Groundwater Management : शास्त्रीय भूजल व्यवस्थापन करण्याची सोपी पद्धत

पाण्याच्या समस्या आणि भूजलाच्या बाबतही अनेक अनावश्यक प्रथा, परंपरा विनाकारण पाळल्या जातात. कोणत्याही कृतीमागील कार्यकारण भाव जाणून न घेताच त्या केल्या जातात. त्यातून अनेकदा आपण नुकसान करून घेतो.
Water management
Water managementAgrowon

सतीश खाडे

Water management : आश्रमात आचार्य शिष्यांना शिकवत असताना तिथे एक मांजर लुडबूड करू लागले. लक्ष चाळवले जात असल्याने व्यत्यय येऊ लागला. आचार्य ते मांजर एका कोपऱ्यात बांधण्यास सांगितले. संध्याकाळी सोडून दिले. दुसऱ्या दिवशीही तसेच झालं.

मांजर घुटमळल्यामुळे बांधण्यास सांगितले. पुढे रोजच तसे घडू लागले. अध्यापनाची सुरुवातच मुळी ‘‘मांजर बांधले का?’’ या प्रश्‍नाने होऊ लागली. शिष्यच काय पण मुख्य आचार्यही बदलले तरी हा शिरस्ता सुरुच राहिला.

अगदी ते मांजर मेले तर शिष्यांनी दुसरे मांजर पकडून तिथे आणून बांधले. का तर परंपरा सुरूच राहिली पाहिजे. पुढे त्या मांजराचे इतके कौतुक सर्वत्र पसरले की चक्क मांजराची मूर्ती बनवून तिथे ठेवली. तिच्या पूजेशिवाय शिक्षणाला सुरुवात करणे म्हणजे पाप ठरले.

तिथून बाहेर पडलेल्या व आयुष्यात यशस्वी ठरलेल्या शिष्यांनी खास सोन्याचीच मूर्ती आश्रमाला भेट दिली. त्याची री ओढत येणारे भाविकही चांदी, सोन्याची मांजरे दान करू लागले. एखादी प्रथा किंवा परंपरा कशी सुरू होते, याचे हे उत्तम उदाहरण होय.

पाण्याच्या समस्या आणि भूजलाच्या बाबतही अशाच अनावश्यक प्रथा, परंपरा विनाकारण पाळल्या जातात. कोणत्याही कृतीमागील कार्यकारण भाव जाणून न घेताच त्या केल्या जातात. त्यातून अनेकदा आपण नुकसान करून घेतो.

Water management
Bhujal Punarbharana : भूजल पुनर्भरणासाठी उपयुक्त नकाशे मोफत उपलब्ध

आजही आपण भूजल सांगणाऱ्या पायाळू माणसांच्या शोधात असतो. पूर्वी एकवेळ ते ठिक होते. मात्र आता शास्त्रीय आधार असलेली साधने, पद्धती उपलब्ध असतानाही त्याचा वापर करत नाही. या साधनांमध्ये ‘जीएसडीए’ने उपलब्ध केलेले खडकांचे आणि पाणी उपलब्धतेचे नकाशे, भूजल पातळी शोधण्याची यंत्रे इ. उपलब्ध आहेत.

अगदी भूजल पुनर्भरणाचे विविध उपाय आपल्या मोबाईलवर उपलब्ध आहेत. भूजल, पाण्याच्या व्यवस्थापनासाठी आधुनिक साधनांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांची व गावाची संख्या फारच थोडी आहे. ती वाढली पाहिजे.

भूजल उपलब्धतेचे नकाशे

मागील भागात ‘जीएसडीए’ बनवलेल्या भूजल पुनर्भरण प्राधान्यक्रमाच्या नकाशाबद्दल जाणून घेतले. त्यापुढे जात संस्थेने उपग्रहाच्या प्रतिमांचा वापर करून पाणलोट क्षेत्र हा मूलभूत घटक मानत.

‘भूजल उपलब्धतेचे नकाशे’ तयार केले आहेत. भूजल विभागाच्या जिल्हा कार्यालयात ते उपलब्ध आहेत. या नकाशातून भूजलाचे प्रमाण आणि खोली समजू शकते. येथील भूजल शास्त्रज्ञ भूजल उपलब्धतेविषयी या नकाशावरून मार्गदर्शनही करतात. पण आपल्याला हे माहितीच नसते.

