युक्त आहार विहार...

फडक्यात गुंडाळून आणलेल्या भाकरीचे गाठोडे सोडले जाते आणि बांधावरच्या झाडाच्या गार सावलीत कोरड्यास भाकरीचा आनंद सगळे कुटुंब घेऊ लागते. त्या वेळी बांधावरून आमच्या सारख्या येणाऱ्या जाणाऱ्याला ‘दादा या जेवायला’ म्हणायला त्या कुटुंबातला कर्ता पुरुष विसरत नाही.
Farmer
FarmerAgrowon

शंकर बहिरट

सकाळी कामाला झटल्यावर दुपार कधी होते लक्षातही येत नाही. तेव्हा कडकडून भूक लागते. फडक्यात गुंडाळून आणलेल्या भाकरीचे गाठोडे सोडले जाते आणि बांधावरच्या झाडाच्या गार सावलीत कोरड्यास भाकरीचा आनंद सगळे कुटुंब घेऊ लागते. त्या वेळी बांधावरून आमच्या सारख्या येणाऱ्या जाणाऱ्याला ‘दादा या जेवायला’ म्हणायला त्या कुटुंबातला कर्ता पुरुष विसरत नाही.

Farmer
women Farmer : कष्टकरी स्त्रियांच्या समस्या जाणून घेऊया

त्या वेळी त्या कष्टकरी लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असतो. आपल्या आनंदात इतरांनीही सहभागी व्हावे ही त्यामागची निर्मळ वृत्ती असते. ‘शेतात जेवण केलं की ते चवदार लागते, माणूस आर्धी भाकर जास्ती खातो’ असे आमची आजी म्हणायची.

Farmer
Women Empowerment : महिला हक्कासाठी लढणाऱ्या : चंद्रप्रभा

सुकी भाजी, लसणाची चटणी आणि भाकरी असे ते साधे जेवण असले तरी ते इतके चवदार का लागते, हा प्रश्‍न मला लहानपणी पडायचा. शेतात जेवणच नाही तर पाणी ही अतिशय चवदार लागते. झाडाखालची सावली तर आलेला थकवा क्षणात नाहीसा करते. अपचन, भूक मंदावणे, निद्रानाश, बद्धकोष्ठ यांसारखे शहरी आजार शेतकऱ्यांना होत नाहीत.

काम करत असताना येणाऱ्या घामाद्वारे शरीरातले विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. खूप तहान लागल्यानंतर जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा त्या पाण्याची गोडी अवीट असते. भरपूर पाणी प्यायल्यामुळे ताजेतवाने वाटून कामाला आणखी हुरूप येतो. वाढणारे वजन किंवा कॅलरी बर्न कशा करायच्या, याची चिंता शेतकऱ्याला कधीही भेडसावत नाही.

भरपूर काम केले की चांगली भूक लागते. चांगली भूक लागली की जेवण अधिक रुचकर लागते आणि पर्यायाने अन्नपचन चांगले होते. निद्रानाश असणाऱ्या पेशंटला डॉक्टर सांगतात की शरीराला दिवसभर इतके दमवा की रात्री ते थकून झोपी जाईल. दिवसभर भरपूर काम करून दमलेला शेतकरी रात्री नऊच्या आतच झोपी जातो.

लवकर झोपल्याने सकाळी लवकर जाग येते. इंद्रियांना असे वळण एकदा लागले की ते आयुष्यभर तसेच राहते. प्रत्येक शेतकऱ्याकडे दुभती गाय किंवा म्हैस असतेच. सकाळच्या रोजच्या न्याहारीमध्ये दूध आणि भाकरी किंवा हिवाळ्यात बाजरीची भाकरी आणि उडदाचे घुटे हा ऊर्जादायी आहार आहे. जुन्या काळापासून शेतकऱ्यांचा हा आवडता आहार आहे.

आधुनिक काळ आला म्हणून आहारात बदल करणे चुकीचे आहे. उपास-तापास, रात्रीची जागरणे टाळली पाहिजेत. चांगला आहार घेतला तर आपल्याला काम करायला ऊर्जा मिळेल. रात्री चांगली झोप येईल. पर्यायाने शरीर आणि मन निरोगी राहील.
तुकाराम महाराज म्हणतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com