कंपोस्ट खत तयार करण्याच्या पद्धती

NADEP and Banglore methods for preparation of compost
NADEP and Banglore methods for preparation of compost

सध्या लागवडीखाली असलेल्या संकरित जाती आणि पाण्याची पुरेशी उपलब्धता असलेल्या शेतांमध्ये एकापेक्षा जास्त हंगामात एकापाठोपाठ एक पिके घेतली जातात. पर्यायाने जमिनीला विश्रांती मिळत नाही. त्यातच केवळ रासायनिक खतांचा वापर वाढत आहे. खते आणि पाण्याच्या अतिरिक्त वापराने जमिनी क्षारपड होत आहेत. गेल्या काही वर्षामध्ये सेंद्रिय पदार्थांच्या कमतरतेमुळे जमिनीचा कसही कमी होत आहे. अशा जमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा जमिनीत वापर होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी कंपोस्ट खत महत्त्वाचे ठरते. शेतामध्ये उपलब्ध असलेला टाकाऊ स्वरूपाचा काडीकचरा, पिकांचे शिल्लक राहिलेले अवशेष, गोठ्यातील जनावरांचे मलमूत्र, तसेच बांधावरील पानगळ अशा उपलब्ध अवशेष कुजवून तयार केले जाणारे खत म्हणजे कंपोस्ट खत होय. यामध्ये निसर्गतः उपलब्ध जिवाणू कुजवण्याची प्रक्रिया करतात. आपल्याकडे सामान्यतः शेणखत व अन्य काडी कचरा हा एका खड्ड्यामध्ये टाकून वर्षअखेरीला खरीप हंगामाच्या पूर्वी या कुजलेल्या कंपोस्ट खताचा शेतामध्ये वापर करण्याची परंपरा आहे. मात्र, यासाठी मोठा कालावधी लागतो. ही कुजण्याची प्रक्रिया वेगाने होण्यासाठी कंपोस्ट करण्याच्या सुधारित पद्धतीची माहिती घेऊ. कंपोस्ट खत तयार करण्याच्या पद्धती इंदौर पद्धत 

  • इंदौर पद्धतीलाच ढीग पद्धत म्हणतात. या पद्धतीमध्ये सर्वसाधारणपणे ६ फूट रुंद व ५ ते ६ फूट उंच आणि सेंद्रिय पदार्थांच्या उपलब्धतेनुसार लांबी ठेवली जाते. त्यात शेतातील उरलेले पीक अवशेष, काडीकचरा, शेण, तण आदी सेंद्रिय पदार्थांचा त्यावर एक थर ठेवला जातो.  
  • ढीग पद्धतीमध्ये कुजण्याची प्रक्रिया उघड्यावर (ऑक्‍सिजनयुक्त वातावरणात) होते. ही प्रक्रिया लवकर होण्याकरिता एका महिन्याच्या अंतराने ढीग वर-खाली करून कुजणारे पदार्थ एकजीव केले जातात.  
  • ओलावा टिकविण्याकरिता अधूनमधून पाणी शिंपडले जाते.  
  • याशिवाय ढिगावर प्लॅस्टिकचे आच्छादन टाकल्यास तापमानात वाढ होऊन कुजण्याची क्रिया जलद होण्यास मदत होते.  
  • ३ ते ४ महिन्यांत चांगले कंपोस्ट खत तयार होते.  
  • या खतामध्ये ०.८ ते १.५ टक्के नत्र, ०.५ ते १ टक्का स्फुरद व १ ते १.८ टक्के पालाश यासह अन्य अन्नघटक असतात.
  • बंगलोर पद्धत

  • बंगलोर पद्धतीलाच खड्डा पद्धत म्हणतात. या पद्धतीमध्ये सर्वांत खालचा थर १५ ते २० सें. मी. जाडीचा काडीकचरा व इतर सेंद्रिय पदार्थांचा थर देऊन पाणी शिंपडून ओला केला जातो.  
  • अशाप्रकारे खड्डा भरून जमिनीच्या सुमारे दीड ते दोन फूट उंचीपर्यंत शेणमाती मिश्रण करून लिंपून घेतले जाते.  
  • सेंद्रिय पदार्थांची कुजवण्याची क्रिया लवकर होण्याकरिता अधूनमधून पाणी शिंपडले जाते.  
  • कुजण्याची क्रिया सुरुवातीला ऑक्‍सिजनविरहित वातावरणात होत असल्याने कुजण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे खत तयार होण्यास थोडा अधिक वेळ लागतो.  
  • या पद्धतीमध्ये अन्नद्रव्ये वाया जाण्याचे प्रमाण कमी असते.
  • नाडेप पद्धत 

  • ही पद्धत पुसद येथील एक गांधीवादी शेतकरी कै. नारायण देवराव पांढरीपांडे यांनी प्रयोगातून विकसित केली आहे.  
  • या पद्धतीत जमिनीवर पक्‍क्‍या विटांच्या साह्याने १० फूट लांब, ६ फूट रुंद व ३ फूट उंच अशा आकाराचे हौदाचे बांधकाम केले जाते. विटांच्या दोन ओळींनंतर तिसऱ्या ओळीत खिडक्‍या ठेवल्या जातात.  
  • या पद्धतीमध्ये सुमारे एक ते दीड टन काडीकचरा, १०० कि. ग्रॅ. शेण, दीड टन चाळलेली माती भरली जाते.  
  • नाडेप पद्धतीमध्ये सर्वांत खालचा थर चांगला ठोकून शेणाचा सडा टाकून घेतात.  
  • त्यानंतर ६ इंच जाडीचा काडीकचरा थर व इतर सेंद्रिय पदार्थांचा थर देऊन, त्यावर १०० लिटर पाण्यात ४ ते ५ कि. ग्रॅ. शेण मिसळून शिंपडले जाते.  
  • यानंतर साधारणतः १ ते २ इंच जाडीचा चाळलेला मातीचा थर अर्धा देऊन परत पाणी शिंपडून ओलावा केला जातो.  
  • अशा प्रकारे ३ ते ४ महिन्यांत उत्कृष्ट कंपोस्ट तयार होते.
  • कंपोस्ट खताचे फायदे

  • कंपोस्ट खत हा कोणताही शेतकरी स्वतःच्या शेतावर तयार करू शकतो.  
  • कंपोस्ट खतनिर्मितीमध्ये टाकाऊ सेंद्रिय पदार्थाचा पुनर्वापर केला जातो.  
  • यामध्ये फारसा खर्च येत नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे आहे.  
  • कंपोस्ट खतामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवून सूक्ष्म जीवांची संख्या वाढते.  
  • कंपोस्ट खताच्या वापरामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते. जमिनीची धूप कमी होते.
  • संपर्कः रवींद्र जाधव, ९४०३०१६१०१ (लेखक सॅम हिग्गीनबॉटम कृषी, तंत्रज्ञान आणि विज्ञान विश्वविद्यालय, अलाहाबाद येथे आचार्य पदवी घेत आहेत.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com