मोगरावर्गीय फूलपिके लागवड तंत्रज्ञान

मोगरावर्गीय फूलपिके लागवड तंत्रज्ञान
मोगरावर्गीय फुलपिकांचे लागवड तंत्रज्ञान

मोगरावर्गीय फूलपिकांमध्ये मोगरा, जाई, जुई, चमेली, चंपा, सायली, कागडा, बेला, मोतीया, नेवाळी आदी दोनशे सुवासिक फूलपिकांचा समावेश होतो. भारतात सुवासिक फुले म्हणून या पिकांची लागवड प्राचीन काळापासून प्रचलित आहे. भारतात मोगरावर्गीय पिकांखाली सुमारे एक हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. भारताच्या शेजारील सिंगापूर, श्रीलंका, मलेशिया आदी देशांना आपल्याकडून फुलांची निर्यात होते. त्यातून सुमारे काही कोटी रुपयांचे परकीय चलन मिळते.   

मोगरावर्गीय पिकांचे महत्त्व : 

 • भारतात मोगरावर्गीय पीक तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांत व्यावसायिक तत्त्वावर घेतले जाते. महाराष्ट्रात या पिकाखाली सुमारे १०० हेक्‍टर क्षेत्र आहे. मोगऱ्याला सुगंधी पांढरी शुभ्र एकेरी किंवा दुहेरी पाकळ्यांची फुले लागतात. फुलांपासून हार, माळा, वेण्या, गजर तयार करतात.
 • फुलांचा उपयोग सुगंधी द्रव्ये तयार करण्यासाठीही होतो. मोगरावर्गीय फुलांना मुंबई, चेन्नई, बंगळूर, नागपूर, दिल्ली, हैदराबाद, पुणे आदी शहरांतून मागणी असते. बाजारपेठेतील वाढती मागणी शेतकऱ्यांना या पिकांच्या लागवडीसाठी उत्तेजित करीत आहे. व्यापारी दृष्टिकोनातून मोगरावर्गीय फूलपिकांमध्ये मोगरा, जाई व जुई या पिकांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
 • मोगऱ्याची शेती :  मोगरा हे फूलपीक सर्वांच्या परिचयाचे आहे. हे पीक एक मीटर उंच झुडपासारखे वाढते. मोगऱ्याला उन्हाळा व पावसाळ्यामध्ये फुलांचा बहर येतो. गुंडुमलई जातीला फेब्रुवारी-एप्रिलमध्ये फुले लागतात. तर बाकी जातींना मे-जूनमध्ये फुले लागतात. अर्का आराधना, बेला, कस्तुरीमलई अशा काही सिंगल व डबल मोगऱ्याच्या काही जाती आहेत. मोगऱ्याच्या प्रति १० टन फुलांपासून १४ ते १९ किलो सुगंधी द्रव्याचे उत्पादन मिळते.

  जाई :   ही वेलवर्गीय वनस्पती आहे. जाईची फुले शुभ्र पांढरी, चांदणीच्या आकाराची सुगंधी असतात. पश्‍चिम बंगालमध्ये या फुलांना चमेली किंवा जत्री नावाने ओळखतात. जाईच्या कळीवर लालसर रंगाची छटा दिसून येते. जुलै, ऑक्‍टोबर काळात जाईला फुलांचा बहर येतो. अर्का सुरभी, सीओ-१ व सीओ-२ या जाईच्या सुधारित जाती आहेत. जाईच्या प्रति १० टन फुलांपासून ३२ किलो सुगंधी द्रव्ये मिळतात. हेक्‍टरी १० टनांपर्यंत फुलांचे उत्पादन मिळते.

  जुई :  जुईच्या फुलांपासून गजरे, वेण्या आणि सुगंधी द्रव्ये तयार करतात. ही सदाहरित वेलवर्गीय वनस्पती आहे. जुईला खोडापासून अनेक फुटवे येतात. फुले झुपक्‍यांनी येतात. तसेच ती नाजूक पाकळ्याची पांढरी शुभ्र लहान आकाराची असतात. जून-जुलै फुलांचा हंगाम असतो. जुईची परीमुलई ही जात आहे. हेक्‍टरी ७-८ टन फुलांचे उत्पादन मिळते. प्रति १० टन फुलांपासून सुमारे २८ ते ३६ किलो सुगंधी द्रव्ये मिळते.

