Soil Test : मातीचा नमुना घेण्याची अचूक पद्धत

मागील लेखामध्ये जमिनीतील पोषक अन्नद्रव्यांचे प्रमाण व स्वरूप जाणून घेतले. तसेच आपण मातीचे नमुने कसे घेऊ नयेत, याची माहिती घेतली. या लेखामध्ये मातीचा नमुना नेमका व अचूकपणे कसा घ्यावा, याची माहिती घेऊ.
Soil Testing
Soil TestingAgrowon

डॉ. संजय भोयर, डॉ. ज्ञानेश्‍वर कंकाळ, डॉ. विशाखा डोंगरे

माती परीक्षण (Soil Testing) आपण नेमक्या कोणत्या उद्देशाने करणार आहोत, हे माहिती असले पाहिजे. कारण त्यानुसार शेतातून मातीचा नमुना (Soil Sample) घेण्याची पद्धत अवलंबावी लागते. शेतामधील माती साधारणतः खालील तीन उद्देशांसाठी तपासली जाते.

१) विविध हंगामी पिकांच्या खत नियोजनाच्या (Fertilizer Planning) दृष्टीने मातीचे आरोग्य (Soil Health) तपासणे. उदा. अन्नधान्य, भाजीपाला (vegetable) आणि फुल पिके इ.

२) विविध बहूवर्षायू फळपिकांचे खत नियोजन करण्यासाठी. उदा. संत्रा, लिंबू (Lemon), आंबा (Mango), डाळिंब, पेरू (Peru), सीताफळ, चिकू इ.

३) नव्या किंवा विशिष्ट फळबागेच्या लागवडीसाठी जमिनीची योग्यता तपासणे.

यासाठी मातीच्या नमुन्याचे रासायनिक विश्‍लेषण करताना प्रामुख्याने प्राथमिक पोषक अन्नद्रव्यांची (उदा. नत्र, स्फुरद आणि पालाश) उपलब्धता व प्रमाण तपासले जाते. गरजेनुसार कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि गंधक या दुय्यम; तसेच लोह, जस्त, तांबे, मंगल इ. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासले जाते.

यासोबत मातीच्या आरोग्याशी संबंधित मातीचा सामू, मातीमधील क्षारांचे प्रमाण (क्षारता किंवा विद्युत वाहकता), सेंद्रिय कर्ब आणि मुक्त चुन्याचे प्रमाण इ. रासायनिक गुणधर्मही महत्त्वाचे असून, तेही तपासले जातात.

मातीचा प्रातिनिधिक नमुना घेण्याचे टप्पे

मातीचा प्रातिनिधिक नमुन्याची अचूकता जपण्यासाठी पुढीलप्रमाणे चार टप्पे अवलंबावेत.

पहिला टप्पा : मातीचा नमुना घेण्यासाठी आवश्‍यक साहित्याची जुळवणी.

मातीचा नमुना घेण्यासाठी टिकाव, कुदळ, फावडे, खुरपे, घमेले, पहार किंवा गिरमिट (मूठ असलेला आगर/ पाइप), लाकडी टोकदार काठी, १० ते १५ लाकडी खुंट्या, स्वच्छ गोणपाट, कापडी पिशवी इ. साहित्यांची आवश्यकता भासू शकते.

-मातीचा नमुना घेण्यासाठी स्वच्छ आणि कापडी पिशव्या वापराव्यात.

-रासायनिक खतांच्या, सिमेंटच्या पिशव्या वापरू नयेत.

-हे सर्व साहित्य स्वच्छ असावे. साधने गंजलेली किंवा शेणाने किंवा रासायनिक खताने भरलेली नसावीत.

दुसरा टप्पा : शेताची विभागणी, जागेची निवड आणि नमुना घेण्याची पद्धत ः

सर्व हंगामी पिकांच्या खत आणि अन्नद्रव्य नियोजनासाठी मातीचा प्रातिनिधिक नमुना घेण्यासाठी सर्वप्रथम जमिनीचा रंग, चढ-उतार, खोली, खडकाळ किंवा पाणथळ ठिकाणे, निचऱ्याची परिस्थिती, तसेच क्षारयुक्त किंवा चोपण जागा इत्यादी बाबींमधील फरक लक्षात घ्यावा.

