वैविध्यपूर्ण पीक बदलातून क्षार समस्याग्रस्त जमिनीत सुधारणा

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या करनाल (हरियाना) येथील केंद्रीय मृदा क्षारता संशोधन संस्था (CSSRI) आणि पाली (राजस्थान) येथील कृषी विज्ञान केंद्र यांनी एकत्रितरीत्या राजस्थानातील पाली जिल्ह्यातील क्षारामुळे पडीक राहत असलेल्या जमिनी लागवडीखाली आणून उत्पादनक्षम करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
Soil
SoilAgrowon

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या करनाल (हरियाना) (ICAR Karnal) येथील केंद्रीय मृदा क्षारता संशोधन संस्था (Central Soil Salinity Research Institute) (CSSRI) आणि पाली (राजस्थान) येथील कृषी विज्ञान केंद्र यांनी एकत्रितरीत्या राजस्थानातील पाली जिल्ह्यातील क्षारामुळे पडीक राहत असलेल्या जमिनी लागवडीखाली आणून उत्पादनक्षम करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याचे चांगले निष्कर्ष मिळाले असून, त्याचा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या तणावाखाली असलेल्या गरीब शेतकरी कुटुंबांना फायदा झाला आहे.

राजस्थानमध्ये अधिक तापमान आणि क्षारयुक्त पाण्यामुळे जमिनी वेगाने क्षारयुक्त होत आहे. त्यामध्ये पिकांचे उत्पादन अत्यंत कमी मिळते. अशा स्थितीमध्ये पिके घेणेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने नुकसानकारक ठरू लागले आहेत. अशा विविध तणावाच्या स्थितीमध्ये कालबद्ध कार्यक्रम राबवून स्थानिक उपाययोजनांच्या साह्याने पिकांचे शाश्‍वत उत्पादन घेण्यासाठी संस्थात्मक प्रयत्न करण्यात आले. या अभ्यास प्रक्षेत्रामध्ये असलेल्या विहिरीमुळे सिंचनाची सोय झाली. मात्र या भागातील पाण्याचा दर्जा आणि प्रमाण यात गेल्या दशकापासून सातत्याने घट होत असल्यामुळे समस्या वाढत होती. पाली जिल्ह्यातील रामपुरा, रूपावास, ढोलेरिया, मुकानपुरा आणि हिमावास या पाच गावांतील माती आणि पाण्यातील वाढलेल्या क्षारांच्या समस्येमुळे हैराण असलेल्या ८६ शेतकऱ्यांची निवड केली. त्यातच वातावरणातील बदलामुळे पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.

Soil
Soil Fertility : जमिनीतील उपयुक्त जिवाणू वाढवा...

येथील शेतकऱ्यांच्या शेतीतील माती आणि पाण्यातील क्षारांचे नेमके प्रमाण मोजण्यात आले. त्यानंतर त्यातील क्षारांचे प्रमाण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या व्यवस्थापन पद्धती सुचविण्यात आला. या पद्धतीसंदर्भातील योग्य ती शास्त्रीय माहिती व अनुभव पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या विस्तार पद्धतींचा अवलंब करण्यात आला. उदा. शेतांना भेटी, शिवार फेरी, प्रत्यक्ष शेतकऱ्यांसोबत संवाद, लक्ष्य निर्धारित करून चर्चासत्रांचा आयोजन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शास्त्रज्ञ शेतकरी यांच्या भेटी, संवाद अशा सातत्यपूर्ण विस्तार कार्यक्रमावर भर देण्यात आला. त्याच प्रमाणे क्षार सहनशील पिकांचे सुधारित वाण त्यांना पुरवण्यात आले.

समस्येचे निदान ः

- या शेतकऱ्यांच्या जमिनीमधील माती हा वालुकामय गाळाची ते चिकण गाळाची या दरम्यानच्या पोताची आहे. त्यातील क्षारतेचे प्रमाण मध्यम आहे.

-मातीचा सामू ७.७८ ते ९.३३ (सरासरी = ८.६७)

- मातीतील क्षाराचे प्रमाण ईसी ०.२९ ते ७.४० डेसिसायमन प्रति मीटर (dS/m) (सरासरी = १.४६ dS/m).

