सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये पुरवठा करून पशुखाद्यावरील खर्च कमी करता येतो. जातिवंत वासरे, करडे यांची जलद वजन वाढ होऊ शकते. हंगामानुसार चारा पिकांची लागवड करावी. बहुतांशी पशुपालक शेतातील दुय्यम पदार्थ, मका,कडवळ असा चारा जनावरांना देतात. परंतु अशा चाऱ्यामधून शरीरपोषण व दुग्धोत्पादनासाठी असणारी पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होत नाही. त्यामुळे पशुखाद्याचे प्रमाण वाढवावे लागते. यामुळे प्रतिलिटर दुग्धोत्पादन, प्रतिकिलो वजनवाढ यावरील खर्च वाढतो. सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये पुरवठा करून पशुखाद्यावरील खर्च कमी करता येतो, जातिवंत वासरे, करडे यांची जलद वजन वाढ होऊ शकते. एकूणच पशुपालन व्यवसाय किफायतशीर होऊ शकतो.
१) बहुतांशी पशुपालक शेतातील दुय्यम पदार्थ जसे कडबा, सोयाबीनची गुळी, भुसकट, बांधावरील गवत, ऊसवाढे यांचा जनावरांच्या आहारात वापर करतात. काही शेतकरी मका, कडवळ, हत्ती गवत झाडपाला इ. चारापिकांचा जनावरांच्या आहारात उपयोग करतात. २) आपल्याकडे एकदलीय चारा पिके आणि द्विदल चारापिके उपलब्ध आहेत, तसेच चारा उत्पादनाच्या कालावधीनुसार हंगामी आणि बहुवर्षीय चारा पिके आहेत. एकदलीय चारापिके मुबलक चारा उत्पादन देतात. यामध्ये कर्बोदके व तंतुमय पदार्थ असतात. द्विदलीय चारा पिकांपासून तुलनेने एकदलीय चारापिकांपेक्षा कमी चारा उत्पादन मिळते; परंतु यामध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. मात्र कर्बोदके तुलनेने कमी प्रमाणात असतात. ३) एकदलीय चारापिकांमध्ये प्रामुख्याने मका, ज्वारी, संकरित नेपियर आणि द्विदल चारा पिकांमध्ये लसूणघास, बरसीम, चवळी, दशरथ चारापिकांचा समावेश होतो. हंगामी चारा पिकांची केवळ एक कापणी करावी लागते. परंतु बहुवर्षीय चारापिके ठराविक कालावधीत ३ ते ५ वर्षापर्यंत चारा उत्पादन देतात. लसूणघासाचे तीन वर्षापर्यंत चारा उत्पादन मिळते. बहुवर्षीय चारापिकांची लागवड करून चारा उत्पादन करणे फायदेशीर ठरते. ४) संकरित नेपियर वर्गातील धारवाड हायब्रीड नेपियर (डी.एच.एन.-६) तसेच बी.एन.एच.-१० ही चारापिके सकस आणि जास्त चारा उत्पादन देतात. मध्यम ते भारी जमिनीमध्ये लागवड करावी. लागवडीसाठी शेत तयार करताना जास्तीत जास्त शेणखत मिसळून चार फुटांची सरी तयार करावी. दोन कांडयातील अंतर दोन फुट याप्रमाणे ठेवून उभ्या किंवा आडव्या पध्दतीने सरीच्या बाजूला लागवड करावी. उभ्या पद्धतीने लागवड करताना डोळा शक्यतो वरच्या दिशेने राहील आणि एक डोळा मातीमध्ये पुरवलेला व एक डोळा उघडा या पद्धतीने लागवड करावी. एक गुंठा लागवडीसाठी १४० कांडया लागतात. लागवड झाल्यानंतर पहिली कापणी साधारण ते मध्यम जमिनीमध्ये ३ महिन्याला तर काळ्या, भारी जमिनीमध्ये अडीच महिन्यांपर्यंत होते. पुढच्या सर्व कापण्या ५५ ते ६५ दिवस या अंतराने कराव्यात जेणेकरून सकस चारा जनावरांना मिळतो आणि नंतरची चाऱ्याची वाढही झपाटयाने होते. ५) द्विदल चारापिकामधील लसूणघास हे उत्तम चारापीक आहे. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण हे २० टक्यांपर्यंत असते. एकदा लागवड केल्यानंतर तीन वर्षांपर्यंत चारा उत्पादन मिळते. ६) आपल्याकडे कोणती जनावरे आहेत याचा विचार करावा. शेळ्या, गायी/म्हशी कोणत्या जातीच्या आहेत? ही बाब विचारात घ्यावी. कारण प्रत्येक जनावरांची शरीरवजन आणि दुग्धोत्पादन, वजनवाढीचा दर यावर पोषणमुल्यांची गरज ठरत असते. एकूण आपल्याकडे किती जनावरे आहेत आणि पुढे किती संख्या वाढणार आहे, या बाबी लक्षात घेऊन चाऱ्याचे नियोजन करावे. ७) चाऱ्याची एकूण गरज लक्षात आल्यानंतर कोणत्या चारापिकाची