सोयाबीन आणि तूर आंतरपीक पद्धतीने लागवड
सोयाबीन आणि तूर आंतरपीक पद्धतीने लागवड

खरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा सुधारित जाती

सोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष  जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. त्याच्या मुळांवरील गाठीत असणारे जीवाणू हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून पिकाच्या वाढीसाठी नत्र उपलब्ध करून देते. आंतर पीक व दुबार पीक पद्धतीबरोबर पीक फेरपालटासाठीही सोयाबीन पीक महत्त्वाचे ठरते. 

जमीन : पिकाच्या वाढीसाठी मध्यम काळी पोयट्याची व पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि ६.५ ते ७.५ पर्यंत सामू असणारी जमीन अतिशय उत्तम असते.  हवामान : २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात सोयाबीन चांगल्या प्रकारे वाढू शकते. ज्या भागात ७०० ते १००० मिमी पर्यंत पावसाचे प्रमाण असते त्या ठिकाणी सोयाबीनचे चांगले उत्पादन मिळते.  पूर्वमशागत व भरखते : जमिनीची १५ ते २० सेंमी खोल नांगरट तीन वर्षांतून एकदा करावी. दोन ते तीन वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत व समपातळीत करावी. शेवटच्या वखराच्या पाळीला चांगले कुजलेले ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरून नंतर जमिनीत मिसळावे. पेरणीपूर्वी एक वखराच्या सहाय्याने पाळी घातल्यास तणांची तीव्रता कमी होते. बीज प्रक्रिया : बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम कार्बेन्डाझीम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम चोळावे. तसेच नत्र स्थिरीकरण करण्यासाठी सोयाबीन गटाचे रायझोबियम जॅपोनिकम २५० ग्रॅम + स्फुरद विरघळविणारे जिवाणू २५० ग्रॅम प्रत्येकी प्रति १० किलो बियाण्यास पेरणीपूर्वी २ - ३ तास आधी लावून सावलीमध्ये वाळवावे. बीज प्रक्रिया करताना बियाणे जोरात घासू नये. तसेच प्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करून, नंतरच जिवाणू खतांची प्रक्रिया करावी.

सुधारित जाती : जे. एस . ३३५, एम.  ए .सी. एस. ११८८, फुले कल्याणी (डी . एस . २२८), जे. एस . ९३-०५, के. एस. १०३, फुले अग्रणी (के. डी. एस. ३४४), फुले संगम (के. डी. एस. ३४४) आणि  जे. एस . ९७-५२.

पेरणीची वेळ व पद्धत : पुरेसा पाऊस झाल्यानंतर जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी करावी. उशिरा पेरणी केल्यास उत्पादन कमी होते. सोयबिनची पेरणी पाभरीच्या सहाय्याने करताना बियाणे ३-४ सेंमीपेक्षा खोल करू नये, अन्यथा बियाणे कुजून उगवण कमी होते. दोन ओळीतील व रोपातील अंतर भारी जमिनीत ३० x १० सेंमी आणि मध्यम जमिनीत ४५ x ५ सेंमी ठेवावे. पेरणी उताराला आडवी व पूर्व-पश्चिम दिशेत करावी.

खत व्यवस्थापन  भरखते : चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी ५ टन पेरणीपूर्वी १५- २० दिवस अगोदर जमिनीत मिसळावे. वरखते : सोयाबीन पिकास प्रति हेक्टरी ५० किलो नत्र , ७५ किलो स्फुरद आणि ४५ किलो पालाश पेरणीच्या वेळी जमिनीत मिसळून किंवा चाड्याच्या पाभरीने खते व बियाणे एकाच वेळी पेरून द्यावेत.

बियाण्याचे प्रमाण : सलग पेरणीसाठी प्रति हेक्टरी ७५-८० किलो, तर टोकण करण्यासाठी ४५-५० किलो बियाणे वापरावे.  आंतर पीक पद्धत : मध्यम भारी जमिनीत तूर पिकामध्ये सोयाबीन १:३ किंवा २:४ या प्रमाणात आंतरपीक घेतल्यास निव्वळ तुरीपेक्षा सोयाबीनमुळे आंतरपीक पद्धती फायदेशीर दिसून येते. आंतर मशागत : पीक उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी एक कोळपणी व नंतर ३० दिवसांच्या आत खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे. दुसऱ्या कोळपणीच्या वेळी डवराला दोरी गुंडाळून कोळपणी करावी. त्यामुळे पिकांच्या मुळांना मातीची भर बसेल आणि सऱ्या पडल्यामुळे मुलस्थानी जलसंवर्धन होण्यास मदत होते. पाणी व्यवस्थापन : पिकाला फांद्या फुटताना (पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी) आणि फुलोऱ्यात (४५ ते ५० दिवसांनी) पावसाचा ताण पडल्यास पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.      - अंबादास मेहेत्रे (आचार्य पदवी), ९५४५३२३९०६  - डॉ. एस. एच.पठाण (सहयोगी प्राध्यापक), ८१४९८३५९७० (कृषी विद्या विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com