  लागवड व्यवस्थापन :  जमीन :  मोगरावर्गीय फूलपिके जमिनीच्या बाबतीत विशेष चोखंदळ नाहीत. ती कोणत्याही जमिनीत जोमदार वाढतात. चांगल्या व भरपूर उत्पादनासाठी या पिकांसाठी हलकी ते मध्यम पाण्याचा चांगला निचरा होण्याची आणि ६० सेंमी खोलीची जमीन निवडावी. निवडलेल्या जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा. चुनखडीयुक्त चिकणमातीची व पाणथळ जमीन या पिकासाठी अयोग्य आहे.

  हवामान :  

 • हवामानाच्या बाबतीतही विशेष चोखंदळ ही पिके नाहीत. ही पिके मुळतः अत्यंत काटक आहेत. उष्ण व समशितोष्ण हवामानात यांची चांगली वाढ होते. या पिकांना उष्ण-कोरडे हवामान, भरपूर स्वच्छ सूर्यप्रकाश व मध्यम स्वरूपाचा पाऊस चांगला मानवतो.
 • पिकाच्या जोमदार वाढीसाठी आठ तास स्वच्छ सूर्यप्रकाश, दिवसाचे २५ -३० अंश सें. तर रात्रीचे १६-२५ अंश से. दरम्यानचे तापमान आणि ५५ ते ६० टक्के सापेक्षा आर्द्रता आवश्‍यक असते. कडाक्‍याची थंडी, धुके, दव आणि जोराचा पाऊस पिकावर अनिष्ट परिणाम करतो.
 • मध्यम हिवाळा आणि सौम्य उन्हाळ्यात फुलांतील सुगंधी द्रव्यांचे प्रमाण वाढते. अधिक उत्पादनही मिळते. मात्र, फुलांच्या काळात सतत पडणारा पाऊस सुगंधी द्रव्याच्या प्रमाणावर अनिष्ट परिणाम करतो.
 • अभिवृद्धी : 

 • मोगरावर्गीय पिकाची अभिवृद्धी छाटकलमांद्वारे करतात. छाटकलमांसाठी ४ ते ५ डोळे असलेल्या १५-२० सेंमी लांबीच्या पक्व व निरोगी फांद्याची निवड करतात.
 • छाट्यांना लवकर व भरपूर मुळे फुटण्यासाठी त्यांचे बुडके शिफारस केलेल्या संजीवकात योग्य प्रमाणात बुडवून लावावेत. त्यानंतर माती मिश्रणाने भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत छाटे लावावे. अशाप्रकारे तयार केलेली छाटकलमे दोन ते अडीच महिन्यांत लागवडीस तयार होतात.
 • लागवड : 

 • मोगरावर्गीय फूलपिके बहुवर्षायू असल्याने एकदा जमिनीमध्ये लावल्यानंतर ती त्याच जमिनीत ८ ते २० वर्षे  राहातात. त्यामुळे मोगरा लागवडीचे दूरचे नियोजन भविष्यात उपयोगी पडते. त्यासाठी प्रथमतः जमीन उभी-आडवी नांगरून चांगली तापू द्यावी. त्यामुळे ती तणमुक्त होईल. जमिनीत बहुवर्षायू तणे असतील तर ती वेचून नष्ट करावीत. त्यानंतर जमीन २ ते ३ वेळा कुळवून सपाट करून घ्यावी.
 • हलक्‍या जमिनीत खड्डे काढून, तर मध्यम जमिनीत रुंद गादी वाफा तयार करून लागवड करावी. म्हणजे पुढे ठिबकने पाणी देणे सुलभ होते. लागवडीसाठी ६० बाय ६० बाय ६० सेंमी. आकाराचे खड्डे घ्यावेत. हे खड्डे मोगऱ्यासाठी एक बाय एक मीटर, तर जाईसाठी अडीच बाय अडीच मीटर व जुईसाठी दोन बाय दोन मीटर अंतरावर घ्यावेत.
 • तळाला पालापाचोळा भरून खड्डे १ः१ शेणखत व माती मिश्रणाने भरावेत. माती मिश्रण खड्ड्यात भरताना त्यामध्ये शिफारस केलेल्या कीटकनाशकाची शिफारस मात्रा मिसळावी. अशाप्रकारे भरलेल्या खड्ड्यात जोमदार वाढीचे भरपूर मुळ्या असलेले निरोगी रोप पावसाळ्यात लावावे. लागवडीनंतर रोपांना हलके पाणी द्यावे. लागवड साधारणतः जून ते सप्टेंबरदरम्यान करावी.
 • खत व्यवस्थापन :  हे पीक खतांना चांगला प्रतिसाद देते. चांगली वाढ व उत्पादनासाठी प्रतिझाडास प्रत्येक वर्षी १० ते १५ किलो शेणखत द्यावे. छाटणीनंतर संपूर्ण स्फुरद, पालाश व नत्राची अर्धा मात्रा द्यावी. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा फुले सुरू झाल्यानंतर म्हणजे कळ्या धरल्यानंतर द्यावी. दरवर्षी प्रत्येक झाडास खालीलप्रमाणे खते द्यावीत.