त्यानुसार समान गुणधर्म असलेल्या शेताचे निरनिराळे विभाग पाडावेत. अशा प्रकारे सोबतच्या चित्र क्र. १ मध्ये दाखविल्याप्रमाणे एकाच शेतात निरनिराळ्या प्रकारची माती असल्यास समान गुणधर्म असलेल्या शेताच्या त्या भागाला एक स्वतंत्र शेत गृहीत धरून निवडलेल्या भागातून एक स्वतंत्र प्रातिनिधिक नमुना घ्यावा.

Soil Testing
Soil Testing : या कारणांमुळे माती परिक्षण अहवाल येतो चुकीचा

शेतातील मातीमध्ये वरीलप्रमाणे काही फरक आढळत नसल्यास असे वेगळे भाग न करता अशा शेतामधून एकच प्रातिनिधिक नमुना घ्यावा. त्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करावा.

-प्रत्येक खड्डा खोदण्यासाठी जागा निवडताना बांधावरील, बांधाजवळील २० फुटांपर्यंतची जागा, विहिरीजवळची जागा, मोठ्या झाडांची सतत सावली पडणारा भाग, पाण्याचा पाट वाहत असणारी पाणथळ जागा, शेतातील जनावरे बसण्याच्या जागा, जळालेली जागा, सेंद्रिय खत आणि रासायनिक खत टाकलेली जागा, पाऊस पडल्यानंतर किंवा ओलित केल्यामुळे ओली झालेली जागा आणि नांगरलेली जागा इ. जागेमधून मातीचे नमुने घेऊ नयेत.

-निवडलेल्या या एका शेतातून सोबतच्या चित्र क्र. १ मध्ये दर्शविल्याप्रमाणे नागमोडी पद्धतीने १० ते १२ ठिकाणच्या जागेवर खड्डे खोदण्यासाठी लाकडी खुंट्या ठोकून खुणा करा. यासाठी समान गुणधर्म असलेले कमीत कमी दोन हेक्‍टर आणि जास्तीत जास्त आठ हेक्‍टर एवढे क्षेत्र पुरेसे आहे.

-लाकडी खुंट्या ठोकून खुणा करताना निवडलेल्या संपूर्ण शेतातील माती गोळा करता येईल याची खात्री करा. दोन खड्ड्यांमध्ये किमान २० मीटर अंतर ठेवा.

तिसरा टप्पा : खड्ड्याची खोली आणि त्यामधून माती गोळा करणे

-वरीलप्रमाणे केलेल्या १० ते १२ खुणांपैकी पहिल्या खुणेजवळ किंवा खुंटीजवळ खड्डा खणण्यास सुरुवात करण्यापूर्वी तेथील जमिनीच्या पृष्ठभागावरील काडीकचरा, दगड इ. हाताने बाजूला करा.

-चित्र क्र. १ मध्ये दर्शविल्याप्रमाणे नमुना घेण्यासाठी टिकाव किंवा पहार किंवा कुदळीने एक द्रोण आकाराचा किंवा इंग्रजी ‘व्ही’(V) अक्षराच्या आकाराचा खड्डा खणा.

-मूळ-परिवेशातील (रूट झोनमधील) माती नमुन्यासाठी अचूकपणे घ्यावयाचा आहे. त्यानुसार ज्वारी, भात, मूग, भुईमूग, गहू अशा उथळ मुळे असणाऱ्या पिकांकरिता २० सेंटिमीटर खोल; तर ऊस, कापूस, तूर यांसारख्या खोल मुळे असणाऱ्या पिकांकरिता ३० सेंटिमीटर खोल खड्डा खणावा.

-खड्ड्यातील सर्व माती प्रथम बाहेर काढून टाकावी. ही माती नमुन्यासाठी घेऊ नये.

-खड्डा रिकामा केल्यानंतर त्या खड्ड्याच्या कडेची दोन ते तीन सेंमी जाडीची मातीची चकती स्वच्छ खुरप्याच्या किंवा टोकदार लाकडी काठीच्या साह्याने वरपासून तळापर्यंत खरवडून घ्या.

-एका खड्ड्यातून साधारणपणे अर्धा ते एक किलो मातीचा नमुना घ्या.

