Millet's : भरडधान्य पिकांना हवे दीर्घकालीन धोरण

शेतीच्या मुख्य धारेमध्ये भरडधान्ये कायम स्वरूपी राहण्यासाठी समग्र धोरण तयार करावे लागेल. तरच ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने परिणामकारक ठरेल. अन्यथा, ती एक उत्सवी योजना ठरण्याची जास्त शक्यता आहे.
Millet's
Millet's Agrowon

डॉ सतीश करंडे   संयुक्त राष्ट्र संघाची जागतिक अन्न आणि शेती संस्था (World Food and Agriculture Organization of the United Nations) यांना भारत सरकारने २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष (मिलेट्स वर्ष) (Millet"s Year) म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव दिला आणि तो मंजूर करण्यात आला. त्यानिमित्ताने भरडधान्यांची देशातील स्थिती आणि त्यांचे पोषणमूल्य, आहार आणि प्रक्रिया उद्योगातील महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देणारी लेखमाला आजपासून दर शुक्रवारी सुरू करत आहोत.

Millet's
Millets year: भरडधान्यात कोणत्या पिकांचा समावेश होतो?

आशिया खंडाच्या एकूण भरडधान्य उत्पादनाच्या ८० टक्के आणि जगाच्या २० टक्के उत्पादन भारतामध्ये होते. अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यामध्ये हरितक्रांतीचे योगदान मान्य करावे लागेल. परंतु हरितक्रांती आणि ठरावीक पिकांनाच हमीभावाचे धोरण यामुळे पीक विविधता नष्ट होत गेली. अन्नसुरक्षा साध्य करण्यासाठी गहू आणि भात या दोन पिकांवर सर्व भिस्त ठेवल्यामुळे, सुपोषण निश्‍चिती होईल अशी पीक पद्धती हरितक्रांतीनंतर रुजली नाही.

Millet's
Millet : भरडधान्यांचे वाढते महत्त्व जाणून घ्या

जी पूर्वी पारंपरिक पीक शेती पद्धती म्हणून ओळखली जात होती. तीच नष्ट झाली. त्यामुळे शेतातून अनेक पिके कमी होत गेली. काही हद्दपारच झाली. भात आणि तांदूळ उत्पादन वाढण्याची कारणे म्हणजे एक विक्रमी उत्पादन देणारे तंत्रज्ञान आणि हमी भावाचे कवच देऊन सरकारच मोठा खरेदीदार असणे. रेशन व्यवस्थेवर गहू आणि तांदूळ पुरविला जातो.

Millet's
Pearl millet: बाजरीच्या धनशक्ती वाणासाठी बोरलॉग पुरस्कार

एकूण तांदळाच्या उत्पादनापैकी ४५ टक्के तांदूळ उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल आणि पंजाबमध्ये पिकतो, तर ६५ टक्क्यांपेक्षा जास्त गहू उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पंजाब या राज्यांत पिकतो आणि तो देशात सर्वदूर पाठविला जातो. त्याचा परिणाम म्हणजे ५६ टक्के भरडधान्याचे क्षेत्र कमी झाले आहे.

भरडधान्यामध्ये मोठी विविधता आहे आणि ती जवळपास प्रत्येक राज्यामध्ये आहे. मात्र २२८ टक्के उत्पादकता वाढ ही केवळ ज्वारी आणि बाजरीमुळे दिसते. एकूण भरडधान्य उत्पादनात या दोन पिकांचा वाटा हा ८४ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. एकूण भरडधान्य उत्पादनात महाराष्ट्र, राजस्थान आणि कर्नाटक या तीन राज्यांचा वाटा ५३ टक्क्यांहून जास्त आहे आणि त्यामध्ये मुख्य पिके आहेत ज्वारी, बाजरी आणि नाचणी. १९५० च्या तुलनेत ज्वारीची उत्पादकता ३.५३ क्विंटल/हे. वरून ८.८९ क्विंटल/हे. पर्यंत पोहोचली. बाजरी २.८८ क्विंटल/हे. वरून १३.११क्विंटल/हे. पर्यंत पोहोचली. त्याच वेळी देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील कृषी संशोधन संस्थांनी भरडधान्यांचे एकूण १५४ वाण प्रसारित केले आहेत. त्यापैकी ज्वारी आणि बाजरीचे मिळून ९५ आहेत, नाचणीचे २८ आहेत. राहिलेल्या पाच भरडधान्यांपैकी मिळून फक्त ३१ वाण आहेत.

