द्राक्ष सल्ला : सद्यःस्थितीत उद्भवलेल्या समस्या अन् उपाययोजना

सध्या द्राक्ष बागायतदार ज्या अडचणीत सापडलेला आहे, ती महत्त्वाची अडचण म्हणजे वेलीवर असलेली द्राक्षे. खालील परिस्थितीतून आपण त्यावर काय तोडगा काढता येईल, ते पाहू.
सद्यःस्थितीत द्राक्षात उद्भवलेल्या समस्या अन् उपाययोजना
सद्यःस्थितीत द्राक्षात उद्भवलेल्या समस्या अन् उपाययोजना

सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेमध्ये बागायतदारांना वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कोरोना या विषाणूमुळे द्राक्ष बागायतदारांवर बागेतील सर्व कामे ठप्प करावी लागली आहेत. असा कधीच विचार केला नव्हता. परंतु, कालच पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे जर पूर्ण देश लॉकडाऊन झाला असला तर त्यात आपण शेतकरी ही आलो. स्वतःच्या प्रकृतीची काळजी सगळ्यांनी घेणे गरजेचे आहे. त्यावर महत्त्वाची उपाययोजना म्हटले तर सोशल डिस्टंग्टिग गरजेचे आहे. यानंतर शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याकरिता आहारसुद्धा तितकाच महत्त्वाचा असेल. यामध्ये फळांची सुद्धा तितकीच महत्त्वाची भूमिका असते.  शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी द्राक्षे हे महत्त्वाचे फळ समजले जाते. द्राक्षामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त एकूण फिनॉलिक घटक, त्यात एकूण फ्लॅवनॉईडस अॅन्थोसायनीन घटक व अॅण्टीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. बऱ्याचदा डॉक्टर आपल्याला जीवनसत्त्वयुक्त औषधे (उदा. बी कॉम्प्लेक्स इ.) लिहून देतात.  अशा औषधातील अनेक घटक द्राक्षांमध्ये नैसर्गिकरीत्या असतात. (उदा. मांजरी मेडिका मध्ये असलेले अॅन्थोसायनिनचे प्रमाण) तेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकरिता भरपूर द्राक्ष खाल्ली पाहिजेत.     सध्या द्राक्ष बागायतदार ज्या अडचणीत सापडलेला आहे, ती महत्त्वाची अडचण म्हणजे वेलीवर असलेली द्राक्षे. खालील परिस्थितीतून आपण त्यावर काय तोडगा काढता येईल, ते पाहू. सध्या वाळत असलेला बेदाणा व पाऊस ः काल बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. मुख्यतः सांगली व सोलापूर जिल्ह्यात द्राक्षापासून बेदाणे निर्मितीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो. या ठिकाणी झालेल्या पावसामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत बेदाणा सुकण्यास उशीर लागेल. बेदाणा सुकण्याऐवजी ओलसर होण्याची शक्यता असेल.  पुन्हा पाऊस आला व आर्द्रता जास्त वाढल्यास बेदाणा काळा पडण्याची शक्यता असेल. या परिस्थितीत ब्लोअर किंवा पंख्याच्या साह्याने हवा खेळती राहील, असे पाहावे. त्यामुळे आर्द्रता कमी होऊन बेदाणा सुकण्यास मदत होईल.   वेलीवर असलेले द्राक्षघड ः सध्याच्या बिकट परिस्थितीमुळे फळ काढणी करण्याकरिता मजुरांची उपलब्धता नाही. अशा परिस्थितीत या फळांचे काय करावे, हा प्रश्न निर्माण होतो. नाशिक विभागामध्ये स्थानिक बाजारपेठेकरिता किंवा निर्यातीकरिता उपलब्ध असलेल्या द्राक्षांचा विल्हेवाट कशी लावावी, ही समस्या निर्माण झाली. अशा स्थितीत आपल्या हाती दोन उपाययोजना असू शकतील. फळकाढणी करून शीतगृहामध्ये माल साठवून ठेवणे. हा माल परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर बाहेर काढता येईल. परंतु, प्रत्येक राज्याची सीमा बंद केलेली असल्यामुळे द्राक्षाचे निर्यातीसाठीचे कंटेनरही तिथेच उभे आहेत. ही परिस्थितीही असू शकते. अशावेळी जर शीतगृहे रिकामी नसतील, तर मात्र समस्येत भर पडेल. ज्या ठिकाणी शीतगृहे मोकळी आहेत, तिथे एकमेकांना मदत करून माल साठवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. उपलब्ध फळांपासून बेदाणा करण्याकरिता वापर करावा. यावेळी मण्यातील गोडी वाढवण्याकरिता पाण्यावर नियंत्रण ठेवावे. पाणी कमी केल्यामुळे गोडी वाढते. काही परिस्थितीत द्राक्षामध्ये गोडी आलेली आहे, व फळछाटणीपासून १६० दिवसापेक्षा अधिक काळ झाला आहे,  अशा बागेमध्ये घडाच्या मागे दोन तीन डोळे सोडून काडी कापून घ्यावी. त्यानंतर बेदाणा निर्मितीकरिता वापरल्या जाणाऱ्या इथाईल ओलिएट (डिपिंग ऑईल) ची फवारणी करून घ्यावी. असे केल्यास वेलीला ताणही बसणार नाही व इथाईल ओलिएटच्या वापरामुळे वेलीवरच आठ ते दहा दिवसांत मणी सुकतील. त्याचा बेदाणा तयार होईल. या करिता साधारणतः दोन ते तीन वेळा फवारणी करावी लागेल. डिपिंग ऑईलच्या फवारणीमुळे पानावर स्कॉर्चिंग येऊ शकते. परंतु आपण घडाच्या मागे काडी कापल्यामुळे वेलीवर त्याचे वाईट परिणाम होणार नाहीत. काडी कापल्याच्या आठ दिवसानंतर खरड छाटणी घ्यावी. तोपर्यंत डोळे फुटतील व परिस्थिती सुधारेल. सुकलेले द्राक्ष घड बेदाणे म्हणून वापरता येईल. ४० चे ५० टक्के मणी सुकल्यानंतर शे़डनेटमध्ये सावलीत बेदाणा सुकवून घ्यावा. हे संशोधनाचे परिणाम नसून, सध्याच्या तातडीच्या व बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठीचा प्रयत्न असेल.  ः डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com