  खतव्यवस्थापन - प्रतिझाड / वर्ष

  फूलपीक   शेणखत (किलो)  नत्र (ग्रॅम)  स्फुरद (ग्रॅम)     पालाश (ग्रॅम)
  जाई    २०   ४०    ७५    ७५
  जुई      २०    ५०  १००  १०० 
  मोगरा     ५०   १००  १००  १००

  पाणी व्यवस्थापन : 

 • जमिनीच्या मगदूराप्रमाणे या पिकाला पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. हिवाळ्यात १० ते १२ दिवसांनी, तर उन्हाळ्यात ५-७ दिवसांनी पाणी द्यावे. छाटणीच्या आधी २०-२५ दिवस पिकाचे पाणी बंद करावे म्हणजे झाडांना पूर्ण विश्रांती मिळते. परिणामी, चांगला बहार येण्यास मदत होते.
 • उन्हाळ्यात फुलांचा बहर येतो. त्या वेळी पाण्याचा ताण पडू देऊ नये. अशा वेळी नियमित व भरपूर पाणी द्यावे. ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्यास उत्तम प्रतिचे उत्पादन मिळण्यास मदत होते.
 • छाटणी : 

 • मोगरावर्गीय पिकामध्ये फुले नेहमी नवीन फुटव्यांना लागतात. त्यामुळे उत्पादनाच्या दृष्टीने विचार केल्यास नवीन फुटव्यांचे प्रमाण जास्त असल्यास जास्त फुले मिळतात. नवीन फुट येण्यासाठी झाडांची दरवर्षी छाटणी करणे आवश्‍यक असते. छाटणीपूर्वी २०-२५ दिवस पिकाचे पाणी बंद करावे.
 • झाडांची पाने मलूल होऊन गळू लागली की झाडाची विश्रांती अवस्था पूर्ण होते. झाडे विश्रांती अवस्थेत असताना छाटणी करावी. नवीन फूट येण्यासाठी झाडावरील जुन्या, रोगट, किडक्‍या, दाटीवाटीने वाढलेल्या आणि कमकुवत फांद्याची छाटणी करावी. छाटणी डिसेंबर-जानेवारी महिन्यात करावी.
 • छाटणीनंतर ताबडतोब झाडावर कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड दोन ग्रॅम प्रतिलिटर प्रमाणात फवारावे. झाडाची आळी साफ करून जमिनीची मशागत करून आळ्यांची बांधणी करावी. खताची मात्रा देऊन झाडांना भरपूर पाणी द्यावे.
 • फुलांची काढणी व पॅकिंग : 