या नकाशांचा प्रसार व वापर अगदी गाव आणि व्यक्तिगत पातळीपर्यंत होणे गरजेचे आहे. भूजल साक्षरतेसंदर्भात भूगोलाचे, भूगर्भ शास्त्राचे, पर्यावरण शास्त्राचे, स्थापत्यशास्त्राचे प्राध्यापक यांनी प्रयत्न केले पाहिजेत. पुढे जाऊन असेही म्हणता येईल की भूजल विभागाच्या वेबसाइटवरच भूजलाचे नकाशे उपलब्ध झाले पाहिजेत.

भूजल शोधण्याची ‘रेझिस्टिव्हिटी’ पद्धत

ही भूजल संशोधनासाठी जगभरामध्ये सर्वाधिक वापरली जाणारी पद्धत आहे. त्यात एका यंत्राने जमिनीमध्ये एक विजेचा प्रवाह सोडला जातो. त्याला जमिनीकडून होणारा प्रतिरोध मोजला जातो. उदा. कोरड्या जमिनीत प्रतिरोध खूपच जास्त असतो.

तर पाणी असल्‍यास प्रतिरोध कमी होतो. खारे पाणी असल्यास प्रतिरोध सर्वांत कमी असतो. जमिनीत सोडलेल्या विजेच्या प्रवाहाला होणारा प्रतिरोध रेझिस्टिव्हिटी मीटरच्या साह्याने मोजला जातो. जमिनीतील

पाण्याचा थेट वेगवेगळा परिणाम खडकांच्या विद्युतभारावर होतो. खडकांच्या निरनिराळ्या खोलीवर विद्युत प्रवाहास होणाऱ्या प्रतिरोधाचे आलेख काढले जातात. त्यावरून जमिनीखाली पाण्याची उपलब्धता, त्याचे प्रमाण व नेमकी जागा शोधली जाते.

हे भूभौतिकशास्त्र (जिओ फिजिक्स) असून, त्यातील तज्ज्ञ अशा आलेखांचे वाचन करू शकतात. या शास्त्रीय पद्धतीचा वापर करून पाण्याचा शोध घेणारे भूवैज्ञानिक व भूजल सल्लागार कार्यरत आहेत.

बोअरवेल रिचार्जर

कोरडे पडलेल्या किंवा कमी पाणी असलेल्या बोअरवेल पुन्हा वाहत्या करण्यासाठी हे तंत्र वापरले जाते. बोअरवेलमध्ये पाणी येते ते खोलवरच्या जलधरातून (Deep Aquifer). बोअरवेल करतेवेळी बाजूची माती व मुरूम ढासळून बोअरवेल बुजू शकते.

ते टाळण्यासाठी जमिनीपासून खाली पक्का खडक लागेपर्यंत म्हणजेच सुमारे पन्नास ते साठ फूट लांबीचा केसिंग पाइप टाकला जातो. केसिंग पाइप लगतच्या जलधरात (Shallow Aquifer) पावसाचे किंवा बाजूने वाहणाऱ्या ओढे, नदी यामुळे पाणी साठते.

पण ते मुरत खोल जलधरात (deep aquifer) पोहोचण्यास खूप वर्ष लागतात. शास्त्रज्ञांच्या मते, बोअरमधील शंभर फुटावरचे पाणी शंभर वर्षांपूर्वीचे, तर पाचशे फुटावरील पाणी पाचशे वर्षांपूर्वीचे असू शकते. हे भूजलाचे वय नेमके कसे मोजले जाते असा आपल्याला प्रश्‍न पडेल.

Water management
Ground Water Level : परभणी जिल्ह्यातील भूजल पातळीत खालावली

पावसाच्या मुरणाऱ्या पाण्यात कार्बन डायऑक्साइड हा वायू विरघळलेला असतो. त्यात अत्यंत अल्प प्रमाणात रेडिओॲक्टिव्ह कार्बन १४ हे मूलद्रव्य असते. भूजलातील ‘कार्बन १४’चे मोजमाप करून पाण्याची वय काढले जाते.

