फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाची

फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा फळबागेचे उत्पादित आयुष्य कमी होण्यामागे अयोग्यजमिनीची निवड आणिजमिनीचे बिघडत चाललेले आरोग्य ही दोन महत्त्वाची कारणे असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे योग्य फळबागेकरिता योग्य जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची आहे.
soil types
soil types

सामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा फळबागेचे उत्पादित आयुष्य कमी होण्यामागे जमिनीची अयोग्य निवड आणि बिघडत चाललेले जमिनीचे आरोग्य ही दोन महत्त्वाची कारणे असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे योग्य फळबागेकरिता योग्य जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. प्रदेशनिहाय हवामान उदा. पाऊस, आर्द्रता, तापमान इ. घटकांचा आणि जमिनीचा प्रकार, पाण्याची प्रत इ. स्थानिक बाबींवर फळझाडांची चांगली वाढ, उत्पादित आयुष्य, फळाचा रंग, आकार अवलंबून असतो. म्हणूनच कोकणात आंबा (हापूस), काजू, कोकम, करवंद, फणस, लीची इ. फळपिकांचे उत्पादन व गुणवत्ता चांगली मिळते. अगदी त्याचप्रकारे विदर्भात संत्रा, तर पश्चिम महाराष्ट्रातील डाळिंब, द्राक्षे, पेरू, आंबा, चिक्कू, केळी, लिंबू, सीताफळ, आवळा, अंजीर, बोर, इ. फळपिकांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र राज्यात १३.५ लक्ष हेक्टर क्षेत्र फळबागेखाली असून त्यापासून सुमारे ११.५ दशलक्ष टन उत्पादन होते. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण मुख्य फळपिकांखालील क्षेत्रापैकी आंबा २५.१३ टक्के, संत्री १४.९७ टक्के, काजू १२.४० टक्के, द्राक्ष ११.९४ टक्के व चिक्कू १२.४० टक्के इतके क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील शेतकरी फळबागेकडे वळत असल्याचे दिसत असले तरी त्या प्रमाणात क्षेत्र वाढताना दिसत नाही. याचे मुख्य कारण फळबागेचे उत्पादित आयुष्य कमी होऊन ४ -५ वर्षात फळबागा तोडल्या जात असल्याचे स्पष्ट होत आहे. अगदी खोलात विश्लेषण केल्यास फळबागेचे उत्पादित आयुष्य कमी होण्यामागे जमिनीची अयोग्य निवड आणि बिघडत चाललेले जमिनीचे आरोग्य ही दोन महत्त्वाची कारणे असल्याचे स्पष्ट होते. त्यासाठी खालील बाबी लक्षात ठेवाव्यात.

  • साधारणपणे हलक्या जमिनीमध्ये कमी कालावधीत येणारी फळपिकांची लागवड करावी. उदा. डाळिंब, बोर, सीताफळ, अंजीर इ.
  • मध्यम ते खोल, चांगला निचरा असलेल्या जमिनीत दीर्घायुषी फळपिकांची लागवड करावी. असे केल्यास फळपिकांचे भरपूर उत्पादित आयुष्य मिळते.
  • फळझाडांच्या योग्य लागवडीसाठी आणि उत्पादित आयुष्य वाढविण्यासाठी खालील प्रमाणे व्यवस्थापन करावे माती परीक्षणासाठी नमुना घेण्याची पद्धत  लागवडीपूर्वी शेतामध्ये मध्यभागी प्रातिनिधिक स्वरूपात मुरूम लागेपर्यंत खड्डा घ्यावा. मुरूम नसल्यास जास्तीत जास्त तीन फूट खड्डा घ्यावा.

  • हलक्या जमिनीत पहिल्या एक फूट (० ते ३० सेंमीपर्यंत) थरातील माती नमुना घ्यावा.
  • मध्यम खोल जमिनीतील पहिल्या एक फूट थरातील (० ते ३० सेंमीपर्यंत) व दुसऱ्या थरातील (० ते ६० सेंमीपर्यंत) मातीचे वेगवेगळे दोन नमुने घ्यावेत.
  • जमीन खोल असल्यास प्रत्येक थरातील (० ते ३० सेंमी, ३० ते ६० सेंमी व ६० ते ९० सेंमी ) मातीचे तीन वेगवेगळे नमुने घेऊन प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवावेत.
  • माती परीक्षणामध्ये सगळ्यात महत्त्वाचे पायाभूत गुणधर्म तपासावेत. त्यात प्रामुख्याने सामू, विद्युत वाहकता (क्षारता), चुनखडीचे प्रमाण होय. या तीनही गुणधर्मांना संतुलित ठेवणारा गुणधर्म म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्बांचाही या परीक्षणामध्ये समावेश असावा.

