तंत्र पूर्वहंगामी ऊस लागवडीचे...

तंत्र पूर्वहंगामी ऊस लागवडीचे...
तंत्र पूर्वहंगामी ऊस लागवडीचे...

लागवड ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी बेणे मळ्यातील बेणे वापरावे. दर तीन ते चार वर्षांनी बेणे बदलावे. बटाटा, कांदा, लसूण, कोबी, प्लॉवर, वाटाणा, टोमॅटो, हरभरा इ. आंतरपिके घेता येतात. उसासाठी मध्यम ते भारी मगदुराची व उत्तम निचऱ्याची जमीन असावी. जमिनीची खोली ६० ते १२० सें.मी. असावी. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण किमान ०.५ टक्‍के असावे. भारी जमिनीतील १ ते २ फूट खोल जमिनीचा कठीण थर फोडण्यासाठी दर तीन वर्षांतून एकदा सबसॉयलरचा वापर करावा. जमीन सपाट केल्यानंतर रिजरच्या सहाय्याने भारी जमिनीत १२० ते १५० सें.मी. व मध्यम जमिनीत १०० ते १२० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. पट्‌टा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी २.५ फूट व भारी जमिनीसाठी ३ फुटांच्या सलग सऱ्या पाडाव्यात. दोन सऱ्यांमध्ये ऊस लागवड करून एक सरी रिकामी सोडून पुन्हा दोन ओळी ऊस लागवड अशा पद्धतीने जोड ओळ उसाची लागवड करावी. रिकाम्या ओळीत आंतरपिकांची लागावड करावी. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. यांत्रिक पद्धतीने मशागत करण्यासाठी दोन सरीतील अंतर १५० सें.मी. (पाच फुटांपर्यंत) ठेवावे. आंतरमशागतीसाठी लहान ट्रॅक्‍टरचा वापर करावा. सुधारित जाती ः - फुले २६५, को ८६०३२ या मध्यम पक्वता आणि फुले १०००१, को ९४०१२, को सी. ६७१ , व्हीएसआय १२१२१ आणि कोल्हापूर विभागासाठी को ९२००५. - ९ ते १० महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि आनुुवंशिकदृष्ट्या शुध्द बेणे वापरावे. लागवड तंत्र ः १) लागवड ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी बेणे मळ्यातील बेणे वापरावे. दर तीन ते चार वर्षांनी बेणे बदलावे. २) लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी. एक डोळा पध्दतीने लागवड करावयाची असल्यास दोन डोळ्यातील अंतर ३० सें.मी. ठेवावे. शक्‍यतो कोरड्या पध्दतीने लागवड करावी. डोळा वरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी द्यावे. ३) दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपरीमधील अंतर १५ ते २० सें. मी. ठेवून डोळे दोन्ही बाजूस येतील हे पाहून लागवड करावी. यासाठी मध्यम जमिनीत ओल्या पध्दतीने लागवड केली तरी चालेल, मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. लागवडीसाठी हेक्‍टरी दोन डोळयांची २५,००० टिपरी लागतील. ४) एक डोळा पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करावयाची असल्यास सरीतील अंतर ४ फूट ठेवावे. दोन रोपातील अंतर मध्यम जमिनीत १.५ फूट व भारी जमिनीत २ फूट ठेवावे. या पद्धतीने हेक्‍टरी १३,५०० ते १४,००० रोपे लागतील.

लागवडीच्या पद्धती : अ) लांब सरी पद्धत ः १) जमिनीच्या उतारानुसार सरीची लांबी ठेवावी. जमिनीच्या प्रकारानुसार सरीमधील अंतर ठेवावे. जमिनीच्या उतारानुसार ४० ते ६० मीटरपर्यंत सरीची लांबी ठेवावी. पाणी देताना २ ते ३ सऱ्यांना एकत्र पाणी दयावे. जमिनीचा उतार ०.३ ते ०.४ टक्‍के पर्यंत असेल तर उताराच्या दिशेने सरी काढावी व उतार ०.४ टक्‍के पेक्षा जास्त असल्यास उताराला आडव्या सऱ्या पाडून ऊस लागवड करावी. सलग पद्धतीमध्येसुद्धा ठिबक सिंचनाचा वापर करावा. टंचाईच्या काळात सरी आड सरी पाणी देणे या पद्धतीत फायदेशीर ठरते. २) या पध्दतीमध्ये आवश्‍यक तेवढेच पाणी देता येते. पिकाची वाढ जोमदार होते. लांब सरी मुळे जास्तीत जास्त क्षेत्राचा वापर होतो. उत्पादनात वाढ होते. आंतरमशागत सुलभतेने करता येते. पट्टापद्धत ः (२.५ बाय ५ फूट किंवा ३ बाय ६ फूट ) १) जमिनीच्या प्रकारानुसार पट्टा पद्धतीने लागवड करावी. मध्यम जमिनीत २.५ फूट व तीन भारी जमिनीत फूट अंतरावर अंतरावर रिझरच्या सहाय्याने सलग सऱ्या पाडून दोन सऱ्यांमध्ये लागवड करून तिसरी सरी मोकळी सोडावी. म्हणजे दोन जोड ओळीत ५ फूट किंवा ६ फूट पट्टा रिकामा राहील. २) ठिबक सिंचनासाठी आणि अधिक उत्पादनासाठी ही पध्दत फायदेशीर आहे. या पध्दतीत भरपूर सूर्यप्रकाश व हवा मिळाल्यामुळे उसाची वाढ जोमदार होते. ३) यांत्रिकीकरणासाठी ही पध्दत योग्य आहे. यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडणी करता येते. पट्ट्यामुळे पीक संरक्षण चांगल्या पध्दतीने करता येते. ऊस बांधणी नंतर दोन ओळी मध्ये एक सरी तयार होते. त्या एका सरीला पाणी देऊन उसाच्या दोन्ही ओळी भिजविता येतात. त्यामुळे पाण्याची ४५ टक्‍के बचत होते. बेणे प्रक्रिया १) हिवाळी हंगाम असल्याने बेणे उगवण्यावर परिणाम होतो. उगवणक्षमता वाढविण्यासाठी बेणे १०० पीपीएम -----इथ्रेल (२५ मि.लि. + १०० लिटर पाणी) द्रावणात रात्रभर भिजू द्यावे. २) काणी रोग, कांडीवरील खवले कीड, पिठया ढेकूण नियंत्रण ः १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि मॅलॅथिऑन किंवा डायमिथोएट ३०० मि.लि. प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून बेणे १० मिनिटे बुडवावे. ३) या प्रक्रियेनंतर ॲसिटोबॅक्‍टर १० किलो व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक १.२५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी ३० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. जीवाणू संवर्धकाच्या प्रक्रियेमुळे ५० टक्‍के नत्र व २५ टक्के स्फुरद खतांची बचत आणि उत्पादनात वाढ होते.

संपर्क ः ०२१६९- २६५३३४ (मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com