बँकेवर तुम्हाला विश्वस्त म्हणून पाठवलंय, मालक म्हणून नव्हे

सोलापूर डीसीसी बॅंकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेत्यांचे टोचले कान
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon

सोलापूर ः सोलापूरसह राज्यातील अनेक साखर कारखान्यांना (Sugar Mills) सरकारने मदत केली, जिल्हा मध्यवर्ती बँकांनाही सातत्याने मदत केली, हे सांगताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी (ता. ३०) सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परिस्थितीवरून जिल्ह्यातील नेत्यांचे चांगलेच कान टोचले. आम्हाला पुणे जिल्हा बँक (PDCC Bank) व्यवस्थित चालवता येते, तुम्हाला तुमची बँक का चालवता येत नाही. मध्यवर्ती बँकेवर तुम्हाला विश्वस्त म्हणून पाठवले आहे, मालक म्हणून नव्हे, अशा शब्दात त्यांनी या नेत्यांना सुनावले.

अनगर नगरपंचायतीच्या स्थापनेनिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात श्री. पवार बोलत होते. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे (dattatray Bharane), राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने, आमदार निलेश लंके, अमरसिंह पंडित, संयोजक आणि माजी आमदार राजन पाटील, बाळाराजे पाटील यावेळी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, साखर कारखाने, बँका नीट चालवा, शेतकऱ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे. यात शेतकऱ्यांची चूक नाही, संचालकांच सर्वस्वी जबाबदार आहेत. सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांची पूर्ण काळजी घेत आहोत. आता अलीकडेच शून्य टक्के व्याजानं पीककर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन लाखांवर कर्जाबाबतही काय सवलत देता येईल, त्याचा विचार करत आहोत. पण ऊटसूट कर्जे काढू नका, जेवढं विहिरीला, नदीला पाणी आहे, तेवढाच ऊस लावा, आज अतिरिक्त उसाचं संकट आहे. पण एकाही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही, याची काळजी घेत आहोत. चार दिवसांपूर्वीच एक मे नंतर गाळपासाठी येणाऱ्या उसाला कारखान्यांना रिकव्हरी लाॅस म्हणून २०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यातूनही प्रश्न सुटेल, असेही ते म्हणाले.

हे राजकारण परवडणारे नाही

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मशिदीवर असलेल्या भोंग्यांवरून चांगलेच राजकारण तापवले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली आहे, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या भाषणात त्याचा समाचार घेतला. यावेळी राज ठाकरे यांचे नाव न घेता, ज्यांना स्वतःचे चौदा आमदार टिकवता आले नाहीत, नाशिककरांनी महापालिकेची सत्ता त्यांच्या हातात दिली. मात्र नंतर त्याच नागरिकांनी त्यांना नाकारले, आता हेच लोक राजकीय हेतू साध्य करण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण होईल, कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा मुद्दा काढून राजकारण करत आहेत. पण आपणाला हे परवडणारे नाही, अशांपासून तुम्ही सावध रहा, असं उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com