 • जून महिन्यात लागवड केलेल्या रोपांना त्याच वर्षी उन्हाळ्यात फुले येण्यास सुरवात होते. परंतु चांगल्या भरपूर उत्पादनास दुसऱ्या वर्षापासून सुरवात होते. मोगऱ्याचा फेब्रुवारी-मार्च, जाईचा जुलै-ऑगस्ट, तर जुईचा जून-जुलै हा फुलांचा हंगाम असतो.
 • फुले कोणत्या कारणांसाठी वापरावयाची आहेत तो उद्देश डोळ्यांपुढे ठेवून फुलांच्या काढणीची अवस्था व वेळ ठरवावी लागते. गजरा-वेणीसाठी फुले एक दिवस आधी कळी अवस्थेत काढावीत. तर सुगंधी द्रव्ये, पूजा, हारांसाठी फुलांची काढणी पूर्ण उमलल्यानंतर करावी. कळ्यांची काढणी सूर्योदयापूर्वी करावी. तर सुगंधी द्रव्यांच्या कारणासाठी फुले सकाळी नऊ वाजेपर्यंत काढावीत.
 • काढणी केल्यानंतर आकारानुसार व जातींनुसार त्यांची प्रतवारी करावी. काढलेली फुले लांबच्या बाजारपेठेत कोरुगेटेड बॉक्‍समध्ये पॅक करून पाठवावीत. जवळच्या बाजारपेठेसाठी बांबूच्या टोपल्या वा करंड्यांमध्ये पॅक करून पाठवावीत. बांबूच्या टोपल्यांमध्ये फुले पॅक करताना टोपल्यांच्या तळाशी व फुलांवर कर्दळ अथवा केळीची पानांचा वापर करावा.
 • फुले लवकरात लवकर बाजारात पाठवावीत. काढणी केल्यानंतर फुले जास्त काळ टिकावीत म्हणून त्यावर पाणी मारू नये. पाणी फवारलेली फुले वाहतुकीत खराब होतात.
 • फुलांचे उत्पादन : 

 • मोगरावर्गीय फूलझाडांपासून लागवडीच्या दुसऱ्या वर्षांपासून पुढे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर उत्पादन सुरू होते. हे उत्पादन पुढे आठ वर्षे चालू राहते. मोगऱ्याचे सरासरी तीन वर्षांनंतर १० ते १२ टन प्रतिहेक्‍टरी, जाईचे चौथ्या वर्षापासून ९ ते १० टन प्रतिहेक्‍टरी तर जुईचे ७ ते ८ टन प्रतिहेक्‍टरी उत्पादन मिळते.
 • फुलांची काढणी केल्यापासून विक्री होईपर्यंत फुलांच्या वजनात घट होत राहते. ती कमी करण्यासाठी फुले कळीवर असताना जीए या संजीवकाच्या २५ पीपीएम तीव्रतेच्या द्रावणाच्या दोन फवारण्या कराव्यात. संजीवकाच्या फवारणीमुळे वजनातील घट कमी होतेच शिवाय सुगंध टिकून राहतो.
 • पीक संरक्षण :  रोग :   मोगरावर्गीय फूलपिकांवर भुरी व करपा रोग आढळून येतो. नियंत्रणासाठी पेनकोनॅझोल ०.०५ टक्के किंवा डायफेनोकोनॅझोल ०.०५ टक्के किंवा डिनोकॅप ०.०५ टक्के अथवा मॅंकोझेब ०.२ टक्के प्रमाणात यापैकी बुरशीनाशकांची गरजेनुसार ८-१० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.  किडी :   मोगरावर्गीय पिकास सहसा किडींचा प्रादुर्भाव होत नाही. काही वेळेस पाने खाणारी व कळी पोखरणारी अळी, मावा या किडी आढळून येतात. डायमिथोएट ०.२ टक्के या प्रमाणात फवारल्यास नियंत्रण होते. गरजेनुसार ठराविक दिवसांच्या अंतराने शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा शिफारस केलेल्या डोसनुसार वापर करावा. कोळी किडीचा प्रादुर्भाव झाल्यास केलथेन ०.४ टक्के किंवा पाण्यात विरघळणाऱ्या गंधकाची शिफारसीत डोसप्रमाणे फवारणी करावी. संपर्क : डॉ. सतीश जाधव , बळवंत पवार, ०२०- २५६९३७५० (लेखक अखिल भारतीय समन्वयीत पुष्पसुधार प्रकल्प, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे येथे कार्यरत आहेत.)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.