ग्लॅडिओलस कंदांची काढणी, साठवणूक

योग्य टप्प्यावर ग्लॅडिओलस कंदांची काढणी करणे महत्त्वाचे आहे. कंद काढण्यास उशीर झाल्यास उन्हाळ्यात येणाऱ्या वादळी पावसाने कंद खराब होऊ शकतात.अपरिपक्व कंद काढल्यास त्याची गुणवत्ता कमी होते. लहान आकाराचे कंद निघाल्यास पुढच्या हंगामात फुल धारणा कमी होते.
Harvesting, storage of gladiolus tubers
Harvesting, storage of gladiolus tubers

योग्य टप्प्यावर ग्लॅडिओलस कंदांची काढणी करणे महत्त्वाचे आहे. कंद काढण्यास उशीर झाल्यास उन्हाळ्यात येणाऱ्या वादळी पावसाने कंद खराब होऊ शकतात.अपरिपक्व कंद काढल्यास त्याची गुणवत्ता कमी होते. लहान आकाराचे कंद निघाल्यास पुढच्या हंगामात फुल धारणा कमी होते. पर्वतीय भाग वगळता, बहुतेक सर्वच भागांत फुलांची कापणी पूर्ण झालेली आहे. कंद काढणी, प्रक्रिया आणि साठवण करताना योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक आहे. काही काळ कंद जमिनीमध्येही चांगले राहू शकतात. सध्या नवीन लागवड करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. कंद काढण्याची वेळ  

  • लागवडीसाठी पूर्ण वाढलेले कंद वापरले जातात. ग्लॅडिओलसची फुले काढल्यानंतर ४५ ते ५० दिवसांनी कंद काढण्यासाठी तयार होतात. फुले काढल्यानंतर उरलेल्या पानांच्या संख्येवर कंदांची वाढ अवलंबून असते. कंदाच्या चांगल्या वाढीसाठी किमान ३ ते ४ पानांची आवश्‍यकता असते.
  • कंद काढण्याअगोदर माती कोरडी, भुसभुशीत आणि थोडीशी ओलसर असावी. यासाठी किमान २ ते ३ आठवड्यांपूर्वी सिंचन थांबवले पाहिजे. योग्य टप्प्यावर कंदांची काढणी करणे खूप महत्त्वाचे आहे. कंद काढण्यास उशीर झाल्यास उन्हाळ्यात येणाऱ्या वादळी पावसाने कंद खराब होऊ शकतात.
  • कंदांची काढणी मैदानी भागांत एप्रिल ते मे दरम्यान तर पहाडी प्रदेशात ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान केली जाते. अपरिपक्व कंद काढल्यास त्याची गुणवत्ता कमी होते. लहान आकाराचे कंद निघाल्यास पुढच्या हंगामात फुल धारणा कमी होते.
  • कंदांचे वर्गीकरण 

  • कंदांच्या आकारावरून मोठे कंद व छोटे कंद असे वर्गीकरण केले जाते. मोठे कंद २.५ सेंमी पेक्षा जास्त मोठे तर छोटे कंद २.५ सेंमी पेक्षा लहान असतात.
  • आकाराने लहान असलेल्या छोट्या कंदांना फुलधारणा होत नाही. या कंदांचे फुलदांडे लहान असतात व ते विक्रीसाठी योग्य नसतात. छोट्या कंदांचा वापर पुढील हंगामामध्ये करून मोठ्या आकाराचे कंद तयार केले जातात.
  • कंद प्रक्रिया  

  • काढणीनंतर कंद किमान १४ दिवसांपर्यंत सावलीत आणि हवेशीर ठिकाणी ठेवावेत. कंद १५ ते २३ अंश सेल्सिअस तापमानात २ ते ३ आठवड्यांसाठी सुकविले जातात, यालाच क्युरिंग म्हणतात. याच काळात कंद स्वच्छ करावेत. खराब, रोग बाधित आणि काढताना तुटलेले कंद वेगळे करून ठेवावेत.
  • स्वच्छ केलेल्या कंदांना बुरशीनाशकांची प्रक्रिया करणे आवश्यक असते. प्रक्रिया न करता कंद साठविल्यास ते सडून जातात किंवा पुढील हंगामात त्यावर रोगांचा अधिक प्रादुर्भाव होतो.
  • दहा लिटर पाण्यात २ ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळून द्रावण तयार करावे. यामध्ये ४० ते ५० मिनिटे कंद बुडवून ठेवावेत. त्यानंतर कंद बाहेर काढून सावलीत सुकवावेत. साधारणपणे आठवड्याने हे कंद साठवणुकीसाठी तयार होतात. सुकवलेले कंद नायलॉनच्या पिशवीत अथवा बटाट्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पिशवीत ठेवावेत.
  • कंदांची सुप्तावस्था आणि साठवणूक 

  • ग्लॅडिओलसच्या कंदांमध्ये सुप्त अवस्था असते. सुप्त अवस्था म्हणजेच कंद विश्रांतीच्या अवस्थेत असतात. अशा कंदांची लागवड केल्यास ते उगवत नाहीत, सडून जातात.
  • कंदांची सुप्त अवस्था तोडण्यासाठी त्यांना शीतगृहामध्ये ठेवावे लागते. काही रसायनांचा वापर करून देखील सुप्त अवस्था तोडता येते. मात्र शीतगृहामध्ये ठेवणे हा एक उत्तम पर्याय आहे.
  • शीतगृहामध्ये २ ते ६ अंश सेल्सिअस तापमान आणि ६८ ते ७५ टक्के आर्द्रता असणे आवश्‍यक असते. कंद २ ते ३ महिन्यांसाठी या अवस्थेत ठेवावेत. कंदांची पुन्हा लागवड करण्यासाठी त्यास १५ ते २० दिवस आधी शीतगृहातून बाहेर काढावे लागतात. कंदाची सामान्य तापमानात साठवण केल्याने अंकुर येण्यास सुरवात होते. असे अंकुरित कंद लागवडीयोग्य असतात.
  • संपर्क - डॉ. गणेश कदम, ८७९३११५२७७ ( पुष्प विज्ञान संशोधन निदेशनालय, शिवाजीनगर,पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com