हवामान बदलाच्या संकटामध्ये हवामान अनुकूल आणि शाश्‍वत शेती विकासाच्या दृष्टीने भरडधान्यांचे महत्त्व खूपच आहे. पाण्याचा(भाताला भरडधान्यांच्या अडीच पट पाणी लागते) आणि कीड रोगांचा (भरडधान्यांवर एकूण कीटकनाशकाच्या वापराच्या एक टक्क्यांहून कमी वापर आहे.) ताण सहनशील अशी ही पिके आहेत. त्यांची स्थानिक विविधता ही मोठी आहे. त्यामुळे स्थानिक वाणाचेही महत्त्व मोठे आहे.

त्यामुळे त्या भागातील स्थानिक भरडधान्ये आणि त्याच्या वाण संवर्धनांना दिले पाहिजे. तरच ती शेती परिस्थितिकी (हवामान अनुकूल) आणि सुपोषण अशा दोन्ही बाजूंनी परिणामकारक ठरतील. नाहीतर आज रेशन व्यवस्थेवर उत्तरेकडील राज्यातून गहू, तांदूळ पुरविला जातो. उद्या दक्षिणेतून उत्तरेकडे भरडधान्ये पाठवली जातील आणि तीही केवळ ज्वारी आणि बाजरी.

Millet's
Millets :भरडधान्यांची अधिकाधिक लागवड करा - पंतप्रधान

भरडधान्यांचे महत्त्व ः

१) अन्नसुरक्षा जेवढी महत्त्वाची तेवढीच पोषण सुरक्षासुद्धा महत्त्वाची आहे. भारतामध्ये दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त मुले कुपोषणाने दगावतात, ४८ टक्के महिला अनेमियाग्रस्त आहेत. दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या जागतिक भूक निर्देशंकामध्ये भारताचे स्थान सातत्याने घसरत आहे.

२) बदलत्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून मधुमेह, उच्च रक्तदाब या विकारांचे प्रमाण वाढत आहे. अशी परिस्थिती निर्माण होण्याला एक महत्त्वाचे कारण म्हणजे बदलता आहार. १९६० मध्ये दरवर्षी दरडोई २६ किलो एवढा गहू आहारात होता, २०१० मध्ये त्याचे प्रमाण ५२ किलो झाले आहे.त्याच प्रमाणात भात खाण्याचेही प्रमाण वाढत गेले.

३) भरडधान्यामध्ये ग्लुटेन नाही. मात्र प्रथिने, तंतुमय घटक जास्त आहेत. रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. नाचणी सारखे धान्य लहान मुले ते वृद्ध यांना प्रत्येक टप्प्यावर आवश्यक आहे.

४) या धान्यामध्ये जीवनसत्त्व-ड, कॅल्शिअम आहे. राळ्यामध्ये जीवनसत्त्व बी १ आहे जे मज्जातंतुशी निगडित आजारावर गुणकारी आहे. बाजरी उष्ण गुणाची आणि लोह पुरवणारी अशी आहे. वरईमध्ये कमी कॅलरी आहेत, त्यामुळे स्थूलता कमी करण्यासाठी महत्त्वाची आहेत.त्यामुळे पाश्चिमात्य देशामध्ये भरडधान्ये खाण्याचे प्रमाण वाढत आहे.

मुख्य प्रवाहात भरडधान्ये येण्यासाठी ः

शहरी वर्गाचे राहणीमान वाढले त्या प्रमाणात आरोग्याच्या बाबतीतील सतर्कता वाढताना दिसते. त्याचा हा परिणाम म्हणजे भरडधान्यापासून इडली, डोसा आणि इतर पदार्थांची मागणी वाढली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणारे आजार आणि त्यामुळे भरडधान्य पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढणार आहे. हे ओळखून समग्र धोरण तयार करावे लागणार आहे.

