शेतकरी पीक नियोजन ः केळी

माझी नायगाव (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथे तापी नदीच्या लाभक्षेत्रात ४० एकर जमीन आहे. केळी प्रमुख पीक असून बेवडसाठी तूर, हळद, आले ही पिकेही घेतो.
शेतकरी पीक नियोजन ः केळी
Banana Agrowon

माझी नायगाव (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथे तापी नदीच्या लाभक्षेत्रात ४० एकर जमीन आहे. केळी प्रमुख (Banana Crop) पीक असून बेवडसाठी तूर (Tur), हळद (Turmeric), आले (Ginger) ही पिकेही घेतो. पीक फेरपालटीवर विशेष भर दिला जातो. जुलै व ऑगस्ट महिन्यांत सुमारे १५ एकर क्षेत्रावर नवती केळीची लागवड केली आहे. जुलैमध्ये ६ हजार, तर ऑगस्टमध्ये ११ हजार उतिसंवर्धित रोपांची लागवड केली आहे. संपूर्ण लागवड गादी वाफा पद्धतीने ६ बाय ५ फूट अंतरावर केली आहे.

जमीन मध्यम, पाण्याचा निचरा करणारी असल्याने त्या दृष्टीनेच सर्व बाबींचे नियोजन करत आहे. निर्यातक्षम केळी उत्पादन घेण्याचा माझा प्रयत्न असतो. सध्या बागेत केळी काढणीची कामे सुरू आहेत.

व्यवस्थापनातील बाबी ः

- अद्यापही कमाल तापमानातील वाढ कायम आहे. तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान आहे. मध्येच ढगाळ वातावरण अशी विषम स्थिती आहे. अशा हवामान स्थितीत पिकाचे व्यवस्थापन करणे अत्यंत जिकिरीचे होते. उष्णता कायम असल्याने सिंचन आणि खत व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन करत आहे.

- जुलै लागवडीमधील बागेत ९५ टक्के निसवणी पूर्ण झाली आहे. या बागेत काढणीची कामेदेखील सुरू झाली आहेत. या बागेत काही घड अति उष्णतेमुळे मध्यंतरीच्या काळात सटकले होते. त्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावण्यात आली.

- ऑगस्ट लागवडीतील बागेत ९० टक्के निसवण पूर्ण झाली आहे. निसवलेले घड स्कर्टिंग बॅगने झाकण्याचे काम सुरू आहे.

- झाडे निसवत असल्याने उष्णतेपासून संरक्षणासाठी कोरड्या केळी पानांचा गठ्ठे ठेवण्याचे कामही सतत सुरू आहे.

- दर १२ दिवसांनी फुटवे काढून घेतले. फुटवे अधिक वाढल्यास मुख्य झाडाच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम होतो.

- सध्या केळी पीक नऊ महिन्यांचे झाले आहे. उष्ण वाऱ्यांपासून बागेचे संरक्षण होण्यासाठी बागेभोवती हिरव्या नेट लावल्या आहेत. येत्या काळात तापमान कमी झाल्यानंतर काढून टाकल्या जातील. कारण पावसाळ्यात बागेत हवा खेळती राहणे गरजेचे आहे.

पुढील १५ दिवसांचे नियोजन ः

- सर्व केळी बागांमध्ये तापमानाचा अंदाज घेऊन दररोज किमान ३ तास सिंचन केले जाईल. कारण तापमान कमी होत असले तरी निसवलेल्या बागांमध्ये केळी काढणीवर येण्यासाठी पुरेसे पाणी आवश्यक असते.

- ढगाळ वातावरण व अधिक तापमानामुळे बागेत विविध समस्या उद्‍भवतात. यासाठी सिंचन आणि खतांचे योग्य व्यवस्थापन केले आहे.

- वेळापत्रकानुसार खत व्यवस्थापन केले जाईल. युरिया आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा देणे बंद केले जाईल. जुलैमधील लागवडीच्या बागेस ०ः०ः५० हे खत ५ किलो तर ऑगस्ट लागवडीस ०ः०ः५० हे खत ५ किलो आणि पोटॅश ६ किलो याप्रमाणे मात्रा प्रति एक हजार झाडांना दिली जाईल. ही मात्रा पुढील दोन आठवडे दिली जाईल.

- वादळी वाऱ्यामुळे फाटलेल्या स्कर्टिंग बॅग काढून टाकल्या जातील.

- निसवणी सुरूच राहणार असल्याने उन्हापासून संरक्षणासाठी घडांवर कोरड्या पानांचा गठ्ठा ठेवण्याची कार्यवाही आठवड्यातून दोनदा केली जाईल.

- पाऊस सुरू झाल्यानंतर कोरड्या पानांचा गठ्ठे घडांवरून काढून टाकले जातील.

- बागेत हवा खेळती राहण्यासाठी झाडाची अनावश्यक पाने व फुटवे काढली जातील.

- घडांच्या अधिक वजनाने काही वेळा झाडे कोसळतात. झाडांना आधार देण्यासाठी बांबू लावले जातील.

--------------------

- विशाल महाजन, ९२८४८४०४९९

(सायंकाळी पाच ते सात या वेळेत संपर्क साधावा)

(शब्दांकन ः चंद्रकांत जाधव)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com