
वाल ः
- फुलोरा ते शेंगा अवस्था
- वाल, चवळी पीक फुलोऱ्यात येण्याची व दाणे भरण्याची अवस्था ओलाव्यासाठी अति संवेदनशील असते. त्यामुळे या अवस्थेत पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
- वाल पिकामध्ये शेंगा पोखरणारी अळी व घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. किडीचा प्रादुर्भाव सुरुवातीला कोवळ्या कळ्यांवर व नंतर शेंगांमध्ये दिसून येतो. अळी कोवळ्या दाण्यांवर उपजीविका करते. किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी कीडग्रस्त शेंगा काढून नष्ट कराव्यात.
फवारणी ः प्रतिलिटर पाणी
- निंबोळी अर्क ५ टक्के किंवा
- डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) २ मिलि
१५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
- शेतामध्ये पक्षिथांबे उभारावेत.
टीप ः ओल्या शेंगा काढणी करावयाची असल्यास कीटकनाशकाची फवारणी करू नये.
हरभरा ः
- फुलोरा ते शेंगा अवस्था
- हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. अळ्याच्या प्रादुर्भावामुळे पानांवर पांढरे डाग दिसून येतात. शेंडे खाल्ल्यासारखे दिसतात.
- शेतात एकरी दोन कामगंध सापळे आणि दोन पक्षिथांबे लावावेत.
नियंत्रणासाठी,
निंबोळी अर्क ५ टक्के किंवा ॲझाडीराक्टीन (३०० पीपीएम) ५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भुईमूग ः
- वाढीची अवस्था
- भुईमूग पिकामध्ये पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी आवश्यकतेनुसार खुरपणी करावी. पेरणीनंतर ४५ दिवसांनी पिकास मातीची भर द्यावी.
- पिकाला १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
तूर ः
- पक्वता अवस्था
- तुरीची साधारणपणे ७५ ते ९० टक्के शेंगा वाळल्यानंतर कापणी करावी. कापणीनंतर बांधलेल्या पेंढ्या वाळल्यावर शेंगा काठीने बडवाव्यात आणि वारवणी करून दाणे आणि भुसा वेगळा करावा. साठवणीपूर्वी तूर दाणे ४ ते ५ दिवस चांगले उन्हात वाळवून कोरड्या जागी पोत्यात किंवा कोठीत साठवावे. धान्यात कडुनिंबाचा पाला मिसळून साठवण करावी.
उन्हाळी मूग, मटकी ः
- पेरणी
- उन्हाळी हंगामासाठी मूग आणि मटकी पिकाच्या लागवडीसाठी सपाट वाफे तयार करावेत.
- पेरणी ३० बाय १० सेंमी अंतरावर करावी. एकरी ६ ते ८ किलो बियाणे पुरेसे होते.
- पेरणीपूर्वी सरीमध्ये युरिया ५५० ग्रॅम आणि सिंगल सुपर फॉस्फेट ३ किलो प्रति गुंठा प्रमाणे रासायनिक खताची मात्रा देऊन मातीने झाकून घ्यावे.
- पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास थायरम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ३ ग्रॅम प्रमाणे प्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबिअम या जिवाणू संवर्धकाची २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे.
आंबा ः
- फुलोरा ते फळधारणा अवस्था
- कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याने फळधारणा झालेल्या बागेमध्ये फळगळ टाळण्यासाठी आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति झाड किंवा १५ दिवसांतून एकदा १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणे द्यावे. झाडाच्या आळ्यांमध्ये गवताचे आच्छादन करावे.
- नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिल्या वर्षी आठवड्यातून दोन वेळ, दुसऱ्या वर्षी १५ दिवसांतून २ वेळा, तर
तिसऱ्या वर्षी महिन्यातून २ वेळा प्रत्येक कलमांना ३० लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी. कलमांच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे. जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी.
- आंबा फळांचे फळमाशी तसेच प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच फळांचा आकार व वजन वाढून डाग विरहित फळे उपलब्ध होण्यासाठी गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना विद्यापीठाच्या शिफारशीनुसार २५ बाय २० सेंमी आकाराच्या कागदी किंवा वर्तमानपत्राच्या पिशव्यांचे आवरण घालावे. आवरण घालताना फळाच्या देठाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
- आंब्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि प्रत सुधारण्यासाठी फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना पोटॅशिअम नायट्रेट (१ टक्का) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे एकूण तीन फवारण्या कराव्यात.
तुडतुडे नियंत्रण ः
- मोहोर/फळधारणा अवस्थेतील आंब्यावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते. तुडतुडे मोहोरातील, कोवळ्या फळांतील रस शोषून घेतात. त्यामुळे मोहोर गळून पडतो. तुडतुडे मधासारखा चिकट पदार्थ शरीरावाटे बाहेर पानांवर टाकतात. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते.
- आर्थिक नुकसान पातळी ः (पालवी किंवा मोहोर अवस्था ः ५ तुडतुडे प्रति पालवी किंवा मोहोर)
नियंत्रण ः
आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर, (फवारणी ः प्रति लिटर पाणी)
१) बोंगे फुटण्याच्या अवस्थेत
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मिलि
२) मोहोर फुलण्यापूर्वीच्या अवस्थेत
इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मिलि किंवा
ब्युप्रोफेझीन (२५ टक्के प्रवाही) २ मिलि
३) वाटाणा अवस्थेत
थायामेथोक्झाम (२५ टक्के दाणेदार) ०.१ ग्रॅम
- मोहोर ते फळधारणा अवस्थेत भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- मोहोर अवस्थेत असलेल्या आंब्यामधील परागीकरण वाढविण्यासाठी मोहोर फुललेल्या अवस्थेतील मोहोर सकाळी ९ ते १२ या वेळेत हलका हलवून घ्यावा.
फळधारणा झालेल्या झाडांवरील मोहोरातील सुकलेल्या अवस्थेतील नर फुले दुपारच्या वेळेस कडक उन्हामध्ये झाडून घेतल्यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. तसेच केलेल्या फवारणीचा प्रभाव अधिक चांगला होऊन फळांची वाढ चांगली होते.
टीप ः
मोहोर नुकताच फुलत असताना ते फलधारणा होईपर्यंत कीटकनाशकांची फवारणी शक्यतो टाळावी.
फवारणी करणे गरजेची असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी परागीकरणाचा कालावधी सकाळी ९ ते १२ ही वेळ वगळून फवारणी करावी. कीटकनाशक किंवा बुरशीनाशकांची फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावी.
(०२३५८) २८२३८७/ ८१४९४६७४०१ डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१ (ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.