समिती

‘‘ कार्यक्षेत्रातील पन्नास पाड्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम सुरु आहे. या भागातील मूळ गाभा व संस्कृती तशीच ठेऊन त्यांना सुखी व समृद्ध करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.
- डॉ.राजेंद्र खैरे, कार्यवाह, सेवा संकल्प समिती

संपर्क:
१) मिलिंद जोशी, ७७०९६१८८३३
२) अमित डमाले,९८२०२९ ३३२८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com