शेतकरी पीक नियोजन : केळी

केऱ्हाळे बुद्रुक, पिंप्री, मंगरूळ (ता. रावेर, जि. जळगाव) येथे अतुल पाटील यांची भोकर व अभोळा नदीच्या लाभक्षेत्रात ५० एकर जमीन आहे. त्यापैकी २० एकरांवर नवती केळीची लागवड आहे.
Banana
Banana Agrowon

शेतकरी ः अतुल मधुकर पाटील

गाव ः केऱ्हाळे बुद्रुक, ता. रावेर, जि. जळगाव

एकूण क्षेत्र ः ५० एकर

नवीन केळी लागवड ः २० एकर (३० हजार केळी झाडे)

जुनी लागवड ः २० एकर (३२ हजार केळी झाडे)

..........

केऱ्हाळे बुद्रुक, पिंप्री, मंगरूळ (ता. रावेर, जि. जळगाव) येथे अतुल पाटील यांची भोकर व अभोळा नदीच्या लाभक्षेत्रात ५० एकर जमीन आहे. त्यापैकी २० एकरांवर नवती केळीची लागवड (Banana Cultivation) आहे. लागवड साधारण मे, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात टप्प्याटप्प्याने करण्याचे नियोजन (Banana Crop Management) असते. यंदा रोपांच्या उपलब्धता न झाल्यामुळे मे महिन्यात लागवड शक्य झाली नाही. सध्या जून आणि जुलै लागवड पूर्ण झाली आहे.

बेवडसाठी तूर, हळद आणि कापूस ही पिकेही घेतो. पीक फेरपालटीवर त्यांचा विशेष भर असतो. जमीन मध्यम आणि पाण्याचा निचरा होणारी असून त्या दृष्टीनेच सर्व बाबींचे नियोजन केले जाते. निर्यातक्षम केळी उत्पादन घेण्याचा अतुल प्रयत्न करतात. केळी लागवडीसाठी त्यांनी जळगाव येथील अखिल भारतीय फळे (केळी) संशोधन केंद्रातील डॉ. गणेश देशमुख यांचे मार्गदर्शन घेतात.

जून महिन्यात साडेपाच एकरांवर साडेआठ हजार रोपे तर जुलैमध्ये ६ एकर क्षेत्रावर ९ हजार केळी रोपांची लागवड केली आहे. लागवड ६ बाय ५ फूट आणि साडेपाच फूट व ५ फूट अंतरावर गादी वाफा पद्धतीने केली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात ११ एकर क्षेत्रावर १५ हजार केळी रोपांची लागवड करण्याचे त्यांचे नियोजन आहे. लागवडीसाठी उतिसंवर्धित रोपे वापरली आहेत.

Banana
केळी उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले

लागवड नियोजन ः

- उन्हाळ्यात नदी व सिंचन प्रकल्पातील गाळ उपसून शेतामध्ये टाकून घेतला.

- पाच ट्रॉली शेणखत प्रतिएकर हजार झाडे याप्रमाणे शेतात टाकून घेतले.

- महिना एप्रिल महिन्यात केळी रोपांच्या लागवडीपूर्वी जमिनीची २ वेळा आडवी व उभी खोल नांगरणी करून जमीन भुसभुशीत केली. नांगरटीनंतर मे महिन्यात कडक उन्हामध्ये जमीन तापू दिली.

- लागवडीसाठी दीड फूट उंचीचे गादीवाफे तयार केले. त्यानंतर २० दिवस आधी गादीवाफ्यावर दोन रोपांमध्ये राखावयाच्या अंतरासाठी आखणी करून घेतली.

Banana
Banana Rate : केळी दोन हजार रुपये क्विंटल

- उष्णतेपासून बचावासाठी बागेच्या पश्‍चिम दिशेला तागाची पेरणी केली.

- प्रति एक हजार झाडांसाठी ४ पोती सिंगर सुपर फॉस्फेट गादीवाफ्यात टाकून घेतले. त्यानंतर मिनी ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरने गादीवाफ्यावरील दाणेदार सुपर फॉस्फेटचे मिश्रण करून घेतले. पुन्हा गादीवाफे व्यवस्थित करून घेतले.

- गादीवाफ्यांवर ठिबकच्या नळ्या अंथरूण घेतल्या. दोन ड्रीपमध्ये सव्वा फूट अंतर राखले आहे. प्रतितास २ लिटर पाणी ड्रीपरद्वारे दिले जाते.

- लागवडीसाठी रोपवाटिकेत लागवड नियोजनानुसार ३२ हजार रोपांची आगाऊ नोंदणी केली. प्रति रोप साधारण १५ रुपये दराने मिळाले.

- लागवडीच्या ५ दिवस आधी रोपे आणून ठेवली. त्यानंतर लागवडीपूर्वी रोपांवर बुरशीनाशके व कीटकनाशकांची फवारणी केल्या.

- ठिबकद्वारे गादीवाफे चांगले भिजवून घेतले. त्यानंतर साधारण मजुरांच्या मदतीने रोपांची लागवड केली.

- लागवडीनंतर त्वरित ठिबकद्वारे पाणी दिले. त्यानंतर प्रतिदिन ३ तास याप्रमाणे सिंचन केले.

- लागवडीनंतर दुसऱ्या दिवशी सेंद्रिय घटकांची आळवणी (ड्रेंचिंग) तसेच आठव्या आणि पंधराव्या दिवशी कीडनाशकांची फवारणी केली.

- दर आठ दिवसांनंतर कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) साठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शिफारशीप्रमाणे फवारणी घेतली.

- लागवडीनंतर १५ दिवसांनी २४ः२४ः० हे खत एक हजार झाडांना एक पोते याप्रमाणे बांगडी पद्धतीने दिले.

पुढील १५ दिवसांतील नियोजन ः

- एक हजार झाडांना १० किलो झिंक, १० किलो सल्फर (दाणेदार) व फेरस १० किलो ही खते गादीवाफ्यावर टाकून लगेच मातीआड केली जातील.

- सध्या पाऊस सुरू आहे. पावसात किमान ८ दिवसांचा खंड

पडल्यास दिवसातून २ तास ठिबक चालू केला जाईल.

- मजुरांच्या मदतीने तणनियंत्रण केले जाईल. तणनियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर टाळला जातो. कारण रोपांचे नुकसान होण्याची भीती असते.

- मागील दोन वर्षांपासून कुकुंबर मोझॅक विषाणूचा प्रादुर्भाव दिसत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दर ८ दिवसांनी पावसात उघडीप राहिल्यास कीडनाशकांनी फवारणी केली जाईल.

- सध्या रोपे एक महिन्याची झाली आहेत. रोपांचे सतत निरीक्षण केले जाईल. कारण, पावसाळी वातावरणामुळे पोंग्यात अळ्यांचा प्रकोप होण्याची शक्यता असते. तसेच हुमणी अळीची समस्याही वाढते. ही बाब लक्षात घेऊन फवारणीचे नियोजन केले जाईल.

- ड्रीपमधून मुळांची कक्षा रुंदावण्यासाठी ड्रीपद्वारे विद्राव्य खते दिली जातील.

---------------------

- अतुल पाटील, ९८२२४५१६२१

(सायंकाळी सहा ते नऊ वेळेत संपर्क साधावा.)

(शब्दांकन ः चंद्रकांत जाधव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com