योग्य पद्धतीने करा कूपनलिका पुनर्भरण

दोन/चार चेंबरच्या फिल्टरचा वापर करून कूपनलिकेचे पुनर्भरण
दोन/चार चेंबरच्या फिल्टरचा वापर करून कूपनलिकेचे पुनर्भरण

मागच्या भागात आपण विहीर आणि कूपनलिका यांमधील फरक पाहिला. त्यात असे लक्षात येते की कूपनलिका ही कधीही कोरडी पडू शकते आणि म्हणून तिचं पुनर्भरण करणं अनिवार्य आहे. सध्याही अनेक ठिकाणी कूपनलिकेचे पुनर्भरण विविध मार्गांनी केले जात आहे. आपण याची माहिती घेऊया म्हणजे प्रत्येक उपाययोजनेतून नक्की काय साध्य होते ते लक्षात येईल.

पद्धत १  ः  कूपनलिकेभोवती खड्डा करून त्यात पाणी वळविणे

जिथे कूपनलिका असेल त्या ठिकाणी कूपनलिकेच्या सभोवताली एक चौकोनी किंवा गोल खड्डा (५ x ५ फूट, १०-१५ फूट खोल) केला जातो. त्यामध्ये खडी आणि रेती टाकून तो खड्डा साधारण पाऊण भाग भरून त्या खड्ड्यात घराच्या छपराचे आणि इतर परिसरातील पावसाचे पाणी सोडले जाते. हे पावसाचे पाणी खड्ड्याच्या माध्यमातून जमिनीत मुरेल आणि कूपनलिकेला त्याचा फायदा होईल अशी समजूत करून घेतली जाते.

नेमके काय होते

  • कूपनलिका करताना जोपर्यंत माती, मुरूम असतो, तोपर्यंत केसिंग पाइप टाकतात, ज्यायोगे कूपनलिका ढासळत नाही. खाली पक्का दगड (काळा कातळ) लागला की मग तो खोदून त्याच्या खालचा पाण्याचा साठा शोधला जातो.
  • जेव्हा पाऊस पडतो आणि पाणी नैसर्गिकपणे किंवा योजनेमार्फत जमिनीत मुरवले जाते, तेव्हा ते मातीतून खाली जात जात शेवटी खालच्या कातळापर्यंत पाेचते. कातळाच्या वरच्या भागात जेव्हा पाणी मुरवले जाते तेव्हा कूपनलिकेच्या केसिंग पाइपमुळे ते पाणी कूपनलिकेमध्ये जाऊ शकत नाही. तो खड्डा पावसात  भरतो आणि  ते पाणी उताराच्या दिशेने वाहून जाते. आपला समज होतो की आपण पुनर्भरण करतोय पण प्रत्यक्षात पाणी उताराच्या दिशेने जमिनीखालून वाहून गेलेले असते.
  • पद्धत २ ः कूपनलिकेच्या केसिंग पाइपला छिद्रे पाडून पुनर्भरण

    कूपनलिकेच्या सभोवताली एक चौकोनी किंवा गोल खड्डा केला जातो. (५ x ५ फूट, १०-१५ फूट खोल) आणि नीट बांधकाम करून आतून प्लास्टर आणि घोटाई केली जाते. खड्ड्यामध्ये असलेल्या कूपनलिकेच्या केसिंग पाइपला अनेक छिद्रं पाडली जातात. त्या पाइपभोवती एक नायलॉनचा दोरा गुंडाळला जातो. हे झाल्यावर खड्ड्यामध्ये खडी आणि रेती टाकून त्या खड्ड्यात घराच्या छपराचे आणि इतर परिसरातील पावसाचे पाणी सोडले जाते.

    नेमके काय होते

  •  जेव्हा पाऊस पडतो आणि पाणी नैसर्गिकपणे किंवा योजनेमार्फत या खड्ड्यात मुरवले जाते, तेव्हा ते आपण टाकलेल्या रेती, खडी, दगड यांच्या थरांतून खाली जाते आणि खड्ड्याच्या तळाशी थांबते. त्या खड्ड्यात साठलेले पाणी मग त्या विविध थरांमधून गळून केसिंग पाइपपर्यंत पोचते आणि मग सच्छिद्र पाइपभोवती गुंडाळलेल्या नायलॉनच्या दोरातून गळून जाऊन छिद्रांमधून पाइपमध्ये जाते आणि तिथून ते थेट त्या कूपनलिकेच्या जलसाठ्यापर्यंत पोचते आणि भूगर्भातील तो साठा परत वाढवायला मदत करतं. फक्त, हे करताना, पाइप भोवती गुंडाळलेला नायलॉनचा दोरा किती नीट गुंडाळला आहे आणि येणाऱ्या पाण्यामध्ये माती किती आहे याचा पुरेसा विचार केला नसेल तर पाइपची छिद्रं बुजून पाणी केसिंग पाइपमध्ये जाण्याचा मार्ग बंद होऊ शकतो. त्यामुळे पुनर्भरण करण्यात अपयश येऊ शकतं. त्याचप्रमाणे, पावसाचं प्रमाण जास्त असेल आणि खड्डा पुरेसा बांधला नसेल तर पाणी बाहेर वाहून जाऊ शकतं. त्यामुळे हा उपाय करताना योग्य काळजी घेतली नाही तर याचा मर्यादित उपयोग होतो. हा सध्या सर्वाधिक वापरला जाणारा उपाय आहे.
  • पद्धत ३  :  दोन/चार चेंबरच्या फिल्टरचा वापर करून कूपनलिकेचे पुनर्भरण

