ग्लॅडिओलस लागवड

ग्लॅडिओलस
ग्लॅडिओलस

ग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. पोयट्याची आणि चांगला निचरा असणारी जमीन फुलांचे लांब दांडे आणि कंदवाढीस उपयुक्त असते.चुनखडी, तसेच हलक्‍या बरड जमिनीत याची लागवड करू नये / टाळावी. या पिकाची लागवड खरीप तसेच रब्बी हंगामात केली जाते. सर्व लागवड एकाच वेळी न करता १५ दिवस किंवा एक महिना, असे अंतर ठेवून लागवड केल्यास फुलांची नासाडी कमी होते. लागवडीसाठी गेल्या हंगामातील, तीन ते चार महिने विश्रांती घेतलेले चांगले कंद निवडावेत. लागवडीपूर्वी कंद शिफारशीत बुरशीनाशकाच्या द्रावणात २० मिनिटे बुडवून नंतर सुकवून लागणीस वापरावेत. लागवड सरी वरंब्यावर ४५ x १५ सें.मी. अंतराने करावी. सपाट वाफ्यात लागवड करताना ३० सें.मी. x २० सें.मी. अंतराने, पाच ते सात सें.मी. खोलीवर कंदांची लागण करावी. साधारणपणे हेक्‍टरी १.२५ ते १.५० लाख कंद लागवडीसाठी लागतात.

जातींची निवड ः लागवडीसाठी पिवळसर रंगाची फुले 'गणेश', फिकट गुलाबी रंगाची फुले 'प्रेरणा', जांभळट गुलाबी रंगाची फुले 'तेजस' आणि निळ्या रंगाची फुले 'नीलरेखा' या जाती निवडाव्यात. त्याचबरोबरीने फिकट गुलाबी रंगाची 'सुचित्रा', लाल रंगाची 'पुसा सुहागन', निळ्या रंगाची 'ट्रॉपिक सी', पिवळसर रंगाची 'सपना', पांढऱ्या रंगाची 'संसरे', केशरी रंगाची 'हंटिंग साॅँग' या जातीही बाजारपेठेच्यादृष्टीने फायदेशीर आहेत.

या पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी हेक्‍टरी ५० ते ७० टन शेणखत जमिनीची मशागत करताना मिसळावे. माती परीक्षणानुसारच लागणीच्या वेळी २०० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश प्रतिहेक्‍टरी द्यावे. प्रतिहेक्‍टरी नत्र खताची ३०० किलो मात्रा तीन समान हप्त्यांमध्ये द्यावी. नत्राची मात्रा पिकाला दोन, चार आणि सहा पाने आल्यावर, म्हणजेच लागवडीनंतर तीन, पाच आणि सात आठवड्यांनी सम प्रमाणात विभागून द्यावी. रासायनिक खते दिल्यावर पाण्याची पाळी द्यावी. लागवडीनंतर दहा दिवसांनी दहा किलो ऍझोटोबॅक्‍टर किंवा ऍझोस्पिरीलम १०० किलो ओलसर शेणखतात मिसळावे. या मिश्रणाचा ढीग करून तो प्लॅस्टिकच्या कागदाने आठवडाभर झाकून ठेवावा. अशाच प्रकारे दहा किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणूसंवर्धक आणि दहा किलो ट्रायकोडर्मा प्रत्येकी १०० किलो शेणखतात मिसळून वेगवेगळे ढीग करून आठवडाभर झाकून ठेवावेत. एक आठवड्यानंतर तिन्ही ढीग एकत्र मिसळून एक हेक्‍टर क्षेत्रातील पिकाला द्यावे. पिकाच्या मुळांची वाढ जमिनीच्या वरच्या थरातच होते, त्यामुळे पाणी नियमित आणि गरजेपुरतेच पाच ते आठ दिवसांच्या अंतराने द्यावे. गरजेनुसार खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे. पिकाच्या बुंध्यास मातीची भर देऊन दांडे खाली पडून ते खराब होणार नाहीत याची काळजी घ्यावी. लागवडीनंतर जातीनुसार आणि कंदाला दिलेल्या विश्रांती काळानुसार ६० ते ९० दिवसांत फुले काढणीस येतात. फुलदांड्यावरील पहिले फूल कळीच्या अवस्थेत असताना रंग दाखवून उमलू लागले म्हणजे झाडाच्या खालची चार पाने शाबूत ठेवून फुलांचे दांडे छाटून घ्यावेत. फुलदांड्याच्या लांबीप्रमाणे प्रतवारी करावी. - ०२० - २५६९३७५० राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेश खिंड, पुणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com