१. संशोधन :

- सध्या असणाऱ्या भरडधान्यांच्या वाणांची विविधता अभ्यासणे, त्यांचे आदानप्रदान करणे, त्यामध्ये निवड पद्धतीने अधिक उत्पादन देणारे वाण तयार करणे, प्रक्रियेच्या अनुषंगाने संशोधन करणे.

२. बहुविध पीक पद्धतीला चालना देणे :

- पिकांचा फेरपालट,आंतर पिके, मिश्र पिके आणि एकात्मिक कीड, रोग व्यवस्थापनात भरडधान्यांचा समावेश. त्यासाठी सरकारी धोरणांचे पाठबळ असावे. उदा, एक एकर शेतामध्ये शेतकऱ्याचे मुख्य पीक २४ ते ३२ गुंठे असावे, तर राहिलेल्या ८ ते १६ गुंठ्यामध्ये किमान चार पिके असावीत. त्यापैकी दोन कडधान्ये, दोन भरडधान्ये असावीत. अशा पीक समूहाला पीकविमा, कर्ज, अनुदान यासाठी प्राधान्य असावे.

३. पंचक्रोशी केंद्रित प्रारूप :

- जिल्ह्याची वैशिष्ट्ये जपत पंचक्रोशी केंद्रीत शेती आणि ग्राम विकासाचे प्रारूप हवे. स्थानिक पीक पद्धती आणि आनुषंगिक उद्योग व्यवसायाला प्राधान्य देणारे धोरण हवे. उदा. त्या पंचक्रोशीमध्ये उत्पादित भरडधान्यावर प्रक्रिया करणारे उद्योग ते बिस्किटे तयार करण्यासाठी विविध उपक्रम आणि योजना.

- हवामान अनुकूल आणि पाणी आणि कार्बन फूटप्रिंट कमी करणारी शेती पद्धती विकसित करण्यासाठी आवश्यक.

४. रेशन व्यवस्था आणि माध्यान्ह भोजन :

- प्रत्येक जिल्ह्यातील रेशन व्यवस्था आणि माध्यान्ह भोजन योजनेमध्ये त्या जिल्ह्यामध्ये उत्पादित झालेला किमान ४० टक्के शेतीमाल पुरवठा. तेवढ्या प्रमाणात तो उत्पादित होण्यासाठी बहुविध पीक पद्धतीला चालना देणाऱ्या समग्र शेती धोरणाची गरज.

- पंचक्रोशीमधील रेशन दुकानामध्ये भरडधान्यांचा पुरवठा हा तयार पिठे (न्यूट्रिसिरियल मिश्र पीठ) देऊन करणे जास्त सोईस्कर आणि स्थानिक रोजगार वाढविणारे ठरेल.

५. शेतकरी महिला :

- बहुविध पीक पद्धतीला चालना मिळणे, छोटे प्रक्रिया उद्योग उभारणे. प्रचार आणि प्रसार होण्यासाठी महिला महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात.

- महिला खातेदार (शेत ते किचन मालकी) तयार करणे आणि त्यांना सर्व योजनांचा प्राधान्य लाभार्थी असा दर्जा द्यावा.

