Each family should plant a variety of vegetables in the backyard.
Each family should plant a variety of vegetables in the backyard.

परसबागेतून मिळतो पोषण आहार

रिवाइटलयझिंग रेन ॲग्रिकल्चर महाराष्ट्र अभियानांतर्गत भंडारा, गोंदिया जिल्ह्यात परसबागेचे महत्त्व लोकांमध्ये रुजविण्यासाठी ही संस्था काम करत आहे.

भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्याच्या जवळील गावकऱ्यांना जंगलातून बंबुड्या म्हणजेच अळिंबी मुबलक प्रमाणात मिळते. गावकऱ्यांच्या दैनंदिन जेवणात पौष्टिक अळिंबीचा समावेश असतो. ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे अनिल बोरकर यांनी या गावातील सर्व वयोगटातील गावकऱ्यांची ऑक्सिजन पातळी तपासली, तेव्हा ती सरासरीपेक्षा जास्त मिळाल्याचे सांगितले. रिवाइटलयझिंग रेन ॲग्रिकल्चर महाराष्ट्र अभियानांतर्गत भंडारा, गोंदिया जिल्ह्यात परसबागेचे महत्त्व लोकांमध्ये रुजविण्यासाठी ही संस्था काम करत आहे. कोका अभयारण्याच्या अवतीभोवतीच्या तेरा गावांमधील शेकडो तरुण दिवसाला अळिंबी विक्रीतून पाचशे ते सहाशे रुपये कमावतात.साधारणपणे जून मध्ये छोट्या अळिंबी तसेच सप्टेंबरमधील अनंत सात्या आणि ऑक्टोबर महिन्यातील येरू सात्या अळिंबी विकून ही तरुण मंडळी चांगले उत्पन्न मिळवितात. परसबागेत विविध भाज्यांची लागवड 

 • गेल्या तीन वर्षांपासून ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ या संस्थेतर्फे जंगलातील भाज्या परसबागेत रुजविण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याचे पोषणमूल्य तसेच लागवड ते काढणीपर्यंतचे नियोजन ग्रामस्थांना सांगितले जाते. दोनशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांना शेतातील परसबाग आणि दिडशेच्यावर कुटुंबीयांना घरच्या परसबागेसाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. केना कांदा, आवळी जावळी, पातुर अशा रानभाज्या जेव्हा परसबागेत लावल्या गेल्या, तेव्हा त्या कुटुंबाच्या पोषण आहारात आमूलाग्र बदल झाल्याचे अविल बोरकर यांनी सांगितले.
 • गडचिरोलीत ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी‘ ही संस्था परसबागेतून सुदृढ आरोग्य हा उपक्रम राबवीत आहे. या संस्थेतर्फे कुरखेडा ,कोरची, ब्रह्मपुरी ,नागभिड येथील गावांमध्ये परसबाग तयार करण्यात आल्या. परसबागेचा फारसा वापर नसलेल्या गावातील काही महिलांचे हिमोग्लोबिन संस्थेने तपासले; ते सरासरीपेक्षा कमी आले, त्यांना परसबागेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अशी माहिती डॉक्टर शुभदा देशमुख यांनी दिली. आज जवळपास पन्नास गावांमध्ये परसबागेमुळे महिलांच्या हिमोग्लोबीनमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. परसबाग अगदी मे च्या उन्हात देखील फुलावी यासाठी सांडपाण्यावर परस बागेची लागवड करण्याचे देखील प्रशिक्षण महिलांना देण्यात आले. या महिलांनी चवळी ,माठ ,घोळ या हिरव्या भाज्यांची लागवड केली होती. त्यामुळे भाज्यांची वाळवण कमी होऊन ताजा हिरवा भाजीपाला आहारात वापरला जातो.
 • कमी पावसाच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील परसबागेचे चांगले काम झाले आहे. हिंगोलीच्या उगम ग्रामीण विकास संस्थेने गावातील महिलांची हिमोग्लोबिनची तपासणी केली. परसबागेचे दृश्य परिणाम फारच सकारात्मक दिसत आहेत. जागा कमी असली तरी परसबाग लावा हा संदेश या संस्थेने जवळपास दोनशे गावांमध्ये दिला. तीन स्तरावर परस बागेची रचना करून गरजेनुसार बियाणे वाटप करण्यात आले. वाफ्यामध्ये कांदा,मुळा, वांगी, भेंडी लागवड तसेच कुंपणावर वाल,दोडकी अशा वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे जयाजीराव पैकर यांनी दिली. या संस्थेने शेतातील परंपरागत पाटा पद्धतीचे पुनरुज्जीवन केले. पाटा पद्धतीत फुले येणाऱ्या विविध भाज्यांची लागवड सुरू झाली. या भाज्यांमधून सहज पोषण आहार मिळाला. जवळपास दीड हजार शेतकऱ्यांनी पाटा पद्धतीने लागवड केली. तसेच दीडशेच्यावर कुटुंबांनी घराजवळ परसबाग लावली आहे.
 • वर्ध्याच्या धरामित्र संस्थेने यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी महिलांचे कुपोषण दूर करण्यासाठी मागील पंधरा वर्षांपासून परसबाग या विषयावर काम केले आहे. वर्षभराच्या परसबागेतील पोषण आहारातून आदिवासी महिलांची ४५ टक्के नवजात बालके सुदृढ जन्माला आली आहेत. तर ३० टक्के बालकांचे वजन सरासरी पेक्षा जास्त आहे. वर्धेच्या आर्वी तालुक्यातील २४८ कुटुंबामध्ये गेली सात वर्षे धरामित्र संस्थेचे डॉ.तारक काटे सातत्याने परसबागेसाठी काम करत आहेत. डॉ.तारक काटेंच्या अभ्यासानुसार पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येणाऱ्या परसबागेतील भाज्यांमुळे प्रत्येक कुटुंबात जवळपास पाच हजार रुपयांची बचत करता आली. तसेच पोषक आहारही मिळाला.
 • आदिवासी विकास विभागातर्फे आदिवासींना परसबाग विकास करण्यासाठी ५०० रुपये अनुदान दिले जाते. या योजनेचा मूळ हेतू बघता त्यातून भरघोस पोषण आहाराचा स्रोत निर्माण करता येऊ शकतो. महिलांचे व बालकांचे कुपोषण दूर करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांवर जेवढा पैसा खर्च होतो, त्याच्या केवळ २० टक्के जरी परसबाग रुजविण्यासाठी शासनाने खर्च केला ,तरी नागरिकांच्या आरोग्यात आमूलाग्र बदल करता येऊ शकतो.
 • संपर्क- सजल कुलकर्णी, ९८८१४७९२३९ (लेखक रिवाइटलयझिंग रेन ॲग्रिकल्चर महाराष्ट्र अभियानाचे सदस्य आहेत

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  logo
  Agrowon
  www.agrowon.com