निशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन आवश्‍यक

निशिगंध लागवड शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरते.
निशिगंध लागवड शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरते.

निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही कमी असतो. त्यामुळे हे पीक शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र निशिगंधाच्या भरपूर व उत्तम प्रतीच्या उत्पादनासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्‍यक आहे. मे महिन्यात, उत्तम निचरा असलेल्या जमिनीत या पिकाची लागवड केल्यास दर्जेदारव भरपूर फुलोत्पादनाची खात्री देता येते. निशिगंध हे कंदवर्गीय फुलपीक असून, या झाडाला शुभ्र पांढरी फुले लागतात. फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात. प्रामुख्याने फुलांचा हार, गजरे, माळा, वेण्या तयार करण्यासाठी उपयोग होतो. तसेच फुलदांड्यांचा फुलदाणी आणि पुष्प सजावटीसाठी उपयोग केला जातो. जमीन निशिगंध पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. मात्र उत्तम निचऱ्याची, हलकी ते मध्यम जमीन चांगली मानवते. जमिनीचा सामू ५ ते ७.५ दरम्यान असावा. जमीन हलकी असेल तर लागवडीपूर्वी जमिनीत भरपूर सेंद्रिय पदार्थ टाकावेत. अतिशय हलक्‍या जमिनीमध्ये लागवड केल्यास पिकाची वाढ व उत्पादनावर परिणाम होतो. हवामान   निशिगंध पिकाला उष्ण व समशितोष्ण हवामान चांगले मानवते. अतिथंड, उष्ण व पाऊसमानाचे हवामान या पिकास हानीकारक ठरते. बारमाही पाण्याची सोय असल्यास कोरड्या हवामानातही हे पीक चांगले येते. निशिगंधाच्या चांगल्या वाढीसाठी २० ते २५ अंश सेल्सिअस तापमान आवश्‍यक असते. तसेच वार्षिक पाऊसमान ५००-७०० मि.लि. असावे. पूर्वमशागत निशिगंधाच्या कंदाची जमिनीत वाढ होते. त्यामुळे जमिनीची मशागत चांगल्या पद्धतीने करावी लागते. उन्हाळ्यात नांगरट करून जमीन किमान एक महिना उन्हात चांगली तापू द्यावी. नंतर जमीन उभी-आडवी कुळवून माती भुसभुशीत करावी. दुसऱ्या कुळवणीपूर्वी हेक्‍टरी ३० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्टखत मातीत मिसळावे. बीजप्रक्रिया निवडलेले कंद लागवडीपूर्वी शिफारशीत बुरशीनाशकाच्या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवून लावावेत.

प्रकार व जाती निशिगंधाची सुट्या फुलांसाठी अथवा दांड्यासाठी लागवड केली जाते. फुलांतील पाकळ्यांच्या वलयांच्या संख्यानुसार व पानांच्या रंगानुसार सिंगल, डबल, सेमी डबल व व्हेरिगेटेड असे चार प्रकार पडतात. सिंगल : सिंगल प्रकारच्या निशिगंधाची फुले अतिशय सुवासिक असतात. त्यांचा उपयोग सुवासिक द्रव्यांसाठी तसेच हार, माळा, गजरे तयार करण्यासाठी केला जातो. याच्या फुले रजनी, अर्का श्रंगार, अर्का प्रज्वल, अर्का निरंतरा व स्थानिक सिंगल सुधारित जाती आहेत. डबल : डबल प्रकारचा निशिगंध प्रामुख्याने फुलदांड्यासाठी वापरतात. तुलनात्मकदृष्ट्या डबल प्रकार हा सिंगल निशिगंधापेक्षा कमी सुवासिक असतो. डबल प्रकारातील फुलामध्ये ३ पेक्षा जास्त पाकळ्यांची वलये असतात. याच्या सुवासिनी, स्थानिक डबल या जाती आहेत. सेमीडबल : या प्रकारात ३ पेक्षा कमी व एकपेक्षा जास्त पाकळ्यांची वलये फुलामध्ये असतात. फुलदांड्यांसाठी या जातीचा वापर होतो. या प्रकारात अर्का वैभव ही सुधारित जात आहे.   व्हेरिगेटेड : या प्रकारात निशिगंधाची पाने रंगीत असतात. पानावर पिवळ्या रंगाचा चट्टा मध्य शिरेलगत असतो. या प्रकाराचा उपयोग बागेमध्ये सजावटीसाठी किंवा कुंडीत लागवडीसाठी करतात.