- या भागातील विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यातील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक नमुने हे उच्च क्षारयुक्त निघाले. या पाण्याची क्षारता ईसी ५.० ते १३.२ dS/m इतका होता. इतक्या क्षारतेचे पाणी शेतीसाठी अयोग्य मानले जाते.

- उर्वरित २५ टक्के पाणी नमुने मध्यम क्षारयुक्त (ईसी ०.४० ते ५.० dS/m) होते. त्यांचा वापर योग्य प्रकारे सिंचनासाठी करता येऊ शकतो.

- अभ्यास प्रक्षेत्रातील बहुतांश शेतकऱ्यांनी (सुमारे ८० टक्के) गेल्या दोन ते तीन दशकांमध्ये वातावरण बदलांच्या स्थितीमुळे एकूण पावसाचे दिवस कमी झाल्याचे आणि तीव्र वातावरण स्थिती वाढल्याचे सांगितले.

- या भागामध्ये एकूणच वातावरण बदल, शिक्षणाचे अल्प प्रमाण, गरिबी यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हे शेतकरी परिसरातील कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी संस्थांपर्यंत पोहोचतही नव्हती. अशा एकूण स्थितीमुळे वातावरण बदलासंदर्भात या शेतकऱ्यांची संवेदनशीलता लक्षणीयरित्या वाढत चालली होती.

Soil
Soil Health : ओळखा जमिन क्षारपड होण्याची कारणे ?

उपाययोजना ः

१) या भागातील सिंचन ज्या विहिरींच्या पाण्यावर अवलंबून आहे, त्याची क्षारता कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरवले.

२) काही नमुना शेतकऱ्यांमध्ये प्राथमिक पातळीवर पारंपरिक पिकांऐवजी योग्य आणि चांगला नफा मिळवून देणाऱ्या पीक पद्धतीवर भर देण्यात आला.

३) प्रत्येक शेतकऱ्यांची माती व पाणी तपासून मातीचे आरोग्य कार्ड देण्यात आले. त्यासोबत विहिरीतील पाण्याची क्षारता कमी करण्याचे उपाय सूचविण्यात आले. सोबतच अशा पाण्याचा पिकांसाठी कशा प्रकारे वापर करायचा, याची पद्धती समजाविण्यात आली.

४) पिकांच्या क्षार सहनशील जातींचे बियाणे व रोपे पुरविण्यात आली. उदा. गहू सीव्ही केआरएल २१०, मोहरी सीव्ही सीएस ५४. त्याच प्रमाणे अन्य स्थानिक पिकांच्या सुधारित जाती उदा. मुंग सीव्ही IPM०२-३, तीळ सीव्ही RT-३५१, खरबूज सीव्ही कजरी यांच्या बिया आणि बोर जात गोला यांची रोपे.

५) शेतीमधील सुधारित व्यवस्थापन पद्धती आणि क्षारांचे धोके कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.

वैविध्यपूर्ण पिकांमुळे वाढला शेतकऱ्यांचा नफा

- रब्बी हंगामामध्ये घेतलेल्या मोहरी- खरबूज आणि मोहरी आणि तीळ अशा पीक पद्धतीमुळे निव्वळ उत्पन्नामध्ये अनुक्रमे १६.६०% ते २८.९०% इतकी वाढ झाली. त्याच प्रमाणे गहू सीव्ही केआरएल २१० ( गहू - खेजरी, गहू - तीळ) अशा पीक पद्धतीमध्ये निव्वळ उत्पन्न २० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक वाढले.

- खरीप हंगारामध्ये खेजरी किंवा बोर बागेमध्ये मुगाचे आंतरपीक घेण्यात आले. त्यामुळे निव्वळ उत्पन्नांमध्ये अनुक्रमे २३.५० आणि २८.५०% इतकी वाढ झाली.

