गुलाबी बोंड अळी रोखण्यासाठी टाळा पूर्वहंगामी कपाशी

गेल्या काही वर्षांमध्ये कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या किडीमुळे पिकाचे मोठे नुकसान होते.
Pink Bollworm
Pink BollwormAgrowon

डॉ. योगेश मात्रे

डॉ. पी. आर. झंवर

डॉ. एस. डी. बंटेवाड

गेल्या काही वर्षांमध्ये कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या किडीमुळे पिकाचे मोठे नुकसान होते. कपाशीची फरदड घेणे, त्यानंतर पूर्वहंगामी कापूस लागवड अशा प्रकारे पीक सतत शेत परिसरामध्ये उपलब्ध असल्याने या किडीसाठी खाद्याची उपलब्धता वर्षभर होत राहते. त्यातून त्यांच्या पिढ्या वाढत राहतात. या किडीचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत पिकांचे अवशेष व्यवस्थित नष्ट करणे या बरोबरच पूर्वहंगामी कपाशी लागवड करण्याचे टाळणे आवश्यक आहे. नवीन लागवड ही जून महिन्यांमध्ये ८०-१०० मिमी पाऊस झाल्यानंतरच करावी. येत्या हंगामात या किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील बाबींवर लक्ष केंद्रित करावे.

  • हंगाम संपल्यावर शेवटच्या पिढीतील गुलाबी बोंड अळ्या या प्रादुर्भावग्रस्त बोंडे, परतीची पऱ्हाटीची धसकटे अथवा मातीत सुप्तावस्थेत जातात. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होऊन किडींचा पुढील प्रसार थांबवण्यासाठी असे अवशेष वेळेत नष्ट करणे आवश्यक आहे.

  • शेताच्या धुऱ्यावर किंवा बांधावर कापसाच्या धसकटाचा साठा करू नये.

  • मार्केट यार्ड, जिनिंग मिल परिसरात कामगंध सापळे २० मीटर अंतरावर कमीत कमी १० कामगंध सापळे लावावेत. सुप्तावस्थेतील अळ्यांपासून निघालेले पतंग कामगंध सापळ्यामध्ये अडकतील. या सापळ्यामध्ये अडकलेले पतंग नष्ट करावेत. सोबतच सरकीतून निघालेल्या अळ्यांचा नायनाट करावा. सापळ्यातील ल्युर निर्धारित वेळी बदलावेत. पुढील उत्पत्ती रोखण्यास मदत होईल. अन्यथा हे पतंग जवळपास शेतात तेथील कपाशी पिकावर प्रादुर्भाव करतील.

  • पूर्वहंगामी कापसाची पेरणी करणे टाळावे. लवकर पेरलेल्या कपाशीवर लवकर पात्या, फुले येतात. पावसाबरोबर सुप्तवास्थेतून बाहेर पडणारे गुलाबी बोंड अळीचे पतंग अशा पूर्वहंगामी पिकाच्या पात्या व फुलांवरच आपली अंडी देतात. इतरत्र कापसाचे पीक नसल्यामुळे लवकर पेरलेले कपाशीचे पीक गुलाबी बोंड अळीला बळी पडू शकते.

  • वेळेत नियंत्रण न केल्यास किडीच्या पुढच्या पिढ्या तयार होण्यास मदत होते. त्यांचा प्रसार पुढे हंगामी कपाशीवर स्थलांतरित होतो.

  • लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरणी करून मशागत करावी. मातीत लपलेले कोष व सुप्तावस्थेतील अळ्या वर येऊन उन्हाळ्यातील प्रखर सूर्यप्रकाशामुळे (जास्त तापमानामुळे) मरून जातात. पक्षी त्यांना वेचून खातात.

  • मागील वर्षी ज्या ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जास्त होता, अशा ठिकाणी पिकाची फेरपालट करावी. कपाशी हेच गुलाबी बोंड अळीचे एकमेव खाद्य आहे. त्यामुळे पिकाची फेरपालट केल्यास खाद्य पिकाअभावी गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते.

  • रसशोषक किडीसाठी प्रतिरोधक व कमी कालावधीत येणाऱ्या आणि लवकर परिपक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. यामुळे सुरुवातीच्या अवस्थेतील रसशोषक कीड नियंत्रणासाठी अनावश्यक कीटकनाशकाची फवारणी टाळता येते.

  • गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव हा कपाशी हंगामाच्या मध्यापासून सुरू होऊन शेवटपर्यंत वाढत जातो. त्यामुळे लवकर परिपक्व होणाऱ्या वाणांमुळे हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात गुलाबी बोंड अळीच्या जास्त प्रादुर्भावापासून सुटका होऊ शकते.

  • पेरणी जून महिन्यात साधारणतः ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतर करावी. पिकाची चांगली उगवण होणे. सुरुवातीच्या रोपावस्थेत तग धरून राहण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. पावसाचा खंड पडल्यास दुबार पेरणीचे संकट टाळता येते.

  • पेरणी जून महिन्यात केल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी राखण्यास मदत होते.

  • कापूस उत्पादकांमध्ये गुलाबी बोंड अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनाविषयी आवश्यक जागृतीसाठी स्थानिक पातळीवरही प्रयत्न करावेत.

योगेश मात्रे, ७३८७५२१९५७, डॉ. पी. आर. झंवर, ७५८८१५१२४४

(लेखक डॉ. झंवर हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कृषी कीटकशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक असून, योगेश मात्रे हे पीएच.डी.चे विद्यार्थी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com