ग्लॅडिओलस लागवडीबाबत माहिती द्यावी.

ग्लॅडिओलस लागवडीबाबत माहिती द्यावी.

ग्लॅडिओलस लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. पोयट्याची आणि चांगला निचरा असणारी जमीन फुलांचे लांब दांडे आणि कंदवाढीस उपयुक्त असते. चुनखडी, तसेच हलक्‍या बरड जमिनीत याची लागवड करू नये.

लागवड खरीप तसेच रब्बी हंगामात करावी. सर्व लागवड एकाच वेळी न करता १५ दिवस किंवा एक महिना, असे अंतर ठेवून लागवड करावी. लागवडीसाठी गेल्या हंगामातील, तीन ते चार महिने विश्रांती घेतलेले चांगले कंद निवडावेत. लागवड सरी वरंब्यावर ४५ x १५ सें.मी. अंतराने करावी. सपाट वाफ्यात लागवड करताना ३० सें.मी. x २० सें.मी. अंतराने, पाच ते सात सें.मी. खोलीवर कंदांची लागवड करावी.

जातींची निवड ः लागवडीसाठी पिवळसर रंगाची फुले ‘गणेश’, फिकट गुलाबी रंगाची फुले ‘प्रेरणा’, जांभळट गुलाबी रंगाची फुले ‘तेजस’ आणि निळ्या रंगाची फुले ‘नीलरेखा’ या जाती निवडाव्यात. त्याचबरोबरीने फिकट गुलाबी रंगाची ‘सुचित्रा’, लाल रंगाची ‘पुसा सुहागन’, निळ्या रंगाची ‘ट्रॉपिक सी’, पिवळसर रंगाची ‘सपना’, पांढऱ्या रंगाची ‘संसरे’, केशरी रंगाची ‘हंटिंग सॉंग’या जातीही बाजारपेठेच्या दृष्टीने फायदेशीर आहेत.पुरेसे शेणखत जमिनीची मशागत करताना मिसळावे.

मातीपरीक्षणानुसारच लागवडीच्या वेळी २०० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश प्रतिहेक्‍टरी द्यावे. प्रतिहेक्‍टरी नत्र खताची ३०० किलो मात्रा तीन समान हप्त्यांमध्ये द्यावी. नत्राची मात्रा पिकाला दोन, चार आणि सहा पाने आल्यावर म्हणजेच लागवडीनंतर तीन, पाच आणि सात आठवड्यांनी सम प्रमाणात विभागून द्यावी. रासायनिक खते दिल्यावर पाण्याची पाळी द्यावी.

संपर्क : ०२०- २५६९३७५० राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेश खिंड, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com