  • मातीचा सामू ६.५ ते ८.० पर्यंत असावा
  • विद्युत वाहकता (क्षारता) ०.५० डेसीसायमन प्रती मीटर पेक्षा कमी असावी.
  • मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी असावे. मात्र, मुक्त चुनखडीचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास ती हानिकारक वर्गवारी असते. अशा जमिनीत कोणत्याही फळबागेची लागवड करू नये.
  • सेंद्रिय कर्ब ०.६० टक्क्यांपेक्षा जास्त असावे.
  • भारी काळ्या जमिनीत व निचरा नसलेल्या चोपण जमिनीत (सामू ८.५ पेक्षा जास्त) फळबाग लागवड करू नये. क्षारयुक्त जमिनीत (सामू ८.५ पेक्षा कमी व क्षारता १.५ डेसी सायमन प्रती मीटर पेक्षा जास्त) फळबाग लागवड करू नये.
  • नांगराच्या तासात फळबाग लागवड करू नये. उत्पादित आयुष्य वाढविण्यासाठी खड्डा घेऊन लागवड करावी. या खड्ड्यात १ घमेले शेणखत अधिक सुपर फॉस्फेट १ किलो अधिक सुपीक माती एकत्र करून खड्डे भरावेत. आवश्यकतेप्रमाणे शिफारशीत दाणेदार कीटकनाशकांचा वापर करावा. या खड्ड्यामध्ये फळरोपांची लागवड करावी. नवीन रोपांना काठीचा आधार द्यावा.
  • जमिनीत एक फुटाच्या आत बेसॉल्ट खडकाची तळी लागल्यास फळबाग लागवड करू नये.
  • बहार धरण्यापूर्वी फळझाडांना नैसर्गिक ताण द्यावा. पाण्याच्या उपलब्धतेनुसार व बाजारपेठेनुसार बहराचे नियोजन करावे.
  • सध्या उभ्या असलेल्या फळबागेतील दोन ओळींमध्ये माती नमुना घेऊन परीक्षण करावे. परीक्षणामध्ये मातीचे पायाभूत गुणधर्म चांगले नसल्यास उदा. सामू ८.० पेक्षा जास्त, विद्युत वाहकता ०.५० डेसीसायमन प्रती मीटर पेक्षा जास्त व चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असतील तर सेंद्रिय खतांचा वापर जास्त करावा. शेताच्या कडेला भारी जमिनीत चार काढून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. जीवामृताची आळवणी दर दोन ते तीन महिन्याने वापसा असताना जमिनीतून करावी. माती परीक्षणानुसार कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर शेणखतात आठवडाभर मुरवून बहराच्यावेळी बेसल डोसमध्ये मिसळून झाडांना जमिनीतून द्यावे.
  • मुक्त चुनखडीचे प्रमाण १२ टक्केपर्यंत असलेल्या चुनखडीयुक्त जमिनीत आवळा, सीताफळ, अंजीर, बोर, इ. फळबागांची लागवड करू शकतो. मात्र, त्यासाठी या जमिनीत शेणखतांचा वापर जास्त करावा. जीवामृताची आळवणी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा (विशेषतः जस्त, लोह, बोरॉन) जमिनीतून व फवारणीद्वारे वापर करावा. या जमिनीत सूत्रकृमीची वाढ होण्याची शक्यता जास्त असते. अशा ठिकाणी जैविक कीटकनाशकांचा (उदा. ट्रायकोडर्मा प्लस) वापर किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रतिबंधक उपययोजना म्हणून दरवर्षी करावा.
  • फुलोरा अवस्थेत कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी रसायनांची तीव्र फवारणी करू नये. त्या ऐवजी या अवस्थेत जैविक कीड व रोग नाशकांचा वापर करावा
  • फळझाड लागवड ही शिफारशीत अंतरावरच करावी. फक्त शिफारस केलेल्या काही फळझाडांचीच लागवड घनपद्धतीने करता येते. उदा. पेरू अतिघन पद्धतीने २ × १ मीटर किंवा ३ × २ मीटर अंतरावर घन लागवड करावी. आंबा पिकामध्ये ५ × ५ मीटर अंतरावर घन लागवड करावी. मात्र या घनलागवड पद्धतीमध्ये फळे सुरु झाल्यावर करावयाच्या छाटणीचे तंत्र तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकून घ्यावे. त्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा भविष्यात कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
  • कृषी हवामान विभागवार शिफारस केलेल्या जमिनीच्या प्रकारानुसारच लागवड करावी. देशातील दुसऱ्या राज्यातील फळझाडे कलमे आणून लागवड करण्यापूर्वी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • फळबाग लागवडीपूर्वी शेतकऱ्यांनी वरील सूचनांचे पालन व व्यवस्थापन केल्यास फळबागेचे उत्पादित आयुष्य वाढण्यास मदत होईल. सोबतच जमिनीचे आरोग्यसुद्धा अबाधित राहून शाश्वत उत्पादनाकडे वाटचाल सुरू होईल.
  • संपर्क- शुभम दुरगुडे, ९४२०००७७३२ डॉ. अनिल दुरगुडे, ९४२०००७७३१ (शुभम दुरगुडे हे जी.बी.पंत. कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ पंतनगर, उत्तराखंड येथे मृदविज्ञान आचार्य पदवीचे विद्यार्थी असून, डॉ. अनिल दुरगुडे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागात कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com