Banana Crop Management
Banana Crop ManagementAgrowon

Banana Crop : शेतकरी अतुल पाटील यांचे केळी पीक नियोजन

के ऱ्हाळे बुद्रुक, पिंप्री, मंगरूळ (ता. रावेर, जि.  जळगाव) येथे अतुल मधुकर पाटील यांची भोकर व अभोळा नदीच्या लाभक्षेत्रात ५० एकर जमीन आहे. त्यापैकी साधारण २१ एकरांवर नवती केळीची लागवड आहे.

शेतकरी ः अतुल मधुकर पाटील

गाव ः केऱ्हाळे बुद्रुक,

ता. रावेर, जि. जळगाव

एकूण क्षेत्र ः ५० एकर

केळी लागवड ः २१ एकर (३४ हजार झाडे)

केऱ्हाळे बुद्रुक, पिंप्री, मंगरूळ (ता. रावेर, जि.  जळगाव) येथे अतुल मधुकर पाटील यांची भोकर व अभोळा नदीच्या लाभक्षेत्रात ५० एकर जमीन (Agriculture Land) आहे. त्यापैकी साधारण २१ एकरांवर नवती केळीची लागवड (Banana Cultivation) आहे.

ही लागवड जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत टप्प्याटप्प्याने लागवड केली आहे. सध्या त्यांच्याकडे २१ एकरांत सुमारे ३४ हजार केळी झाडे आहेत. संपूर्ण क्षेत्रावरील लागवडीसाठी उतिसंवर्धित रोपांचा उपयोग केला आहे.

बेवडासाठी तूर, हळद ही पिकेही घेतली जातात. पीक फेरपालटीवर विशेष भर दिला जातो. जमीन मध्यम, पाण्याचा निचरा करणारी असल्याने त्या दृष्टीनेच सर्व बाबींचे नियोजन केले जाते.

निर्यातक्षम केळी उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. केळी बागेचे संपूर्ण व्यवस्थापन हे जळगाव येथील अखिल भारतीय फळे (केळी) संशोधन केंद्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.

Banana Crop Management
Banana Crop Insurance : केळी फळपीक विमा योजनेत वराती मागून घोडे

व्यवस्थापनातील बाबी

सध्या बाग सव्वासात महिन्यांची झाली आहे.

या आठवड्यात निसवण सुरू झाली आहे. त्या दृष्टीने मागील २० ते २२ दिवस नियोजन केले आहे.

थंडी कमी अधिक प्रमाणात आहे. मागील काही दिवस थंडी व ढगाळ वातावरणही होते.

थंडीच्या काळात बागेत गोवऱ्या व पालापाचोळा पेटवून धूर केला. जेणेकरून बागेला ऊब मिळेल.

तापमान कमी होत असल्याने बागेस रात्रीच्या वेळी सिंचन केले.

काही झाडांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव बागेत दिसून आला. त्यासाठी बुरशीनाशकांची एक फवारणी घेतली.

Banana Crop Management
Banana Crop Insurance : जेव्हा कंपनीला नफा, तेव्हा का नाही जिओ टॅगिंग?

खत व्यवस्थापन

पुढील काही दिवसांत निसवण वेगाने होईल. त्यानुसार खत आणि सिंचन नियोजन केले जाईल.

झाडांवरील फण्यांची विरळणी सुरू केली आहे. एका झाडावर फक्त नऊ फण्या ठेवत आहे.

थंडी जास्त प्रमाणात असल्यामुळे झाडांना अमोनिअम सल्फेट ८ किलो व पोटॅश १२ किलो प्रति एक हजार झाडे या प्रमाणे ठिबकद्वारे दिले.

त्यानंतरच्या दुसऱ्या आठवड्यात एक हजार झाडांना युरिया ८ किलो, मॅग्नेशिअम २ किलो आणि पोटॅश १२ किलो प्रमाणे प्रति १ झाडांना प्रमाणे दिले. त्यामुळे बागांच्या निसवणीला लाभ होताना दिसून आला.

थंडीमध्ये निसवणीवर परिणाम होतो. मात्र अचूक व योग्य मात्रेत खत व्यवस्थापन केल्यामुळे झाडांची निसवण चांगली झाल्याचे दिसून आले.

Banana Crop Management
Banana Crop Insurance : केळी पिकाची पडताळणी थांबवण्याची भाजप नेत्यांची मागणी

कीड- रोग व्यवस्थापन

सध्या थंडीच्या प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले असून ढगाळ वातावरण अशी स्थिती आहे. बदलत्या वातावरणामुळे बागेत समस्या निर्माण होतात. त्यासाठी कीटकनाशके आणि बुरशीनाशकांच्या प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या आहेत.

त्रिची (तमिळनाडू) येथील राष्ट्रीय संशोधन केंद्राच्या शिफारशीनुसार झाडांवर पोटॅशिअम डाय हायड्रॉक्साइड (पीडीएच), एक संप्रेरक व बुरशीनाशक यांची फवारणी केली. त्याचा झाडांच्या वाढीसह ताकदीला लाभ होणार आहे.

मागील कामकाज

बागेत वाढलेले फुटवे वेळोवेळी काढून घेतले आहेत.  बागेत वाढलेले गवत तसेच बांधावरील गवत काढून बाग स्वच्छ केली. बागेत स्वच्छता राखण्यावर विशेष भर होता.

मागील काही दिवसांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस दरम्यान तर कमाल तापमानही वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन सिंचनाचा कालावधी वाढविला आहे. बाग निसवत अवस्थेत असल्याने रोज ४ तास सिंचन सुरू केले आहे. बागेत वाफसा स्थिती कायम राहील याची काळजी घेतली जाईल.

ठिबकद्वारे पीएसबी देण्यात आले.

बागेत वन्यप्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी संरक्षणात्मक बाबींवर भर दिला आहे.

आगामी नियोजन

येत्या काही दिवसांत थंडी कमी होऊन उष्णता वाढण्यास सुरुवात होईल. त्या अनुषंगाने सिंचनावर कटाक्षाने भर दिला जाईल. बागेतील वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन सिंचनाचा कालावधी कमी जास्त केला जाईल.

केळी निसवण सुरूच राहील. त्यामुळे चार ते पाच दिवसांआड फण्यांची विरळणी केली जाईल.

बागेत फ्रूट केअर तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. घडांना स्कर्टिंग बॅग लावल्या जातात. जेणेकरून घडाला चमक मिळते. तसेच किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

वाढत्या तापमानात घडांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यकतेनुसार योग्य उपाययोजनांचा अवलंब केला जाईल.

नियमितपणे फुटवे काढून घेतले जातील.

पुढील काळात फक्त विद्राव्य खतांच्या वापरावर भर दिला जाईल. सोबत जिवाणू खते, स्लरीचा वापर केला जाईल. जेणेकरून दर्जेदार घडांचे उत्पादन मिळेल.

बागेची वेळोवेळी पाहणी करून आवश्यकतेनुसार कीड-रोगांसाठी फवारणी घेतली जाईल.

निसवणीच्या काळात वन्यप्राणी बागेतील झाडांचे तसेच ठिबक संचाचे नुकसान करण्याची भीती असते. त्यासाठी बागेचे सातत्याने पाहणी करणे आवश्यक असते. वन्यप्राण्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य काळजी घेतली जाईल.

- अतुल पाटील, ९८२२४५१६२१

(सायंकाळी सहा ते नऊ वेळेत संपर्क साधावा)

(शब्दांकन ः चंद्रकांत जाधव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com