लागवड पद्धत लागवड सपाट वाफे किंवा सरीवरंबा किंवा गादी वाफ्यावर करतात. पाणी देण्याच्या पद्धतीनुसार वाफ्यांची निर्मिती करावी. पाट पाण्याची सोय असल्यास सपाट व सरी वरंबा पद्धतीने लागवड करावी. ठिबक किंवा सूक्ष्म तुषार पद्धतीने सिंचन करणार असल्यास गादीवाफे तयार करावेत. लागवड ३० x २० सें.मी. अंतरावर करावी. लागवडीसाठी निरोगी व आकाराने मोठ्या कंदाची निवड करावी. लागवडीसाठी २.५ ते ३ सें.मी. व्यासाच्या कंदाची निवड करावी. साधारणतः २० - ३० ग्रॅम वजनाचे कंद लागवडीसाठी वापरावेत. जमिनीत ५-७ सें.मी. खोल कंदाची लागवड करावी. कंद लागवडीनंतर ताबडतोब पाणी द्यावे. पाणी व्यवस्थापन निशिगंधाची लागवड उन्हाळ्यामध्ये होत असल्याने पिकाच्या वाढीच्या सुरवातीच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये. लागवडीनंतर ताबडतोब पाणी द्यावे. उन्हाळी हंगामात पाच ते सात दिवसांच्या अंतराने तर हिवाळ्यात आठ ते दहा दिवसांनी पाणी द्यावे. पाण्याच्या पाळ्या जमिनीच्या मगदुरानुसार कमी अधिक दिवसांनी द्याव्यात. पावसाळ्यात आवश्‍यकतेनुसार पाणी द्यावे. निशिगंधाला फुलदांडे पडावयास सुरवात झाल्यानंतर पाण्याचा ताण पडू देऊ नये. उत्पादन काळात पिकास पाण्याचा ताण पडल्यास त्याचा विपरीत परिणाम उत्पादन व प्रतीवर होतो. पावसाळ्यात जादा पावसाचे पाणी पिकात साठू देऊ नये. साठणाऱ्या पाण्याचा ताबडतोब निचरा होईल, अशी सोय करावी. खत व्यवस्थापन निशिगंध हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे खताला उत्तम प्रतिसाद देते. पिकाची चांगली वाढ व उत्पादनासाठी हेक्‍टरी ३० टन शेणखत किंवा कंपोस्ट खत लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करताना शेतात मिसळावे. रासायनिक खतमात्रा देताना हेक्टरी २०० किलो नत्र, १५० किलो स्फुरद व २०० किलो पालाश अशी खत मात्रा द्यावी. लागवडीवेळी ५० किलो नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश ही खतमात्रा द्यावी. नत्राची उर्वरित मात्रा लागवडीनंतर ३०, ६० व ९० दिवसांनी तीन समान हफ्त्यांत विभागून द्यावी. याशिवाय लागवडीनंतर ८-१० दिवसांनी अॅझोटोबॅक्‍टर १० किलो किंवा स्फुरद विरघळविणारे जीवाणू खत १० किलो अधिक ट्रायकोडर्मा १० किलो प्रति १०० किलो ओलसर शेणखतात मिसळून द्यावे. फुलांची काढणी

  • लागवडीपासून तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत फुले काढणीस तयार होतात. निशिगंध फुलांची विक्री प्रामुख्याने सुटी फुले, फुलदांडे व सुगंधी द्रव्ये या उद्देशाने केली जाते. सुट्या फुलांसाठी पूर्ण वाढलेल्या कळ्या किंवा उमललेल्या फुलांची काढणी करावी.
  • दांड्यांसाठी काढणी करताना फुलदांड्यावरील तळाच्या दोन फुलांच्या जुड्यातील फुले उमलल्यानंतर काढणी करावी. असे दांडे जमिनीलगत पानांच्यावर धारदार चाकूच्या साह्याने कापावेत.
  • सुगंधी द्रव्यासाठी पूर्ण उमललेल्या फुलांची काढणी करतात. फुलांची व दांड्यांची काढणी सकाळी ६-८ किंवा सायंकाळी ६-७ च्या दरम्यान करावी. फार उशिरा किंवा कडक उन्हामध्ये फुलांची काढणी केल्यास त्याचा प्रतीवर व साठवणुकीवर विपरित परिणाम होतो.
  • भारतीय बाजारात सुट्या फुलांना खूप मागणी असते, अशी फुले ५-७ किलो क्षमतेच्या कागदाच्या अथवा बांबूच्या खोक्‍यात भरून विक्रीसाठी पाठवतात. फुलदांड्याच्या १२, २०, ४० दांड्याच्या जुड्या बांधून वर्तमानपत्राच्या कागदामध्ये गुंडाळून किंवा पुठ्ठ्याच्या खोक्‍यात भरून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवतात.
  • पीक संरक्षण निशिगंध हे फुलपीक किडी व रोगांसाठी फार संवेदनशील नाही. मात्र पावसाळ्यात जास्त पाऊस पडल्यास कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून त्याची झाडाच्या बुंध्याशी आळवणी करावी. तसेच याच द्रावणाची पिकावर फवारणी करावी.

    संपर्क :  डॉ. सतीश जाधव, ९४०४६८३७०९ (अखिल भारतीय समन्वयक पुष्प संशोधन प्रकल्प,राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प,गणेशखिंड पुणे.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com