जागतिक बाजारात गुलाब फुलांना वर्षभर मागणी असते. देशांतर्गत तसेच देशाबाहेरील बाजारात दर्जेदार गुलाब फुलांना मागणी वाढत आहे. त्यासाठी हरितगृहातील गुलाब फुलशेती फायदेशीर ठरणार आहे. हरितगृहातील गुलाबशेतीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा. व्हॅलेंटाइन डे, ख्रिसमस आदी सण तसेच लग्नसमारंभ यांचा विचार करून सप्टेंबर ते फेब्रुवारीदरम्यान बाजारात फुले विक्रीस येतील यादृष्टीने गुलाबाची लागवड करावी. कमीत कमी १० ते २० गुंठे क्षेत्रावरील लागवड फायदेशीर ठरते.
लागवड तंत्रज्ञान हवामान : फुलांचा रंग, पाकळ्याची संख्या, फुलदांड्याची लांबी याबाबी तापमानावर अवलंबून असतात. योग्य वाढीसाठी कमाल तापमान २० ते २५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअस इतके असावे. सापेक्ष आर्द्रता ६० ते ७० टक्के असावी. कमी आर्द्रतेमुळे लाल कोळी किडीचा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. जास्त आर्द्रता व कमी तापमानात बोट्रायटीस व डाउनी मिल्ड्यू या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. प्रकाशमान ४००० ते ६००० लक्सदरम्यान असावे. कर्बवायूची पातळी १००० ते ३००० पीपीएम असावी.
लागवडीची वेळ : निर्यातीसाठी गुलाबाची उपलब्धता सप्टेंबरपासून असावी लागते यासाठी मे-जून महिन्यामध्ये लागवड करावी. जमीन व्यवस्थापन :
पाणी व्यवस्थापन : पाण्याचा सामू ६.५ ते ७ दरम्यान असावा. तो जास्त असल्यास योग्य प्रमाणात नायट्रिक अॅसिडचा वापर करावा. पाणी ६०० ते ७५० मि.लि./ चौ.मी./ दिवस या प्रमाणात द्यावे.
आंतरमशागत : फांद्या वाकविणे (बेंडिंग) : फांद्या जमिनीलगत ४५ अंश कोनात वाकविणे आवश्यक असते. पानातील अन्नद्रव्ये जोमाने वाढणाऱ्या फांद्यांकडे पाठविणे हा त्यामागील उद्देश असतो. कळ्या खुडणे (डिंसबडिंग) : पानांच्या बेचक्यातून वाढणाऱ्या कळ्या खुडल्यामुळे फुलदांड्याची व फुलांची गुणवत्ता सुधारते. शेंडा खुडणे (टॉपिंग) : फांद्या सरळ व जोमाने वाढविणे हा उद्देश ठेवून फांदीवरील मुख्य कळी शेंड्यासह काढणे याला टॉपिंग म्हणतात. उन्हाळ्यात कमकुवत फांद्याचे टॉपिंग करावे.
जाती अ) परदेशी बाजारपेठेसाठी : हायब्रीड टी प्रकार - फर्स्ट रेड, पॅशन, अप्पर क्लास, बोर्डो (लाल), टॉपलोस, नोबलेस, व्हिवाल्डी (गुलाबी) पॅरिओ, पाॅइझन, टेक्सास, गोल्ड, स्ट्राइक (पिवळा) टिनीके ऍव्हेलांची, स्कायलाइन (फिकट हिरवा - पिवळा) फ्लोरिबंडा प्रकार - गोल्डन गेट (पिवळा), एस्किमो (पांढरा). ब) देशांतर्गत बाजारपेठेसाठी : डबल डिलाइट, सुपर स्टार, फेअरी पोर्च, ओक्लाहोमा, लॅडोरा. खत व्यवस्थापन
महिना | नत्र (मिलिग्रॅम प्रतिझाड प्रतिआठवडा) | स्फुरद (मिलिग्रॅम प्रतिझाड प्रतिआठवडा) | पालाश (मिलिग्रॅम प्रतिझाड प्रतिआठवडा) |
पहिला | १०० | १०० | १०० |
दुसरा | २०० | २०० | २०० |
तिसरा | ३०० | २०० | २०० |
चौथा | ४०० | ३०० | ३०० |
संपर्क : डॉ. राजेंद्र हासुरे, ९४२१९८३४०३ (आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.