-आगर किंवा मूठ असलेला पाइप असल्यास तो जमिनीत २० ते ३० सेंटिमीटर खोल सरळ टाकून त्यामध्ये जमा झालेली माती नमुना म्हणून घेता येते.

-अशा रीतीने शेतातील वरीलप्रमाणे खुणा केलेल्या सर्व १० ते १२ जागी खड्डे खणून किंवा आगरच्या साह्याने माती घ्यावी. सर्व माती एका घमेल्यात चांगली मिसळून घ्यावी.

चौथा टप्पा : गोळा केलेल्या मातीतून प्रातिनिधिक नमुना तयार करणे.

-चित्र क्र. २ मध्ये दर्शविल्याप्रमाणे घमेल्यातील माती स्वच्छ गोणपाटावर चांगली एकत्र मिसळून घ्या. त्यामधून काडीकचरा, दगड-गोटे काढून टाका.

-गोणपाटावर मातीला गोलाकार पसरवून घ्या. बोटाने या ढिगाचे चार समान भाग करा.

-या समान चार भागांमधून समोरासमोरील दोन भाग काढून टाका.

Soil Testing
Soil Testing : या कारणांमुळे माती परिक्षण अहवाल येतो चुकीचा

-उरलेले दोन भाग पुन्हा एकत्र मिसळून पुन्हा त्याचे चार भाग करून घ्या. त्या समोरासमोरील दोन भाग काढून टाका.

-उरलेले दोन भाग पुन्हा एकत्र मिसळून घ्या. अशा प्रकारे अंदाजे अर्धा किलो माती शिल्लक राहीपर्यंत वरील क्रिया करा.

-माती ओली असल्यास ती सावलीत वाळवा.

-वाळविलेली अर्धा किलो माती म्हणजेच मातीचा प्रातिनिधिक नमुना होय. प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी तयार आहे.

-हा नमुना स्वच्छ कापडी पिशवीत भरा.

-मातीच्या नमुन्यासोबत शेतकऱ्याचे नाव, पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक, शेताचे ठिकाण, गट क्रमांक, आधीचे पीक, पुढील हंगामात घ्यावयाचे पीक - बागायती किंवा कोरडवाहू, नमुना घेतल्याची तारीख, तपासणी करावयाचे गुणधर्म इ. माहितीचे लेबल योग्य प्रकारे लावावे. मातीचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत द्या.

मातीचा नमुना घेण्याचा कालावधी आणि अहवालाची वैधता

-मातीचा नमुना शक्यतो खरीप किंवा रब्बी पिकाच्या काढणीनंतर जमीन नांगरणी करण्याआधी आणि कोरडी असताना घ्यावा. त्याचा माती परीक्षण अहवाल पुढील हंगामातील पेरणीपूर्वी उपलब्ध होणे गरजेचे आहे. कारण त्यानुसार खतांचा नियोजन करणे सोपे जाते.

-प्रयोगशाळेत नमुना दिल्यानंतर साधारणपणे अहवाल प्राप्त होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. तो गृहीत धरून मातीचा नमुना प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठवावा.

या प्रयोगशाळा जवळचे कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र येथे उपलब्ध असतील. या ठिकाणी माफक शुल्कामध्ये माती परिक्षण करून अहवाल मिळतो. काही शहरामध्ये खासगी प्रयोगशाळाही आहेत.

-परिक्षणाचा अहवाल हा तेथील शास्त्रज्ञांकडून समजून घ्यावा. विशेषतः पुढील पीकनिहाय योग्य त्या खत नियोजनाची माहिती घेण्याचा प्रयत्न करावा.

-माती परीक्षण अहवालाची वैधता साधारणत: दोन ते तीन वर्षांपर्यंत असते.

-ओलिताची सोय असलेल्या शेतात वर्षातून दोन किंवा जास्त हंगामात पिके घेतली जातात. अशा शेताचे माती परीक्षण दर दोन वर्षांनी करावे.

-वर्षातून केवळ एकच हंगामात पीक घेत असलेल्या शेतासाठी दर तीन वर्षांनी माती परीक्षण करावे.

डॉ. ज्ञानेश्‍वर कंकाळ (सहा. प्राध्यापक), ०८२७५१५२५५७ , (मृद्‍ विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com