त्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आज आपण जे पाणी बोअरवेलमधून उपसतो आहे, ते किती वर्षांपूर्वीचे आहे हे समजले तर पाणी वापर आणि व्यवस्थापनामध्ये अधिक गांभीर्य येऊ शकेल. वरच्या जलधरात असलेल्या केसिंग पाइपला छिद्रे पाडल्यास त्यातून खालील जलधरापर्यंत पाणी पोहोचवता येईल.

यातून खालच्या जलधरातील पाणी वाढते. या साठलेल्या पाण्याची अचूक जागा, अचूक उंची व पाण्याची उपलब्धता हे सर्व शास्त्रीय पद्धतीने तपासता येते. त्याचा खर्चही आवाक्यातील आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग

हा इंग्रजी शब्द वरवर अवघड वाटत असला तरी प्रत्यक्षात काम अत्यंत सोपे आहे. पावसाचे पाणी साठविण्याचे हे काम प्रत्येक घर, इमारतीवर झाले पाहिजे. शेतातील घरासाठी तर ते फायदेशीरच आहे.

छतावर पडणारे पावसाचे पाणी गाळून बोअरवेलमध्ये भरणे म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग. गाळून बोअरवेलमध्ये गेलेले पाणी हळूहळू भोवतालच्या खडक, त्यातील त्याच्या भेगांमध्ये जाऊन साठते. बोअरचे पाणी वाढते. जर बोअरला खारे किंवा क्षारयुक्त पाणी असल्यास त्यात पावसाचे शुद्ध पाणी मिसळल्यामुळे खारटपणा कमी होतो.

भूजलाचे संवर्धनासाठी शक्य ते सर्व उपाय शहरी असो की ग्रामीण भागामध्ये केले गेले पाहिजेत. घरे, इमारती, मैदाने, हरितगृहे असे शक्य तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग केले पाहिजे. पूर्वी राबवल्या गेलेल्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या चळवळीचा पुढील टप्पा ठरू शकतो.

भूजलाचे व्यवस्थापन

इस्राईलमध्ये मुळातच भूजल अत्यंत कमी आहे. तेही संपूर्ण सरकारच्या मालकीचे आहे. त्यामुळे भूजल नियोजनाचे काम सरकार करते. आपल्याही देशात कायद्याने भूजल संपत्ती ही सार्वजनिक असून, त्यावर सरकारी मालकी आहे.

मात्र जमिनीची मालकी खासगी असल्यामुळे त्याखालील भूजलाची मालकी त्या शेतकऱ्याकडे असल्याचा समज होतो. मी कितीही पाणी उपसेन, ही वृत्ती त्यातून निर्माण होते. भूजल उपसा नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी तितकीशी प्रभावी ठरत नाही.

उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निवाड्यात ‘भूजलाचे पालकत्व सरकारने घेतले पाहिजे’ असेही म्हटले होते.

पाण्याच्या बाबतीत आणीबाणीची स्थिती येते, त्या वेळी शासकीय यंत्रणा कार्यान्वित होऊन विहिरी, बोअरवेल सार्वजनिक कामांसाठी वापरत असल्याचे आपल्याला दिसते. वास्तविक गाव किंवा पाणलोट क्षेत्राच्या पातळीवरील सर्व जमीन मालकांनी एकत्र येऊन सामुहीक निर्णय घेतले तरच पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन शक्य होईल.

भारतीय संविधानाप्रमाणे जमिनीवरील पाणी प्रवाहावर ते जिथून वाहतात, त्या सर्वांचा हक्क असतो. गाव हे प्रमाण मानून त्यावर कोणतेही काम केले जाते. उदा. एका गावात नाल्याचे पाणी अडवायचे, तर येणाऱ्या पाण्याच्या केवळ ६५ टक्के पाणी अडवता येते.

बाकी ३५ टक्के पाणी पुढील गावाला सोडावे लागते. हे नदीलाही लागू आहे. इतकेच काय एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात पाणी सोडण्यासाठी हाच नियम पाळला जातो. जमिनीवरील पाण्याबाबत जसा आपण एकत्रित निर्णय घेतो, तसाच निर्णय जमिनीखालील पाण्याबाबत घेतला जावा.

त्यातही गाव प्रथम ही संकल्पना राबवल्यास भूजल व्यवस्थापनात क्रांती होईल. भूजल व्यवस्थापनामध्ये भूजलाचा साठा वाढवणे आणि त्याच्या उपशावर नियंत्रण ठेवणे हीच दोन सूत्रे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com