कांदा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन

कांदा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन
कांदा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन

कांदा उत्पादकता कमी होण्यासाठी असंतुलित खत व्यवस्थापन हा प्रमुख घटक कारणीभूत आहे. चांगल्या प्रतीच्या उत्पादनासाठी माती परीक्षणानुसार संतुलित खत व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. रांगडा कांद्याची लागवड ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर महिन्यात होते. कांदा वाढीस लागण्याचा काळ हा डिसेंबर महिन्यात येतो. या काळात रात्रीचे तापमान १० ते १५ अंश सेल्सिअस आणि दिवसाचे तापमान २० ते २५ अंश सेल्सिअस असते. कंद वाढीस लागण्याची क्रिया चांगली होते. जानेवारी महिन्यातील सौम्य हवामान व स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे कांदा चांगला पोसतो.

फेब्रुवारी ते मार्च या काळात दिवसाच्या तापमानात वाढ होते. या दरम्यान कांदा चांगला तयार होतो. त्याच्या माना पडतात, काढणीनंतर सुकवणी चांगल्या प्रकारे होते, त्यामुळे कांदे वजनाने जास्त भरतात. परिणामी उत्पादन चांगले मिळते. परंतु, या हंगामात डेंगळा व जोडकांदा यांचे प्रमाण वाढते.   खत व्यवस्थापन ः नत्र ः

  • पुनर्लागवडीनंतर वाढीच्या सुरुवातीला तसेच कांदा पूर्ण वाढत असताना नत्राची आवश्‍यकता अधिक असते.
  • रोप लागवडीनंतर दोन महिन्यांपर्यंत नत्राची जास्त गरज असते, मात्र पूर्ण वाढल्यानंतर नत्राची आवश्‍यकता नसते. म्हणजेच अशा वेळी नत्र दिल्यास किंवा उशिरा दिल्यास डेंगळा व जोडकांदा येणे व साठवणीत कांदा सडणे, असे प्रकार होतात.
  • स्फुरद 

  • मुळांच्या वाढीसाठी स्फुरदची आवश्‍यकता असते.
  • प्रकाशसंश्‍लेषनाद्वारे अन्न तयार होण्याची क्रिया वेगाने होते. त्यामुळे कंदाचे पोषण चांगले होऊन, कंदाचा आकार आणि वजन वाढते.
  • पालाश ः

  • अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत पालाश सहभागी होत नाही. परंतु, पिकाच्या पेशींमध्ये वाहतुकीदरम्यान पेशींना काटकपणा येण्यासाठी उपयोगी.
  • रंग तसेच रोगप्रतिकारक शक्ती आणि टिकाऊपणा वाढवण्यासाठी पीकवाढीच्या सर्व अवस्थांमध्ये पालाशची आवश्‍यकता असते.
  • गंधक ः

  • गंधकामुळे सूक्ष्म स्तरावर वाढलेला जमिनीचा सामू कमी होऊन, इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होते.
  • कांद्याचा तिखटपणा, वजन वाढते. साठवणीत कांदा जास्त काळ टिकतो. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत नाही.
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये ः

  • कांदा पिकास तांबे, लोह, जस्त, मॅग्नीज व बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे कांदे मऊ पडतात. कांद्यावरील पापुद्रा ठिसूळ व फिकट पिवळा पडून गळून जातो.
  • बोरॉनच्या कमतरतेमुळे रोपांची वाढ खुंटते, पातीचा रंग करडा निळसर होतो. पात कडक व ठिसूळ बनते.
  • झिंकच्या कमतरतेमुळे पात जाड होऊन खालच्या बाजूला वाकते.
  • खत व्यवस्थापन (प्रतिएकर) ः रोपे रुजण्याची अवस्था (लागवडीच्या वेळी) ः

  • २४ः२४ः०० हे खत ७६ किलो, एमओपी ४० किलो, गंधक २० किलो, मॅग्नेशिअम सल्फेट ५ किलो व सूक्ष्म अन्नद्रव्ये १ किलो ही सर्व खते एकत्र करून जमिनीतून द्यावीत.
  • २४ः२४ः०० या खतात नायट्रेट व अमोनिकल या दोन्ही स्वरूपांतील नत्र असून, २ टक्के गंधकसुद्धा आहे.
  • यामुळे पिकाची जलद, निरोगी व शाखीय वाढ जोमदार होते. पातीचा हिरवेगारपणा दीर्घकाळ टिकून राहतो.
  • हे खत आम्लयुक्त असल्यामुळे जमिनीचा सामू व पोतसुद्धा सुधारतो. खताचा लागवडीच्या वेळी वापर केल्यामुळे डेंगळा व जोडकांद्याचे प्रमाणसुद्धा कमी होते.
  • २) सुरुवातीच्या वाढीची अवस्था (लागवडीनंतर ३० दिवसांनी) ः

  • १०ः२६ः२६ हे खत ६० किलो, मॅग्नेशियम सल्फेट ५ किलो एकत्र करून जमिनीतून द्यावेत. या खताच्या दाण्यावर आवरण असल्याने स्फुरदाची उपलब्धता सुधारते.
  • मुळांचा विकास मोठ्या प्रमाणावर होऊन अन्नद्रव्यांचे कार्यक्षम पोषण होते. पात हिरवीगार राहते. कांद्याचा आकार एकसारखा गोलाकार मिळतो. एकूण उत्पादनात १२ ते १५ टक्के वाढ होते.
  • ३) जोमदार वाढीची अवस्था (लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांनी) ः लागवडीनंतर ४५ दिवसांनी ः

  • एसओपी (फिल्डग्रेड) ः २० किलो जमिनीतून द्यावे.
  • पिकाच्या जोमदार वाढीच्या अवस्थेतील पोटॅशची गरज एसओपी भागवते.
  • लागवडीनंतर ६० दिवसांनी ः

  • ००ः५२ः३४ हे खत ४ ग्रॅम + सूक्ष्म अन्नद्रव्ये १ ग्रॅम एकत्र करून प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • या फवारणीमुळे कंद पोषणाच्या काळात सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासत नाही. या काळात जैव रासायनिक क्रिया घडत असतात.
  • या फवारणीमुळे कंदाचा आकार वाढतो. कंद घट्ट होतात.
  • ४) कंद वाढीची अवस्था (लागवडीनंतर ७५ ते १०५ दिवसांनी) ः

  • या अवस्थेत ००ः००ः५० हे खत ५ ग्रॅम+ बोरॉन २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • ००ः००ः५० मुळे कांदे पक्व होण्यास मदत होते. बोरॉनमुळे पानात तयार झालेली शर्करा कंदामध्ये उतरते. कंदातील टीएसएस वाढतो. कांद्याची गुणवत्ता सुधारते. साठवण कालावधी वाढतो.
  • (एक्‍झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिंडेंट, सेल्स आणि फिल्ड मार्केटिंग, सीएनबी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com