
AI Update : अनेक वर्षांपासून कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) बोलले जात आहे. त्याविषयी शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या पातळीवर चर्चा होत आहेत. त्याच्या फायद्याविषयी होत असलेल्या अनेक उलट सुलट चर्चांमुळे सर्वसामान्यांमध्येही त्याविषयी कुतूहल निर्माण झालेले दिसते. मात्र हे सारे जग आपल्यापासून खूप दूर आहे, असा एक भाव सर्वसामान्यांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये दिसून येतो.
मात्र गेल्या काही वर्षांपासून आपल्या दैनंदिन जीवनातही कृत्रिम बुद्धिमत्तेने कळत नकळत शिरकाव केलेला आहे. आपण स्वतःही त्याचा अनेक वेळा कळत नकळत वापर करत असतो.
उदा. वेगवेगळ्या प्रकारची स्वयंचलित उपकरणे वापरणे, बँकेमधील ‘एटीएम’चा वापर करणे, ऑटोमॅटिक किंवा स्वयंचलित वाहने, आवाज, चेहरा किंवा हाताचे ठसे ओळखणारी सुरक्षा उपकरणे किंवा हजेरी ठेवणारी यंत्रे इ. अगदी मोबाईलमध्ये नकाशाद्वारे केला जाणारा दिशादर्शकाचा वापर आपण कमी कालावधीत इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी अनेक वेळा करत असतो.
अजून सोपं उदाहरण म्हणजे आपण जेव्हा मोबाईलद्वारे एखादा मजकूर लिहितो. तो थोडाफार चुकीचा असल्यास आपोआप दुरुस्त करणारी यंत्रणा तुम्हाला बरोबर शब्द किंवा वाक्य सुचवते. तुमचा अर्धवट लिहिलेला शब्द किंवा चक्क वाक्यही पूर्ण केले जाते. काही हाताने लिहिण्याचे की- पॅड उपलब्ध झालेले आहेत.
त्यात तुमचे हस्ताक्षर व त्याचे फटकारे लक्षात ठेवून, त्याचे पॅटर्न लक्षात ठेवून पुढील वेळी ते शब्द किंवा वाक्य तशीच्या तशी टाइप होतात. हे जाऊ द्या, आपण आता मोबाईल उघडण्यासाठी जो बोटाच्या ठशाचा किंवा चेहऱ्याचा वापर करतो, त्यामागेही कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यरत असते.
त्याचाच पुढील टप्पा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे चॅटबॉट. आता शहरी निमशहरी भागातील बॅंकांमध्येही यांचा सर्वसामान्य ग्राहकांच्या मदतीसाठी वापर केला जात आहे. ही यंत्रे आपला प्रश्न समजून घेऊन त्यांना स्वयंचलित किंवा आपोआप प्रतिसाद देतात.
काही वेळा आपण आपले प्रश्न काही बटनांवर क्लिक करून किंवा मजकुराद्वारे किंवा प्रत्यक्ष संभाषणाद्वारेही विचारू शकते. यातील संभाषण एखाद्या शेजारी उभे राहिलेल्या माणसांशी व्हावे, तसे असू शकते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण काय विचारत आहोत, ते समजून घेऊन त्यानुसार योग्य ती मदत करण्यासाठी किंवा आपल्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी ही यंत्रे तत्पर असतात.
‘चॅट-जीपीटी’ पोहोचतेय शेतकऱ्यांपर्यंत
सर्वत्र चर्चेत असलेले ‘चॅट-जीपीटी’ हेही एक चॅटबॉटच आहे. त्यामध्ये आपण काही प्रश्न विचारले की त्याची सखोल उत्तरे किंवा प्रदीर्घ लेख, कविता, निबंध इ. लिहून देऊ शकतो. कारण त्यामध्ये जगभरातील सर्व विषयांची सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.
त्याचा वापर करून एखाद्या माणसांप्रमाणे आवश्यक त्या वाक्यरचना करून उतारेच्या उतारे, बातम्या, लेख इ. लिहू शकतो. आजवर ज्या रचना या केवळ माणसांच्या सृजनशीलतेच्या परिघातच शक्य वाटत होत्या, त्याही हा चॅटबॉट तयार करू शकतो. असा त्यांच्या निर्मात्यांचा दावा आहे.
आजवर फक्त एकाच कंपनीने असा चॅट जीपीटी बाजारात उतरवला होता. मात्र या स्पर्धेमध्ये अनेक तंत्रज्ञान कंपन्या उतरल्या असून, लवकरच त्यांचेही अधिक प्रगत असे चॅटबॉट बाजारात उपलब्ध असतील. ‘चॅट-जीपीटी’चा वापर काही तंत्रज्ञान स्नेही आणि प्रगतिशील शेतकरी व त्यांचे गट करू लागले आहेत.
संपूर्ण जगभर कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्राचा वापर अनेक दैनंदिन कार्यामध्ये करण्यासंदर्भात संशोधन होत आहे. टेसला, गुगल आणि अन्य काही तंत्रज्ञान कंपन्यांद्वारे चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या निर्मितीवर भर दिला आहे. त्याच्या विविध ठिकाणी चाचण्याही सुरू झालेल्या आहेत.
तसे तर विमान चालविण्यासाठी या पूर्वीपासूनच ऑटोपायलट मोड म्हणजेच एक प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यरत झालेली आहे. मात्र रस्त्यावरील गर्दी, वर्दळ, वेडीवाकडी वाहणारी वाहने आणि त्यातच आडवे तिडवे रस्ते अशा स्थितीमध्ये चारचाकी चालविण्यासाठी आधुनिक सेन्सर्स, जीपीएस (जागतिक स्थान निर्धारण प्रणाली) यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत असते.
भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्राचा वापर करून बरीच क्लिष्ट कामे ही सहज व सोपी होणार आहे व कृषी क्षेत्र सुद्धा यामध्ये मागे नाही.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय?
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाद्वारे निर्मित यंत्रे किंवा वेगवेगळ्या प्रणाली या मानवी बुद्धीची नक्कल किंवा अनुकरण करतात. त्यामुळे या प्रणाली किंवा यंत्राद्वारे केले जाणारे अपेक्षित कार्य किंवा घेतला जाणारा निर्णय हा एखाद्या माणसांने आपली सर्व बुद्धी वापरून घेतल्याप्रमाणे होत जातो.
हे कसं शक्य होतं?
वेगवेगळी यंत्रे व संवेदके यांच्या साह्याने प्रत्यक्ष परिस्थितीची सातत्याने माहिती गोळा केली जात असते. त्यांचे प्रशिक्षित संगणकीय प्रणालीमध्ये सातत्याने विश्लेषण केले जाते. त्याचे तयार होणारे वेगवेगळे पॅटर्न नोंदवून ठेवले जातात. अशा परिस्थितीमध्ये माणूस काय आणि कसा निर्णय घेतो, याच्याही नोंदी याच संगणकीय प्रणालीमध्ये साठवलेल्या असतात.
तशा प्रकारचा पॅटर्न तयार झाला की त्यावेळी माणसांने काय निर्णय घेतला असता हे तपासले जाते. तसा निर्णय त्या यंत्रणेद्वारे घेतला जातो. म्हणजे त्या संगणकीय प्रणालीद्वारे त्या त्या यंत्राच्या त्या त्या अवयवाला किंवा संवेदकांना तशा सूचना पाठवल्या जातात. ही क्रिया त्वरित होते.
म्हणजेच माणसाप्रमाणे कार्यान्वित होणारी बुद्धीमत्ता संगणकीय प्रणालीद्वारे तयार केली जाते. त्यालाच कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणतात. एखादा माणूस ते यंत्र चालविण्यासाठी बसला असता तर ज्या प्रमाणे सर्व निर्णय घेतले गेले असते, त्याचेच अनुकरण किंवा नक्कल यामध्ये केली जाते. प्रत्यक्षात ते यंत्र आपल्याला आपोआप चालल्याप्रमाणे दिसते.
कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना...
सध्या साध्या, सोप्या आणि सुटसुटीत प्रक्रियांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. मात्र शेतीमध्ये एकाच वेळी अनेक घटक कार्यरत असतात. एखाद्या निर्णयामागे शेतीचे स्थान, तेथील हवामान, मातीचा प्रकार, पाण्याचा दर्जा, उपलब्ध निविष्ठांचे वेगवेगळे प्रकार, त्यानुसार बदलणाऱ्या त्यांच्या वेगवेगळ्या मात्रा अशा अनेक बाबी असतात.
त्यामुळे कृषी क्षेत्रामधील वरवर सोप्या दिसणाऱ्या अनेक क्रिया या वस्तुतः अत्यंत विषम, जटिल व क्लिष्ट आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये अनेक आव्हाने आहेत. मात्र शेती क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी मोठ्या संधी, आवश्यकता आणि वाव आहे.
करायची आवश्यकता व वाव सुद्धा आहे. त्यामुळे हे क्षेत्र सर्वच कृत्रिम बुद्धीमत्ता विकसनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत अशा सरकारी, खासगी संशोधन संस्थांना खुणावत आहे. कृषी यंत्रे व अवजारे बनविणाऱ्या कंपन्यांनीही यात उडी घेतलेली आहे. परदेशातच नव्हे तर भारतातही संपूर्ण स्वयंचलित अशा चालकरहित ट्रॅक्टर, काढणी यंत्रे यांच्या चाचण्या काही कंपन्यांकडून सुरू झाल्या आहेत.
उदाहरणार्थ
१. पीक, पिकाचा प्रकार, पिकाच्या वाढीची अवस्था व त्यावर वेगवेगळ्या स्थितीमध्ये येणारे वेगवेगळ्या प्रकारचे ताण ओळखणे. त्यानुसार पिकाची वाढ व उत्पादनाचा अंदाज लावणे.
२. मातीच्या छायाचित्रातील रंग किंवा संवेदकांकडून मिळालेल्या माहितीवरून मातीचे प्रकार, त्याचे गुणधर्म, त्यातील मूलद्रव्यांचे - खनिजांचे प्रमाण ओळखणे, त्यानुसार शेतकऱ्याला खतमात्रा किंवा सुधारणे संदर्भात आवश्यक त्या सूचना देणे.
३. पानांच्या रंग व लक्षणावरून पिकातील रोगांचा प्रादुर्भाव शोधणे, अंदाज लावणे. तोच प्रकार किडीसंदर्भातही वापरणे.
४. शेतीमधील वेगवेगळ्या क्रिया मातीचा प्रकार, पीक व हवामान यानुसार स्वयंचलित व काटेकोरपणे वेळीच सर्व कामे उदा. मशागतीची कामे, सिंचन, फवारणी, तण काढणी, पीक काढणी इ. करणे.
५. पीक किंवा फळे काढणीयोग्य झाल्याचे ओळखून काढणीच्या सूचना शेतकऱ्याला किंवा संबंधित स्वयंचलित यंत्राला देणे.
६. उत्पादनाची प्रतवारी व वर्गीकरण करणे.
७. उत्पादनाची वाहतूक व विक्री व्यवस्थापन.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.