  • या पद्धतीमध्ये इमारतींच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी खाली येणारे पाइप जोडून किंवा वर पत्रा घातला असेल तर पन्हाळी लावून एकत्र करून, वळवून कूपनलिकेजवळ आणले जाते. तिथे योग्य जागा बघून जमिनीमध्ये एक, दोन किंवा चार चेंबर असलेला फिल्टर बांधला जातो.
  • फिल्टरची आतली बाजू प्लास्टर केली जाते आणि त्या भिंतींना आतून घोटाई करून पाणी बाहेर जाणार नाही याची खबरदारी घेतली जाते. पहिल्या चेंबरमध्ये फिल्टर मीडियम तीन थरांमध्ये पसरले जाते. दुसऱ्या चेंबरमध्ये पाणी साठून त्यातील शिल्लक गाळ खाली बसेल याची काळजी घेतली जाते. जर परिसरात माती खूप जास्त प्रमाणात पाण्यात मिसळत असेल तर असेच आणखी दोन चेंबर बांधून हीच प्रक्रिया परत केली जाते.
  • यानंतर शेवटच्या चेंबरमधून पाइप कूपनलिकेच्या केसिंग पाइपला जोडला जातो. फिल्टरमधून गाळून पुढे गेलेले पाणी या पाइपमधून थेट कूपनलिकेच्या भूगर्भातील जलसाठ्यामध्ये जाते आणि तो साठा वाढविण्यासाठी मदत करते. या पद्धतीने पुनर्भरण केले तर आपण नक्की किती पाणी त्या कूपनलिकेमध्ये परत टाकतोय हे खात्रीपूर्वक सांगू शकतो. या पद्धतीने पुनर्भरण केले तर आपण उपलब्ध पाण्याच्या जवळजवळ ८०-९० टक्‍क्यांपर्यंत पाणी कूपनलिकेच्या साठ्यात सोडू शकतो. फक्त ही योजना राबविताना प्रत्यक्ष त्या कामाचा अनुभव असलेल्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा अन्यथा कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.
  • कूपनलिका पुनर्भरणाचे फायदे

  • आपण बहुतेक वेळा कूपनलिकेतून पाणी काढण्याचं काम करत असतो. नैसर्गिकरीत्या फारच कमी पाणी या कूपनलिकेच्या भूगर्भातील साठ्यापर्यंत पोचते. त्यामुळे उपसा आणि नैसर्गिक पुनर्भरण यातील अंतर वाढत राहते आणि अचानक एक वेळ अशी येते की कूपनलिका अचानक पाणी देणे बंद करते. आपण योग्य पद्धतीने पुनर्भरण केल्याने कूपनलिका अचानक कोरडी पडून पाणी मिळणं बंद होण्याचा धोका आपण टाळू शकतो.
  • बरेचदा कूपनलिकेच्या पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण एकतर जास्त असते किंवा कालांतराने वापर वाढल्यावर ते वाढत जाते. जेव्हा आपण कूपनलिकेचे पुनर्भरण करतो, तेव्हा दरवर्षी आपण त्यात पावसाचं काही लाख लिटर पाणी बाहेरून टाकत असतो. आपल्याला माहिती आहेच की पावसाचं पाणी हे क्षार कमी असलेले पाणी असते. हे पाणी दरवर्षी साठ्यात घालत राहिल्याने कूपनलिकेच्या पाण्याचा दर्जा चांगला राहतो.
  • आपण जर कूपनलिकेचे पुनर्भरण शास्त्रशुद्ध पद्धतीने केले तर आपण उपसत असलेल्या पाण्याच्या तुलनेत कमी पण निश्चित भर त्या जलसाठ्यात परत घालत राहतो. परिणामी, ती कूपनलिका जास्त काळ पाणी देते. आणि फक्त जास्त काळच नव्हे तर पाणी मिळण्याचे प्रमाणही जास्त असते. म्हणजे, पाणी मिळण्याचा कालावधी तर वाढतोच, पण कूपनलिकेची पाणी देण्याची क्षमताही वाढते.
  • वरील फायद्यांव्यतिरिक्त,
  • आणखी एक फायदा या पुनर्भरणामुळे होतो तो म्हणजे आपण आपल्या परिसरातील इमारतींच्या छतावरील पावसाचे पाणी गोळा करून कूपनलिकेकडे वळवत असल्याने आपल्या परिसरात पाणी तुंबण्याचा त्रास जवळपास संपुष्टात येतो. शक्यतो कूपनलिका टाळावी, सरसकट तर अजिबात करू नयेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक कूपनलिकेचे योग्य पद्धतीने पुनर्भरण करणे, हे तो स्रोत चांगला राहण्यासाठी अत्यावश्यक आहे, हे नीट लक्षात ठेवून काम करावे.
  • - डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६०

    (लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com