वरील पाच मुद्द्यांच्या अनुषंगाने अनेक योजना तयार केल्या जाऊ शकतात. त्याचा उद्देश भरडधान्यांची पीक पद्धती (उत्पादन-उत्पन्न, रोजगार-व्यवसाय ते आहार-आरोग्य) उभारणे हा असला पाहिजे.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजवर सर्वांत यशस्वी झालेली शेती योजना म्हणजे रोजगार हमीतून फळबाग लागवड योजना. शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावले, रोपवाटिका, छाटणी, पॅकेजिंग, बागकाम, वाहतूक अशा माध्यमांतून रोजगार संधी निर्माण झाल्या. ही योजना सुरू करताना अनेक प्रश्‍न होते. जसे की कलमे कोण तयार करणार, कौशल्याची कामे करणारा मजूर वर्ग कुठून उपलब्ध होणार ते विक्री कुठे, बहर कोणता आणि कसा करणार हे प्रश्‍न होते. परंतु या सर्व प्रश्‍नांवर सरकारला उत्तरे द्यावी लागली नाहीत. शेतकऱ्यांनी ती शोधली. कारण फळबाग तयार करण्याचा भांडवली खर्चाची जबाबदारी सरकारने उचललेली होती. त्यामुळे बहुविध पीक पद्धतीला चालना मिळेल.(एकरी दहा क्विंटल उत्पादन परंतु पाच प्रकारचे दहा क्विंटल असे धोरण हवे.) त्यामुळे सर्व प्रकारची जोखीम कमी होते. असे एकच धोरण आणि त्यासाठी परिणामकारक योजना तयार केली की पुढे त्याला चालना मिळत राहते.

१) राळा, नाचणी, वरई, ज्वारी, बाजरी आदी भरडधान्ये आपल्या लोकसंस्कृतीचा भाग आहेत. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये संक्रांत, वसुबारस या दिवशी राळ्याचा भात केला जातो. एकादशीच्या उपवासाला भगर असते. आदिवासी बांधव नाचणीच्या शेताला देव मानतात.

२) जगभरातील १३१ देशामध्ये भरडधान्य पिकांची लागवड केली जाते. आजही जगभरातील (मुख्यत: आशिया आणि आफ्रिका खंडातील देशातील) ५९ कोटींपेक्षा जास्त लोकांचे मुख्य अन्न हे भरडधान्य पिके आहेत.

३) भारतामध्ये १७० लाख टन एवढे भरडधान्य पिकांचे उत्पादन होते. ते जगाच्या २० टक्के आणि संपूर्ण आशिया खंडाच्या ८० टक्के आहे.

४) राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि हरियाना ही ज्वारी, बाजरी उत्पादक राज्ये आहेत. राळा, नाचणी, वरई या पिकांच्या लागवडीमध्ये मध्य प्रदेश (३२.४ टक्के), छत्तीसगड (१९.५ टक्के), उत्तराखंड (८ टक्के), महाराष्ट्र (७.८ टक्के), गुजरात (५.३ टक्के), तमिळनाडू (३.९ टक्के) या राज्यांचा चांगला वाटा आहे.

५) अनेक पिकांच्या उत्पादकतेमध्ये भारताचे स्थान पहिल्या दहा देशांमध्येसुद्धा नाही. मात्र भरडधान्य पिकांची उत्पादकता त्या तुलनेत चांगली आहे.(जागतिक उत्पादकता १२२९ किलो/हेक्टर, भारत १२३९ किलो/हेक्टर).

६) हरितक्रांती होण्यापूर्वी असणाऱ्या भरडधान्याखालील क्षेत्राच्या तुलनेत सध्या ५६ टक्के एवढ्या क्षेत्राची घट झाली आहे. असे असले तरी उत्पादकता मात्र २२८ टक्के (ज्वारी आणि बाजरीचे सुधारित आणि संकरित जाती) वाढली आहे. मात्र १९५० मध्ये रोजच्या आहारामध्ये २० टक्के एवढे भरडधान्याचे प्रमाण आज सहा टक्क्यांपर्यंत घसरले आहे.

७) भारत सरकारने २०१८ हे वर्ष राष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले होते. त्याअंतर्गत अन्नसुरक्षा मिशन मध्ये भरडधान्यांचा समावेश, महिला बालकल्याण विभागाच्या पोषण मिशनमध्ये समावेश, कृषी विस्तार कार्य, प्रशिक्षण, प्रकल्प अशा पद्धतीने हे वर्ष साजरे करण्यात आले.

संपर्क ः डॉ सतीश करंडे, ८८०५२९२०१०

(लेखक एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन आणि चेतना विकास संस्था, वर्धा यांच्या संशोधनावर आधारित प्रकल्पात कार्यरत आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com