किती उत्पादकता आहे आणि त्यातील पोषणतत्त्वांचे प्रमाण किती आहे या बाबी लक्षात घेऊन चारापिकाचे क्षेत्र निश्चित करावे. ८) चारापिके लागवड करताना एकूण क्षेत्रापैकी ६० ते ७० टक्के क्षेत्रावर एकदलीय चारापिके आणि ३० ते ४० टक्के क्षेत्रावर द्विदल चारापिकांची लागवड करावी. वाळल्या चाऱ्याची गरज बघून कडबा उत्पादन घ्यावे. ९) चारा लागवड हंगामानुसार करावी. धारवाड हायब्रीड नेपीयरची लागवड हिवाळ्यात केल्यास उगवण आणि वाढ जलद होत नाही. लसूणघास या चारापिकाची लागवड हिवाळयातच करावी कारण याची उगवण केवळ हिवाळयातच चांगल्याप्रकारे होते. १०) ऋतुमानानुसार, वातावरणातील तापमानानुसार पाणी देण्याचा कालावधी ठरवावा. ११) प्रत्येक चारापिकाची कापणी योग्य वेळेत, चाऱ्याच्या योग्य स्थितीमध्ये करावी. उशिरा कापणी केल्यामुळे पोषणतत्त्वामध्ये घट होऊन तंतुमय पदार्थांचे प्रमाण म्हणजेच चोथा वाढतो. असा चारा जनावरांनी न खाल्ल्यामुळे वाया जातो तसेच तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढल्यामुळे चारा पिकाची वाढ खुंटते. त्यामुळे पुढील कापण्या कमी मिळतात, चारा उत्पादनात घट होते. संकरित नेपियरची कापणी जमिनीलगत करावी, यामुळे फुटव्यांची संख्या वाढते. चारा उत्पादन वाढते. १२) चारा पिकांना योग्य वेळी आवश्यकतेनुसार खत मात्रा द्यावी. गरजेनुसार आंतरमशागत करावी. माळरानावर चारा लागवड ः माळरानावर पावसाच्या पाण्यावर सकस चाराउत्पादन घेता येते. स्टायलो हॅमाटा या चारा जातीचे उत्पादन माळरानावर तसेच डोंगर, चराऊ जमिनीवर बी टाकून घेता येतो. जोपर्यंत जमिनीत ओलावा आहे तोपर्यंत उत्पादन मिळते. ओलावा संपला, की हळूहळू हे गवत वाळून जाते. नंतर ओलावा आल्यास पुन्हा त्यापासून चाराउत्पादन मिळते. यामध्ये १५ टक्क्यांपर्यंत प्रथिनांचे प्रमाण असते. हेक्टरी १० किलो बियाणे लागते. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे चारा उत्पादन ः
१) कमी पाण्याच्या उपलब्धतेमध्ये आणि जमीन नसताना हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे चाराउत्पादन करता येते. २) आपल्याला विशेषतः मका बियांपासून चारा उत्पादन घेता येते. यासाठी चारी बाजूंनी शेडनेट लावून चारा उत्पादनासाठी शेड तयार करावी. त्यामध्ये एक ते दीड फूट उंचीवर रॅक तयार करावेत. त्यामध्ये मका ट्रे ठेवता येईल. ३) ट्रे ठेवल्यानंतर पाणी फवारण्यासाठी फॉगर्स बसवावेत. ते स्वयंचलित वेळ नियंत्रकावरती चालणारे असावेत. ४) सुरवातीला मका बियाणे २४ तास पाण्यात भिजवावे. २४ तासानंतर ते बियाणे सुती कापडामध्ये २४ ते ४८ तास बांधून ठेवावे. यामुळे मक्याला मोड येतात. मोड आलेले बियाणे ट्रे मध्ये पसरवून रॅकमध्ये ठेवावेत. प्रत्येक दोन तासानंतर एक मिनिट याप्रमाणे पाण्याचा फवारणी मारावा. ५) दहा दिवसांमध्ये आपणास एक किलो मका बियाणांपासून ९ ते १० किलो चारा मिळतो. असा चारा मुळासहित जनावरांच्या आहारात वापरता येतो. या चाऱ्यावर बुरशी येवू नये म्हणून पाणी फवारणी नियंत्रित ठेवावी. तसेच आर्द्रता ६० ते ६५ टक्के पर्यंत राखावी. सभोवतालचे तापमान २३ ते २५ सें. पर्यंत ठेवावे. ६) हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण १५ ते १६ टक्केपर्यंत असते, तर शेतातून काढलेल्या मक्यामध्ये हेच प्रमाण ८ ते ९ टक्के पर्यंत असते. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे १० किलो चारा तयार करण्यासाठी १० लिटरपर्यंत पाण्याची गरज असते, तर जमिनीमध्ये १० किलो चारा तयार करण्यासाठी ५० लिटरपर्यंत पाणी लागते. संपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४ (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)