कोरडवाहू क्षारयुक्त परिस्थितीमध्ये पिकांच्या वैविध्यपूर्ण लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर झालेला परिणाम*

पीक बदलाचे घटक --- निव्वळ नफा (रु./ हेक्टर)

अ) रब्बी हंगाम --- प्रयोगापूर्वी --- प्रयोगानंतर --- एकूण बदल --- वाढ (टक्के)

केआरएल-२१० गहू (सिंचित) - खेजरी(Prosopis cineraria)** --- ४५,१२५ --- ५३,८७५ --- ८,७५० --- १९.४

केआरएल -२१० गहू - खरबूज --- ७८,३५० --- ९२,१०० --- १३,७५० --- १७.५

केआरएल २१० गहू - तीळ --- ३५,६२५ --- ४३,८५० --- ८,२२५ --- २३.१

सीएस मोहरी (दोन पाणी - खेजरी --- ४०,३४० --- ४८,८५० --- ८,५१० --- २१.१

सीएस ५४ मोहरी (दोन पाणी) - खरबूज --- ७३,५५० --- ८५,७६० --- १२,२१० --- १६.६

सीएस ५४ मोहरी (दोन पाणी) - तीळ --- २५,६४० --- ३३,०४० --- ७,४०० --- २८.९

ब) खरीप हंगाम

मूग (कोरडवाहू)- खेजरी --- ३३,२५० --- ४१,०५० --- ७,८०० --- २३.५

मूग (कोरडवाहू) - बोर गोला --- ६०,३०० --- ७७,५०० --- १७,२०० --- २८.५

* २०१७ ते २०२१ दरम्यान झालेल्या प्रयोगाचे निष्कर्ष

** खेजरीची (शमी) हेक्टरी ६ ते ८ झाडे अभ्यास गटातील शेतकऱ्यांनी लावली होती.

-आर्थिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने मूग आणि बोर या दोन पिकांमध्ये करण्यात आलेले बदल अधिक फायदेशीर ठरले. (निव्वळ उत्पन्न ७७,५०० प्रति हेक्टर) या दोन्ही पिकांसाठी आवश्यक निविष्ठांचे प्रमाणही कमी होते. त्यापासून जमिनीच्या आरोग्याला फायदा झाला. तसेच जनावरांना चारा उपलब्ध झाला.

-अशा छोट्या छोट्या बदलामुळे शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढले. त्याच प्रमाणे अन्न आणि चाराही उपलब्ध झाला. मूग आणि खेजरी यांच्या उपलब्ध झालेल्या चाऱ्यामुळे चाऱ्यांचा प्रश्‍न बऱ्याच अंशी सुटला. विशेषतः ऐन खरीपामध्ये पूर्वी चाऱ्याची कमतरता भासत असे.

-सातत्यपूर्ण प्रबोधनामुळे अभ्यासामध्ये समाविष्ट झालेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी बहुसंख्य (६३ टक्के) शेतकऱ्यांना मातीचे आरोग्याचे महत्त्व समजले. त्याच प्रमाणे त्यांनी मातीच्या आरोग्य कार्ड नुसार मिळालेल्या शिफारशीनुसार संतुलित रासायनिक खतांचा वापर करणार असल्याचे सांगितले.

-या प्रयोग क्षेत्रातील विहिरींच्या पाण्याची उपलब्धता आणि दर्जा यांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. पाण्याची क्षारता मध्यम क्षारयुक्त (ईसी ५.० ते १३.२ dS/m) आणि तुलनेने कमी क्षारयुक्त (ईसी ०.४० ते ५.० dS/m) झाला. त्यामुळे सिंचनासाठी पाणी वापरणे व त्यातून चांगले उत्पादन घेणे शक्य होऊ लागले.

हे धडे शिकले...

वैविध्यपूर्ण बहूपीक पद्धती आणि पीक बदल यातून वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या अनेक धोका बऱ्याच अंशी कमी ठेवण्यात यश आले.

सामुदायिक पद्धतीने काम केल्यामुळे पाण्याचा दर्जा सुधारला.

पारंपरिक शेती पद्धतीमध्ये विशेषतः सिंचनामध्ये सुधारणा झाली.

अधिक क्षार समस्याग्रस्त क्षेत्रामध्ये वृक्ष शेती, क्षार सहनशील अशी आच्छादन पिके घेतल्यामुळे उत्पन्न सुरू झाले.

एकूणच सामुदायिक प्रयत्न आणि विस्तार कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या क्षार समस्यायुक्त जमिनी आणि पाणी यामध्ये एक प्रकारची शाश्‍वतता साधता आली.

(स्रोत ः केंद्रीय मृदा क्षार संशोधन संस्था, करनाल, हरियाना आणि केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्र, पाली, राजस्थान)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com